माणगा अन् मेस बांबूचे सुटले कोडे

गेल्या आठवड्यात फायटोटॅक्सा (Phytotaxa) या शास्त्रीय नियतकालिकात डॉ. तेताली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणगा आणि मेस या बांबूच्या जातींबाबत संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केला. या अनुषंगाने बांबू जातींमधील विविधता स्पष्ट झाली आहे.
Manga and Mess Bamboo
Manga and Mess Bamboo

गेल्या आठवड्यात फायटोटॅक्सा (Phytotaxa) या शास्त्रीय नियतकालिकात डॉ. तेताली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणगा आणि मेस या बांबूच्या जातींबाबत संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केला. या अनुषंगाने बांबू जातींमधील विविधता स्पष्ट झाली आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जैवविविधता उद्यान आहे. या उद्यानातील बांबू संग्रहालयात पंचवीसपेक्षा जास्त प्रजातींची लागवड आहे. विद्यापीठातील माझे सहकारी डॉ. अजय राणे यांनी माणगा या बांबूची अभिवृद्धी आणि लागवड यावर संशोधन केले. त्यातून माणगा बांबू ही एक वेगळी प्रजात असून, ती प्रामुख्याने कोकण आणि पश्‍चिम घाटात मुख्यत्वे लागवड केलेली आढळते, एवढी माहिती झाली होती. माणगा बांबूचा इतिहास 

  • माणगा बांबूच्या वर्गीकरण आणि नामकरणाचा इतिहास मोठा गुंतागुंतीचा पण रंजक आहे. जनरल विलियम मन्रो यांनी १८६८ मध्ये भारतातील बांबू प्रजातींचा प्रमाण ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यामध्ये कोकणात आढळलेल्या बांबूला त्यांनी Oxytenanthera stocksii हे नाव दिले होते. या बांबूला छोटी अणकुचीदार टोके असलेले पुंकेसर असल्याने त्यांनी हे नाव दिले होते.
  • १९८९ मध्ये मजुमदार यांनी ‘Oxytenanthera हा गण केवळ आफ्रिकेत आढळतो, हा दावा मान्य करून या प्रजातीसाठी Pseudotenanthera असा नवीन गण तयार केला. गुएन यांनी १९९१ मध्ये हा नवीन गण चुकीचा आहे हे दाखवून या प्रजातीला Gigantochloa गणात दाखल केले. त्याच वर्षी भारतातील एक नावाजलेले बांबूतज्ज्ञ डॉ. नैथानी यांनी Gigantochloa साठी आवश्यक असलेले गुणधर्म नसल्यामुळे या प्रजातीला Pseudoxytenanthera stocksii म्हटले. पुनः २००४ मध्ये महेश कुमार आणि सहकाऱ्यांनी या प्रजातीला Dendrocalamus stocksii म्हटले. पुंकेसरांच्या दांड्या एकत्र जुळलेल्या आहेत की नाही यावर ही मतमतांतरे होती.
  • आजच्या घडीला माणग्याचे मान्यताप्राप्त शास्त्रीय नाव Pseudoxytenanthera stocksii असेच आहे. तरीही अनेक ठिकाणी D. stocksii वापरले जाते.
  • माणगा आणि मेस बाबत संशोधन  माणगा आणि मेस या स्थानिक नावांच्या बाबतीत घोळ आहे. स्थानिक लोकांना या दोन प्रजाती वेगळ्या ओळखता येत असल्या, तरी शास्त्रीय समुदायाचा या दोन नावांचा वापर मात्र अतिशय गोंधळात टाकणारा होता. गेल्याच आठवड्यात फायटोटॅक्सा (Phytotaxa) या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे हा घोळ बऱ्याच प्रमाणात कमी होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. डॉ. तेताली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सखोल संशोधन करून अखेर हे कोडे सोडवले आहे.

  • नवीन संशोधनाचा मथितार्थ असा आहे, की माणगा आणि मेस या खरोखरच दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत. मेस बांबू महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. तिथल्या आर्द्र तसेच शुष्क पर्णझडी जंगलात मेस बांबू रानटी अवस्थेत आहे. शिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. भोर मेस किंवा मावळ मेस म्हणून ओळख असलेल्या या बांबूची काठी मजबूत, नितळ असून पॉलिश चांगले धरून ठेवते. तिच्या पट्ट्या काढणे सोपे असल्यामुळे घरबांधणी, इतर बांधकाम तसेच फर्निचर व्यवसायासाठी तिला बाजारात मागणी वाढत आहे.
  • डॉ. तेताली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेस या प्रजातीचे गुणधर्म माणग्यापेक्षा वेगळे कसे आहेत ते दाखवून तिला नवीन प्रजाती ठरवले आणि नाव दिले Pseudoxytenanthera madhavii. कोणत्याही प्रजातीचे प्रथम नामकरण करणाऱ्या संशोधकांना दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी या प्रजातीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव दिले आहे.
  • या संशोधनामुळे अनेक ठिकाणी माणग्याला मेस म्हणणे किंवा मेसला माणगा म्हणणे असे प्रकार कमी होतील. या दोन प्रजाती नेमक्या कुठे आणि किती प्रमाणावर आहेत ते स्पष्ट होईल.
  • आजवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे माणगा हा बांबू केवळ लागवडीखाली आढळतो. त्याच्या काही काठ्या भरीव तर काही पोकळ निघतात, त्याला कुठेकुठे फुले येतात पण बी धरत नाही, फुलावर आलेली बेटे मरून जातात, पण त्यातली काही पुनरुज्जीवित होतात तर काही होत नाहीत.
  • कोकणात खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणगा बांबूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. उत्पादित होणारा जवळपास सर्व बांबू जिल्ह्याबाहेर पाठवला जातो. त्यातून काही कोटींची उलाढाल होते. याचाच अर्थ या दोन्ही प्रजाती लागवडीसाठी आदर्श आहेत, त्यांना बाजारात चांगली मागणी आहे, त्यांची लागवड सह्याद्री-कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. शिवाय बदलत्या शासकीय धोरणांमुळे उत्पन्नवाढीचे एक सोपे साधन म्हणून शेतकरी बांबू लागवडीकडे बघत आहेत.
  • अनेकदा मूलभूत आणि उपयोजित संशोधन यामध्ये महत्त्वाचे असा वाद होत असतो. पण नीट पाहिले असता बांबूवर होणारे मूलभूत आणि उपयोजित संशोधन हातात हात घालून चालले आहे असे लक्षात येईल. शिवाय ते संशोधन शेतकरी, उद्योजक यांच्यापर्यंत पोहचून त्यातून अर्थकारणाला गती मिळत आहे, यात शंका नाही.
  • माणगा आणि मेसमधील फरक 

  • माणगा आणि मेस या दोन प्रजाती वेगळ्या ओळखण्यास मदतीचे ठरू शकतात असे गुणधर्म अगदी साधे आहेत.
  • माणगा ९ मीटरपर्यंत आणि मेस ९ ते १६ मीटरपर्यंत वाढतो.
  • माणग्याची काठी भरीव किंवा बऱ्यापैकी भरीव असते. मेसची काठी पोकळ असते.
  • बांबूच्या पेरावर असलेले पर्णच्छद अनेकदा त्यांची ओळख पटवून देण्यास उपयोगी ठरतात. मेस बांबूमध्ये हे पर्णच्छद माणग्यापेक्षा जवळ जवळ दुप्पट मोठे म्हणजे दीड फूट असते. त्यावर मेणासारख्या पदार्थाचा थर असतो.
  • मेस बांबूचे नवीन फुटवे येतात. त्यावर पांढरट पूड आणि करडे केस विखुरलेले असतात. याशिवाय फुले मिळाल्यास त्यांचे काही गुणधर्म या दोन प्रजाती वेगळ्या ओळखण्यास मदत करतात.
  • बांबूला आहे व्यावसायिक मूल्य... महाराष्ट्रात बांबूच्या ७ ते ८ प्रजाती आढळतात. त्याशिवाय इतर राज्यातील आणि परदेशातील बाल्कुआ, टुल्डा, ब्रँडिसी या जातींची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करता येते. माणवेल ही पूर्ण राज्यभर आढळणारी जात व्यावसायिक उपयोगाची आहे. कोकण आणि पश्चिम घाट प्रदेशातील असणाऱ्या माणगा आणि मेस बांबूला चांगली मागणी आहे. कळक आणि चिवा बांबूचे कोंब रानभाजी म्हणून उपयुक्त आहेत.

  • बांबूला बांधकाम व्यवसाय, फर्निचर उद्योग, द्राक्ष बागा, हस्तकला अगरबत्तीच्या काड्या इत्यादीसाठी मागणी आहे. याशिवाय जैवइंधानासाठी बांबूला मागणी आहे.
  • राज्यातील शेतकरी बांबू लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. त्याला समांतर उद्योगांची साखळी राज्यात उभी राहिली तरच उत्पादित होणारा बांबू चांगल्या किमतीत विकला जाऊ शकतो.
  • माणग्याची लागवड करण्यासाठी दक्षिण तळकोकण प्रदेश योग्य आहे. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात मेस लागवडीला संधी आहे.
  • माणगा बांबूची लागवड वाढवायची तर बी उपलब्ध नसताना पेरांपासून रोपे तयार करण्यात येतात. मात्र त्यातील मर्यादा लक्षात घेत टिशू कल्चर रोपे तयार करणे आवश्यक आहे.
  • बांबूच्या इतर प्रजातींवर संशोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम देखील महत्त्वाचे आहे.
  • संपर्क :  विनायक पाटील, ९४२३८७७२०६ (सहयोगी प्राध्यापक, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी) डॉ. अजय राणे, (सहयोगी अधिष्ठाता,वनशास्त्र महाविद्यालय, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com