सलग सोयाबीनपेक्षा सुधारित पट्टापेर पद्धतीचा करा अवलंब

सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या अवस्थेदरम्यान पावसात खंड पडल्यास ओलिताची सोय असलेला शेतकरीही मनात इच्छा असूनही पाणी देऊ शकत नाही किंवा प्रचलित पेरणी पद्धतीमुळे सिंचनामध्ये अडचणी उद्‍भवतात.
Sowing done by BBF sowing machine
Sowing done by BBF sowing machine

सोयाबीन पिकात फुलोऱ्यानंतरच्या वाढीच्या अवस्थेदरम्यान पावसात खंड पडल्यास ओलिताची सोय असलेला शेतकरीही मनात इच्छा असूनही पाणी देऊ शकत नाही किंवा प्रचलित पेरणी पद्धतीमुळे सिंचनामध्ये अडचणी उद्‍भवतात. या समस्या टाळण्यासाठी खरिपातील सलग सोयाबीनपेक्षा सोडओळ (पट्टापेर) पेरणी पद्धत निश्‍चितच मोलाची ठरते. खरिपात सोयाबीनची लागवड करताना पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण १) कमी पाऊसमानाच्या स्थितीत पिकाची वाढ खुंटते. २) नियमित पाऊस असल्यास पिकाची अतिरिक्त वाढ होते. ३) जास्त पाऊस झाल्यास शेतात पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान होते. सामान्यतः सोयाबीनची सलग पेरणी प्रचलित पद्धतीमध्ये ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा (सात, सहा किंवा पाच दाती) वापर करतात. बैलजोडीने पेरणी करताना तिफन, पाभर, काकरी व सरत्याचा वापर करतात. यासाठी तीन, चार किंवा पाच दात्याची काकरी वापरतात. प्रचलित साधनामध्ये किंचित सुधारणा अथवा बदल करून पट्टापेर पेरणी पद्धत अवलंबता येते. ही पद्धत सोयाबीनप्रमाणेच मूग, उडीद, मटकी या खरिपातील आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकासाठी अत्यंत प्रभावी ठरते. प्रचलित पेरणी पद्धतीचे तोटे 

  •  पिकाची दाटी होऊन जागा, सूर्यप्रकाश, जमिनीतील ओल, अन्नद्रव्ये यासाठी तीव्र स्पर्धा होते.
  • दाटीमुळे पिकाची निगराणी शक्य होत नाही. त्यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. किडी, रोगांचा प्रादुर्भाव वेळेत लक्षात येत नाही. फवारणी योग्य प्रकारे करता येत नाही.
  • जास्त पावसामध्ये पिकात पाणी साचून मोठे नुकसान होते. पाणी शेतातून बाहेर काढण्याची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नसते.
  • पावसात मोठा खंड पडल्यास अथवा कमी पावसाच्या स्थितीत जमिनीतील ओल संपून उत्पादन कमी होते.
  • ओलिताची सोय असूनही पीक दाटीमुळे सऱ्या पाडण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने पाणी देता येत नाही. किंवा तुषार सिंचनाचे पाइप टाकता येत नाही.
  • सोडओळ (पट्टापेर) पद्धत म्हणजे काय? पेरणी करताना ठराविक ओळीनंतर एक ओळ खाली सोडून, त्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी जानोळ्याला दोरी गुंडाळून, सरी अथवा गाळ अथवा दांड पाडून घेतली जाते. यातून मुलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन होऊन उत्पादकतेत वाढ होते. पट्टापेर पद्धतीचे फायदे

  • पिकाची सूर्यप्रकाश, जागा, अन्नद्रव्ये, जमिनीतील ओल यासाठीची स्पर्धा कमी राखता येते. उत्पादकता वाढते.
  •  पिकाची निगराणी, निरिक्षण करता आल्यामुळे रोग-किडींचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात येतो. प्रत्येक पट्ट्याला योग्य प्रकारे फवारणी करता येते.
  • डवऱ्याच्या फेऱ्याच्यावेळी खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी सऱ्या काढलेल्या असल्यामुळे शेतात पडणारे पावसाचे, अतिरिक्त पाणी सरीमध्ये उतरते. सरीमध्ये साचते, मुरते व जिरते. ओल टिकून राहते. जास्त पावसामध्ये अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढणे शक्य होते.
  • मोकळ्या ओळींमुळे शेतात हवा खेळती राहते. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो.
  • ओलिताची सोय असल्यास पावसाच्या खंड काळात आधीच पाडलेल्या सऱ्याद्वारे पाणी देणे शक्य होते. किंवा तुषार सिंचन संचाचे पाइप टाकता येतात.
  • ट्रॅक्टरद्वारे पट्टापेर पद्धत : ट्रॅक्टरचलित सात दात्यांच्या पेरणी यंत्राने पेरणी करताना - सात ओळींचा पट्टा : ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढी जागा सोडावी. म्हणजेच प्रत्येक आठवी ओळ खाली राहील. पाच ओळींचा पट्टा  या करिता ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना पेरणी यंत्राच्या दोन्ही बाजूंकडील काठावरील बियाण्याच्या व खताच्या कप्प्यातील प्रत्येकी एक छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या शेवटच्या काकरातच ठेवावे. म्हणजेच संपूर्ण शेतात पाच - पाच ओळींचे पट्टे तयार होऊन, प्रत्येकी सहावी ओळ खाली राहील. ट्रॅक्टरचे शेवटचे दाते खाली ठेवलेल्या ओळीमध्ये ठेवताना ट्रॅक्टरचालकाने जागरूक राहावे. तीन ओळींचा पट्टा पेरणी यंत्राचे बियाण्याच्या व खताच्या कप्प्यातील मधले म्हणजेच चौथे छिद्र बंद करावे. म्हणजेच तीन ओळींनंतर खाली ओळ आणि तीन ओळी अशी पेरणी होईल. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना एक ओळ खाली सुटेल, अशी जागा सोडावी. शेतात प्रत्येक चौथी ओळ खाली राहून तीन - तीन ओळींचे पट्टे तयार होतात. सहा ओळींचा पट्टा सात दाती पेरणी यंत्राचे बियाणे व खत कप्प्यातील मधले म्हणजेच चवथ्या नळीचे छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना प्रचलित पद्धतीप्रमाणे पेरणी केल्यास सोयाबीनच्या तीन ओळींच्या बाजूला पुन्हा तीन ओळी येतील. म्हणजेच शेतात सहा – सहा ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी शक्य होईल. प्रत्येक सातवी ओळ आपोआपच खाली राहील. ट्रॅक्टरचलित सहा दात्यांच्या पेरणी यंत्राने पेरणी करताना -

  • सहा ओळींचा पट्टा : ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना एक ओळ सुटेल असे नियोजन करावे. म्हणजेच शेतात प्रत्येक सातवी ओळ खाली राहून सहा- सहा ओळींचे पट्टे तयार होतील.
  • चार ओळींचा पट्टा : पेरणी यंत्राच्या बियाणे व खत कप्प्यातील काठावरील दोन्ही बाजूंचे प्रत्येकी एक या प्रमाणे छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना शेवटचे दाते खाली ठेवलेल्या काकरातच ठेवावे. यामुळे चार- चार ओळींचे पट्टे तयार होतील.
  • बैलजोडीचलित तिफण, पाभर, काकरी, सरत्याने पेरणी : बैलजोडीने पेरणी करताना तीन दाती, चार दाती अथवा काही ठिकाणी पाच दाती काकरी वापरतात. याद्वारे पट्टापेर करायचे असल्यास तीन दाती काकरी असेल तर चौथी ओळ, चार दाती काकरी असेल तर पाचवी ओळ आणि पाच दाती काकरी असेल तर सहावी ओळ प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना खाली ठेवावी. म्हणजेच शेतात अनुक्रमे तीन ओळी, चार ओळी अथवा पाच ओळींमध्ये पट्टापेर पद्धतीचे नियोजन होईल. तीन दाती बैलजोडी चलित पेरणी यंत्राने सहा ओळींच्या पट्ट्यात पेरणी करावयाची असल्यास जाताना तीन ओळी पलटून येताना पुन्हा तीन ओळी अशा प्रकारे पेरणी करावी. आता पुन्हा पलटून जाताना सातवी ओळ खाली ठेवावी. म्हणजेच शेतामध्ये सहा- सहा ओळींचे पट्टे तयार होतील. अशा प्रकारे पट्टापेर पद्धतीचा अवलंब करताना खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी, जानोळ्याला गच्च दोरी गुंडाळून दांड, सरी अथवा गाळ पाडून घ्यावा. म्हणजेच वरीलप्रमाणे पट्टापेर पद्धतीने पेरलेले सोयाबीनचे पीक गादीवाफ्यावर येते. प्रत्येक खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या फेराच्या वेळी सऱ्या तयार होऊन पट्टापेर पद्धतीचे सर्व फायदे पिकाला मिळतात. उत्पादनात शाश्‍वत वाढ शक्य होते. बीबीएफ प्लँटरद्वारे पेरणी  या पेरणी यंत्राला दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक नांगराच्या फडेसारखे अवजार जोडलेले असल्यामुळे पेरणी करतानाच दोन्ही बाजूंना सऱ्या पाडल्या जातात. चार चार ओळींच्या पट्ट्यांच्या माध्यमातून सोयाबीनची गादीवाफ्यावर पेरणी केली जाते. पेरणीयोग्य पाऊस आल्यानंतर शेत वाफशावर असताना या यंत्राद्वारे पेरणी करावी. या पद्धतीने पेरणी करताना साधारणत: २० टक्के बियाण्याची बचत होते. एकरी २४ किलो बियाणे पुरेसे होते. प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक -कृषी विद्या, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com