agricultural news in marathi article regarding stingless bee keeping | Page 2 ||| Agrowon

डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजन

डॉ. संतोष वानखेडे, डॉ. वैभव शिंदे, संकेत रहाटे
शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021

कोकणामध्ये आढळणाऱ्या डंखविरहित मधमाशीच्या हाताळणी, सापळे आणि विभाजन यासंबंधी भाट्ये, रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यातून काढलेले महत्त्वाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.

पृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत. त्यापैकी सातेरी आणि इटालियन या मधमाश्या मध आणि परागीकरणासाठी पाळल्या जातात. या दोन्ही मधमाश्‍यांना डंख असतो. कोकणामध्ये आढळणाऱ्या डंखविरहित मधमाशीच्या हाताळणी, सापळे आणि विभाजन यासंबंधी भाट्ये, रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यातून काढलेले महत्त्वाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.

सर्वसाधारणपणे कोकण विभागासह विविध ठिकाणी डंखविरहित (स्टिंगलेस) मधमाश्या आढळून येतात. त्या हाताळायला सोप्या असून, औषधी मध आणि मेण मिळू शकते. पिकाचे परागीकरण करत असल्यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. महाराष्ट्रामध्ये या मधमाश्या व्यवसायिकदृष्ट्या पाळणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. या मधमाश्‍यांची वसाहत विक्री करणाऱ्यांची संख्या फारच अल्प आहे. या मधमाश्या निसर्गामध्ये खोडाची ढोली, पोकळी, घराच्या भिंती, खिडक्या तसेच दगडाच्या पोकळीमध्ये तसेच बंद अवस्थेत असलेल्या ड्रेनेज पाइपमध्ये सहसा आढळून येतात. असे मधमाशी घरटे, पोळे परिसरामध्ये शोधून त्यापासून पूर्ण वसाहत विकसित करता येते. पोळ्यापासून वसाहत पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने लागतात. दरम्यानच्या काळात योग्य काळजी घेण्यासोबत सहा महिन्यांनंतर वसाहतीमध्ये राणीमाशी, नरमाशी, कामकरी माश्यांसोबतच मुबलक प्रमाणात परागकण साठवण कोठी, मधाची कोठी आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राणीघरे (क्वीन सेल) असल्याची खात्री करावी. या सर्व बाबी असल्यास निदर्शनास आल्यास नैसर्गिक पद्धतीने वसाहत बाहेर काढण्याची तयारी करावी.

वसाहत पेटी तयार करताना...
एक आयताकृती लाकडी पेटी (१० × ६ × ५ इंच) घेऊन त्याला मधमाश्‍यांना ये-जा करण्यासाठी पेटीच्या पुढील बाजूस ५ मि.मी आकाराचे, तर मागील भागाला २५ मि.मी. आकाराचे छिद्र करावे. त्यानंतर एक ५ इंच लांब २५ मि.मी. व्यासाच्या प्लॅस्टिक पाइपचे एक टोक नैसर्गिक वसाहतीतील घरट्याच्या प्रवेशद्वारामध्ये १ इंच टाकावे आणि दुसरे टोक आपण वरीलप्रमाणे तयार केलेल्या मधमाशी संगोपन पेटीच्या मागील बाजूस असलेल्या छिद्रामध्ये घट्ट बसवावे.

पेटी शक्य नसल्यास एक पोकळ बांबूचा तुकडा घेऊन त्याला एका बाजूस मधमाश्या ये-जा करण्यासाठी ५ मि.मी. आकाराचे छिद्र करावे. विरुद्ध बाजूला २५ मि.मी. आकाराचे छिद्र पाडावे. तसेच वरीलप्रमाणे ५ इंच लांबीचा प्लॅस्टिक पाइपचा एक इंच भाग त्यामध्ये घट्ट बसवावा. दुसरे टोक नैसर्गिक वसाहतीमध्ये टाकून पॅक करावे. किंवा प्लॅस्टिक पाइपचा सापळा तयार करून त्यालासुद्धा तळाच्या वरील बाजूस मधमाश्या ये-जा करण्यासाठी ५ मि.मी. आकाराचे छिद्र पाडावे. विरुद्ध बाजूस २५ मि.मी. आकाराचे छिद्र करावे. त्यामध्येही वरीलप्रमाणे ५ इंच लांब प्लॅस्टिक पाइपचे एक टोक सापळ्याला घट्ट बसवावे. दुसरे टोक नैसर्गिक वसाहतीमध्ये घट्ट बसवावे. अशा प्रकारे आपण वेगवेगळे सापळे तयार करू शकतो. त्यांचा वापर वसाहत घरट्यातून सहजपणे काढून नवीन सापळ्यात संगोपनासाठी करता येतो. आजूबाजूची छिद्रे प्लॅस्टर ऑफ पॅरिसने (POP) पूर्णतः बंद करावीत. म्हणजे मधमाश्‍यांना बाहेर पडता येणार नाही. मधमाश्‍यांची ये-जा फक्त घरट्यामधून प्लॅस्टिक पाइपद्वारे मधमाशी पेटीमध्ये होईल. केवळ पेटीच्या प्रवेशद्वारापासूनच त्यांना बाहेर पडता येईल, असे नियोजन करावे. असे केल्यास चार-पाच महिन्यांमध्ये घरट्यापासून मधमाशींची वसाहत पेटीमध्ये स्थलांतरित होते. काही वेळेस नैसर्गिक घटकांमुळे उदा. मोठे घरटे असल्यास या क्रियेस कमी अधिक वेळ (अगदी चार महिन्यांपर्यंतही) लागू शकतो.

जुन्या वसाहतीपासून नवी वसाहत तयार करताना...

  • डंखविरहित मधमाश्यांच्या जुन्या वसाहतींचे विभाजन करून नवीन वसाहत स्थापन करताना पूर्णपणे विकसित व राणीमाशीसह २००० पेक्षा जास्त सदस्य (माश्या) असलेली वसाहत निवडावी. त्या वसाहतीच्या पोळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मध व परागकण साठवलेले असावेत.
  • दोन लिटर क्षमतेची लाकडी आयताकृती पेटी तयार करून घ्यावी. (आकार १० × ६ × ५ इंच). त्याच्या पुढील बाजूला कामकरी माश्यांसाठी ५ मि.मी.चे एक छिद्र करावे. हे छिद्र म्हणजे पेटीत ये-जा करण्याचा एकमेव दरवाजा आहे. त्याच्या आजूबाजूला थोडा राळ(Resin) चोळावा. राळ चोळल्यामुळे पेटीकडे कामकरी माश्या आकर्षित होतात. अन्य शत्रू कीटक पेटीपासून दूर जातात.
  • नव्या पेटीमध्ये जुन्या वसाहतीतून सुमारे ३ ग्रॅम राळ, २० नव्याने जन्मलेल्या कामकरी माश्या, ६० वयस्कर माश्या, कोषावस्थेत असलेल्या पिलांच्या काही मुबलक कोठी, परागकण साठवलेल्या काही कोठी व राणी माशी जन्म घेत असलेली एक कोठी इ. गोष्टी विस्थापित कराव्यात.
  • विभाजनावेळी मधाच्या कोठ्या फुटण्याची शक्यता असते. फुटलेल्या मध कोठ्या नवीन पेटीमध्ये ठेवल्यास मुंग्यांचा उपद्रव होऊ शकतो. मुंग्यामुळे संपूर्ण वसाहत उध्वस्त होऊ शकते. हे टाळण्यासाठी जुन्या वसाहतीमधील फक्त परागकण साठवलेल्या कोठ्या नवीन पेटीमध्ये विस्थापित कराव्यात. माश्यांची भूक भागविण्याकरिता साखरेचे पाणी पेटीत ठेवणे सोईस्कर ठरते.
  • नवीन वसाहतीत गरजेचे सामान हलवल्यानंतर लाकडी पेटीच्या वरील भागात काच, पारदर्शक प्लॅस्टिक अथवा पॉलिइथिलीनची पिशवी लावून बंद करावे. यामुळे पेटीत होणारी वसाहतीची वाढ सुलभरीत्या पाहता येते. विस्थापित केलेल्या नवीन वसाहतीमध्ये कामकरी माशांचे येणे – जाणे, पेटीमध्ये नवीन कोठ्यांचे बांधकाम सुरू होणे अशा कृतीतून वसाहत विभाजन यशस्वी झाल्याचे समजते.

राणी माशीकडे लक्ष देणे
वसाहत विभाजन करताना राणी माशीची कोठी (म्हणजे ज्या कोठीतून राणी माशी जन्माला येणार आहे अशी कोठी) कोषावस्थेत असेल याची खात्री करावी. यामुळे नवीन वसाहतीचा जम बसण्यास कमी कालावधी लागतो. नवीन वसाहतीत राणी माशी अंडी घालून प्रजनन होण्यास कमी (म्हणजे २० ते ५० दिवसांचा) कालावधी लागतो. मात्र राणीमाशीची कोठी अंडावस्थेत असताना नवीन पेटीमध्ये विस्थापित केल्यास ती अंडी घालून प्रजनन सुरू होण्यास सुमारे ३ ते ३.५ महिन्यांचा काळ लागतो. तसेच अंडावस्थेत कोठीची हालचाल केल्यास विभाजन यशस्वी होण्याची शक्यता कमी होते.

कोषावस्थेतील कोठीला गोलाकार छिद्र पाडून पिवळसर रंगाची, कामकरी माश्‍यांपेक्षा मोठी व सहजपणे ओळखता येईल अशी राणीमाशी जन्माला येते. सदर राणीमाशी कालांतराने बदामी काळसर रंगाची बनते. वसाहत विभाजन झाल्यानंतर ८ ते २० दिवसांत कामकरी माश्‍यांनी परागकण व मध साठवण्यासाठी कोठी बांधण्यास सुरुवात केलेली असते. मात्र राणी माशी जन्मल्यानंतर लगेचच (३ ते ७ दिवस) कामकरी माशा पिलांच्या कोठी (Brood cells) बांधण्यास सुरुवात करतात. राणी माशी आपले पंख लयबद्ध फडफडवत कामकरी माश्‍यांनी तयार केलेले ब्रूड सेलची तपासणी करते. नवीन जन्मलेली राणीमाशी सुमारे १० ते २० दिवसांत पिलांच्या कोठीत अंडी घालण्यास सुरुवात करते. दरम्यानच्या काळात, राणीमाशीचे नरमाशी सोबत मिलन होऊन फलन (Ferilization) झालेले असते. राणी उभ्या किंवा तिरकस स्थितीत प्रत्येक ब्रुड सेलमध्ये खाद्याच्या मध्यभागी अंडी ठेवते. राणीमाशीने अंडी घालून वसाहतीत प्रजनन सुरू झाल्यास आपण जुन्या वसाहतीतून नविन वसाहत स्थापन करण्यात यशस्वी झालो असे समजावे.

जीवनक्रम
अंड्याची सरासरी लांबी १.३६ मि.मी. व रुंदी ०.४८ मि.मी. असून, ती ५.५ ते ६ दिवसांत उबतात. अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या मलईदार पांढऱ्या, अपाद आणि ‘सी’ आकाराच्या असतात. वयानुसार अळ्यांची लांबी व रुंदी वाढते. अळी अवस्था ही ११ ते १३.५ दिवसात पूर्ण होते. कोष अवस्था पूर्ण होण्यास ३३ ते ३८ दिवसाचा कालावधी लागतो. अंडी, अळी व कोष कालावधी पूर्ण होण्यास ५३ दिवस लागतात. तर प्रौढ कामकरी माश्या ८० दिवस जगतात. स्टिंगलेस मधमाशीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व प्रौढ या चार अवस्थेत पूर्ण होतो.

नविन वसाहतीमध्ये मध गोळा होण्याच्या प्रक्रियेला सुमारे ५० ते ७० दिवसांनी सुरुवात होते. हा कालावधी इतर प्रजातीच्या मधमाश्‍यांपेक्षा जास्त आहे. तसेच डंखविरहित मधमाश्‍यांकडून तयार होणारा मध वजनाने कमी मात्र अधिक पोषक असतो. एका वसाहतीपासून साधारणत: २००-५०० ग्रॅम मध मिळतो. त्याला प्रति किलो रु. १५०० इतका दर मिळतो.

हाताळणी सोपी
महाराष्ट्रामध्ये विशेषत: कोकण विभागातील स्टिंगलेस बी (डंखविरहित मधमाशी) हाताळताना कुठलीही इजा होत नाही. या मधमाश्या स्वसंरक्षणासाठी मनुष्याच्या केसांवर हल्ला करतात. उदा. डोक्यावरील केस, डोळ्याच्या पापणीवरील केस, कान, नाक, दाढी, मिशी, हात आणि पायांवरील केस इ. यामुळे आपण अस्वस्थ झालो तरी जखम होत नाही किंवा पुरळ येत नाहीत. कोणतेही विष त्या सोडत नाही. तरीही सामान्यतः या मधमाश्या हाताळणीसाठी बी व्हेल, हॅण्ड ग्लोज आणि पूर्ण पोशाख परिधान करणे चांगले.

०२३५२ - २५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी)


इतर कृषिपूरक
जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार...किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध...
देशी गोवंश संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय...भारतीय गोवंशाची रोग प्रतिकारक शक्ती व विविध...
शेतकरी नियोजन ः रेशीमशेतीशेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत...
शेततळ्यात कार्प माशांचे व्यवस्थापनतळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या...
शेततळ्यात कार्प प्रजातीचे संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करताना बाजारात मागणी...
कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण...ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विकास...
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रकलसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून...
परसबागेत सुधारित कोंबडी जातीसह योग्य...परसबागेतील कोंबड्यांच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन...
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीला...सध्याच्या काळामध्ये कोंबडी खाद्याची किंमत वाढत...
जनावरांना द्या संतुलित आहारजनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक...
मधमाशीपालनातील मौल्यवान पदार्थ : बी...मधमाशी पालनातून मिळणाऱ्या विविध पदार्थांच्या...
शेळी प्रजननासाठी तंत्रज्ञानाचा वापरगर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या...
शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण,...सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने...
निमखाऱ्या पाण्यातील जिताडा,...जिताडासंवर्धन तलाव आणि जलाशयात पिंजरा पद्धतीने...
लेप्टोस्पायरोसिस प्रसाराबाबत जागरूक राहापावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा...
शेततळ्यातील मत्स्य संवर्धनाची पूर्वतयारीमत्स्यसंवर्धन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी...
डंखविरहित मधमाशी वसाहतीचे विभाजनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती आहेत....
वासरातील आजारावर उपाययोजनावासरांच्या संगोपनामध्ये अडथळा आणणारा एक घटक...
जनावरांतील दातांचे आजार अन् उपचारजनावरांमध्ये दातांची ठेवण आणि प्रकार त्यांच्या...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींचीदूध उत्पादनासाठी म्हशी खरेदी करताना त्यांना...