‘फूल’ बनवणारं मलेशियन फूल

मलेशिया हा बेटांचा देश. मलेशियात उष्ण कटिबंधीय फळांचं उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मुबलक उन्हाचा कडाका आणि मुबलक पाऊस अशा वातावरणात पिकणारी मुबलक फळं मलेशियन शेतकऱ्यांना समृद्धी देतात. तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण फूलही येथे येते. ते मात्र आपल्याला चक्रावून टाकतं.
Cameron Highland, famous for its strawberry and tea products.
Cameron Highland, famous for its strawberry and tea products.

मलेशिया हा बेटांचा देश. मलेशियात उष्ण कटिबंधीय फळांचं उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मुबलक उन्हाचा कडाका आणि मुबलक पाऊस अशा वातावरणात पिकणारी मुबलक फळं मलेशियन शेतकऱ्यांना समृद्धी देतात. तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण फूलही येथे येते. ते मात्र आपल्याला चक्रावून टाकतं. थंडगार हवेत लपेटलेली मलेशियन सकाळ. सीटवर पहुडलेल्या साखरझोपेतल्या दवबिंदूंना दूर सारत, बाईकवर मांड ठोकली आणि पुढील प्रवासाला निघालो.  दूरवरून हवेच्या लाटेवर स्वार होऊन मंद संगीताचे सूर ऐकू येताहेत. समोर दिसणाऱ्या  गावातून ते येताहेत असं वाटतंय. दुरून या गाण्याची चाल थोडीशी ओळखीची वाटतेय. माझी मोटरसायकल मोहीम सुफळ, संपूर्ण व्हावी म्हणून मलेशियन लोक मला प्रोत्साहित करण्यासाठी तर गात नसतील ना? गाण्याचे शब्द स्पष्ट नाहीत, पण चाल जरा ओळखीची वाटतेय. थोडं पुढं गेल्यावर स्पष्ट ऐकू येईल असं वाटतंय. एक्सलरेटर पिळला आणि गाण्याच्या दिशेने हेल्मेटमधील कान देत बाईक पुढे नेली. ते मलेशियन भाषेतलं गाणं होतं. ‘रासा सयांग हे, रासा सायांग सायांग हे’ असे काहीसे शब्द असलेलं हे गाणं. ‘रासा सायांग’ हे गाणं मलेशियातील प्रसिद्ध गाणं आहे. ‘माझ्या मनात प्रेमाचा बहर आलाय’ या अर्थाचं. प्रत्येक मलेशियन माणूस शाळेत, सण, उत्सवात हे गाणं ऐकत आणि गुणगुणत मोठा झालाय.  जसा चंद्रावर देखील डाग आहे, तसा प्रेमाच्या या गाण्यावर देखील वाद आहे. मलेशियाचा चीनबरोबर जसा सीमावाद आहे, तसा इंडोनेशियाचा मलेशियाबरोबर ‘रासा सायांग’ वाद आहे. त्याच झालं असं की २००७ मध्ये मलेशियाच्या पर्यटन मंत्रालयानं हे गाणं त्यांच्या पर्यटन प्रसारासाठी बनविलेल्या जाहिरातीत वापरलं. पण आमचं गाणं तुम्ही चोरलं असा आरोप इंडोनेशियातील लोकांनी केला. कारण ‘रासा सायांग सायांग’ गाणं इंडोनेशियातदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. शेवटी मलेशियन सांस्कृतिक मंत्री ‘रईस यतीम’ यांनी हे गाणं मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही देशाची शान आहे, असं सांगत वाद मिटवला. पण ‘रासा सायांग’ चा धागा भारताशीदेखील जोडला गेलाय हे युट्युबच्या नळीत डोकावल्यावर समजलं. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंगापूर’ या हिंदी चित्रपटात ‘रास्सा सायांग हे!’ गाणं आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या हिंदी आवाजावर शम्मी कपूर आणि पद्मिनी अभिनय करतात. म्हणजे ‘रास्सा सायांग’ च्या  रश्श्याचा घमघमाट, १९६० मध्येच भारतापर्यंत दरवळला होता तर! प्रेमाचं हे गाणं मलेशियाच्या बेटाबेटांवर प्रसिद्ध आहे.  मलेशिया हा बेटांचा देश आहे. हिंदी महासागरात हा कित्येक मलेशियन बेटांचा पुंजका पसरलाय. किती बेटांचा हा देश बनला असेल? इथल्या बेटांची संख्या ऐकून चक्कर येईल. हा देश एकूण वीस हजार बेटांमध्ये विखुरलाय. यामधील ‘सबाह’ या राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३९४ बेटं आहेत. एवढंच नाही तर या देशात ५३५ अशी बेटं आहेत की ज्यांचं अजून नामकरण झालेलं नाहीये. मलेशियाच्या या नवजात ‘बेट्यांचं’ नामकरण करून अधिकृत देश प्रवेश करून घेण्याची सरकारची घाई चाललीय. नाहीतर शेजारी देश त्यांच्यावर दावा सांगतील, अशी त्यांना भीती आहे. कारण आहे चीनसारखा भांडखोर देश. त्यानं ही भीती खरी ठरवलीय. आपल्या शेताला बांध असलेला भांडखोर शेजारी ज्या प्रमाणे रोज नवीन खुसपट काढून भांडत राहतो, तसं चीनचं सर्वच शेजाऱ्याबरोबरचं वर्तन आहे. आपल्या सर्व शेजाऱ्यांशी त्याचे सीमावाद सुरू आहेत. मग त्यातून मलेशिया तरी कसा सुटेल? मलेशियाच्या बेटांवर हक्क सांगत चीनने वाद उकरून काढलाय.  मलेशियामध्ये उष्ण कटिबंधीय फळांचं उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. मुबलक उन्हाचा ताप आणि मुबलक पाऊस अशा मुबलक वातावरणात पिकणारी मुबलक फळं मलेशियन शेतकऱ्याच्या पाकिटात मुबलक पैसे घेऊन येतात. इथं डुरियन हे मोठ्या प्रमाणात पिकणारं फळ आहेच, पण फळांचा राजा ‘आंबा’ आणि फळांची राणी ‘मँगोस्टीन’ हे राजाराणीदेखील मलेशियाच्या बेटाबेटांवर राजाराणीचा संसार करतात. याव्यतिरिक्त लोनयान फळ,   फणस, ड्रॅगन फळ, पेरू, राम्बुटान, पपई यासारखी फळं मलेशियाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडी आणतात. ‘कॅमेरॉन’ हे मलेशियाचं महाबळेश्वर आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर उंचीवरील या प्रदेशात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असलेली ही जागा राजधानी क्वालालंमपुर शहरापासून फक्त दोनशे किलोमीटरवर आहे. स्ट्रॉबेरीव्यतिरिक्त वेगवेगळी पीक इथं घेतली जातात. यात महत्त्वाचं पीक आहे ‘चहा’. ‘कॅमेरॉन हायलँड’ इथं मलेशियातील सर्वांत जास्त चहाचं पीक घेतलं जातं.   या वेगवेगळ्या फळांच्या गर्दीत, बोर्निओ बेटाच्या बाजूला एक विशिष्ट फळ आढळतं. या फळाचं नाव आहे ‘तराप’ फळ. याला फिलिपिनो भाषेत ‘मरांग’ असंही म्हणतात. ‘तराप’ फळ हे डुरियन आणि फणस या दोन काटेरी फळांचा संकर आहे. दोन काटेरी जन्मदात्यांपासून जन्माला आलेल्या फळाने मलमलीची झालर घेऊन जन्माला यावं, अशी अपेक्षा करणं म्हणजे, कारल्याच्या वेलाला कलिंगड लागेल अशी अपेक्षा करण्यासारखं आहे.  हे ‘तराप’ फळ देखील त्याच्या जन्मदात्यांसारखंच  काटेरी आहे. पण डुरियन फळासारखा उग्र वास (काही जण त्याला ‘दुर्गंधी’ म्हणतात.) मात्र त्याला नाही. त्याची चव चांगली असून, लोक चवीने खातात. मलेशियाच्या प्रेमळ गाण्याने माझ्याही मनात प्रेमाचा बहर आलाय. गाण्याच्या तालावर आणि प्रेमाच्या बहरात बाईक चालवत पुढे निघालो. बेटाबेटांमध्ये विखुरलेल्या या देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा थंडगार वारा ख्यालीखुशाली कळवत, शीळ घालत माझ्या गाण्यावर ताल देत होता. माझी बाईक ‘धकधक’च्या भाषेत ‘रासा सायांग हे’ गाणं गुणगुणत सिंगापूरच्या दिशेने नाचत नाचत निघाली. जगातील सर्वांत मोठं फूल फळांप्रमाणेच मलेशियातील फुलंदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इथलं फूल मलेशियातच नाही तर जगात भारी आहे. या फुलाचं नाव आहे ‘रॅफ्लेशिया’. जगातलं सर्वात मोठं फूल म्हणून प्रसिद्ध आहे. मोठं म्हणजे किती? तर त्याचा व्यास असतो तीन ते चार फूट. वजनही तसंच दमदार. फुलाचं वजन आहे फक्त १० किलो. रॅफ्लेशियाच्या फुलाला खोड नाही, पानं नाहीत की फांद्या नाहीत. आहे ते फक्त पाच पाकळ्यांचं महाकाय फूल. रॅफ्लेशिया हे झाडाला लागणारं फूल नसून झाडावर वाढणारं फूल आहे. माझ्या बोलण्यानं डोक्यात प्रश्नाचा गोंधळ माजला ना? सांगतो-  ‘रॅफ्लेशिया’ हे दुसऱ्या झाडावर वाढणारं परोपजीवी वनस्पतीचं फूल आहे. इतर झाडांचा रस शोषत त्याच्या फांदीवर वाढतं. या फुलाला इंडोनेशियात ‘पद्म’ असं म्हणतात. संस्कृतमधील ‘कमळ’ या अर्थाने ‘पद्म’ हे नाव पडलंय. मलेशियाच्या बेटांवरील जंगलात इतर झाडांचा रस शोषत हे परोपजीवी कमळं फुलतात.   या अवाढव्य फुलाचा वासही तितकाच विचित्र आहे. रॅफ्लेशियाचा वास चक्क कुजलेल्या मांसासारखा येतो. थोडक्यात दुर्गंधच. दुसऱ्या झाडाचा जीवनरस शोषून फुलणाऱ्या फुलाकडून सुगंधाची अपेक्षा तरी कशी करायची? मराठीतील नाजूक, हलक्या, सुगंधी फुलाची अपेक्षा करणाऱ्यांना हे परोपजीवी फूल मात्र चक्क इंग्रजीतील ‘फूल’ बनवतं.   (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. लि.कंपनीचे संचालक  आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com