agricultural news in marathi article regarding climate change by dr. nagesh tekale | Agrowon

नक्षत्रांचे गणित चुकू लागले

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 25 जानेवारी 2021

अत्याधुनिक तंत्रज्ञान हाती आले, तरी अचूक, पुरेशा आधी अंदाज देण्यात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण नक्कीच कमी पडत आहोत.
 

गावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत नक्षत्रांचे कोडे सोडवत असत. मात्र आता हवामान बदलाने घातलेले कोडे सोडवता सोडवता शिकल्या सवरलेल्या माणसांच्या तोंडाला फेस येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान हाती आले, तरी अचूक, पुरेशा आधी अंदाज देण्यात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण नक्कीच कमी पडत आहोत.

पूर्वी भारतीय शेती आणि शेतकरी हवामान खाते आणि त्यांच्या अंदाजावर फारसे अवलंबून नव्हते. ज्येष्ठात मृगाचा पाऊस पडणारच, त्यामुळे ७ जूनला मॉन्सून येणार हे ठरलेले असे. नभोमंडळामधील २७ नक्षत्रांपेक्षा शेतकऱ्यांची खरी मैत्री असे ती पावसाळी नक्षत्रांशी. एक गोष्ट आठवते, खेड्यातील  शाळेतील गुरुजींनी गणित घातले. “२७ मधून ९ वजा झाले तर काय उरले?” शेतकऱ्याच्या मुलाने पटकन उत्तर दिले “दुष्काळ आणि आत्महत्या”. किती तंतोतंत खरे आहे हे! एकूण २७ नक्षत्रांपेकी आमच्या शेतकऱ्यांची मृगापासून हस्तापर्यंतची पावसाळी ९ नक्षत्रे वजा गेल्यावर काय राहणार? शेतीला जीवदान देणारी ही नक्षत्रे म्हणजेच आमचे खरे हवामान केंद्र होते. ते आज ढासळण्याच्या मार्गावर आहे. 

पूर्वी या नऊ नक्षत्रांच्या सुयोग्य शिस्तबद्ध वागण्यामुळेच शेतकऱ्यांचे खरिपातील वाफसा, पेरणी, उगवण, कुळव, फुलोरा, भरणी, काढणी आणि मळणी यांचे अंदाज कधीच चुकत नसत. दुबार पेरणी, बी उगवलेच नाही, पिकांनी माना टाकल्या असे एखादा अपवाद वगळता होत नव्हते. १९७२ चा दुष्काळ हा निसर्ग नियमानुसार पडला होता. पाऊस वेळेवर पडणार, नदी, ओढ्यांना पूर येणार, वर्षभर नद्या वाहत राहणार, शेती विविध पिकांनी बहरलेली असणार यात कधीच खंड पडला नव्हता. तीच पारंपरिक पिके, गुरेढोरे, पाळी, पेरणी, कृषी निगडित सणवार, उत्सव यात कधीही बदल झाला नाही. कृषी ग्रंथाच्या हजारो आवृत्त्या निघाल्या तरीही तो ग्रंथ कपाळाला स्पर्श करून पुन्हा पुन्हा वाचावा वाटे. आमच्या शेतीचा तो सुवर्ण काळ होता. १९७० च्या हरितक्रांतीनंतर या ग्रंथात अनेक रंगीत चित्रे आली. जुन्या वयोवृद्ध शेतकऱ्यांना या रंगीत चित्रांविषयी थोडी भीतीच वाटे. त्या काळातील तरुण शेतकरी मात्र त्याकडे आकर्षित होऊन म्हणत -असेच चित्र माझ्या शेतात तयार झाले तर! 

हरित क्रांतीनंतरची दोन दशके देशासाठी चांगली गेली. आमचा अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी होण्याचा प्रवास सुरू होता. नंतर शेतीचे चित्र हळूहळू बदलू लागले. आपल्याही नकळत भारतीय कृषी ग्रंथात ‘वातावरण बदल’ हा नवीन धडा शेवटी आला. नव्या पिढीने शेतीची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्यावर कालबाह्य म्हणून जुन्या ग्रंथांची रवानगी माळ्यावर झाली. घरामधील वयोवृद्धांकडून हा कृषी ग्रंथ आणि ज्ञानेश्‍वरीबरोबरीने वाचला जाई. २००-३०० कि.मी. पायी पंढरीची वारी करणारे शेतकरी मी पाहिले आहेत. पायवाटेचा प्रवास, दोन्ही बाजूंना बहरलेली पिके आणि प्रवासात वाटेत भेटणाऱ्या पाच पंचवीस लहान- मोठ्या वाहत्या नद्या हे त्या वेळच्या वारीचे सौंदर्य होते. वाहत्या नदीचे अथवा झऱ्याचे पाणी प्यायला ओंजळ पुरेशी होती. आज ज्याला भारतीय शेती तीस-चाळीस वर्षांपूर्वी कशी होती, हे पाहायची असेल, तर त्याला त्या ग्रंथात ‘वातावरण बदल’ हा लहानसा सगळ्यात शेवटी दिसेल. मात्र आजचे शेतीचे पुस्तकच सुरू होते ते ‘वातावरण बदल आणि शेती’ अशा प्रकरणाने. त्याची पानेही वाढलेली दिसतील. 

हवामान अंदाज जाणून घेतल्याशिवाय आजचा शेतकरी एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही. अचूक हवामान अंदाज व्यक्त करण्याची क्षमता मागील दोन दशकांत हळूहळू विकसित होत गेली. प्रतिवर्षी मॉन्सूनच्या पूर्वसंध्येला मिळणाऱ्या या भेटीकडे पूर्वी शेतकरी फारसे लक्ष देत नसत. त्यांचे नक्षत्रांचे गणित सुरू असे. आता मात्र नक्षत्रे गुंडाळून ठेवत या अंदाजाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी ‘काय वाढून ठेवले आहे’ या चिंतेने त्यांना घेरलेले असते. “देव करो आणि निसर्गाचे विकट हास्य पदरी न पडो” हीच प्रत्येकाची मागणी असते. सहा, सात दशकांपूर्वी हवामानाचे अंदाज सांगितले जाणे ही औपचारिकताच होती. कारण निसर्ग राजा शेतकऱ्यांवर प्रसन्न होता. आता मात्र तो चक्रीवादळे, समुद्राचे उधाण, वादळांचा वेग याद्वारे आमच्या काळजात धडकी भरवतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने माणूस प्रगतीच्या उच्च शिखरावर गेला. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान खात्याचे अंदाज सुधारले. आम्ही निसर्गावर, शेतीवर किती क्रूर अत्याचार केला आहे, हे  समजत नाही. हे सर्व लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या हातात असलेला भारतीय हवामान खात्याचा मागील वर्षाचा (२०२०) अहवाल. त्यातील अंदाज कसे खरे ठरले, याचा अभिमान बाळगावा की भारतीय शेतीची वातावरण बदलामुळे वाताहात झाली याचे दुःख वाटावे हेच कळत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या वाट्याला हे विदारक चित्र, निसर्ग क्रौर्य आले, ते पाहता आज ते जात्यात आणि आपण सुपात आहोत, हे जाणवून भीती वाटते. 

टोकाचे हवामान अनुभवले...
भारतीय हवामान खात्याचा २०२० वर्षांमधील विविध नैसर्गिक घटना, शेती आणि त्याला जोडलेले वातावरण बदल याचा सविस्तर अहवाल जानेवारी २०२१ मध्ये पाहताना डोळ्यासमोर अंधारी येईल की काय, असे वाटते. मागील वर्षी भारताच्या कृषी क्षेत्राने टोकाचे हवामान अनुभवले. देशात तब्बल दीड हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला. किती गुरे, ढोरे गेली याची गणतीच नाही. या आधीही महापूर पाहिलेले असले तरी एकाच दिवसात पूर्ण मॉन्सूनची सरासरी पूर्ण करणारा मुसळधार पाऊस पाहिला नव्हता. अनेक ठिकाणी तो लांबला. २०२१ मध्ये सुद्धा अजूनही कोठे कोठे गर्जतच आहे. 

  • २०२० वर्ष भारतीयांसाठी सर्वांत जास्त उष्ण वर्ष म्हणून नोंदले गेले. 
  • रब्बीसाठी थंड हवा पोषक असते. मात्र या वर्षी हिवाळासुद्धा ०.१४ अंश सेल्सिअसने गरम होता. शेतीसाठी हे निश्‍चितच चांगले लक्षण नव्हे. 
  • संपलेल्या कोरोनाग्रस्त वर्षात आम्ही पाच भयंकर चक्रीवादळे पाहिली. त्यातील निसर्ग चक्री वादळाने कोकणचा शेतकरी पूर्ण उद्‍ध्वस्त झाला. 
  • अँफन वादळाने प. बंगालमध्ये ९० नागरिक आणि हजारो पशुधन मृत्युमुखी पडले. निवार आणि बुरेवी या वादळांनीही शेतीचे मोठे नुकसान केले. देशात मुसळधार पाऊस आणि महाभयंकर पुरामुळे ६०० पेक्षा जास्त लोक मरण पावले. वीज पडून एकूण ८१५ लोकांचा मृत्यू झाला. अंगावर झाडे पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पुन्हा वेगळीच आहे. 
  • २०२० मध्ये जमिनीलगतचे तापमान सरासरीपेक्षा ०.२९ अंशांनी जास्त असणे, हे भविष्यातील शेतीसाठी निश्‍चितच चांगले नाही. कारण भूमातेला समृद्ध करणाऱ्या जिवाणूंच्या जीवनचक्रामध्ये यामुळे मोठी उलथापालथ होऊ शकते.
  • शहरामधील लोक हवामान खात्याच्या अचूक अंदाजाने वेळेवर सावध होतात. शासनही त्वरित उपाययोजना करते. मात्र उद्‍ध्वस्त ग्रामीण भागाचे चित्र अतिशय भीषण असते. भारतीय हवामान खात्याची अत्याधुनिकता, त्यांचे अंदाज आणि वेळीच सावध होण्यास दिलेला वेळ कितीही अचूक असला तरी ग्रामीण, दुर्गम भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेक वेळा शेतकरी याबद्दल अज्ञानी असतो. हवामान खात्याचे अंदाज वेळेवर पोहोचून पिकांचे, कृषी उत्पादनाचे संरक्षण करण्याइतका वेळ मिळणे आवश्यक आहे. यात अजूनही आपण कुठे तरी कमी पडत आहोत. 
  • हवामानाचे अंदाज अचूक होण्यासोबत पुरेसे आधी हाती येणे, ज्यांच्यावर त्यांचा परिणाम होणार आहे, अशा समुदायापर्यंत पोहोचवणे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे. 
  • २०२० च्या वातावरण बदल आणि त्याला जोडलेल्या निसर्ग प्रकोपाने हजारोंचे प्राण गेले. २०२१ चा असाच अहवाल पुन्हा येईल, तेव्हा वातावरण बदलाची ओळख आणि त्याचे शेतीवरील संभाव्य परिणाम यांची बऱ्यापैकी ओळख झालेली असेल, अशी आशा करूया! संभाव्य कृषी नुकसान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जीवितहानी टाळण्यात यश येईल, अशी अपेक्षा.

संपर्क ः डॉ. नागेश टेकाळे, ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...