नाव बदलणाऱ्या देशा... भाताच्या देशा !

कंबोडिया या देशाचं नाव इतक्या वेळा बदललंय की बस्स! त्यामुळे ‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ...’’ या आपल्या महाराष्ट्र गीताच्या धर्तीवर कंबोडियाचं गीत नक्की कसं असेल, तर नाव बदलणाऱ्या देशा, भाताच्या देशा’’ असंच मी गुणगुणू लागलो.
कंबोडियामध्ये मेकाँक आणि टोनले साप नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवला जातो.
कंबोडियामध्ये मेकाँक आणि टोनले साप नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवला जातो.

साध्या सरळ माणसांनी भरलेला कंबोडिया, भाताच्या जातीबाबत प्रचंड समृद्ध आहे. सुमारे ४ हजार जाती, मेकॉंक आणि टोनले साप जलाशयातील मासे यांनी त्यांची खाणंही पोषक केलंय. पण या देशाचं नाव इतक्या वेळा बदललंय की बस्स! त्यामुळे ‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ...’’ या आपल्या महाराष्ट्र गीताच्या धर्तीवर कंबोडियाचं गीत नक्की कसं असेल, तर नाव बदलणाऱ्या देशा, भाताच्या देशा’’ असंच मी गुणगुणू लागलो. गेले काही दिवस कंबोडियामध्ये बाइकने फिरताना लहानसहान गावं, शहरातून जाताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे इथला माणूस साधा आणि सरळ आहे. अगदी मनापासून तो परदेशी लोकांना, प्रवाशांना मदत करताना दिसतो. भाषेच्या बाबतीतही जास्त गोंधळ नाही. यांची खमेर ही एकमेव अधिकृत भाषा आहे. बहुतांश लोकांना इंग्रजी येत नाही. मात्र जिथं पर्यटक येतात, तेथील लोक वेळ मारून नेण्याएवढी तोडकी मोडकी इंग्रजी नक्कीच झाडतात. पोटातल्या कंबोडियन कावळ्यांनी पोटपूजेसाठी थांबायला भाग पडलं. एका टपरीवजा हॉटेलात थांबलो. चौफेर नजर टाकत, पोटात टाकण्याजोगा पदार्थ शोधू लागलो. तेवढ्यात भाताच्या वासाने - मी, मी असं म्हणत माझं लक्ष वेधायला सुरुवात केली. ठीक आहे, आज भाताची पाळी, असं म्हणत भाताचा कसलासा स्थानिक पदार्थ ऑर्डर केला. फ्राइड राइस सारखा तो प्रकार होता. दहा मिनिटात माझा भात माझ्यासमोर हजर झाला. गरमागरम भाताचा वास फुफ्फुसात भरून घेतला. ‘क्या भात है!’ असं म्हणत त्यावर ताव मारायला सुरुवात केली. माझ्या समोर बसलेल्या गिऱ्हाइकाच्या प्लेटमधील भाताचा रंग मात्र वेगळा दिसत होता. त्याच भात पांढराशुभ्र होता, पण माझा मात्र पॉलिश न केलेल्या तांदळासारखा तपकिरी. ‘‘आपका भात मेरे भात से सफेद कैसा?’’ असं मिस्कील सवाल त्याला करावासा वाटलं. पण त्याला माझा बाष्कळ हिंदी जोक कळला नसता. तसंच त्याच्या गंभीर चेहऱ्यावरून तो जोक ऐकायच्या मूडमध्ये नसावा असं दिसतं होतं. उगाच रिस्क नको, असं म्हणत तो विचार आणि भाताचा गोळा एकत्र गिळला. त्यापेक्षा ‘गुगलबाईला विचार ना!’ असं माझ्या डोक्यातील ट्यूबलाइटने एकदोनदा फडफडत सांगितलं. मी मोबाईलमधील ‘बाई’ला कंबोडियातील भाताचे प्रकार किती हा सवाल करून टाकला. मोबाइलमध्ये आलेल्या माहितीने माझा आऽ वासलेला जबडा तसाच राहिला. कंबोडियामध्ये तब्ब्ल चार हजार प्रकारच्या भाताच्या जाती आहेत. माणसांच्या अठरापगड जातीवर कंबोडियाच्या चतुःसहस्र भात जातींनी वरताण केली होती. तोंडात कंबोडियाच्या स्थानिक भाताबरोबर स्थानिक माशीचा प्रवेश होऊ नये, म्हणून वासलेला जबडा बंद केला. भाताच्या जातींची माहिती वाचू लागलो. येथील ‘सीआयएपी’ या संस्थेने १९९० मध्ये या चार हजार भाताच्या जातींच्या माहितीचं संकलन केलं होतं. कंबोडियामध्ये मेकाँक आणि टोनले साप नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पिकवला जातो. इथं भाताचे हंगाम आहेत. पहिला पावसाळी, म्हणजे ओला हंगाम. पावसाळी हंगाम सहा महिन्यांचा असतो. दुसरा हिवाळी किंवा कोरडा हंगाम तीन -चार महिन्यांत आटोपतो. मी प्रवासात असताना ज्या देशात फिरतो, त्या देशातील चांगल्या गोष्टी शोधून काढतो. तेथील उणिवा नजरेआड करत सकारात्मक बाबी गोळा करत मी प्रवास करतो. आतासुद्धा या देशातल्या बऱ्याच खुबी जाणवताहेत. जगातलं सर्वांत मोठं धर्मस्थळ, अंगकोर वाट मंदिर इथं आहे. झेंड्यावर एखाद्या वास्तूची प्रतिमा असणारा देखील हा पहिलाच देश आहे. एवढंच काय, पण मॅकडोनाल्डचं अरबट चरबट खाण्याचं एकही दुकान आख्ख्या देशात नाही. जन्मणं, जगणं सोप्पं, पण मरण महाग... इथली नमूद करण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे कंबोडियात जन्माला येणं सोप्पं, पण मरणं मात्र फार महाग आहे. गोंधळात पडलात ना? थांबा तुमचा प्रश्‍नांचा गुंता सोडवतो. कंबोडियामध्ये अंत्यसंस्कार फार महाग आहेत. शेवटच्या प्रवासात एकूण खर्च येतो तब्बल साडेसहा लाख रुपये. म्हणजे कंबोडियातून स्वर्गाच्या प्रवासाच्या विमानाचे तिकीट दर, आपल्या देशातल्या इंधनदाराशी स्पर्धा करताहेत तर. मला नवल वाटलं! ज्या देशात लोकांचा महिन्याचा सरासरी पगार साडेसात- आठ हजार रुपये आहे, त्या देशात अंत्यसंस्कारासाठी लाखो रुपयांचा चुराडा लोक कसा काय करू शकतात? पण याला पर्याय नाहीये. जसं आपल्याकडे कर्ज काढून मुलीचं थाटामाटात लग्न केलं जातं, तशीच ही जुनी प्रथा आहे, म्हणून मेल्यानंतरच्या या मरणयातना सोसाव्या लागतात. लोक आयुष्यभर, आपल्या आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी पैसे जमा करत असतात. इथला अंत्यसंस्काराचा सोहळा सात दिवस चालतो. मृतदेहाला अंघोळ घालून घरात ठेवलं जातं. त्यानंतर तिसऱ्या किंवा सातव्या दिवशी मिरवणूक निघते. ही मिरवणूक वाजतगाजत मंदिरात पोहोचते. तिथं प्रेताचं दहन केलं जातं. या संपूर्ण कार्यक्रमात भिक्खूची भूमिका महत्त्वाची असते. वाजंत्री, लोकांचं खाणंपिणं, भिक्खूची दक्षिणा वगैरेचा खर्च लाखोंच्या घरात जातो. नाव बदलाचा मनोरंजक इतिहास कंबोडियात अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आणि ती म्हणजे गेल्या काही दशकात कंबोडियाचं नाव सातत्याने बदललंय. १९५३ ते १९७० च्या दरम्यान इथं राजेशाही होती. त्या वेळेस याचं नाव होतं ‘किंगडम ऑफ कंबोडिया’ पण राजा गेला. १९७० ते ७५ दरम्यान प्रेसिडेंट ‘लोन नुई’चं सरकार आलं. ‘जा, आम्ही नाही वापरत तुमचं जुनं नाव!’ असं म्हणत प्रेसिडेंट साहेबांनी ‘दि खमेर रिपब्लिक’ असं दमदार नाव ठेवलं. पुढे १९७५ ते ७९ मध्ये पोलपाटने अत्याचाराचं लाटणं फिरवत देशाचं वाटोळं केलं. आणि ‘आमची बॅट, आमचं राज्य’ या न्यायाने ‘डेमोक्रॅटिक कंपूचीया’ असं नवंकोरं नाव ठेवलं. चीनच्या पाठिंब्याने हवेत गेलेल्या पोलपाटचं देशाला दिलेलं नवीन नावही चिनी मालाप्रमाणे तकलादू निघालं. ते चारच वर्षे टिकलं. पुढे व्हिएतनामला ‘उंगली करणं’ पोलपाटला महागात पडलं. व्हिएतनामच्या आक्रमणापुढे नमतं घेत त्याने पळ काढला. मग व्हिएतनामच्या आधिपत्याखालील सरकारने, आमचं पण नवीन नाव, असं म्हणत ‘दि पीपल्स रिपब्लिक ऑफ कंपूचीया’ असं देशाचं नामकरण केलं. व्हिएतनामी मालाची क्वालिटी चीनपेक्षा बरी निघाली. ते १९७९ ते १९८९ असं दहा ते वर्षे टिकलं. व्हिएतनाम कंबोडियामधून बाहेर पडल्यावर, १९८९ ते १९९३ दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपाने कंबोडियन सरकार स्थापन झालं. ‘हम भी कुछ कम नही!’ म्हणत त्यांनी ‘दि स्टेट ऑफ कंबोडिया’ असं पाश्‍चिमाळलेलं मॉडर्न नाव देऊन टाकलं. पण अजून कंबोडियाच्या मागे लागलेलं नावबदलाचं भूत गेलेलं नव्हतं. १९९३ मध्ये या देशात घटनात्मक राजेशाही लागू झाली आणि ‘किंगडम ऑफ कंबोडिया’ असं नवीन नाव चिकटलं. एवढी नावं बदललेल्या कंबोडियातील लोकांनी नाव बदलीचा धसका घेतला असणार. ‘नावात काय आहे’ असं पुस्तकात लिहून, त्याखाली आपलं नाव लिहिणाऱ्या शेक्सस्पिअरने, त्याचं हे प्रसिद्ध वाक्य लिहिण्याअगोदर कंबोडियाला भेट द्यायला हवी होती, असं मात्र मला वाटून गेलं. कंबोडियाच्या भाताची ‘बातच और’ असं म्हणत भात संपवला. बाइकवर मांड ठोकली. ‘‘रस्त्याचे नियम पाळ, नाहीतर शिक्षा म्हणून कंबोडियन ट्रॅफिक पोलिस, या देशाची बदललेली नावं लिहायची शिक्षा देतील!’’ असा इशारा माझ्या खट्याळ मनाने मला दिला. ‘‘नको रे बाबा एवढी कठोर शिक्षा’’ असं म्हणत, नियमात बाइक चालवत निघालो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com