agricultural news in marathi article by Dr. satilal patil | Agrowon

तणनाशकानं जाळलं कंबोडियासारख्या देशांचं भविष्य

डॉ. सतीलाल पाटील
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

एखादं संशोधन चांगलं की वाईट, हे केवळ ज्यांच्याकडून वापरलं जातंय, त्यानुसार ठरत असतं. अमेरिकेनं व्हिएतनाम युद्धामध्ये व्हिएतनामसह शेजारच्या कंबोडिया, लाओससारख्या देशांमध्ये तणनाशकांचा एखाद्या अस्त्राप्रमाणे वापर केला. त्याचे विपरीत परिणाम दक्षिण कंबोडियामध्ये आजही स्पष्ट दिसताहेत. 
 

एखादं संशोधन चांगलं की वाईट, हे केवळ ज्यांच्याकडून वापरलं जातंय, त्यानुसार ठरत असतं. अमेरिकेनं व्हिएतनाम युद्धामध्ये व्हिएतनामसह शेजारच्या कंबोडिया, लाओससारख्या देशांमध्ये तणनाशकांचा एखाद्या अस्त्राप्रमाणे वापर केला. त्याचे विपरीत परिणाम दक्षिण कंबोडियामध्ये आजही स्पष्ट दिसताहेत. 

पोलपॉटने बरबाद केलेल्या देशात बाइकने फिरताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवताहेत. व्हिएतनाम युद्धामुळे कंबोडियाचं झालेलं नुकसान आणि त्यामुळे जन्माला आलेला ‘खमेर रुज’चा अत्याचार लोकांच्या मनात घर करून राहिलाय. खरं तर हे युद्ध व्हिएतनाममध्ये होतं, पण व्हिएत काँगचे बंडखोर, शेजारी कंबोडिया आणि लाओसमध्ये येऊन लपायचे. मग त्यांना शोधत आलेले अमेरिकी सैनिक या देशांना लक्ष करायचे. या युद्धात वापरलं गेलेलं एक अस्त्र शेतकऱ्याच्या आयुष्याशी जवळिक साधणारं आहे. ते आहे रासायनिक तणनाशक. करोडो लिटर रासायनिक तणनाशकाचा वापर अमेरिकेने या युद्धात कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओस या देशांविरुद्ध एखाद्या अस्त्राप्रमाणे केला.  जंगलांवर, शेतांवर फवारलं गेलं. 

व्हिएतनाम युद्धात ‘एजन्ट ऑरेंज’ हे घातक तणनाशक वापरलं गेलं होतं. हे ‘एजन्ट ऑरेंज’ आहे तरी काय, असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. दुसऱ्या महायुद्धात टू, फोर, डी (२, ४, डी)  हे रसायन तणनाशकाचं काम करते, असा शोध अमेरिकेत लागला. त्यानंतर  टू, फोर, डी. मध्ये टू, फोर, फाईव्ह, टी (२, ४, ५ टी) मिसळल्यास अधिक चांगला परिणाम मिळत असल्याचं आढळलं. मात्र या वेळी तयार होणारं घातक TCDD म्हणजे डायॉक्सिन हे रसायन टाळणं आवश्यक होत. या कंपन्यांनी कमी किंवा डायॉक्सिन नसलेलं तणनाशक सरकारला पुरवणे आवश्यक होते. पण ते झालं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या युद्धात वापरलेल्या तणनाशकात डायॉक्सिनचं प्रमाण दुपटीने जास्त होतं हे आता समोर आलंय. 

तणनाशकांचा युद्धात वापराबाबत १९४० पासून संशोधन सुरू होतं. सुरुवातीला जपानची भातशेती नष्ट करून, जपानी सैनिकांची उपासमार घडविण्याच्या उद्देशाने या योजनेवर काम सुरू होतं. अशा तणनाशकांच्या रासायनिक युद्धाची सुरवात ब्रिटिशांनी केली. १९५० मध्ये त्यांनी मलेशियात याचा उपयोग केला. कम्युनिस्टांचं बंड मोडून काढण्यासाठी त्यांनी इथल्या जंगलांवर तणनाशकांचा वापर केला. त्याचे दुष्परिणाम पुढे कित्येक वर्षे जाणवले. पहिल्या महायुद्धानंतर रासायनिक आणि जैविक युद्धावर जिनिव्हा करारानुसार बंदी घातली होती. पण आमचं हे मुळी युद्ध नव्हतंच, हा फक्त एक आणीबाणीचा काळ होता आणि त्यासाठी आम्ही हे रसायनं वापरल्याचा युक्तिवाद करत ब्रिटिशांनी वेळ मारून नेली. या घटनेनंतर अमेरिकेचं फावलं. त्यांनी तणनाशकांच्या युद्धातील अस्त्र म्हणून संशोधन आणि चाचण्या सुरू ठेवल्या. अमेरिकेकडे वेगवेगळी तणनाशकास्त्रे होती. ‘एजन्ट ऑरेंज’ हा त्यातलाच एक प्रकार. हे रसायन काही रंगाने ऑरेंज म्हणजे नारिंगी होते असं नव्हे, तर ते ज्या रंगाच्या ड्रममध्ये साठवले जाई त्यावरून त्याला नावं पडली. उदा. एजन्ट हिरवा, जांभळा, निळा, पांढरा, नारिंगी-I, नारिंगी-II, नारिंगी-III आणि सुपर नारिंगी असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले गेले. या युद्धात सात आठ प्रकारच्या तणनाशकांचा रासायनिक पाऊस कंबोडिया-व्हिएतनामच्या दाट हिरव्यागार जंगलांवर आणि शेतांवर पाडला गेला. या तणनाशकांच्या हवेतून होणाऱ्या फवाऱ्यावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे त्यातून इंद्रधनुष्य दिसायचं. त्याला ‘रेन्बो हर्बिसाईड’ म्हणजेच ‘तणनाशकांचं इंद्रधनुष्य’ असं म्हणायचे. 

 दशकभर चाललेल्या युद्धात सुमारे ६ लाख एकर क्षेत्रावर हे तणनाशकांचं विष वापरले गेले. या तणनाशकांच्या रासायनिक युद्ध मोहिमेचं नाव होतं ‘ऑपरेशन रांच हँड’.  १९६२ ते १९७१ दरम्यान राबवल्या गेलेल्या मोहिमेत साधारणतः साडेसात कोटी लिटर तणनाशक, व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस वर फवारलं गेलं. कल्पना करा, आपल्या हिरव्यागार, डोलणाऱ्या पिकावर,  घरादारावर, अचानक आकाशातून विषारी तणनाशकाची फवारणी होते आणि काही तासात सर्वांची राखरांगोळी होते. हे सगळं कल्पनेपलीकडलं होत. या रसायनांच्या वापरानंतर हिरवेगार जंगलं, शेती बेचिराख झाली. लोकांची उपासमार झाली आणि त्यामुळे दुष्काळ पडला. या तणनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डायॉक्सिन’ हे रसायन होतं. त्यामुळे कॅन्सर होतो हे सर्वज्ञात होतं. डायॉक्सिनचा स्पर्श झाल्यावर किंवा त्याचे अंश खाण्यावाटे तोंडात गेल्यावर ते सरळ रक्तात भिनतात आणि अन्न साखळीत फिरत राहतात. त्यामुळे कॅन्सर, जन्मतः पांगळेपण येणं, हार्मोनचा असमतोल होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं यासारखे गंभीर आजार होतात. डायॉक्सिन हे वर्षानुवर्षे जमिनीत, नद्या नाल्यात, तलावाच्या पाण्यात टिकून राहते. तसेच ते मासे, पक्षी आणि प्राण्यांच्या चरबीत अडकून साठत जाते. या प्राण्यांचा आहारात वापर करणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतं. या रसायनांच्या थोड्याशा संपर्काने कातडी काळी पडते, लिव्हर खराब होतं आणि गंभीर त्वचारोग आणि टाइप-२ प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. जमिनीत पडलेल्या या रसायनांमुळे जंगलं, शेती नष्ट झाली, जमिनीची सुपीकता संपली, नैसर्गिक अन्नसाखळी तुटली आणि त्यामुळे पर्यावरणाचे फार नुकसान झाले. 

कंबोडिया, व्हिएतनाम आणि लाओसमध्ये या तणनाशकाने मोठं नुकसान केलं. एकट्या व्हिएतनाममध्ये ४० लाख लोक बाधित झाले. त्यापैकी ३० लाख आजारी पडले, ४ लाख मेले. २० लाख लोकांना कॅन्सर झाला. सुमारे पाच लाख बाळं विकृतीसह जन्माला आली. व्हिएतनाम-कंबोडिया आणि लाओसच्या पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये विकृती दिसू लागल्या. डोळे नसलेले, एकच हात असलेले, दोन डोके आणि एकच शरीर असलेले जुळे, डोकं प्रमाणापेक्षा मोठं आणि शरीर बारीक, असे एक ना अनेक शारीरिक विकृतीसह मुलं जन्माला येऊ लागली. दक्षिण कंबोडियाच्या गावांमध्ये अशा प्रकारच्या विकृती असलेल्या मुलांचं प्रमाण जास्त आहे.  

सरकारे बदलली पण करोडो लोकांचं आयुष्याचं वाटोळं करणाऱ्या कंपन्या आजही टिकून आहेत. पूर्वी त्यांचे प्रॉडक्ट युद्धात वापरले जात, आता ते शेतात वापरले जाताहेत. पूर्वी सैनिक आणि युद्ध बाधितांना भरपाई द्यायचे. आता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना झालेल्या व्याधींसाठी भरपाई देताहेत. आपणही आज अशीच तणनाशके आपल्या घरात ठेवतोय, फारशी काळजी न घेता शेतात फवारतोय आणि शेती आणि माती प्रदूषित करतोय.

...अशी अस्त्रं दुधारी असतात
शत्रुराष्ट्राविरुद्ध वापरली जाणारी ही रसायनं फवारणाऱ्या सैनिकांसाठी सुरक्षित असल्याचं अमेरिकेने सांगितलं होतं. पण पुढे अमेरिकी सरकार आपल्या सैनिकांशी देखील खोटं बोलल्याचं दिसून आलं. कारण कित्येक अमेरिकी सैनिकांना त्याची बाधा झाली. युद्धातून परतलेल्या सैनिकांमध्ये त्वचारोग होऊ लागले. त्यांना शारीरिक विकृती असलेले मुले जन्माला येऊ लागली. मधुमेहासारखे आजार दिसू लागले. बायकांमध्ये गर्भपाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं. कॅन्सर रुग्णांचेही प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. या करोडो लिटर तणनाशकाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्य होत्या, डाऊ केमिकल, मोन्सॅन्टो आणि हर्क्युलस. यांच्या जोडीला अन्य काही अमेरिकन कंपन्याही होत्या. १९७९ मध्ये व्हिएतनाम युद्धातील बाधित लाखो सैनिकांनी या तणनाशक बनविणाऱ्या कंपन्यांविरोधात खटला दाखल केला. शेवटी कोर्टाबाहेर समझोता करत या कंपन्यांनी हजारो कोटी रुपये या सैनिकांना आणि त्यांच्या नातेवाइकांना भरपाई म्हणून दिले. याचा दाखल देत २००४ मध्ये काही व्हिएतनामी लोकांनी देखील ३० रसायनं बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात अमेरिकी कोर्टात दावा ठोकला. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. थोडक्यात, अमेरिकी न्यायदेवता देशाच्या सीमांची बंधनं पाळून न्याय देत असल्याचं स्पष्ट झालं. ज्यांनी ही विषारी रसायनं फवारली त्या डायॉक्सिनबाधित अमेरिकन लोकांसाठी अमेरिकी सरकारने ९५ हजार कोटी रुपयांची मदत केली. ज्या व्हिएतनाम सह अन्य देशांवर ही रसायनं फवारली, त्यातील केवळ व्हिएतनामला १८०० कोटी रुपये दिले. कंबोडिया आणि लाओसमध्ये आम्ही ही तणनाशके वापरलीच नसल्याचं म्हणत अमेरिकेने हात वर केले.

- डॉ. सतीलाल पाटील, ९९२२४५९७८४
(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे संचालक  आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)


इतर कृषी सल्ला
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापरनिसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यताकोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व...
द्रवरूप जिवाणू खते महत्त्वाची...जिवाणू खतांची प्रक्रिया करण्यापूर्वी बियाण्यास...
शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी...गतिशक्ती मास्टर प्लॅन वाहतूक, हाताळणी खर्च कमी...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे रसशोषक किडी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या...
जाणून घ्या कांदा पिकातील सूक्ष्म...माती परीक्षणानंतर जमिनीमध्ये असलेल्या सूक्ष्म...
सुधारित तंत्राने करा करडई लागवडकरडई हे रब्बी हंगामातील महत्वाचे तेलबिया पीक आहे...
भेटीचे सोने करता आले पाहिजे...भात शेतीमध्ये पाणथळ जागा. या जागाच जल आणि...
मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज  प्रादेशिक हवामान केंद्र,...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
रांगडा, रब्बी कांदा रोपवाटिका,...रांगडा कांद्याची पुनर्लागवड सप्टेंबर - ऑक्टोबर...
शेतकरी कंपनीसाठी सुविधा केंद्राची रचनाशेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रातर्गत गावस्तरावर...
काढणीनंतर सोयाबीनची हाताळणी, साठवणूकसध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत...
हुरड्यासाठी ज्वारी लागवडीचे व्यवस्थापनमराठवाड्यातील पावसाची स्थिती मुळात बेभरवशाची....
तंत्र भुईमूग लागवडीचे...भुईमूग उत्पादन वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून...
भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनमहाराष्ट्रात भातावर बुरशीजन्य, जिवाणूजन्य व...
शेतकरी नियोजन - केळीसध्या वातावरण सतत बदलत आहे. आगामी काळात करपा...
देवभूमीवर देव रुसलाय का?भारताच्या एकदम दक्षिणेकडील आणि मॉन्सूनचे...