शेतीच्या गप्पा आणि थायलंडचा बाप्पा...

थायलंडचा विकास शेतीविकासाच्या वाटेनंच झालाय. शेतीचा विकास होण्यासाठी शासनाच्या पायाभूत सुविधा, शिक्षण या बरोबरच शेतीत खासगीकरण आणि गुंतवणुक होण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसते. हा देश अन्नधान्याचा मोठा निर्यातदार आहे.
Tilapia Farm and commercial prawn farming in Thailand.
Tilapia Farm and commercial prawn farming in Thailand.

थायलंडचा विकास शेतीविकासाच्या वाटेनंच झालाय. शेतीचा विकास होण्यासाठी शासनाच्या पायाभूत सुविधा, शिक्षण या बरोबरच शेतीत खासगीकरण आणि गुंतवणुक होण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसते. हा देश अन्नधान्याचा मोठा निर्यातदार आहे.  म्या नमारची सीमा ओलांडून आमच्या बुलेट थायलंडच्या रस्त्याला लागल्या आणि चॅनेल बदलावं तसं चित्र बदललं. सुबक प्रशस्त रस्ते, नजर जाईल तिथपर्यंत हिरवंगार जंगल आणि शेती. सगळीकडे कशी मस्तपैकी स्वच्छता आणि टापटीप. लोकांच्या चेहऱ्यावरून सतत झिरपणारं स्मित हास्य आणि खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत नजरेत भरणारी सुबत्ता. सगळं कसं मनमोहक!  थायलंड भारतापेक्षा विकसित देश आहे. दरडोई राष्ट्रीय सकल उत्पन्नात जिथं भारत १४२ व्या क्रमांकावर आहे, तिथं इवल्याशा थायलंडने ८२ वा क्रमांक पटकावलाय. यांचं चलन आहे ‘बाथ’. भारतीय रुपयांपेक्षा ‘बाथ’ दुप्पट भाव खाऊन जातो. एक बाथ म्हणजे दोन रुपये, हे गणित पाहिल्यावर, ‘वाह, क्या ‘बाथ’ है!’ असं म्हणावसं वाटतं.  शेतीव्यवसावर आधारित उत्पादने थायलंडमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. ती आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्धही आहेत. पाच लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला साडेसहा कोटी लोकांचा हा देश शेतीच्या बाबतीत खऱ्या अर्थाने विविधता बाळगून आहे.  इथल्या प्रमुख पिकांची यादी भात, नारळ, कॉफी, पाम, सोयाबीन, चवळी, ऊस, डूरीयन फळ, केळी, संत्रा, टॅपिओका म्हणजे साबुदाण्याचा कंद, टोमॅटो, वेगवेगळा भाजीपाला, रबर, हेम्प, रेशीम उद्योग अशी लांबत जाते. या यादीव्यतिरिक्त अजून एका प्रकारची शेती इथं मोठ्या प्रमाणात केली जाते, ती म्हणजे किड्यांची शेती. कारण वेगवेगळ्या किड्यांचा थायलंडमधील जेवणात समावेश असतो. किड्यांचे संगोपन करणारे फार्म (मी स्वतः याला ‘वळवळे फार्म’ संबोधतो.) थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.  थायलंडच्या विकासात शेतीव्यवसायाचा मोठा वाटा आहे. शेतीत झालेल्या बदलांमुळे १९६० मध्ये ६० टक्के असलेली बेरोजगारांची संख्या २००० पर्यंत १० टक्क्यांच्या घरात आली. बालकुपोषितांची संख्या १७ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर घसरली होती. ही जादू साधली ती शासनाच्या पायाभूत सुविधा, शिक्षण या बरोबरच शेतीत खासगीकरण आणि गुंतवणुक होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे.  त्यामुळे येथील उद्योगधंद्यांना बरकत आली. गावागावात सिमेंट आणि डांबरी रस्ते पोहोचलेत. रस्ते हे रक्तवाहिन्यांसारखे असतात. शासनाने रस्ते बांधले आणि लोकांनी त्यात आडवे पाय न घालता आपल्या गावातून आणि शेतातून जाऊ दिले.  याच डांबरी रक्तवाहिन्यांमुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं शक्य होतंय.  यांच्या शेती आणि शेतकऱ्याच्या विकासाची प्रचिती  वेगवेगळ्या पिकांच्या जागतिक यादीतील स्थान पाहिलं की येते. ऊस उत्पादनाच्या जागतिक यादीत ब्राझील, भारत आणि चीनसारख्या महाकाय देशानंतर थायलंडने ४ था क्रमांक राखलाय. भात उत्पादनात जगात ६ वा, शाबुकंदात २ रा आणि पामतेलात तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे. नैसर्गिक रबरात तर त्यांनी बाजीच मारलीय. रबराला ताणून तुटेपर्यंत राजकारण न आणल्याने या पिकात जगात अव्वल स्थान पटकावलंय. आंब्याच्या पिकात तिसरा क्रमांक, तर काटेरी अननसानं चवथं स्थान धरून ठेवलंय. देवाच्या करणीने ज्या नारळात पाण्याचा झरा फुटलाय, त्या नारळाच्या उत्पादनात थायलंड जागतिक यादीत नववं स्थान पटकावून खऱ्या अर्थानं डॉलरचा झरा देशात आणतंय.     थायलंडची शेतीमालाची वार्षिक निर्यात एक लाख कोटी ‘बाथ’ म्हणजेच दोन लाख कोटी रुपये एवढी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत चार लाख कोटी रुपयांचा शेतीमाल विकला जातो. सर्वात जास्त निर्यात भाताची होते. जसा जेवणाच्या ताटात इतर पदार्थांच्या तुलनेत भाताचं मानाचं स्थान असतं, त्याचप्रमाणे एकूण अन्नधान्याच्या तुलनेत साडेसतरा टक्के भात निर्यात होतो. त्यानंतर नंबर लागतो तो चिकन, ट्युना मासा, साखर, शाबुकंदाचं पीठ आणि झिंगे यांचा.  आख्ख्या जगाच्या एकूण अन्न निर्यातीत थायलंडचा वाटा आहे घसघशीत अडीच टक्क्यांचा. आपल्यासारख्या आकाराने आणि लोकसंख्येने मोठ्या देशांपेक्षाही शेतीमालाच्या निर्यातीत या लहानग्या देशाने मारलेली बाजी खरंच प्रशंसनीय आहे. अशा या सुजलाम् सुफलाम् देशात फिरताना मजा येतेय. लोक प्रेमळ आणि सहृदय आहेत. वेळोवेळी मदतीसाठी तयार असतात.  पुणे-सिंगापूर-पुणे या २०,००० किमीच्या बाईक मोहिमेदरम्यान आम्ही थायलंडमधून प्रवास करत होतो. दुतर्फा हिरवेकंच डोंगर आणि गुळगुळीत डांबरी रस्ते यामुळे बाइकिंगची मजा वाढत होती. हिरव्यागार किनारीच्या चकाचक रस्त्यावर आम्ही बुलेटच्या डीजेच्या तालावर निघालो होतो. आजूबाजूच्या थाई वाड्यावस्त्यांतून शिजणाऱ्या अन्नपदार्थांचा वास घेऊन हवेची थंडगार झुळूक ''वळवळणाऱ्या थाई जेवणाला या हो!'' असं आवताण देत गावभर हिंडत होती. थाई भाषेला एक विशिष्ट लय आहे. इथले लोकही हळुवार मृदू सुरात बोलतात. मी भांडणारे थाई बघितले नाहीत अजून... पण ते सुद्धा आपल्या तमाशातील सवाल जबाबासारखेच गाण्यात भांडत असावेत, असं मला वाटलं. असो.  थायलंडचा बाप्पा... ‘फ्रा फिकनेट’ ‘अरे थांबा ! थांबा!’ अशी हाकाटी आली आणि ब्रेक मारून बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली. आमच्या सुखासीन प्रवासात ‘थांबा थांबा’च्या हाकाटीने व्यत्यय आणला होता. ‘अरे ही बघा, कसली मूर्ती आहे इथं’. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ती मूर्ती बघून आमचे बायकर्स थांबले होते. ‘मित्रांनो, हे तर आपले गणपती बाप्पा,’ मी उत्साहाने उद्‌गारलो. रस्त्याच्या कडेला एक खोपटं होतं. आणि त्या खोपट्यासमोर तुंदिलतनुधारी सोनेरी थाई बाप्पा आपल्या सुबक ठेंगण्या थाई भक्तांना आशीर्वादाची पोझ देत उभे होते.  थायलंडमध्ये गणपतीला ‘फ्रा फिकनेट’ असं म्हणतात. चांगली वीत दोन वीत लांब अगरबत्ती लावून त्याची पूजा केली जाते. थायलंड सरकारच्या ‘ललित कला खात्याचं’ प्रतीकही गणेशाची प्रतिमा आहे. येथील मोठ्या मोठ्या टीव्ही कंपन्यांच्या आवारात बाप्पाची स्थापना केलेली असते. म्हणजे अख्ख्या देशाला ‘दूरदर्शन’ घडविणाऱ्यांचा दिवस बाप्पाच्या ‘दर्शनाने’ होतो तर! थायलंड मधील सर्वांत जुनी गणेश मूर्ती ‘फांग ना’ इथं आहे. ही मूर्ती १०व्या  शतकातील आहे. ‘चाचोंग साओ’ हे गणपतीचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात गणेशाच्या तीन अवाढव्य मूर्ती आहेत. त्यातील ‘फ्रा अंकाट’ मंदिरात तर ४९ मीटर उंचीचे बाप्पा बसलेत. जगातील सर्वांत उंच गणेशाची मूर्ती थायलँडमध्ये आहे असा येथील लोकांचा दावा आहे. ब्रॉन्झची ही विघ्नहर्त्याच्या मूर्ती थायलंडमधीलच नाही, तर जगातील सर्वोच्च गणेशमूर्ती आहे असं लोक म्हणतात. आम्ही सर्व बायकर बाइक उतार झालो. या थाई बाप्पासमोर हात जोडले. आमची ही मोहीम ‘कोणतेही विघ्न न येता पार पडू दे रे बाप्पा!’ असं साकडं घातलं. आपल्या विसर्जनाच्या मिरवणुकीत ‘धतर ततर... धतर ततर’ असं ढोल-ताशाच्या तालावर मुक्तछंदातलं नृत्य करणाऱ्या भारतीय भक्तांकडे बाप्पाने गंभीर नजरेनं पाहिलं आणि ‘तुम भी क्या याद करोगे’ असं म्हणत ‘तथास्तु’ म्हटलं असावं. - डॉ. सतीलाल पाटील,  ९९२२४५९७८४ (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस  प्रा. ली. कंपनीचे संचालक आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com