उत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न

उत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न
उत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते दीर्घकाळ उत्पन्न

गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न देण्याची या पिकाची क्षमता आहे. त्यातच स्वमालकीच्या लागवडीतून कापणी, वाहतुकीसाठीच्या जाचक अटी कमी झाल्या आहेत. बांबू लागवडीनंतर झाल्यावर प्रथम वर्षी रोपांना महिन्यातून एकदा नियमितपणे मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढतात. मातीची भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. मूळ खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होते, त्यामुळे जमिनीत योग्य ओलावा राहील यासाठी काळजी घ्यावी. ओलावा टिकून राहण्यासाठी रोपांच्या जवळ गवताचा, धसकटाचे आच्छादन करावे. हे  सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजून त्यापासून अन्नद्रव्ये बांबूला मिळतात. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून बांबूचे संरक्षण करावे.

तणव्यवस्थापन बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असून, त्याची मुळे साधारणतः जमिनीच्या वरील थरात असतात. मातीच्या वरील थरातील अन्नद्रव्यांसाठी तणाशी स्पर्धा होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी रोपांभोवतीचे तण काढावे. रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते.

छाटणी प्रत्येक कळकाच्या पेऱ्यामध्ये फांद्या फुटत असतात. अशा फांद्यांचा नवीन येणाऱ्या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढतो. हे टाळण्यासाठी अशा फांद्याची कळकाच्या अंगालगत जितक्या खालीपासून करता येईल, तितक्या खालपासून छाटणी करावी.

आंतरपिके लागवडीनंतर बांबू तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते. सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांत दोन ओळींतील पट्ट्यात मूग, उडीद, कुळीथ व सोयाबीनसारखी आंतरपिके घेणे शक्य आहे. आंतरपिकातून अतिरिक्त उत्पन्नासोबतच जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.

मूळ खोडाची काळजी

  • मूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये यासाठी, रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीतसारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड करावी.
  • कळकांच्या जमिनीलगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीतजास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे.
  • तोडीसाठी अत्यंत तीक्ष्ण धारेचे पाते असावे. खास बांबू कापणीसाठीचे विळे उपलब्ध आहेत.
  • तोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर करावा. त्यामुळे किडी व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.
  • उत्पादन व उत्पन्न

  • ५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्‍टरी ४०० रोपे बसतात. त्यामधून पाचव्या वर्षी २००० बांबू मिळतात. किरकोळ बाजारात प्रति नग १५ रुपये दराप्रमाणे हेक्टरी ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. एकदा केलेल्या लागवडीपासून पुढे सलग ४० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पन्न १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढत जाते. हलक्‍या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षांपासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळू शकतात.
  • उपयोग

  • पारंपरिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.
  • शेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.
  • घरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ. बनविण्यासाठी.
  • प्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.
  • घरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.
  • फर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.
  • हस्तकला व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तू, विविध आभुषणे, फ्रेम्स इ.
  • व्यापार : पॅकेजिंग साधनांसाठी (उदा. चहाची खोकी, आंबा पॅकींगसाठी पेट्या, टोपल्या इ.) , पॉलिहाऊस उभारणी, कागद निर्मिती, उदबत्ती इ.
  • पारंपरिक आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.
  • औषधे : वंशलोशन, नारू रोगाच्या उपचारासाठी उपयुक्त. तसेच बांबूची मुळे, रस खोडावर आढळणारी पांढरी भुकटी औषधी मानली जाते.  
  • मृदा संधारण : जमिनीची धूप थांबविण्यासाठी, जमिनीचा कस वाढविण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरते.
  • खाद्य पदार्थ : बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून चांगली भाजी तसेच लोणचेही तयार करतात.
  • व्यावसायिकदृष्टीने बांबू लागवड

  • सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०, हजार कोटी रुपयांचा असून, त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सिंचनाची सोय असल्यास दीर्घकाळ (४० वर्षापर्यंत) उत्पादन देत राहण्याची बांबू लागवडीमध्ये क्षमता आहे. यासाठी मजुरांची गरजही कमी आहे.
  • राष्ट्रीय बांबू मिशन योजना २००७ ः जागतिक तापमानवाढीच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन, डोंगर उतारावरील मातीची धूप रोखणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली. पूर्वी बांबू वाहतूक व तोडणीसाठी लागणाऱ्या वनखात्याच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र, बांबू वाहतुकीसाठी स्थानिकपातळीवरील गावकामगार पोलिस पाटील किंवा तलाठी दाखल्याची आवश्यकता असते. जून २०१५ च्या अध्यादेशानुसार स्वमालकीच्या जागेत लागवड केलेल्या बांबूची तोडणी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
  • काढणी व उत्पन्न कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू तोडावा. बांबू कापताना तो जमिनीलगत न तोडावा, दुसऱ्या व तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कुऱ्हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळाच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूचे खोडमूळच मरते. बांबू कापणीबाबत नियम

  • अविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात.
  • वाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये.
  • दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत.
  • अर्धवट तुटलेले, वेडेवाकडे, मेलेले कळक प्रथम तोडावेत.
  • प्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार म्हणून किमान आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडावेत.
  • संपर्क :  डॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०, (कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळद घाट, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com