पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापन

शेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड ठेवावा. बोकडाची निवास व्यवस्था, आहार, पैदाशीच्या मोसमातील व्यवस्थापन ठेवल्यास कळपातील अधिक शेळ्यांचे रेतन होईल आणि उच्च प्रतीची वंशावळ मिळविणे शक्य होईल.
Selection of breed goats is important in goat rearing.
Selection of breed goats is important in goat rearing.

शेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड ठेवावा. बोकडाची निवास व्यवस्था, आहार, पैदाशीच्या मोसमातील व्यवस्थापन ठेवल्यास कळपातील अधिक शेळ्यांचे रेतन होईल आणि उच्च प्रतीची वंशावळ मिळविणे शक्य होईल. शेळीपालन  व्यवसायाचे भवितव्य शेळ्यांपासून मिळणाऱ्या करडांवर अवलंबून आहे. एका वेतात अधिक करडे मिळविण्याकरिता तसेच पुढील पिढीत चांगल्या उत्पादनक्षम शेळ्या व चांगल्या अनुवंशाचा बोकड मिळणे हे पैदाशीकरिता वापरण्यात येणाऱ्या बोकडावर अधिक अवलंबून असते.  पैदाशीच्या बोकडाची निवड 

  • आपल्या व्यवसायाच्या उद्दिष्टानुसार (मांस उत्पादन, दूध उत्पादन, दूध आणि मांस दोन्ही इ.)  पैदाशीकारिता शेळ्यांच्या जातीची निवड करावी. त्याच जातीचा बोकड पैदाशीकारिता  वापरावा. 
  • आपल्या भागातील वातावरणात टिकून राहण्याची क्षमता असलेल्या जातीचा जातिवंत बोकड पैदाशीकारिता वापरणे योग्य राहील. 
  • मराठवाड्यातील  उस्मानाबादी, पश्चिम महाराष्ट्रात संगमनेरी, विदर्भात बेरारी आणि कोकण पट्ट्यातील कोकण कन्याळ या जातीची निवड करावी. जेणेकरून त्यापासून उत्पादित शेळ्या व बोकड स्थानिक वातावरणात (भौगोलिक परिस्थिती, चारा, पाणी इत्यादी) सहजपणे जुळवून घेतील. 
  • राज्य किंवा देशाबाहेरील जातीचे बोकड ठेवायचे असल्यास त्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. बाजारात त्यांना मागणी असल्याचीही खात्री करून घ्यावी. 
  • बोकड जातिवंत असेल तर त्यापासून मिळणारी पैदासही चांगली असेल. कळप एकसारखा आणि आकर्षक/उठून दिसेल.
  • निवड केलेला बोकड हा जन्मत: जुळ्यातील किंवा तिळ्यातील आणि वजनदार (जन्मवजन २.५ ते ३ किलोग्रॅम पेक्षा अधिक) असावा जेणेकरून त्याची वाढ झपाट्याने होईल.
  • पैदाशीकरीता नराची निवड करताना १.५ ते २.५ वर्षाचा बोकड  निवडावा. ५ वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. दर दोन वर्षाला नर बदलावा किंवा आपल्या कळपात त्यापासून अंत:पैदास होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • बोकड घेताना त्याची वंशावळ व त्यांच्या नातलगाची जन्म वजने, वयात येण्याचे वय, प्रजनन क्षमता इत्यादी नोंदी तपासून घ्याव्यात.
  • बोकड हा देखणा, निरोगी, उत्साही,  सतेज त्वचा, पाणीदार डोळे असणारा हवा. चारही पाय मजबूत व पुढील दोन पायात थोडेसे अंतर (भरदार छाती) असावे आणि खूर निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. त्याकरिता बोकडास चालवून पहावे. 
  • बोकडाचे वृष्ण त्याच्या अंडकोशात पूर्णपणे आहेत आणि ते भरीव, दंडगोलाकार आणि एकसारख्या आकाराचे असल्याचे तपासून पाहावे.शिश्नद्वार सामान्य असावे, त्याठिकाणी कुठलीही जखम किंवा अधिकचे मांस नसावे.
  • निवड करताना बोकडाची लैंगिक क्षमता तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
  • पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापन निवास

  • गोठ्यात लागणारी जागा :   एका पैदाशीच्या बोकडाकरिता गोठ्यात ३.४ चौ.मी. एवढी जागा पुरवावी, शक्यतो गोठ्यातील एका कप्प्यात एक बोकड ठेवण्याकरिता वेगळी जागा असावी. 
  • गोठा कोरडा असावा, गोठ्यात हवा खेळती राहावी.
  • अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून पैदाशीच्या बोकडाची सुरक्षा राहण्याकरिता आवश्यकतेनुसार गोठा व्यवस्थापनात बदल करून घ्यावेत.
  • उन्हाळ्यात थंड राहण्याकरिता गोठ्याचे छत पक्के असेल तर त्यावर गवत टाकावे किंवा चुना मारून घ्यावा. गोठ्याच्या उघड्या बाजू गोणपाटाच्या पडद्याने झाकून घ्याव्यात आणि त्यावर अतिउष्णतेच्या काळात पाणी मारावे.
  • थंडीच्या काळात अतिथंड वातावरणात गोठ्याच्या उघड्या बाजू गोणपाटाच्या पडद्याने झाकून घ्याव्यात,  बोकड उभे राहण्याच्या जागेवर गवत अंथरून घ्यावे.बोकडाच्या छातीस सुती कपडा बांधावा. 
  • आहार 

  • बोकडास दिला जाणारा आहार हा सकस, भरपूर उच्चप्रतीचे अन्नघटक आणणारा असावा.
  • आहार देण्यापूर्वी, त्यात बुरशी किंवा इतर कुठलेही विषारी घटक असू नयेत. याचा त्याचा आरोग्य तसेच वीर्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.
  • बोकडास दिल्या जाणाऱ्या आहारात सकस हिरवा, चारा, उच्च प्रतीचा सुका चारा तसेच पशुखाद्याचा समावेश असावा.
  • दररोज एका बोकडास ज्याचे वजन ३५ ते ४० किलोग्रॅम आहे त्यास ३ ते ५ किलो सकस हिरवा चारा, १/२ किलो उच्च प्रतीचा सुका चारा आणि २००-३०० ग्रॅम एवढे पशुखाद्य (प्रथिनांची मात्रा-१० ते १२%) द्यावे. पैदाशीच्या बोकडाच्या आहारात सरकी, सरकी ढेप असू नये. यामुळे त्यांच्या वीर्य गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
  • आहारात क्षारमिश्रण आणि जीवनसत्त्व मिश्रणाचा वापर करावा. प्रोबायोटिक्सचा समावेश करावा.
  • बोकडांना दिल्या जाणारे पशुखाद्य बुरशी, उंदीर, घुशीपासून सुरक्षित राहील असे ठेवा, तसेच अधिक काळ साठवलेले पशुखाद्य देऊ नये.
  • उन्हाळ्यात शक्यतो सकाळी  लवकर आणि सायंकाळी  उशिरा आहार द्यावा.  पिण्याकरिता २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.
  • पैदास काळातील नियोजन

  • साधारणतः शेळ्यांचा प्रजनन काळ हा सप्टेंबर ते ऑक्टोबर, फेब्रुवारी ते मार्च आणि मे ते जून महिन्यादरम्यान आढळून येतो. याकाळात पैदाशीच्या बोकडाचा अधिक वापर होतो.
  • हा काळ सुरु होण्याआधी एक ते दोन आठवडे पैदाशीच्या बोकडास ५०-१०० ग्रॅम अधिकचे पशुखाद्य देणे गरजेचे आहे.
  • पैदाशीकारिता, १.५ ते २.५ वर्षांचा बोकड असेल तर त्यास प्रती २० शेळ्यांना रेतनाकरिता आणि   ३  ते ५ वर्ष वयापर्यंत असेल तर ३०-३५ शेळ्यांना रेतनाकरिता  सक्षम असतो. 
  • पैदाशीच्या पद्धती हात वीण पद्धत 

  • माजावरील शेळ्यांना बोकडाच्या सान्निध्यात एकावेळी एक अशा पद्धतीत ठेवले जाते. 
  • एक बोकड दिवसातून फक्त तीन शेळ्यांना रेतनाकरिता वापरतात.
  • या पद्धतीत लहान वयाच्या शेळ्यांना त्यांच्यापेक्षा अधिक वयाचा नर वापरल्यास अधिक प्रभावी ठरते. 
  • या पद्धतीत रेतन केल्या जाणाऱ्या शेळ्यांबाबत त्यांच्या रेतनाच्या तारखेबाबत खात्री असते. शेळ्यांचे पुढील व्यवस्थापन काटेकोरपणे ठेवण्यास मदत होते. शेळ्या किंवा बोकडांना जखमा होण्याची शक्यता कमी राहते.
  • पेन वीण पद्धत 

  • या पद्धतीत २० ते २५ शेळ्या गटाने नराच्या सानिध्यात ठेवल्या जातात. रात्रभर शेळ्यांच्या पैदाशीच्या नर बोकडाच्या सानिध्यात ठेवले जाते. नरांना दिवसभर वेगळे ठेवल्या जाते.
  • या पद्धतीचा फायदा असा की, रात्री नरांना  शेळ्यांच्या सानिध्यात ठेवल्याने दिवसा शेळ्यांच्या चराईत अडथळा निर्माण होत नाही आणि नरासही पुरेसा आराम मिळतो. पैदाशीकरिता योग्य उपयोग करून घेता येतो.
  •  कळप वीण पद्धत 

  • पैदाशीच्या बोकडांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी शेळ्यासोबत ठेवले जाते यात बोकडाची बरीच शक्ती शेळ्यांच्या मागे फिरण्यात जाते. शरीर प्रकृती खालावण्याची शक्यता असते.
  • या पद्धतीत नर काही विशिष्ट माद्यांकडे आकर्षित होऊन वारंवार त्यांनाच फळविण्याची शक्यता असते. यामुळे इतर शेळ्यांची लागण होण्याची शक्यता कमी राहते. कळपाचा एकूण फलन दर कमी होण्याची शक्यता असते.
  • दिवसाबरोबरच नर रात्रीही १० ते १२ शेळ्यांना फळविण्याची शक्यता असते. परंतु शेवटच्या काही शेळ्यांना मिळणाऱ्या वीर्यात शुक्राणू कमी असू शकतात, त्यामुळे काही शेळ्या गाभण राहत नाहीत.
  • कृत्रिम रेतन पद्धत 

  • कृत्रिम रेतन हे  सर्व प्रकारच्या  कळपात उच्च प्रतीच्या बोकडाचे वीर्य वापरून  कळपवंश सुधार करण्याकरिता सर्वोत्तम साधन आहे.
  • यात शितीकृत किंवा ताजे असे दोन्ही प्रकारचे वीर्य रेतन करता येते.
  • उच्च प्रतीच्या नराचे शितीकृत वीर्य वापरता येते, नर ठेवण्याची गरज नसते. परंतु, याकरिता तांत्रिक दृष्ट्‍या सक्षम व्यक्ती किंवा पशुवैद्यकांची मदत घ्यावी लागते. या पद्धतीत फलन दर हा कमी असतो.
  • - डॉ. चैतन्य पावशे,  ९९२१६११८९९ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com