कोरडवाहूमध्ये कवठ लागवड फायदेशीर

मजबूत मूळ प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत तसेच हलक्या आणि खराब झालेल्या जमिनीत उत्तम वाढते. कवठाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झाल्या आहेत.
 article regarding Wood-apple cultivation
article regarding Wood-apple cultivation

मजबूत मूळ प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत तसेच हलक्या आणि खराब झालेल्या जमिनीत उत्तम वाढते. कवठाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झाल्या आहेत. औषधी गुणधर्म, वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे कवठ फळांना चांगली मागणी आहे. कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष ‘रूटेसी’ कुळातील असून फेरोनिया एलेफंटम हे शास्त्रीय नाव आहे. कवठ हा काटेरी, पानझडी वृक्ष आहे. झाड ६ ते ९ मीटर उंच वाढते. साल हिरवट, पांढरी रंगाची खडबडीत, जाड असते. झाडाची पाने बारीक असतात. फळाचा गर विटकरी रंगाचा असून, चवीला आंबट-गोड असतो. हे फळझाड पाण्याचा ताण सहन करू शकणारे आणि अत्यंत काटक आहे. वृक्षाचा विस्तार मोठा असल्याने घर किंवा गोठ्याच्या शेजारी सावलीसाठी लावले जाते.

  • या वृक्षाचे मूलस्थान दक्षिण भारत आहे. याचा प्रसार पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, जावा देशांत आहे. भारताच्या कोरड्या प्रदेशांमध्ये आणि उत्तर, दक्षिण, पूर्व आणि मध्य भागातील मैदानी भागात कवठाची लागवड दिसते. उत्तर भारतात हे झाड ४० फुटांपर्यंत चांगले वाढते.
  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पश्‍चिम हिमालयात लागवड आढळते. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात शेती बांधावर, गोठ्याजवळ दोन, चार झाडे आढळतात.
  • झाडाच्या जोमदार वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान, २५० ते ३०० मिलिमीटर पाऊस आणि २० ते ३५ अंश सेल्सिअस सरासरी तापमान लागते. मध्यम कोरड्या हवामानात तसेच समुद्रसपाटीपासून ५००० मीटर उंचीवर झाडे आढळतात.
  • हे झाड ४८ अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातील -६ अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकते. शुष्क हंगामामध्ये कवठाची फूल व फळ धारणा होते.
  • हे फळझाड पर्णपाती, हळुवार वाढणारे आणि फांद्या सरळ ते अर्ध-पसरलेल्या असतात. मजबूत मूळ प्रणालीमुळे दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत तसेच हलक्या आणि खराब झालेल्या जमिनीत उत्तम वाढते.
  • व्यापारीदृष्ट्या लागवडीस हलकी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चुनखडी व खारवट जमिनीमध्ये काळजी घ्यावी लागते.
  • अभिवृद्धी 

  • अभिवृद्धी बिया, डोळे भरून व भेट कलमाने करतात. ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे परिपक्व झालेल्या व आकाराने मोठ्या असलेल्या फळांमधून बिया घेऊन पॉलीबॅगमध्ये पेराव्यात. बियांची उगवण ७ ते १० दिवसांनी सुरू होऊन ४० दिवसांमध्ये पूर्ण होते.
  • रोप हळुवार वाढत असल्याने आठ ते दहा महिन्यांमध्ये लागवडीस तयार होते. परंतु, बियांपासून निर्मित रोपाला फळधारणा होण्यास ६ ते ८ वर्षांचा कालावधी लागतो. म्हणूनच, कलमाद्वारे तयार केलेली उच्च प्रतीची रोपे तयार करून लागवडीस वापरली जातात.
  • नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्या दरम्यान एक वर्षाच्या रूटस्टॉकवर भेट कलम केले जाते.
  • कवठाच्या जातींचे संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग आणि केंद्रीय शुष्क फलोत्पादन संस्थेच्या चेस गोध्रा या केंद्रावर केले आहे.
  • विकसित जातींची वैशिष्टे सीएचईएसडब्लू-१  फळांचे वजन - २३९.४३ ग्रॅम, फळातील गर ४३.९५ टक्के, साखरेचे प्रमाण-१५.६० ब्रीक्स, उत्पादन ५० किलो प्रती झाड. सीएचईएसडब्लू-२ फळांचे वजन ३९२ ग्रॅम, फळातील गर ५१.३० टक्के, साखरेचे प्रमाण १८ ब्रीक्स, उत्पादन १०८ किलो प्रती झाड. सीएचईएसडब्लू-३ फळांचे वजन ३१२ ग्रॅम, फळातील गर ४६.९० टक्के, साखरेचे प्रमाण १२ ब्रीक्स, उत्पादन ५८ किलो प्रती झाड. थार गौरव (सीएचईएसडब्लू-४) फळांचे वजन ४५०.२५ ग्रॅम, पेक्टिन १.७६ टक्के, फळातील गर ५०.९२ टक्के, साखरेचे प्रमाण १४.१२ ब्रीक्स, उत्पादन १२४ किलो प्रती झाड. सीएचईएसडब्लू-५ फळांचे वजन २७६.३३ ग्रॅम, फळातील गर ५१.०६ टक्के, साखरेचे प्रमाण १४.६० ब्रीक्स, उत्पादन ६८ किलो प्रति झाड. सीएचईएसडब्लू-६ फळांचे वजन ३८५ ग्रॅम, फळातील गर ५८.२७ टक्के, साखरेचे प्रमाण २०.३० ब्रीक्स, उत्पादन १४८ किलो प्रति झाड.  सीएचईएसडब्लू-१० फळांचे वजन ३५०.२३ ग्रॅम, फळातील गर ५२.२३ टक्के, साखरेचे प्रमाण १७ ब्रीक्स, उत्पादन ११५ किलो प्रती झाड. सीएचईएसडब्लू-१५ फळांचे वजन ३२०.४५ ग्रॅम, फळातील गर -५५.६२ टक्के, साखरेचे प्रमाण १८ ब्रीक्स, उत्पादन १०५ किलो प्रति झाड. एलोरा फळांचे वजन ३००-८५० ग्रॅम, उत्पादन २००-२५० फळे प्रति झाड, महाराष्ट्रामध्ये लागवडीस शिफारस केलेली जात. लागवडीचे नियोजन 

  • लागवड फेब्रुवारी-मार्च किंवा जुलै-ऑगस्टदरम्यान करावी. लागवडीच्या दोन महिन्यांपूर्वी १मी. × १ मी. × १ मी. आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये चांगले कुजलेले १०-१५ किलो शेणखत, १०० ते २०० ग्रॅम निंबोळी पेंड मिसळावी.
  • बीजनिर्मित कवठ रोपांची लागवड ८ मी. × ८ मी., १० मी × ८ मी. किंवा १२ × १० मी. अंतरावर तसेच बांधावरील लागवड ५ ते १० मीटर अंतरावर करावी. कलम केलेल्या रोपांची लागवड ८ मी. × ५ मी. किंवा ६ मी. × ६ मी. अंतरावर करावी.
  • रोपांच्या भोवतीची माती व्यवस्थित दाबून लगेच पाणी द्यावे. आळ्यातील तण सतत काढावे, आच्छादन करावे. आळ्यातील माती दर महिन्याला वरखाली केल्यास आणि बुंध्याला माती लावल्यास पहिल्या चार वर्षांत दुष्काळात देखील झाड सहज तग धरू शकते.
  • पाणी आणि खत व्यवस्थापन 

  • कोरडवाहू किंवा शुष्क भागामध्ये लागवडीनंतर दोन वर्षांपर्यंत पाणी दिल्याने चांगली वाढ होते. जल-मृद्‌ संवर्धनाच्या पद्धतीचा वापर केल्याने रोपांची चांगली वाढ होते. फळांच्या उत्पादनाला फायदा होतो.
  • व्यापारीदृष्ट्या लागवड केलेल्या बागांमध्ये फळ काढणीनंतर पाण्याचा ताण दिल्याने फुलधारणा होण्यास मदत होते. फुलधारणेनंतर बागेस पाणी द्यावे.
  • रोपाला पहिली ४ वर्षे पावसाळ्यात जून महिन्यात आळे करून ६५० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाशचे मिश्रण (२:१:१) आणि ५०० ग्रॅम निंबोळी पेंड आणि १५ किलो शेणखताबरोबर द्यावे.
  • वाढीच्या टप्प्यात काही वेळा फांद्यामधून डिंक निघतो. असा भाग खरवडून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
  • आंतरपिकांचे नियोजन 

  • पहिले दोन ते तीन वर्षे रोपांची संथ गतीने वाढ होते. आंतरपिके म्हणून मिरची, झेंडू, हरभरा, भुईमूग लागवड शक्य आहे.
  • आंतरपिके घेताना कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत. जेणेकरून कवठाच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही.
  • छाटणी व्यवस्थापन 

  • सुरुवातीच्या काळामध्ये रोपांना वळण आणि आकार दिल्याने बागेमध्ये मशागत सोपी होते.
  • फळधारणा ही नवीन शाखांवर होत असल्याने जुन्या, रोगट व वाळलेल्या फांद्या फळतोडणी झाल्यानंतर काढून टाकाव्यात.
  • फळ परिपक्वता आणि उत्पादन 

  • डोळा भरलेली तसेच भेट कलमांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात. बियांपासून तयार केलेल्या रोपांना सातव्या वर्षी फळे लागतात.
  • फेब्रुवारी- एप्रिल  या महिन्या़ंत फांद्यांच्या टोकास विरळ लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठाची फुले येतात. फळे परिपक्व होण्यासाठी फुलधारणेनंतर १९० ते २२० दिवसांचा कालावधी लागतो.
  • पूर्ण पिकलेली फळे ओळखण्यासाठी एक फूट उंचीवरून कडक सिमेंटच्या पृष्ठभागावर टाकून त्यांची चाचणी करावी. अपरिपक्व फळे उसळतात तर परिपक्व फळे उसळत नाहीत. फळे पिकल्यावर चवीला तुरट व गोड-आंबट लागतात.
  • फळे कठीण कवचयुक्त असतात. पिकल्यावर ती पांढऱ्या काळपट रंगाची होतात. पिकल्यावर फळांचा गोड-आंबट वास येतो. पूर्णपणे पिकलेली फळे हलकी तपकिरी ते टॉफी ब्राऊन रंगाची असतात.
  • उत्पादन हे जात आणि लागवड अंतरावर अवलंबून आहे. पाचव्या वर्षांनंतर कलमांना सरासरी ३५ ते ५० आणि दहाव्या वर्षांपासून सरासरी ८० ते १२० किलो फळे मिळतात.
  • कवठाच्या फळांना जास्त मागणी ही ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात आणि हैदराबाद बाजारपेठेत असते.
  • संपर्क : विजयसिंह काकडे (उद्यान विद्या), ७३८७३५९४२६ संग्राम चव्हाण (वनशेती), ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com