थाई बीजा पोटी... फळे रसाळ गोमटी

भाजीपाला, मका, भात यांसारख्या बियाण्यांच्या उत्पादनात लहानमोठे थाई शेतकरी व्यग्र असतात. एकूणच बीजोत्पादन उद्योग थायलंडमध्ये चांगलाच रुजलाय. बियाणे निर्यातीतही त्यांचा जगात २४ वा क्रमांक लागतो. आशिया खंडात जपान आणि चीननंतर थायलंड तिसरे मोठे बीजनिर्यातदार आहेत.
चियांगमाई येथील सेंद्रिय पद्धतीने घेतले जाणारे मक्याचे उत्पादन. आणि मक्यापासून तयार केलली वैशिष्ट्यपूर्ण डिश.
चियांगमाई येथील सेंद्रिय पद्धतीने घेतले जाणारे मक्याचे उत्पादन. आणि मक्यापासून तयार केलली वैशिष्ट्यपूर्ण डिश.

भाजीपाला, मका, भात यांसारख्या बियाण्यांच्या उत्पादनात लहानमोठे थाई शेतकरी व्यग्र असतात. एकूणच बीजोत्पादन उद्योग थायलंडमध्ये चांगलाच रुजलाय. बियाणे निर्यातीतही त्यांचा जगात २४ वा क्रमांक लागतो. आशिया खंडात जपान आणि चीननंतर थायलंड तिसरे मोठे बीजनिर्यातदार आहेत. पावसाची रिपरिप सुरू होती. गेले काही दिवस रोज संध्याकाळी चारनंतर, कर्जवसुली करणाऱ्या सावकारागत तो, न चुकता हजर होई. इथलं वातावरण तसं दमट आहे. त्यामुळे दुपारी सूर्य डोक्यावर आला की उकडतं, आणि त्याने पश्‍चिमेच्या पलंगावर अंग टाकलं, की थंड वाऱ्याचा पंखा सुरू होतो. त्यात पावसाचा शिडकावा सुरू झाला की मग थंडी चोरपावलाने नको तिथपर्यंत पाझरते. बाइकवरचा वारा त्या थंडीला अजून थंडगार बनवतो. असा हा थंडा मामला घशाखाली काहीतरी गरमागरम पदार्थ टाकून संपवावा लागतो. आताही तेच करायचं ठरवलं. समोरच्या डोंगरापलीकडे छोटंसं गाव असल्याचं गुगले काका सांगताहेत. ॲक्सिलेटर पिळलं. बाइकने काही घोट पेट्रोल पिऊन त्या लहानशा घाटापलीकडे गावात पोहोचवलं. थायलंडच्या गावागावांत असतं, तसंच लहान टपरीसारखं हॉटेल चौकात होतं. धडधडती बाइक टपरीसमोर थांबली. टपरीमालकीण आणि गिऱ्हाइकांनी आश्‍चर्यमिश्रित चिमुकल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं.    ‘‘गरम काय आहे?,’’ कपाळावर ओघळणारे पाण्याचे थेंब निथळणाऱ्या घामासारखे बोटांनी बाजूला सारत त्याला विचारलं. कॉफी! ती गुणगुणली. पण रोजरोज कॉफी पिऊन कंटाळा आला होता. दुसरं काय दिसतंय का, ते शोधत असतानाच, समोर ठेवलेली मक्याची कणसे दिसली. छोट्याशा लोखंडी पेटीत कोळसे टाकून त्यावर ती मक्याची कणसे भाजत होती. आपल्याकडे मक्याला त्याच्यावरील आवरण काढून दिगंबर अवस्थेत भाजतात. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, ती मक्याच्या कणसांना त्याच्या वरील आवरणासह भाजत होती. मी कुतूहलाने तिच्याकडे पाहू लागलो. शेजारी गॅसवरच्या कुकरमध्ये कदाचित मक्याची कणसे उकडायला ठेवली असावीत. आता भूक नाहीये, असं एक मन ‘माका नको गो’ म्हणत असताना, दुसऱ्या मनाने ‘एक डिश द्या’ अशी खुणेने ऑर्डर दिली. पुढच्या पाच मिनिटांत एका प्लेटमध्ये दोन स्वीटकॉर्न म्हणजे मधुमक्याचे मक्याची कणसं घेऊन ती मकावूमन हजर झाली. कणसांमध्ये कुल्फीसारखी काडी खोचलेली, नारळाच्या दुधात त्याला अभ्यंग स्नान घातलं आहे, हे स्पष्ट दिसत होत. हिरवी मिरची त्याच्या रंगसंगतीत भर घालत होती. गरमगरम भुट्ट्याचा लचका तोडला आणि वाह! अशी दाद नकळत निघून गेली. चव छान होती. मका या देशासारखाच गोड होता. स्वीटकॉर्नमध्ये १८ टक्क्यांपर्यंत साखर असते. जास्त करून ही साखर सुक्रोजच्या स्वरूपात असते. आपल्या गोडीमुळे मधुमका खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. माणसाच्या खाद्याबरोबरच पशुखाद्य म्हणून मका मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मक्याचं पीक थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. वर्षाकाठी ५० लाख टन मका थायलंडमध्ये पिकतो. थायलंडमध्ये मका एप्रिल-मे आणि जुलै ऑगस्ट अशा दोन हंगामांत पेरला जातो. दीडशे दिवसांचं हे पीक थाई शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देतं. पण गेल्या काही वर्षांत शेंडा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव या पिकात झालाय. या फायद्याच्या पिकाचा नफा शेंडेअळीने कुरतडला होता. शेंडेअळीला हरवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे फवारे मक्याच्या शेतात उडताहेत.  कोणत्याही व्यवसायाच्या भरभराटीत राजाश्रयाचा मोठा वाट असतो. थायलंडमधील मक्याच्या भरभराटीला सरकारचा मोठा आधार आहे. मक्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार बिनव्याजी कर्ज देते. मका उत्पादनात थायलंड २५ व्या क्रमांकावर असून, निर्यातीत त्यांचा १५ वा क्रमांक लागतो. याउलट घटक चाचणीत पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत सपशेल नापास व्हावा, तसा मका उत्पादनात जगात सातव्या क्रमांकावर असणारा भारत निर्यातदारांच्या यादीत दूरदूरपर्यंतही सापडत नाही. बियाण्यांच्या बाबतीतही तेच. त्यांनी मका बियाण्यांचे उत्पादन देशांतर्गत गरजेइतकं करून निर्यातीतही सिंहाचा वाटा उचलला आहे.  मकाच काय पण इतर पिकांच्या बियाण्यांच्या उत्पादनात त्यांनी मानाचं स्थान पटकावलंय. भाजीपाला, मका, भात यांसारख्या बियाण्यांच्या उत्पादनात लहानमोठे थाई शेतकरी व्यग्र असतात. एकूणच बीजोत्पादन उद्योग थायलंडमध्ये चांगलाच रुजलाय. येथील योग्य वातावरण, भौगोलिक परिस्थिती, आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेली गुंतवणूक यामुळे बियाणे व्यवसायाने इथं चांगलंच बाळसं धरलंय. सरकारने योग्य धोरणं राबवून त्याला खतपाणी घातलंय. परिणामी, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणूक करत बियाणे विकसित आणि उत्पादित करणारे प्रकल्प इथं राबवले आहेत. बियाणे व्यवसायात परदेशी गुंतवणूक वाढते आहे. थायलंड बियाण्यांची खाण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. योग्य त्या नेमक्या गुणाचं बियाणं मिळणं, कीड-रोग प्रतिकारक वाण विकसित करणं, देशी परदेशी कंपन्यांचे संशोधन आणि विकास कार्यक्रमात विकसित होणाऱ्या नवीन जाती, ही थायलंडच्या बियाण्याची खासियत आहे. खासकरून मका आणि भाजीपाल्याच्या बियाण्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जसा इतर उत्पादनांच्या निर्यातीत थायलंड अग्रेसर आहे, तसाच बियाणे निर्यातीतही त्यांनी बाजी मारलीय. एवढासा देश, पण या यादीत त्यांचा जगात २४ वा क्रमांक लागतो. आशिया खंडात जपान आणि चीननंतर ते तिसरे मोठे बीजनिर्यातदार आहेत.  थाई बियाणे व्यवसायाचं बीज तसं साठ वर्षांपूर्वीच रोवलं गेलं होतं. १९६० मध्येच बियाणं विकासासाठी संशोधन इथं सुरू झालं. १९७० मध्ये सरकारने, राष्ट्रीय मका आणि ज्वारी बियाणे विकास अभियान राबवलं होतं. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी दिली गेली. ‘थाई सीड ट्रेड असोसिएशन, ‘सीड असोसिएशन ऑफ थायलंड’ आणि थायलंड सरकारचं ‘शेतकी खातं’ येथील बियाण्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी झटताहेत. शासनाने खासगी कंपन्यांबरोबर संशोधन आणि विकासासाठी करार करून नवनवीन बियाण्यांचे वाण विकसित करायचं सतीचं वाण घेतलं आहे. याचमुळे एकवीस राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या थायलंडमध्ये बियाणे व्यवसायात कार्यरत आहेत. बीजकारणाचा व्यवसाय राजकारणापासून दूर ठेवल्याने विश्‍वासाचं वातावरण तयार झालंय. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढतेय.      भारतातसुद्धा बियाणे उत्पादन व्यवसायात मोठी संधी आहे. वर्षभर पीक घेण्यासाठी पोषक वातावरण बहुतांश राज्यात आहे. शेतकरी आणि कंपन्यांमधील विश्‍वास वाढणे गरजेचे आहे. शासनाने, बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि शेतकऱ्यांना ‘बीज’वरासारखी दुजाभावाची वागणूक न देता, त्यात समन्वय निर्माण करण्यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ची भूमिका निभावण्याची गरज आहे.       गरमागरम थाई भुट्टा संपवला. तिने ‘कसा होता?’ असं भुवई दोनदा उडवून विचारलं. मीही ‘झक्कास!’ असं अंगठा आणि तर्जनीचं वर्तुळ करून सांगितलं. ती भुट्ट्यासारखीच छान गोड हसली. गरमागरम मका खाऊन तृप्त तन आणि मनाने मी थंडगार बाइकवर बसलो. - (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ  सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक  आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com