वनशेतीमध्ये जांभूळ लागवड

जांभळाच्या वाढीसाठी खोल चिकण माती असणारी आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. अशा मातीत जमिनीचा पुरेसा ओलावा टिकून राहतो. चांगले उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी.
jamun cultivation in forestry
jamun cultivation in forestry

जांभळाच्या वाढीसाठी खोल चिकण माती असणारी आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. अशा मातीत जमिनीचा पुरेसा ओलावा टिकून राहतो. चांगले उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी. जांभूळ हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फळझाड. झाडाची उंची साधारणपणे २० ते ३५ मीटरपर्यंत वाढू शकते. झाडाची साल खडबडीत असते, फांद्या राखाडी पांढऱ्या रंगाच्या असतात. फेब्रुवारी महिन्यात दिसणारा फुटवा आणि फुलांची निर्मिती करतो. ५ ते १० महिन्यांच्या जुन्या फांद्यावर फुलांच्या कळ्या लागतात. फुले मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू राहतात. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झाडे पूर्ण बहरलेली असतात. फुले मुख्यतः चालू वर्षाच्या फांद्यावर लागतात, फळे १० ते ४० च्या घोसात लागतात. जांभळाचा गर पांढरा व अतिशय रसाळ असतो. फळधारणेनंतर पिकण्यासाठी ६० ते ६५ दिवस लागतात.

  • वाढीसाठी आणि फळ धारणेसाठी कोरड्या हवामानाची गरज असते. उपोष्णकटिबंधीय भागात, लवकर पाऊस फळे पिकण्यासाठी आणि त्याचा आकार, रंग आणि चव यांच्या विकासासाठी फायदेशीर मानला जातो.
  • झाडाच्या वाढीसाठी खोल चिकण माती असणारी आणि चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. अशा मातीत जमिनीचा पुरेसा ओलावा टिकून राहतो. जो उत्तम वाढ आणि चांगल्या फळासाठी फायदेशीर आहे.
  • जांभूळाचे वैशिष्ट्य असे आहे, की काटक व कठीण असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशमध्ये, क्षारयुक्त जमिनीमध्ये किंवा जास्त पाऊस व पाणी साचलेल्या परिस्थितीतही चांगले वाढू शकते.
  • रोपवाटिका 

  •  रोपे बियांपासून आणि कलामांद्वारे तयार केली जातात. एका फळापासून पुष्कळ अंकुर निघत असल्यामुळे रोपे तयार करण्यासाठी देखील वापरले जातात. तथापि, बियांपासून रोपनिर्मिती केल्यामुळे फळ धारणा उशिरा होते. परंतु बियांपासून तयार केलेली रोपे रूटस्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात.
  • मे-जून महिन्यामध्ये बिया एकत्र करून ४ ते ५ सेंमी गादीवाफ्यावर टोकाव्यात. त्या सुमारे १० ते १५ दिवसांत उगवतात. रोपे फेब्रुवारी ते मार्च किंवा पावसाळ्यात, अर्थात ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये रूटस्टॉक म्हणून वापरण्यासाठी तयार होतात.
  •  शाखीय अभिवृद्धी (काष्ठ कलमे), बगल, ढाल किंवा व्हिनियर कलम भरून रोपनिर्मिती केली जाते. कलामांसाठी १० ते १४ मिमी जाडी असलेल्या एका वर्षाच्या रूटस्टॉक वर डोळा भरला जातो. कमी पर्जन्यमान भागात डोळा भरण्यासाठी जुलै ते ऑगस्ट हा सर्वोत्तम काळ आहे. ज्या भागात पाऊस लवकर आणि मुसळधार असतो, तेथे मे-जूनच्या सुरुवातीला डोळे भरावे.
  •  गुटी कलमाद्वारे सुद्धा रोपनिर्मिती केली जाते.
  • लागवड तंत्र 

  • साधारपणे मे महिन्यामध्ये पूर्वमशागत करून १० × ८ मीटर, ८ × ८ मी किंवा उच्च घनतेसाठी ५ × ५ मीटर (४०० झाडे/हेक्टर) अंतरावर ९० × ९० × ९० सेंमी आकाराचे खड्डे काढावेत.
  • सामान्यपणे २० ते २५ दिवस उन्हामध्ये तापू देऊन सुपीक माती आणि शेणखताच्या मिश्रणाने (३:१ प्रमाणात) खड्डे भरावेत.
  • जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये कलमांची लागवड करावी.
  • बागेचे व्यवस्थापन

  • नवीन कलमावर ३ ते ५ चांगल्या फांद्या ६० सेंटिमीटरवरील अंतराच्या ठेवाव्यात. ज्यामुळे कलमाला आकार प्राप्त होईल. त्यानंतर झाडाचा योग्य आकार राहण्यासाठी छाटणी करावी. रोगट व खराब फांद्या तोडून टाकाव्यात.
  • नवीन तसेच जुन्या फळबागांमध्ये वर्षातून २ ते ३ वेळा कोळपणी करावी. त्यामुळे तणनियंत्रण होते.
  • आंतरपिकांचे नियोजन 

  • सुरुवातीच्या काळामध्ये बागेत आंतरपिकांची लागवड शक्य आहे.
  • कोरडवाहूमध्ये उद्यानकुरण किंवा कृषी-उद्यान पद्धतीमध्ये जांभूळ लागवड केली जाते.
  • जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधावर लागवड केली जाते.
  • पाणी आणि खत व्यवस्थापन 

  • १० ते १५ किलो शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी खत, १२५ ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि ५० ग्रॅम पालाश एक वर्षाच्या कलमाला द्यावे. दरवर्षी मात्रा वाढवत न्यावी.
  • पाचव्या वर्षांनंतर ३० ते ४० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश, १० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि १०० ते १५० ग्रॅम निंबोळी खत प्रती कलमास द्यावे.
  • सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार शाखीय वाढीसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ८ तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. फूल व फळधारणेच्या वेळी दिवसाआड २ तास ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
  • एप्रिलमध्ये फुलोऱ्यात युरियाची १ टक्का द्रावणाची फवारणी घेतल्यास उत्तम फळ धारणा होते. फळांची गुणवत्ता आणि रंग सुधारण्यासाठी ०.२-०.१ टक्का झिंक सल्फेटची फवारणी करावी.
  • उत्पादन 

  • कलम लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी फळ धारणा होण्यास सुरवात होते. बिया पासूनची वाढलेली झाडे ८ ते १० वर्षांनंतर फळे देतात.
  • साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फुले व मे-जुलै महिन्यात फळे पिकतात, हे जात आणि कृषी हवामानाच्या विविधतेवर अवलंबून आहे.
  • बीपासून तयार झालेल्या वीस वर्षांच्या झाडापासून सुमारे ८० ते १०० किलो. १० वर्षे जुन्या कलमापासून सुमारे ६० ते ७० किलो फळांचे उत्पादन मिळते.
  • जातींची निवड 

  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कोकण बहाडोली या जातीची शिफारस महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी केली आहे. परंतु कलमे न मिळाल्यास बी पेरून लागवड करावी.
  • पारस ही जात पुणे आणि नगर जिल्ह्यातील देशी जातीतून निवडून विकसित केली आहे.
  • जांभूळ हे पर परागीकरण असल्याने रोपांमध्ये प्रचंड परिवर्तनशीलता येते. यामध्ये फळांचा आकार, गर मात्रा, टीएसएस आणि आंबटपणा यामध्ये फरक दिसतो.
  • विविध जाती  सीआयएसएच जामवंत  - ९० टक्यांपेक्षा जास्त गर, पौष्टिक आणि प्रतिजैविकांनी समृद्ध, खाण्यासाठी, प्रक्रियेसाठी उपयुक्त. सीआयएसएच जे-३७

  • १२-१५ मीटर उंच, परीघ १.९५ मीटर, छत पसरलेले, परिपक्वता साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, फळाचे सरासरी वजन २४ ग्रॅम, लांबी ४ सेंमी, गर ९० टक्के, टीएसएस १६.४ डिग्री ब्रिक्स.
  • सहा वर्षे वयाच्या झाडापासून ५० किलो फळे प्रति झाड.
  • सीआयएसएच जे - ४२ (सीडलेस)

  • झाडाची उंची १०-११.५० मीटर, खोडाचा घेर १.५ मीटर, छत पसरलेले, परिपक्वता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात.
  • फळ गोल आकाराची आणि सरासरी वजन ६.८७ ग्रॅम, लांबी २.५७ सेंमी, लगदा ९८ टक्के, टीएसएस १४.७ डिग्री ब्रिक्स.
  • १० वर्षे वयाच्या झाडापासून ६०-९० किलो फळे / झाड
  • कोकण बहाडोली 

  •  मोठ्या आकाराची फळे आणि जास्त काळ टिकणारी गुणवत्ता, नियमित फळ धारणा.
  • फळाचे सरासरी फळाचे वजन १४ ते १६ ग्रॅम. १६ डिग्री ब्रिक्स टीएसएस.
  • नऊ वर्षांच्या झाडापासून ७०-८० किलो फळे प्रति झाड.
  • जामुन जीजे-८

  • फुलांचा कमाल कालावधी मार्च महिन्यात.
  • लवकर येणारी जात, फळाचे सरासरी वजन १७ ग्रॅम.
  • ८३.३३ टक्के गर, टीएसएस १६ डिग्री ब्रिक्स.
  • ६ वर्षांच्या झाडापासून फळ उत्पादन ४८-५० किलो प्रति झाड.
  • औषधी उपयोग

  • हृदयरोग, मधुमेह, संधिवात, दमा, पोटदुखी, आतड्यांसंबंधी आजारावर उपयुक्त.
  • उच्च तंतुमय पदार्थामुळे पचनास मदत. मळमळ व उलट्या थांबवते.
  • मूल्यवर्धित पदार्थ  रस, बी पावडर, जॅम, जेली, स्क्वॅश, सिरप, आरटीएस, सरबत, टॉफी, श्रीखंड, वाइन. संपर्क - विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६ - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com