आंतरमशागत, पिकाला द्या भर...

सध्याच्या काळात आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी, वर खतांची मात्रा देणे आवश्यक आहे.
जलसंधारणासाठी पिकांच्या ओळीमध्ये सरी पाडावी.
जलसंधारणासाठी पिकांच्या ओळीमध्ये सरी पाडावी.

सध्याच्या काळात आंतरमशागतीची कामे करणे गरजेचे आहे. पीकवाढीच्या अवस्थेनुसार नांग्या भरणे, विरळणी, कोळपणी, खुरपणी, खांदणी, वर खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. नांग्या भरणे पेरणीनंतर बऱ्याच वेळा उगवण नीट न झाल्यामुळे वाफ्यात, साऱ्यात रिकाम्या जागा दिसतात, अशा वेळी टोकण पद्धतीने किंवा रोपांची लागवड करावी. साधारणतः पेरणीनंतर ८-१० दिवसांत नांग्या भराव्यात. जेणेकरून आधीच्या आणि नंतर लावलेल्या पिकांच्या वाढीत जास्त फरक पडत नाही. यामुळे रोपांची हेक्टरी संख्या योग्य प्रमाणात राखता येते. विरळणी बऱ्याच वेळा दाट पेरणीमुळे योग्य अंतर राहत नाही. पेरणीनंतर १०-१२ दिवसांनी आणि २२-२५ दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. यामुळे या रोपातील अंतर योग्य राहते. कोळपणी  तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करणे गरजेचे ठरते. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ कोळपण्या पेरणीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून पाचव्या-सहाव्या आठवड्यापर्यंत कोळपणी करावी. कोळपणीसाठी विविध प्रकारची पिकानुसार कोळपी उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा. खुरपणी  तणांमुळे पिकाला अन्नद्रव्य, पाण्याची कमतरता भासते. कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, उत्पादनात घट येते. यासाठी तणांचा प्रादुर्भाव कमी करून पीक तणरहित ठेवणे गरजेचे आहे. साधारणतः २ ते ३ खुरपण्या पिकानुसार आणि तणांच्या प्रादुर्भावानुसार कराव्यात. वेळेअभावी किंवा मजुरांअभावी खुरपणी शक्य नसल्यास रासायनिक तणनाशकाचा वापर करावा. खांदणी  जमिनीत वाढणाऱ्या भागांची वाढ नीट होण्यासाठी रोपांच्या, पिकांच्या बुंध्याला किंवा बुडाला मातीची भर दिली जाते. खांदणी मुख्यतः ऊस, आले, बटाटा, हळद, उपट्या भुईमूग इत्यादी पिकांसाठी केली जाते. उसासाठी खांदणी केल्यामुळे पाणी एकसारखे बसते, पीक लोळत नाही. उसासाठी दोन ते अडीच महिन्यांनी बाळबांधणी आणि ४ ते ५ महिन्याचे पीक होताच पक्की बांधणी करावी. वर खतांचा वापर  पेरणी झाल्यानंतर पीकवाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार विशेषतः नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. खुरपणी किंवा कोळपणी झाल्यानंतर खत मातीत मिसळले जाईल या पद्धतीने द्यावे. खत दिल्यानंतर पिकाला पाणी द्यावे. आच्छादनाचा वापर  पेरणी केल्यानंतर तीन आठवड्यांनी पिकांच्या दोन ओळींत सेंद्रिय पदार्थांचे उदा. गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तूरकाठ्या, ज्वारीची धसकटे, उसाचे पाचट, पिकांचा टाकाऊ भाग आच्छादन म्हणून वापरावे. साधारणपणे प्रति हेक्टरी ५ टन या प्रमाणात सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकतो, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहाते. पीक व्यवस्थापन 

  • तुरीच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावे. पीक १५ ते २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि पुढे १५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर ३०-४५ दिवस शेत तणविरहित ठेवावे.
  • मूग, उडदाचे पीक सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावे. ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. पीक २०-२५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. ही पिके ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादनवाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
  • हुलगा, मटकी, चवळी आणि राजमा ही पिके २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस पीक तणविरहित ठेवावे.
  • कपाशीच्या पिकात मातीची भर, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जमिनीत हवा खेळती राहून मुळांना आवश्यक असलेला प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळण्यासाठी व तणनियंत्रणासाठी आंतरमशागत फार महत्त्वाची आहे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी ३ ते ४ कोळपण्या, २ ते ३ वेळा निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे.
  • बाजरी पिकात १० दिवसांनी पहिली व २० दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपांतील अंतर १५ सेंमी ठेवावे.
  • भुईमुगाच्या पिकात, पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत.१०-१२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपणी, दोन खुरपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत करू नये.
  • सूर्यफूल पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी एक खुरपणी करावी. दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी.
  • भाजीपाला पिकांमध्ये फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी, म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्याव्यात. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारणीसाठी तयारी करावी.
  • आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये दर दोन ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. या सऱ्यांमुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
  • संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com