कंबोडियाची शाही नांगरणी

शेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये राजेशाहीवर आधारित लोकशाही आहे. इथं राजाच्या हस्ते भाताचा हंगाम सुरू केला जातो. या वर्षी पिकांचं किती उत्पादन येईल, याचा अंदाज इथं वर्तवला जातो. या सणाला खमेर भाषेत ‘प्रीह रीच पिथी चराट प्रेह नेॲनगकोॲल’ असं लांबलचक नाव आहे.
छत्रचामरे, मोठ्या लवाजम्याच्या संगतीने राजाची स्वारी नांगरटीला सुरुवात करते.
छत्रचामरे, मोठ्या लवाजम्याच्या संगतीने राजाची स्वारी नांगरटीला सुरुवात करते.

शेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये राजेशाहीवर आधारित लोकशाही आहे. इथं राजाच्या हस्ते भाताचा हंगाम सुरू केला जातो. या वर्षी पिकांचं किती उत्पादन येईल, याचा अंदाज इथं वर्तवला जातो. या सणाला खमेर भाषेत ‘प्रीह रीच पिथी चराट प्रेह नेॲनगकोॲल’ असं लांबलचक नाव आहे. माझी कंबोडियाची बाइक राइड जोरात सुरू आहे. इथल्या खेड्यापाड्यात फिरताना आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा अभिमान लोकांमध्ये जागोजागी जाणवतो. त्याचबरोबर व्हिएतनाम युद्धाची अमेरिकन झळ आणि स्वदेशी कुपुत्र ‘पोलपॉट’ने दिलेला घाव लोकांच्या आठवणीत ताजा आहे, याची जाणीव होते. फक्त हे दोनच झटके त्यांच्या देशाला बसले असं नाहीत. कंबोडियाचा ताबा पोलपॉटच्या खमीर रूजकडे आल्यावर लोकांवर अत्याचार सुरू झाले. दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं व्हिएतनामने कंबोडियावर आक्रमण करत काही किलोमीटर प्रदेश बळकावला. मग पोलपॉटच्या खमेर रूज आर्मीने त्यांना शह देत मागे ढकललं आणि हरलेली जमीन परत मिळवली. ‘आता थांबू नका, व्हिएतनामला धडा शिकवा’ असं म्हणत पोलपॉटने आपल्या सैन्याला व्हिएतनाममध्ये प्रवेश करायला लावला. मग प्रत्युत्तरादाखल व्हिएतनामदेखील पूर्ण ताकदीनिशी युद्धात उतरला आणि त्यांनी संपूर्ण कंबोडिया जिंकून घेतला. तिथं नवीन सरकार स्थापन केलं. पोलपॉट आणि त्याच्या सहकाऱ्यांना थायलंडमध्ये आश्रय घ्यावा लागला. क्रूरकर्मांना मदत करणाऱ्या चीनने पोलपॉटची मदत केली. मग त्यांनी चीनची मदत घेऊन थायलंडमधून लढाई सुरू ठेवली. पुढे युनोने पुढाकार घेतला. चीनने शिष्टाई केली. व्हिएतनामची आर्मी कंबोडियातून एकदाची गेली. राजेशाही आधारित लोकशाही कंबोडियात अवतरली. पोलपॉटचं पुढे काय झालं हा प्रश्‍न आपल्याला पडला असेलच. त्याला जन्मठेप झाली. पुढे तो जेलमध्ये हार्ट ॲटॅकने मेला. काही जण म्हणतात, की त्याने औषधांच्या जास्त गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ते काहीही असो, पण पोलपॉट आणि खमेर रूजच्या राहू -केतूपासून कंबोडियाची सुटका झाली. स्वतंत्र कंबोडियाची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली. शेती व्यवसायावर सरकारने भर दिला. शेतीशी निगडित एक पारंपरिक उत्सव इथं साजरा होतो. तो म्हणजे शाही नांगरणी उत्सव. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला, पाऊस येण्याअगोदर हा सण साजरा केला जातो. पावसाळ्यातील भात लागवडीचा हंगाम सुरू होण्याची ही नांदी असते. खमेर राजवटीचा सर्वांत महत्त्वाचा शाही उत्सव म्हणून या सोहळ्याला मानतात. या सणात राजाच्या हस्ते भाताचा हंगाम सुरू केला जातो. या वर्षी पिकांचं किती उत्पादन येईल, याचा अंदाज इथं वर्तवला जातो. या सणाला खमेर भाषेत ‘प्रीह रीच पिथी चराट प्रेह नेॲनगकोॲल’ असं लांबलचक नाव आहे. कंबोडियातील ही प्रथा पहिल्या ते सहाव्या दशकादरम्यानच्या फुआन राजवटीपासून चालू आहे. शाही नांगरटीचा हा सोहळा पाहण्यासारखा असतो. राजा किंवा राजघराण्यातील वंशज सजवलेल्या पालखीतून येतो. ती नक्षीदार पालखी सहा जण खांद्यावर वाहून आणतात. पालखीमागे लांब बांबूला बांधलेलं छत्र राजाच्या डोक्यावर धरत एक जण चालत असतो. पारंपरिक कंबोडियन वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक येते. उत्सव स्थळावर कंबोडियन शेतकरी अगोदरच राजाची वाट पाहत थांबलेले असतात. दोन गुबगुबीत बैल पाठीवर नक्षीदार नांगर घेऊन नांगरटीसाठी तयार असतात. मग राजा दोर हातात घेऊन नांगरायला सुरुवात करतो. राजाच्या डोक्यावर छत्र धरत नोकर चालतात. मागे राणी नक्षीदार भांड्यातून बिया टाकत राजाला सोबत करते. राणीच्या बरोबरच्या दासी कलशात बियाणं घेऊन एका रांगेत चालतात. असा हा लवाजमा तीन फेऱ्या मारून थांबतो. या फेकलेल्या बिया गोळा करायला लोकांची झुंबड उडते. या बियांना इथं पवित्र मानलं जातं. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टीला सुरुवात होते. ती म्हणजे पीक पाण्याचा अंदाज वर्तविणे. सात सोनेरी भांड्यांत तांदूळ, मका, तीळ, डाळी, गवत, पाणी आणि तांदळापासून बनवलेली दारू असे पदार्थ मांडून ठेवलेले असतात. नांगरट संपल्यावर बैलांना या भांड्यांसमोर मोकळे सोडले जाते. बैल ज्या पदार्थाला अगोदर तोंड लावेल, त्या पिकासाठी येणारा हंगाम चांगला असल्याचं मानलं जातं. यावरून त्या वर्षीच्या हवामानाचा अंदाजदेखील बांधला जातो. बैल दारूला तोंड लावतो का, हा प्रश्‍न आजही डोक्यात झोकांड्या खातोय. हा उत्सव पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दक्षिण कंबोडियाच्या अंगकोर बोरोई इथल्या मंदिरात सहाव्या शतकात नांगराने नांगरणारा बलरामाचा पुतळा सापडलाय. पंधराशे वर्षांपासून शेती सोहळ्याची साक्ष देत हा कृष्णबंधू उभा आहे. हा पुतळा शाही नांगरटीच्या सोहळ्याचं प्रतीक म्हणून प्रदर्शित केला जातो. तसा या सणाला हजारो वर्षांपूर्वीच्या रामायणाचा संदर्भ आहे. राजा जनक नांगरत असताना जमिनीतून सीता बाहेर आली. तेव्हापासून हा सण सुरू झाला, असं इथं म्हणतात. फार पूर्वी सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी बांधिलकी ठेवणाऱ्या कंबोडियामध्ये हा सण आपल्या देशातून गेला, हे ऐकून छान वाटलं. अन्य देशातही शाही नांगरटीची प्रथा कंबोडिया व्यतिरिक्त बऱ्याच आशियायी देशात हा नांगरटीचा सण साजरा केला जातो. म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशात इंग्रज येण्याअगोदर १८८५ पर्यंत हा सण साजरा केला जात होता. ब्रह्मदेशात हा उत्सव पाचव्या शतकात पागान राजवटीत सुरू झाला. ब्रह्मदेशात सर्वच राजांनी हा उत्सव साजरा केला असं नाही. काही राजांच्या कालखंडात या प्रथेला खंड पडला. पण पुढील राजांनी ही प्रथा परत सुरू केली. सोनेरी आणि चंदेरी झूल अंगावर टाकलेले पांढरे बैल नांगराला जुंपलेले असतात. पुढे राजा आणि त्यामागे राणी नांगरटीला निघतात. त्यांच्यामागे मंत्रिगणांचा ताफा निघतो. नांगरट सुरू असताना ब्राह्मण मंत्रघोषात १५ हिंदू देवतांना आहुती देतात. त्यानंतर ३७ पवित्र आत्म्यांना आवाहन केलं जातं. या वर्षी पाऊस पाणी चांगलं होवो आणि पिकं चांगली येवोत म्हणून हा सण ब्रह्मदेशात साजरा करतात. शेजारी थायलंडमध्येदेखील हा सण साजरा केला जातो. थायलंडमध्ये ही प्रथा सुखोथाई राजवटीपासून सुरू आहे. इथं नांगरटीच्या उत्सवाची प्रथा कंबोडियातून आली असं म्हणतात. १३ व्या शतकाच्या मध्यात खमेर राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर थायलंडमध्ये ही प्रथा सुरू झाली. थाई भाषेत याला ‘राएक ना ख्वान’ असं म्हणतात. याचा शब्दशः अर्थ ‘भात लागवडीचा शुभ मुहूर्त’ असा होतो. मोंगकूट राजाने बौद्ध आणि हिंदू सणांना एकत्र करून एकत्रित साजरे करायला सुरुवात केली. बौद्ध विधी अगोदर राजवाड्यात होतो, त्यानंतर राजवाड्यासमोरच्या पटांगणात हिंदू पद्धतीने नांगरटीचा सोहळा पार पडतो. १९२० मध्ये राजा राम - सातवा यांनी हा सोहळा खंडित केला होता. पण १९६० मध्ये राजा राम-९ वा ‘भूमिबोल अदुलयादेज’ यांनी तो परत सुरू केला. इथं शाही नांगरटीच्या सणाच्या दिवशी शासकीय सुट्टी असते. शेती सणाच्या दिवशी संपूर्ण देशाला सुट्टी देणाऱ्या देशात शेतीला किती महत्त्व आहे, हे यावरून स्पष्ट होतं. नांगरट करत असलेल्या जमिनीत, अमेरिकेने टाकलेले आणि न फुटलेले बॉम्ब सापडत असतील का, असा प्रश्‍न सकाळच्या उन्हात चमकून गेला. चांगल्या हंगामासाठी नांगरट करणारा कंबोडियन राजा पाहून मला सोन्याच्या नांगराने नांगरणारा मराठी जाणता राजा आठवला. ‘जय शिवाजी’ म्हणत मी बाइकला किक मारली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com