कांदा पिकावर ॲन्थ्रॅक्नोज रोगाचा वाढता प्रादुर्भाव

सध्याकांदा रोपे किंवा रोप लागवडीनंतरही शेतामध्ये ॲन्थ्रॅक्नोज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनुकूल वातावरणामुळे रोगाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रतिबंधासाठी वेळीच उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
 कांदा रोपांवरील अँन्थ्रॅक्नोज रोगाचा प्रादुर्भाव. मान मुरगाळल्याप्रमाणे दिसत असल्याने शेतकरी याला पिळ्या रोग या नावानेही ओळखतात.
कांदा रोपांवरील अँन्थ्रॅक्नोज रोगाचा प्रादुर्भाव. मान मुरगाळल्याप्रमाणे दिसत असल्याने शेतकरी याला पिळ्या रोग या नावानेही ओळखतात.

सध्या नाशिकच्या येवला व सिन्नर, धुळे येथील सिंदखेडा आणि जळगाव येथील चोपडा या भागांमध्ये कांदा रोपे किंवा रोप लागवडीनंतरही शेतामध्ये ॲन्थ्रॅक्नोज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनुकूल वातावरणामुळे रोगाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रोगाच्या प्रतिबंधासाठी वेळीच उपाययोजना राबविण्याची गरज आहे. भारतामध्ये महाराष्ट्रातील लोणंद (जि. सातारा) येथे १९८१ मध्ये प्रथम ॲन्थ्रॅक्नोज (शा. नाव - कोलेटोट्रिकम ग्लोईस्पोरायडिस) या बुरशीजन्य रोगाची खरीप कांदा पिकात नोंद झाली होती. पुढे १९८२ आणि १९८३ दरम्यान नाशिक आणि पुणे विभागात हा रोग आढळला. आंध्र प्रदेशमधील कांदा पिकावर त्याचा सातत्याने प्रादुर्भाव आढळत आला आहे. महाराष्ट्रात दरम्यानच्या काळात ठरावीक भागामध्ये ठरावीक प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असला, तरी मागील वर्षापासून या रोगाची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे. सध्या कांदा रोपे व पुनर्लागवडीच्या शेतामध्ये असे दोन्ही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.  रोगाची लक्षणे

  • पातीवर सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ते हलक्या पिवळ्या डागांमध्ये रूपांतरित होतात. पुढे पूर्ण पातीवर पसरतात.
  • रोगाची तीव्रता वाढल्यास कांद्याच्या पिकाची मान लांब होण्यास सुरुवात होते. नंतर पात (Twisting) वेडीवाकडी होते. म्हणून याला शेतकरी पिळ्या रोग या नावानेही ओळखतात.
  • पुढील काळात कांद्याच्या पातीची मान वाकून जमिनीलगत होते.
  • कालांतराने बुरशी काळी पडून रिंगसारखी लक्षणे पातीवर दाखवते. ती कंदापर्यंत पोहोचते. 
  • सुरुवातीला लक्षणे प्रामुख्याने शेतामध्ये पाणी साचलेल्या किंवा ड्रीपर किंवा स्प्रिंकलरच्या जवळ दिसतात. त्यानंतर ते पूर्ण शेतात पसरतात.
  • या रोगाची वाढ पावसाच्या तीव्रतेवर व वातावरणावर अवलंबून असते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने रोपाची मुळे कमकुवत होऊन पाने पिवळी दिसतात. कंद पोसत नाही आणि काढणीनंतर कंद सडण्याचे  प्रमाण वाढते.
  • रोगाची कारणे 

  • हा रोग जमिनीमध्ये पिकाच्या अवशेषांमधून नंतर रोपांद्वारे किंवा कांद्याद्वारे पसरतो. बौफ आणि अन्य शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार (१९९५) हा रोग बियाण्यामार्फत सुद्धा पसरू शकतो.
  • या रोगाची वाढ ही पावसाच्या तीव्रतेवर, प्रमाणावर आणि वारंवार येण्यावर अवलंबून असते.
  • हा रोग पिकाला जमिनीतून संसर्ग करतो.
  • जेव्हा वातावरणात जास्त आर्द्रता व २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असते, त्या वेळी या रोगाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
  •  रोगाचा संसर्ग झाल्यानंतर तो पावसाद्वारे, वाऱ्याद्वारे किंवा सिंचनाच्या पाण्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.
  • ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये आर्द्रता ७८-९० टक्के आणि सरासरी पाऊस ३५ मिलिमीटर प्रति आठवडा असल्यास हा रोग जास्त प्रमाणात पसरत असल्याचे दिसून आले आहे.
  • एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन

  • पीक फेरपालट करावी. पीक अवशेष काढून टाकावेत.
  • गादीवाफ्यावर नर्सरी तयार करावी. किंवा रोपांची पुनर्लागवड करावी.
  • रोगाला प्रतिकार करणाऱ्या जातींची निवड करावी. उदाहरणार्थ : भीमा राज, भीमा श्‍वेता.
  • बी प्रक्रिया : कार्बेनडाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • रोप प्रक्रिया ः कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपे त्या द्रावणामध्ये १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर पुनर्लागवड करावी.
  •  बियाणे टाकल्यानंतर किंवा रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन पाटपाण्याद्वारे ड्रेंचिंग (आळवणी) करावे. एकसमान कव्हरेज असावे.
  • रासायनिक बुरशीनाशकांचा वापर - प्रमाण प्रति लिटर पाणी  (एकसमान फवारणी वा कव्हरेज असावे.)

  • बियाणे टाकल्यानंतर किंवा रोप लागवडीनंतर १०-१२ दिवसांनी - मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
  •  २५ ते ३० दिवसांनी - ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम
  • ४०-४५ दिवसांनी - हेक्झाकोनेझोल  १ मि.लि. 
  • ६० ते ६५ दिवसांनी - ॲझॉक्सीस्ट्रॉबीन ०.५ मि.लि.
  • टीप :  बुरशीनाशकांच्या शिफारशी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत आहेत. फवारणीच्या द्रावणात सिलिकॉन आधारित ॲडजुवंट वापरावे. रोगाच प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड असते. त्यामुळे प्रतिबंधकात्मक म्हणून लेखात दिलेल्या व्यवस्थापनाचे काटेकोरपणे पालन करावे.  - डॉ. सतीश भोंडे,  ९८२२६५०६६१ - डॉ. ओमप्रकाश हिरे,  ७५८८०१५४९१ (लेखक एनएचआरडीएफ, नाशिक या संस्थेतील निवृत्त अतिरिक्त संचालक आहेत. तर डॉ. हिरे नाशिक येथील खाजगी कंपनीत मृदा शास्रज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com