Biodiversity-rich forests with saga trees.
Biodiversity-rich forests with saga trees.

बर्माचा साग... कृषी पर्यटनाला जाग!

कृषी पर्यटन आणि पर्यावरण पर्यटन अशा दोन्ही व्यवसायांना मान्यमारमध्ये मोठी संधी आहे. इथलं सरकार कृषी पर्यटनाला चालना देत आहे. एका बाजूला हिमालय, मध्ये इरावडीसारखी महाकाय नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशी भूस्थिती. सागाची प्रचंड जंगलं इको पर्यटनासाठी पूरक ठरतात.

कृषी पर्यटन आणि पर्यावरण पर्यटन अशा दोन्ही व्यवसायांना मान्यमारमध्ये मोठी संधी आहे. इथलं सरकार कृषी पर्यटनाला चालना देत आहे. एका बाजूला हिमालय, मध्ये इरावडीसारखी महाकाय नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशी भूस्थिती. सागाची प्रचंड जंगलं इको पर्यटनासाठी पूरक ठरतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात बसून नाश्ता आटोपला. नाश्त्याचं ठिकाण होतं छोटंसं ॲग्रोटुरिझम सेंटर. शेतात गवताने शाकारून बनवलेलं खोपटं. तेलाचा घाणा, घरगुती गूळ बनवण्याचं लहानसं गुऱ्हाळ. आश्चर्य म्हणजे या गुळापासून इथं राजरोसपणे दारूही बनवली जातेय. असली पर्यटन केंद्रे आपल्याकडे काय झिंगाट धंदा करतील, या नुसत्या कल्पनेनेच डोक्याला झिंग आली.   इथल्या सरकारने कृषी पर्यटनाला चालना द्यायचं ठरलंय. टुरिझम उद्योजक संघटना आणि म्यानमारच्या हॉटेल आणि टुरिझम मंत्रालयानेदेखील, जंगल सफारी, नदीवरील क्रूझ यासारखी नवनवीन पॅकेज तयार केल्याचं समजलं.     या देशात इकोटुरीझम उद्योगाला चांगला वाव आहे. एका बाजूला हिमालय, मध्ये इरावडीसारखी महाकाय नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. त्याचबरोबर भरपूर जंगलं, मौल्यवान रत्नांच्या, सोन्याच्या खाणी, कोरडवाहू शेतीपासून चहाच्या मळे अशा विविधतेने नटलेल्या म्यानमारमध्ये कृषी पर्यटन आणि इको टुरिझमला मोठी संधी आहे. पण लष्कराचा विळखा या देशाला पडल्यानं लोकशाही नावालाच आहे. शेजारी डोक्यात सतत वळवळणारे लाल किडे पाळणारा शातीर चीन त्यांना खतपाणी घालतोय. त्यामुळे लोकशाहीचा हा बेगडी मुलामा कधीही गळून पडेल अशी भीती येथील लोकांना सतत वाटत राहते. (सध्या झालंही तसंच, मिलिटरी शासन लोकशाहीवाद्यांची आंदोलने दडपण्यात गुंगलं आहे.) अशा या वातावरणात कृषी पर्यटनाचं  रोपटं किती आणि कसं फुलेल, याची लोकांना चिंता आहे.  श्री. हाताय यांनी ‘‘उशीर होतोय, निघूया’’ असं घड्याळाकडे बोट दाखवत खुणावलं. फटाफट नाश्ता आटोपला आणि निघालो. उजव्या बाजूला नैसर्गिक जंगल आणि वामांगी कृत्रिम सागाचं जंगल माझी सोबत करतंय. म्यानमार हा सागासाठी प्रसिद्ध देश. बर्मा-टीक, म्हणजे म्यानमारी साग जगात भारी. दक्षिणेतील ‘पेगू’ आणि ‘तानासेरीम’ च्या डोंगराळ भागात सागाची मोठी जंगलं आहेत. या व्यतिरिक्त पश्चिमेतील ‘अरकान’ आणि पूर्वेतील ‘शान’ टेकड्यातही सागाची जंगलं वसलेली आहेत. इतर लाकडापेक्षा सागाचा पाण्याला प्रतिरोध जरा जास्त, त्यामुळे फर्निचर आणि जहाजबांधणीत त्याला पूर्वीपासून मोठी मागणी आहे. तसं साग हे भारत, म्यानमार, लाओस आणि थायलंड या देशातील मूळ निवासी. समुद्रसपाटीपासून ३००० फुटांच्या आत साग वाढतो. अगदी जुनाट पानाचं ओझंही अंगावर न ठेवणारा निर्मोही साग, मिश्र पानझडीच्या आणि सदाहरित अशा दोन्ही प्रकारच्या जंगलात स्वतःला सामावून घेतो.    देशाच्या अर्थव्यवस्थेत म्यानमारी सागाचा मोठा वाटा आहे. १९८० मध्ये म्यानमारच्या एकूण निर्यातीत एकट्या सागाचा वाटा ३३% एवढा भरभक्कम होता. एकोणिसाव्या शतकात अँग्लो बर्मीज युद्धात जिंकल्यावर, म्यानमारचे सागाचे हिरवेगार जंगलं गोऱ्यांच्या ताब्यात गेली. जगात सर्वात भारी नौसेना आलेल्या ब्रिटनला जहाजबांधणीच्या  व्यवसायासाठी बर्मीज सागाच्या रूपाने लॉटरीच लागली. सुरवातीला सागावर सरकारी नियंत्रण ठेवणाऱ्या गोऱ्यांनी १८२९ मध्ये खासगी कंपन्यांसाठी सागतोड खुली केली. मग काय जंगलांचे लचके तोडायला खुली छूट मिळाली.  १९४८ मध्ये म्यानमार स्वतंत्र झाला. सागाच्या धंद्याची सोन्याची  चिमणी राजकारण्यांच्या हातात आली. १९८८ मध्ये ‘ने विन’र च्या लष्करी आधिपत्याखाली देश गेला. लष्कराला हत्यारं आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी पैशाची गरज होती. मग काय! जास्तीत जास्त साग तोडून परदेशात निर्यात करण्याचा या मिलिटरी सरकारने सपाटा चालवला. १९९० मध्ये जास्तीत जास्त सागाची तोड करून जंगलांचं आरोग्य बिघडवून देशाची लष्करी अर्थव्यवस्था सुधारवान्याचा शासनाने प्रयत्न केला गेला. शासनाच्या विचित्र निर्णयामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली.    लोकशाही सरकार आल्यावर २०१४ मध्ये सागाचं लाकडावर निर्यातबंदी लावली गेली. पण बेकायदेशीर लाकूडतोड मोठ्या प्रमाणात सुरु आहेच. उत्तर सीमेवर चीन मोठ्या प्रमाणात म्यानमारमधून साग चोरून नेतोय. २०१५ मध्ये नुकत्याच अस्तित्वात आलेल्या लोकशाही सरकारने शातीर चीनशी पंगा घेत १५३ चिनी लाकूड चोरांना फासावर लटकवले होतं.  सागाच्या धंद्यात विस्कळित झालेला निसर्ग कृषी पर्यावरणाने थोडासा का होईना सावरावा आणि बर्मीज टीकची ही वाचलेली जंगलं टिकावी असं ब्रह्मदेशी ब्रह्मदेवाला साकडं घातलं. मानवाने निसर्गाची चालवलेली ससेहोलपट पाहून संतापात मूठ पिळली गेली. त्यामुळे राग कमी झाला नाही, उलट बुलेटचा एक्सेलरेटर जरा जास्त पिळला जाऊन बाईकने उसळी घेतली. बाईकच्या धकधक आवाजावर लक्ष केंद्रित करत मनाला शांत करायचा प्रयत्न करत पुढे निघालो.  ‘ताऊंगया’ शेती पद्धतीने केला जैवविविधतेचा घात १९४१ मध्ये ब्रिटन सरकारने म्यानमारमध्ये पहिला ‘फॉरेस्ट सुप्रिटेंडन्ट’ नेमला. या सुप्रीच्याने सागासाठी जंगलतोडीची ‘ताऊंगया’ ही नवीन पद्धत अवलंबली.  सागाची जुनी जंगलं तोडायची, उरलेली झाडेझुडपे आणी गवतावर काडी टाकून राखरांगोळी करायची. जाळून साफ झालेल्या जमिनीवर नवीन सागाची झाडे लावायची. हे साग मोठे होईपर्यंत इतर पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करायची. या ''ताऊंगया'' पद्धतीने हजारो हेक्टर जंगलांच्या जैवविविधतेचा बट्ट्याबोळ केला. सरकणाऱ्या शेतीने पर्यावरणाचा समतोल सरकवला होता. ‘ताऊंगया’ शेतीला ‘करेन’ या स्थानिक आदिवासी लोकांची मदत मिळेल अशी ब्रिटिशांना आशा होती. पण गोऱ्यांच्या या मतलबी शेतीपद्धतीला ''करेन'' लोकांनी कडाडून विरोध केला. ही जंगलं म्हणजे त्यांचा शतकानुशतकांचा अधिवास. तो गमावून व्यावसायिक शेती करणं त्यांनी साफ नाकारलं. आपल्या फायद्यासाठी कायदे करून कायदेशीर पद्धतीने काम काढण्यात पटाईत गोऱ्यांनी वेगवेगळे कायदे बनवले. देशातील सर्व जमीन सरकारच्या मालकीची आहे असा कायदा केला. त्यामुळे ''करेन'' लोकं शतकानुशतके ती बेकायदेशीररीत्या कसतायेत असा निवाडा केला. कोर्टकचेऱ्या बनवून बेकायदेशीररीत्या कायदाकायदा खेळत ''करेन'' लोकांना गुन्हेगार ठरवून छळलं. अगदी स्थानिक लोकांना जळणासाठी लाकूडफाटा नेणंही बेकायदेशीर होतं. बर्मीज राष्ट्रवादी पार्टीने ब्रिटिश सरकारला ''लोकांना जळणासाठी तरी लाकडं तोडू द्या'' असं समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ही विफल ठरला. -डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com