संधारण, सिंचनासाठी त्रिसूत्रीचा व्हावा वापर

धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते. सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे (मूलस्थानी जलसंधारण), उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागणार आहे.
शेताची बांध बंदिस्ती, उताराला आडवे बंदिस्त वाफे किंवा सरी वरंबे केल्यास मूलस्थानी जलसंधारण होते.
शेताची बांध बंदिस्ती, उताराला आडवे बंदिस्त वाफे किंवा सरी वरंबे केल्यास मूलस्थानी जलसंधारण होते.

राज्यामध्ये बऱ्याचदा पाऊस सरासरीसुद्धा गाठत नाही. धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते. सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे (मूलस्थानी जलसंधारण), उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागणार आहे.  राज्यातील विविध भागात पडणारे एकूण पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस यामध्ये विषमता आहे. कोकणात सरासरी पावसाचे दिवस ८४, विदर्भात ४५ तर मध्य महाराष्ट्रात ४० आणि मराठवाड्यात ३७ दिवस असतात. एकूण पर्जन्यवृष्टीपैकी निम्मी पर्जन्यवृष्टी कोकणात ४० तासात, विदर्भात १८ तासात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १६ तासात होते. म्हणजेच पिकांच्या वाढीच्या काळात राज्यात पावसामध्ये प्रदीर्घ खंड पडून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादनावर दिसून येतो. सध्या राज्यातील सिंचनाचे प्रमाण १८ टक्क्यांच्या आसपास आहे. संपूर्ण क्षमतेने सिंचन व्यवस्था कार्यान्वित झाली तरी कमाल ३० टक्क्यापर्यंत सिंचन सुविधा देणे शक्य आहे. उर्वरित ७० टक्के पावसावर अवलंबून क्षेत्राच्या समस्या कायम राहणार आहेत. यामुळेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गाव परिसरामध्ये माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामासोबतच स्वतःच्या शेतामध्ये मूलस्थानी मृद व जल संधारणाचे उपाय केल्यास ही समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल. हे समजून घ्या

  • पडणाऱ्या पावसाची तीव्रता जमिनीत पाणी मुरण्याचा वेगापेक्षा जास्त असली किंवा, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता संपली की पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागते. त्यालाच अपधाव असे म्हणतात. 
  • हे पाणी वाहतेवेळी आपल्यासोबत जमिनीचा वरील सुपीक थर घेऊन जाते, त्याला जमिनीची धूप म्हणतात. हे वाहून जाणारे पाणी आपल्या सोबत हेक्टरी ८ ते १० टन (म्हणजे जवळपास १ ट्रक) सुपीक माती, शेणखत, रासायनिक खते व मूलद्रव्ये वाहून नेते. परिणामी जमिनीची सुपीकता व जलधारण क्षमता कमी होऊन जमिनी नापिक होतात. 
  • जमिनीच्या अति धुपेमुळे जलसिंचन प्रकल्प, साठवण बंधारे यांची साठवण क्षमता कमी होत जाते. 
  • पडणारे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाऊ न देता ते त्याच क्षेत्रामध्ये अडवून जमिनीमध्ये जिरवण्याच्या प्रक्रियेला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात. यापेक्षा अतिरिक्त वाहणाऱ्या पाण्याचा साठा शेततळे, साठवण बंधारे इ. यामध्ये करावा. पुढे संरक्षित पाण्यासाठी त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. 
  • पाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठ्याची भूगर्भातील क्षमता इ. बाबींचा विचार करून जमिनीच्या उपयोगितेनुसार ''माथा ते पायथा'' या तत्त्वावर मृद व जल संधारणाचे पुढीलपैकी योग्य ते उपाय राबवले पाहिजेत.
  • ढाळीची बांधबंदिस्ती,   कंपार्टमेंट बंडिंग (शेत बांधबंदिस्ती),   मजगी (भात खाचरे बांधबंदिस्ती), 
  • जुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती,   सलग समपातळी चर (CCT),   खोल सलग समपातळी चर (Deep CCT),   डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे,   अनघड दगडाचे बांध,   गॅबियन स्ट्रक्चर (जाळीचा बंधारा),   माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारा,   सिमेंट नाला बांधातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता अबाधित ठेवणे,   जुन्या बोडीचे नूतनीकरण, दुरुस्ती,   शेतातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवणे. शेततळ्यासाठी प्रोत्साहनपर विविध योजना राबवल्या जात आहेत. 
  • मूलस्थानी जलसंधारण पद्धतीमुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत हा ओलावा वापरला जाऊन उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ मिळू शकते. कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसापेक्षाही त्यातील जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते. अनियमित व अनिश्चित पाऊस, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि शेतीसाठी पाण्याची वाढती गरज यांचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीचे पाणीसाठे निर्माण करण्याची व सिंचन क्षमता  वाढवली पाहिजे.
  • जल संधारण व व्यवस्थापनाच्या कोणत्याही उपाययोजना या केवळ पावसाने ओढ दिली, दुष्काळ सदृश परिस्थितीत करून उपयोग नाही. या कायमस्वरूपी करत राहिल्या पाहिजेत. 
  • साधे तत्त्व लक्षात ठेवा. जमिनीवरून पळणाऱ्या पाण्याला चालायला लावावे, चालणाऱ्या पाण्याला थांबवावे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरविण्याचे नियोजन करावे. यात भूगर्भात जलाचे पुनर्भरण होणे शक्य आहे. 
  • शेतातील पाणी जिरविण्याचे सोपे तंत्र

  • शेतास एका दिशेने उतार असल्यास उतरला आडवी मशागत, पेरणी व कोळपणी करावी.
  • शेतास एकापेक्षा जास्त दिशेने उतार असल्यास समतल रेषेला समांतर मशागत, पेरणी व आंतरमशागत करावी.
  • समतल रेषेवर खस गवत, सुबाभूळ, घायपात, स्थानिक गवताचे जैविक बांध तयार करावेत.
  • शेतातील ओघळीवर, नाल्यात दगडी बांध, माती बांध, ब्रशवुड बांध, जाळीचा बांध घालावेत.
  • नादुरुस्त, फुटलेले बांध पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत.
  • अस्तित्वात असलेल्या नालाबंधातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता अबाधित राखणे.
  • शेततळे, विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण.
  • पावसाचा खंड पडल्यावर कोळपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीनंतर २ ते ३ आठवड्यांनी सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
  • आंतरपीक पद्धती ः कमी पाण्यात जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी पिकांची निवड करावी. 
  • शेततळ्यातील पाण्याचा वापर करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा (तुषार, ठिबक इ. ) वापर करावा.
  • उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे.
  • मृत सरी काढणे (डेड फरो/ जल संधारण सरी)
  •  पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेच्या वेळी संरक्षित पाण्याची सोय करणे.
  • यंत्रांचा वापर 

  • ज्या भागात खरीप हंगामात पीक न घेता शेत रिकामे ठेवून रब्बी हंगामात पीक घेतात, अशा ठिकाणी खरीप हंगामात रिकाम्या ठेवलेल्या शेतात मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उताराला आडवे बंदिस्त वाफे किंवा सरी वरंबे करावेत. यामुळे खरीप हंगामात पडलेला पाऊस जमिनीत साठवला जाईल. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होईल. बंदीस्त वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले बेसिन लिस्टर आणि बंड फॉर्मर अतिशय उपयुक्त आहे.
  • ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर केल्यास एकाच वेळी बियाणे पेरणी, खत पेरणी, रासणी करता येते. पेरणी रुंद वरंब्यावर (गादीवाफा) होते. बाजूला सरी पडत असल्यामुळे मूलस्थानी जलसंधारणाचे काम होते. अतिरिक्त पाणी सरीद्वारे बाहेर काढता येते. यासाठी ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा टोकणयंत्राचा वापर करता येईल.
  • स्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून मृद व जल संधारणाचे उपाय राबवावेत. शेतातील पाणी शेतातच आणि शिवारातील पाणी शिवारातच राहील. 
  • गावाचा, स्वतःचाही पाण्याचा ताळेबंद जरूर मांडावा. पडणारा पाऊस, बाष्पीभवन, पिकाची पाण्याची गरज, अपधाव इत्यादी बाबींचा जमाखर्च करून गावपातळीवर नियोजन करणे ही आजची गरज आहे. त्यासाठी गावात पर्जन्यमापक, बाष्पीभवन पात्र, तापमापक, शक्य असल्यास हवामान केंद्र उभारावे. या उपकरणांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता, कौशल्य निर्माण करावे.
  • सुधारित तंत्रज्ञानाचा उदा. सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), निरनिराळे संगणक प्रणाली ( स्वॅट, हेक एचएमएस इ. सारखे सॉफ्टवेअर) वापर केल्यास हवामान, पीक पद्धती, मृद व जल संधारणाचे उपचार यामुळे होणारा परिणाम प्रत्यक्ष बदल करण्यापूर्वी अंदाज मिळवता येतो.
  • - डॉ. सुहास उपाध्ये, ९८५०६०१८९० (सहाय्यक प्राध्यापक , मृद व जल संधारण अभियांत्रिकी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com