agricultural news in marathi article by Dr. satilal patil | Agrowon

तेलाचं ‘पामर’ जंगल

डॉ. सतीलाल पाटील
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

नैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो एकरवर व्यवस्थित रांगांमध्ये उभारलेल्या पाम जंगलामुळे हिरवळ दिसत असली तरी निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं. एकूण शेतीमध्ये ३७.७ टक्के एवढं भक्कम योगदान देणारी पामशेती सुमारे ५७ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरली आहे.  

नैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो एकरवर व्यवस्थित रांगांमध्ये उभारलेल्या पाम जंगलामुळे हिरवळ दिसत असली तरी निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं. एकूण शेतीमध्ये ३७.७ टक्के एवढं भक्कम योगदान देणारी पामशेती सुमारे ५७ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रावर पसरली आहे. पामतेलाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर इंडोनेशियानंतर मलेशिया दुसरा मोठा देश ठरला आहे.

माझ्या बुलेटचे रबरी पाय मलेशियन रस्त्याला लागल्यापासून तिच्यातील कंपन संपलंय असं वाटायला लागलंय. रस्ते लोणी लावल्यागत चकाचक आहेत. रस्त्यावरील वाहनं लष्करी शिस्तीत धावताहेत. वाहनांचा वेग वाढलाय. माझ्या बुलेटपेक्षा, लहानसहान वाहने भरधाव वेगाने मला ओव्हरटेक करून, वाकुल्या दाखवत पुढे निघून जाताहेत. माझ्यातील बुलेटी ईर्षा मला एक्सिलरेटर पिळायला मजबूर करतेय. पण सुळकन् जाणाऱ्या त्या बारक्या गाड्यांना गाठणं मुश्कील आहे. ‘आपली गाडी वजनदार आहे, त्यात एवढ्या बॅगांचं वजन. आपल्याला नाही परवडणार ही वेगाची स्पर्धा. आपली स्ट्रेंथ, वेग नसून मजबुती, स्थैर्य आहे. या कचकड्यांच्या फटफट्यांना चिखलाच्या, खड्ड्याच्या हिमालयीन रस्त्यांवर भेटू देत, म्हणजे माझ्या बाईकची ताकद काय आहे ते दाखवेल’ अशी स्वतःची समजूत काढत हे धकधकतं वजनदार धूड मी पुढे नेलं.

नागमोडी रस्त्यावरून पुढे वळण घेतलं आणि रस्त्याच्या दुतर्फा जंगल सुरू झालं. सुरवातीला माझं लक्ष गेलं नसलं तरी जंगलात काहीतरी वेगळंपण जाणवलं. माझ्या आणि निसर्गाच्या आड येणारा हेल्मेटच्या पारदर्शी काचेचा पडदा बाजूला सारत मी बारकाईने पाहिलं. ‘अरे, हे तर पामच्या झाडांचं जंगल!’ मी स्वतःशीच पुटपुटलो. पार दूरपर्यंत पामची शेती कवायतीला उभ्या राहिलेल्या सैन्याच्या शिस्तीत पसरली होती.

मलेशियात पामची शेती कधीपासून केली जाते? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. इथं पाहिलं पामचं झाड इंग्रजांनी १८७० मध्ये शोभेचं झाड म्हणून आणलं होतं. पण त्याला इथलं वातावरण मानवलं. ते इथं फळलं फुललं आणि मलेशियाभर हातपाय पसरले. पामच्या शेतीचं मोठं योगदान मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत आहे. एकूण ५७ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रावर ही पामशेती पसरलीय. या देशाच्या जीडीपीत संपूर्ण शेतीक्षेत्राचा वाटा ७.१ टक्के आहे. समग्र पिकांमध्ये ३७.७ टक्के एवढं भक्कम योगदान या तेलाच्या पिकाचं आहे. मेहनती मलेशियन शेतकरी प्रयत्ने ‘पाम’ ची फळे रगडून, घामाबरोबर तेलही गाळत असतो. पामतेलाच्या उत्पादनात मलेशिया जगात दुसरा मोठा देश आहे. पहिल्या नंबरवर इंडोनेशिया आहे. मलेशियन शेतीला पाममुळे अर्थ आणि अर्थार्जन असा दुहेरी फायदा झालाय.

पामची फळं तोडून, गोळा करून त्यापासून तेल काढलं जातं. फार प्राचीन काळापासून पालतेलाचा वापर होतो. अगदी पाच हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्तच्या थडग्यांमध्येही ते आढळलं आहे. पूर्वीपासून पामतेलाचा उपयोग स्वयंपाकासाठी व्हायचा. युरोपीय लोक आफ्रिकेतून जहाजं भरभरून हे तेल युरोपात न्यायची. पण या तेलाला खरी प्रसिद्धी मिळाली ती युरोपातील औद्योगिक युगात. माणसांऐवजी यंत्रे कारखान्यात राबायला लागली, तेव्हा त्या यंत्रामध्ये ल्युब्रिकंट म्हणून पामतेलाचा उपयोग होऊ लागला. आणि हे ‘पामर तेल’ खास झालं.

हे तेल ऑल राउंडर आहे. पाम तेलाचे उपयोग खाद्यतेल, जैवइंधन, बेकरी उत्पादने, बिस्किटांसारखे अन्नप्रक्रिया उद्योग यापासून सौंदर्य प्रसाधने, साबण व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होतात. पामतेलानं मनात स्थान निर्माण केलंय.

भारतातही पाम तेल झालं आम!
भारतात पामतेलाचा उपयोग तसा अलीकडेच सुरू झाला. पूर्वी मोहरी, शेंगदाणा, तीळ अशी देशी तेलं वापरली जायची. पामतेलाच्या भारतातल्या आगमनाची कहाणीही रंजक आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत १०० टक्के आत्मनिर्भर असलेला भारत हळूहळू परावलंबी होत गेला. पारतंत्र्यात डसलेल्या ब्रिटिश विंचवाचं विष भारतीय समाजात इतकं भिनलं होतं की उतरायला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बरीच दशकं जावी लागली. कोणे एके काळी दुधातुपाच्या गंगा दारी वाहणाऱ्या देशातील गोरसाचा ओघ आटला. याचा फायदा घेत परदेशी कंपन्यांनी खाद्यतेलाला हैड्रोजनेशन प्रक्रियेद्वारे तुपासारखे घट्ट बनवलं. या थिजलेल्या तेलाला ‘वनस्पती तूप’ म्हणून विकायला सुरुवात केली. लोकांनाही परिस्थितीमुळं गाईच्या तुपाची तहान या वनस्पती तुपावर भागवावी लागली. मात्र भारतीय स्वयंपाकघरापर्यंत शिरलेल्या पाहुण्या वनस्पती तूपामुळं घरचंच देशी तूप वनवासी झालं. ज्या देशात ‘डाल डाल’ वर ‘सोन्याची चिडिया’ बसायची तिथल्या लोकांवर ‘डालडा’ खाण्याची पाळी आली. पुढे वनस्पती तुपाची लोकप्रियता वाढली. वनस्पती तूप बनवायला शेंगदाणा आणि मोहरीचं तेल वापरलं जायचं. आधीच बाजारात खाद्यतेलाची टंचाई, त्यात तूप बनवायला खाद्यतेल वापरलं जात होतं. तेलाच्या ‘उपाशी’ ग्राहकाला, तेच ‘तेल’ तुपाशी वापरण्याच्या धंद्याला आळा घालण्यासाठी आणि बाजारातील खाद्यतेलाची टंचाई कमी करण्यासाठी, भारत सरकारने तुपाच्या निर्मितीसाठी मोहरी आणि शेंगदाणा तेल वापरू नये असा नियम काढला. पण कंपन्या गप्प बसणार नव्हत्या. त्यांनी पामतेलाचा तूप बनवण्यासाठी उपयोग सुरू केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पामतेलाची आयात इंडोनेशिया आणि मलेशियातून सुरू झाली. शेंगदाणा आणि मोहरीसारख्या स्वदेशी तेलाला बाजूला सारत विदेशी पामतेल अढळस्थानावर बसलं. गेली कित्येक वर्षे भारताला मोठ्या प्रमाणात पामतेल निर्यात करून मलेशिया मलई खातोय.

अर्थात, मलेशियातील या पाम शेतीला येथील नेते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बराच त्रासही झाला. पामच्या शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते. हजारो एकरावरील जंगले तोडून पामची झाडे शिस्तबद्ध पद्धतीने लावली जातात. या जंगलतोडीमुळे येथील ओरांगउटान माकडांच्या प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आलंय. तेलाचं हे झाडच पर्यावरणाला तेल लावतंय, हा मुद्दा लक्षात घेऊन युरोपियन युनियनने २०३० पर्यंत पामतेलाचा इंधनतेलातील उपयोग संपुष्टात आणलं पाहिजे. असा निष्कर्ष काढला. युरोपियन युनियनप्रमाणेच, अमेरिकेनेसुद्धा मलेशियाच्या कंपन्यांवर बंदी घातली होती. पण त्यांचं कारण होतं, पाम शेतीत होणारं कामगारांचं शोषण!

२०१९ मध्ये अजून एका वादात पामची शेती आणि शेतकरी भरडला गेला. इथल्या शंभरीत आलेल्या, तोंडाळ पंतप्रधान ‘महातीर मोहम्मद’ यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये आपलं नाक खुपसलं. संयुक्त राष्ट्रसंघात भारतावर टीका करत, पाकिस्तान आणि टर्कीच्या चांडाळ त्रिकुटात ते जाऊन बसले. आपण महा ‘तीर’ मारल्याच्या आवेशात त्यांनी भारतावर निशाणा साधला होता. तेव्हा त्यांचा हा ‘तीर’ पाम तेलास्र वापरत भारताने परतवला. मलेशियाकडून प्रक्रिया केलेलं पामतेल आयात करायचं नाही, असा निर्णय घेत मलेशियाला ‘पाम’ झटका दिला. महातिरच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे मलेशियाचे ‘पामर’ शेतकरी मात्र पामतेलाच्या राजकारणात विनाकारण भरडले गेले.

पाम शेतीमुळे होणाऱ्या जंगलतोडीने मी व्यथित झालो. ‘अरे, जंगल तोडून शेवटी झाडंच लावली ना? पामची का असेना जंगलंच लावली, सिमेंटची जंगलं तर नाही ना उभी केली?’ अशा सकारात्मक विचारानं मलमपट्टी करायचा प्रयत्न केला. ‘जंगल कसलं? माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी शिस्तीत लावलेल्या झाडांचा औद्योगिक व्यवसाय आहे तो’, माझ्यातला पर्यावरणप्रेमी थोडाही वेळ न दवडता उत्तरला. ‘जंगलात वेगवेगळ्या जातिप्रजातीची झाडं, सर्वधर्मीय एकोप्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नांदतात. पण केवळ आपल्या फायद्यासाठी, फळा, पाना आणि फुलांसह संपूर्ण झाडाच्या जंगली अपेक्षेने लावलेल्या या एकाच झाडाच्या या बेगडी जंगलाने पर्यावरणाचं नुकसान होतंय’ असं म्हणत मनानं आपलं प्रवचन लांबवलं. ‘मग आपल्या बाइकमुळे देखील पर्यावरणाचं नुकसान होतंय, त्याच काय?’ या प्रश्नावर मात्र ते मूग गिळून गप्प बसलं. ‘धाडऽ, धाडऽऽ, धाडऽऽऽ’ असं ध्वनी प्रदूषण करत, सायलेन्सरमधून बारीक धुराची बारीक रेषा काढत माझी बाईक पुढे निघाली.


इतर कृषी सल्ला
द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे करा प्रभावी...वातावरणात होणारे हे बदल द्राक्ष बागेत भुरी रोगाचा...
उन्हाळी मूग लागवड तंत्रउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
नंदनवनातील शेती केवळ मॉन्सून, उन्हाळीबादशाह जहांगीरने काश्मीरबाबत बोलताना म्हटले होते...
रेडूविड ढेकूण मित्र कीटकाची करा घरगुती...भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि...
किमान तापमानात घट; थंडीत वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते...
उन्हाळी सूर्यफूल लागवडीचे नियोजनउन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी...
गव्हातील अन्नद्रव्यांची कमतरताजमिनीचा प्रकार, खत आणि पाणी व्यवस्थापन, जाती अशा...
एनपीए : कृषी कर्जाची थकबाकीएखाद्या कर्जखात्याचे हप्ते वेळच्या वेळी न गेल्यास...
शेतकरी नियोजन पीक : काजूशेतकरी ः उत्तम दाजी वालावलकर गाव ः वेतोरे, ता....
वनशेतीमध्ये शिसव लागवडीला संधीशिसवाच्या लाकडाला उच्च श्रेणीचे फर्निचर, प्लायवूड...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना करारशेतीतील...करार शेती ही आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये ‍...
शेतकरी नियोजन : पीक हापूस आंबाशेतकरी : देवेंद्र ज्ञानेश्‍वर झापडेकर गाव...
मूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टमूल्यवर्धित स्पेंट मशरूम कंपोस्टचा वापर...
कमाल, किमान तापमानातील तफावतीमुळे...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत तापमानामध्ये...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...