काकडीवर्गातील आरोग्यदायी झुकिनी

झुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज, स्पॅगेटी स्क्वॅश आणि काकडी यांच्याप्रमाणे उन्हाळी फळ आहे. ते कच्चे किंवा शिजवून खाता येत असल्याने फळभाजी म्हणून लोकप्रिय आहे.
Healthy Zucchini
Healthy Zucchini

झुकिनी ही कुकुरबीटासी कुळातील असून, खरबूज, स्पॅगेटी स्क्वॅश आणि काकडी यांच्याप्रमाणे उन्हाळी फळ आहे. ते कच्चे किंवा शिजवून खाता येत असल्याने फळभाजी म्हणून लोकप्रिय आहे.  झुकिनी (शा. नाव :  कुकुरबीटा पेपो) हे काकडीवर्गीय पीक असून, इंग्रजीमध्ये ‘समरस्क्वॅश’ या नावाने ओळखले जाते. काकडी व दुधी भोपळ्याची मिश्रित चव व काकडीसारखेच याचे फळ दिसते. या पिकाची फळे गर्द हिरव्या, पोपटी, राखाडी व पिवळ्या रंगात येतात.  याच्या झुडूपसदृश वेली असून, कमाल ३ फुटांपर्यंत उंची असते. सरासरी उंची दीड ते दोन फुटांपर्यंत राहते. झुकिनीची पाने भली मोठी दीड ते दोन फूट लांब व तांबड्या भोपळ्यासारखी दिसतात. त्याला लांबलचक दांडा असतो व पानावर तसेच पानाच्या दांड्यावर बारीक पांढरी काटेरी लव असते. पानाच्या देठाच्या बेचक्यात याला फुले लागतात. काकडीवर्गीय पीक असल्यामुळे याला नर व मादी अशी वेगवेगळी फुले एकाच झुडपावर लागतात. संपूर्ण न पिकलेली फळे झुडूपसदृश वेलीवरून तोडली जातात. फळांची लांबी २.२ फुटांपेक्षा जास्त वाढू शकते. मात्र सरासरी सामान्यपणे २० सें.मी.पर्यंत फळ घेतले जाते. वनस्पतीशास्त्रानुसार हे फळ असले तरी फळभाजी म्हणून वापरली जाते. याची फळे कच्ची किंवा शिजवून सॅलडच्या स्वरूपात खाल्ली  जातात. झुकिनीचे प्रकार

  •  झुकिनीचे रंगानुसार गडद हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. या पिकाचे झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश आणि ॲरीस्टोक्रॅट अशा परदेशी वाणाचा आपल्याकडेही लागवडीसाठी वापर होतो. 
  •  गर्द हिरव्या फळांचे उत्पादन अधिक येते. ती सॅलड आणि भाजीसाठी वापरली जाते. 
  •  गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांचा गर दुधाळ व स्वादयुक्त आहे. तसेच गोल्ड रश वाण लवकर येत असल्याने त्याचीही लोकप्रियता वाढत आहे. 
  •  हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही ॲरिस्टोक्रॅट या संकरित वाणाची वैशिष्ट्ये आहेत. 
  • झुकिनीचे आरोग्यवर्धक फायदे  एक कप शिजवलेल्या झुकिनी (२२३ ग्रॅम) मधून मिळणारी पोषकतत्त्वे : ऊर्जा १७ कॅलरी, प्रथिने १ ग्रॅम, चरबी १ ग्रॅमपेक्षा कमी, कार्ब ३ ग्रॅम, साखर १ ग्रॅम, फायबर १ ग्रॅम, जीवनसत्त्व-अ ४०%, मॅंगेनीज १६%, जीवनसत्त्व-क १४%, पोटॅशिअम १३%, मॅग्नेशिअम १०%, फोलेट ८%, तांबे ८%, फॉस्फरस ७%, जीवनसत्त्व-ब-६ -७%, थायमिन ५% (टक्केवारीतील प्रमाण हे शिफारस केलेल्या आहारातील दैनिक सेवनाच्या (आरडीआय) तुलनेत दिले आहे.)

  • झुकिनीत लोह, कॅल्शिअम, जस्त आणि इतर अनेक बी-जीवनसत्त्वे कमी प्रमाणात असतात. कच्च्या झुकिनीच्या तुलनेत शिजवलेल्या झुकिनीमध्ये अ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात उपलब्ध होते.
  • यात अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असून, कॅरोटीनोइड्सही (उदा. लुटेन, झेक्सॅन्थिन आणि बीटा कॅरोटीन) मुबलक आहेत. ते  डोळे, त्वचा आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते. काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण देते. 
  • पचन संस्थेसाठी फायदेशीर :  यात पाण्याचे प्रमाण अधिक असून, बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करते. विद्राव्य स्वरूपातील तंतुमय पदार्थ आतड्यातील जिवाणूंसाठी, तर अविद्राव्य तंतुमय पदार्थ हे सारक म्हणून काम करतात. 
  • रक्तातील शर्करा कमी करण्यासाठी कमी कार्ब झुकिनी उपयुक्त ठरते.
  • हृदयाचे आरोग्य - झुकिनीतील विद्राव्य फायबर शरीराला हानिकारक ठरणाऱ्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. त्यात पोटॅशिअमचे उच्च प्रमाण रक्तवाहिन्यांसाठी उत्तम असून, उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. 
  • झुकिनी जीवनसत्त्व-क आणि बीटा कॅरोटीन समृद्ध असून, दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यातील ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे  अँटिऑक्सिडेंट्स घटक वयाशी संबंधित डोळ्यांचे आजार, उदा. मोतीबिंदूची शक्यता कमी करू शकतात. 
  • नियमित आहारामध्ये झुकिनीचा वापर केल्यास, वजन मर्यादित ठेवण्यास मदत होते. 
  • -  डॉ. अविनाश  काकडे,  ८०८७५२०७२० डॉ. हेमंत रोकडे,  ९८८१७७५०९५ रहीम खान निजाम खान,  ९३७१३७३३९९ (राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com