केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास प्राथमिक, दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत चांगली वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होऊन केळी पीक उत्पादनाला फायदा होतो.
Integrated nutrient management is essential for increasing the yield of banana crop
Integrated nutrient management is essential for increasing the yield of banana crop

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास प्राथमिक, दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. जमिनीतील जिवाणूंच्या संख्येत चांगली वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होऊन केळी पीक उत्पादनाला फायदा होतो.   केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक आहे. त्यामुळे या पिकास अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. केळीचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी खते वापरण्याच्या पद्धती आणि त्यांच्या प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी माती परीक्षण केल्यानंतरच खतांचा वापर करावा. पिकांच्या वाढीनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार शास्त्रीय पद्धतीने खतांचा संतुलित वापर करावा.  एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा उद्देश 

  • रासायनिक खतांचा समतोल आणि योग्य वापर करून उपयोगिता वाढविणे.
  • रासायनिक खतांबरोबरच जैविक आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविणे.
  • जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सुधारणा करणे.
  • जल, मृद्‍ तसेच अन्नद्रव्यांचे संधारण करणे.
  • शेतातील काडीकचरा शेतातच वापरून सेंद्रिय खते तयार करण्यास प्रोत्साहन देणे.
  • महत्त्वाचे घटक  एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून खतातील अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होते. तसेच टाकाऊ सेंद्रिय पदार्थ व पिकांच्या अवशेषांचे कंपोस्ट तयार करून जमिनीची सुधारणा घडवून आणता येते.   रासायनिक खते 

  • केळी पिकास आवश्‍यक असणारी सर्वच अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात रासायनिक खतांतून उपलब्ध होत नाहीत. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत इतरही खतांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
  • रासायनिक खतांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी खते बांगडी पद्धतीने द्यावीत. केळीच्या बुंध्यापासून १५ ते २० सेंमी अंतरावर आणि ५ ते ६ सेंमी खोल जमिनीत रासायनिक खते द्यावीत. खते दिल्यानंतर लगेच मातीआड करून हलकेच पाणी द्यावे. जेणेकरून खते इतरत्र न पसरता मातीमध्ये मिसळतील.
  • केळी पिकास हेक्टरी ५० टन शेणखत द्यावे. तसेच २०० ग्रॅम नत्र, १६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश प्रति झाड या प्रमाणात द्यावे. 
  •   एकूण नत्राच्या मात्रेपैकी ३/४ नत्र शाखीय वाढीच्या अवस्थेत चार समान हप्त्यात विभागून द्यावे (लागवडीनंतर अनुक्रमे ३०, ७५, १२० आणि १६५ दिवसांनी). फळ धारणेच्या अवस्थेत उरलेले १/४ नत्र ३ समान हप्त्यांत विभागून द्यावे (लागवडीनंतर २१०, २५५ आणि ३०० दिवसांनी).
  • केळी लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रति झाड ८० ग्रॅम स्फुरद द्यावे. तर पालाश २०० ग्रॅम प्रतिझाड ४ समान हप्त्यांत विभागून (लागवडीनंतर ३०, १६५,२५५ आणि ३०० दिवसांनी) द्यावे.
  •  केळी पिकाला कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते. कॅल्शिअमची गरज भागवण्यासाठी काळ्या जमिनीमध्ये जिप्सम (कॅल्शिअम सल्फेट) १ किलो प्रतिझाड या प्रमाणे ३ ते ४ महिन्यांत द्यावे. 
  •  मॅग्नेशिअमची कमतरता आढळल्यास, ५० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे. गंधकाची कमतरता आढळल्यास, २० ग्रॅम गंधक प्रतिझाड ३ ते ५ महिन्यांच्या दरम्यान देण्यात यावे.
  •  प्रमुख अन्नद्रव्यांइतकीच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे केळी उत्पादनात घट होऊन फळांची गुणवत्ता खालावते. 
  •  केळी झाडाला सुरवातीच्या ३ किंवा ५ महिन्यांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. त्यासाठी माती परीक्षणानुसार झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, बोरॉन, कॉपर सल्फेट प्रत्येकी १० ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात मातीतून द्यावे. जिप्सम वापरल्यास गंधक वापरण्याची गरज नाही.
  • ( टीप :  वर नमूद केलेल्या शिफारशीमध्ये माती परीक्षण अहवाल आणि प्रत्यक्ष अनुभवानुसार योग्य ते बदल करावेत.) सेंद्रिय खते 

  • जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.
  • मुळांची वाढ चांगली होऊन ती अधिक कार्यक्षम बनतात.
  • जमिनीची जलधारण क्षमता वाढते. तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
  • सेंद्रिय पदार्थाचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
  • रासायनिक द्रव्याची उपलब्धता वाढते.
  • स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावून उपलब्धता वाढते.
  • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ ठेवण्यास मदत होते.
  • सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव व जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
  • चुनखडीयुक्त जमिनीत सेंद्रिय पदार्थामुळे अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.
  • शेणखत 

  • केळी बागेसाठी जमीन तयार करताना किंवा लागवडीवेळी हेक्टरी ५० टन शेणखत द्यावे. किंवा प्रत्येक खोडास किमान १० किलो शेणखत द्यावे.
  • शेणखता वापरल्यामुळे जमिनीच्या जैविक आणि भौतिक गुणधर्मातही सुधारणा होते. 
  • शेणखतामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्का स्फुरद आणि ०.५ टक्का पालाश आसते.
  • गांडूळ खत 

  • केळी झाडास किमान ५ किलो गांडूळ खत देणे गरजेचे आहे.
  • गांडूळ खतामध्ये ०.६५ ते २.० टक्के नत्र, ०.५० ते ०.८२ टक्का स्फुरद आणि ०.६५ ते १.२५ टक्का पालाश असते. 
  • हिरवळीचे खत 

  • हिरवळीची खते तयार करण्यासाठी ताग, धैंचा, मूग, उडीद व चवळी यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या द्विदल वर्गीय पिकांचा वापर केला जातो.
  • केळी लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घ्यावे. खत तयार होण्यासाठी ते पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावे.
  •  लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेणे शक्य नसल्यास, केळी लागवडीनंतर दोन झाडांच्या ओळींमध्ये घ्यावीत. आणि ४० दिवसांनी त्याची कापणी करून झाडाच्या बुंध्याजवळ चरी घेऊन गाडावे. 
  • हिरवळीच्या खतापासून हेक्टरी ५० ते ६० किलो नत्र मिळते. या खतामुळे सेंद्रिय पदार्थाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. या सेंद्रिय पदार्थात ०.८ टक्का नत्र, १.० टक्का स्फुरद व ०.५ टक्का पालाश असते.
  • निंबोळी पेंड 

  •  सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी करण्यास निंबोळी पेंड उपयुक्त ठरते.
  •  प्रत्येक केळी खोडास १ किलो निंबोळी पेंड टाकणे फायदेशीर ठरते. 
  •  निंबोळी पेंडमध्ये २ ते ५ टक्के नत्र, ०.५ ते ९ टक्के स्फुरद आणि १ ते २ टक्के पालाश असते.
  • संपर्क : डॉ. भाग्यरेषा गजभिये,  ७५८८६१२६२७,  डॉ. सुजाता धुतराज,  ७५८८६१२६३२, (केळी संशोधन केंद्र, नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com