केळी बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे...

सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तीव्रतेमुळे केळीची पाने, फळे आणि फळदांड्यांवर चट्टे पडून नुकसान होते. फळांची गुणवत्ता खालावते, झाडे कोलमडणे, घड सटकणे अशा विकृती आढळून येतात. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.
Cover the bunch of bananas.
Cover the bunch of bananas.

सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तीव्रतेमुळे केळीची पाने, फळे आणि फळदांड्यांवर चट्टे पडून नुकसान होते. फळांची गुणवत्ता खालावते, झाडे कोलमडणे, घड सटकणे अशा विकृती आढळून येतात. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.   सध्या स्थितीत चार अवस्थेत केळी बागा दिसून येतात. यामध्ये मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लागवड केली कांदेबाग, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केलेली बाग, या वर्षी जून महिन्यात लागवड केलेली मृगबाग आणि या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेली कांदेबाग. मागील वर्षाची कांदेबाग केळी आता कापणी संपलेली आहे.  फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केली बाग आता फळ वाढीच्या अवस्थेत तसेच कापणीच्या अवस्थेत असेल. या वर्षी जून ते जुलै महिन्यात लागवड केलेली मृगबाग सूक्ष्म गर्भनिर्मितीच्या अवस्थेत असेल, तर नुकतीच लागवड केली कांदेबाग ही बाल्यावस्थेत असेल.  वारारोधक कुंपण सोसाट्याचा वाऱ्यामुळे पाने फाटणे, झाडे वाकणे, उन्मळून पडणे किंवा झाडे मध्यातून मोडणे, घड सटकणे, बाष्पीभवनाचा वेग वाढणे, पानांवर धूळ साचून प्रकाश संश्लेषण क्रियेला वेग मंदावणे असे परिणाम होतात. या परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी जागेभोवती किमान पश्चिमेस व उत्तरेस वारारोधक कुंपण असावे. सजीव कुंपण  बाग लागवडीच्या वेळी कडेच्या ओळीपासून ६ ते ७ फुटांवर शेवरी, सुबाभूळ,गजराज गवत, बांबू लागवड करावी. त्यानंतर वेळेवर लागवड करावयाची असल्यास उंच वाढणारी तूर,बाजरी, मका यांच्या दोन ओळी दाट लावाव्यात. निर्जीव कुंपण उन्हाळ्याच्या सुरवातीस उपलब्ध असणाऱ्या कपाशी पऱ्हाट्या, तुरीच्या तूरकाड्या, बाजरीचा कडबा यांचा वापर करून झापा करावा. या झापा बागेभोवती एकमेकास बांधून वारारोधक कुंपण करावे. हे साहित्य उपलब्ध न झाल्यास ५० टक्के शेडनेट कापडाचादेखील वापर करता येतो. सर्वसाधारण स्वच्छता  

  • बागा तणमुक्त ठेवाव्यात. मुख्य खोडाशेजारी येणारी पिल्ले धारदार विळ्याने जमिनीलगत २ ते ३ आठवड्यातून   कापावीत. ही पिल्ले मुख्य पिकांशी हवा, पाणी, अन्न, सूर्यप्रकाशाबाबतीत स्पर्धा करतात. 
  • कोणतीही हिरवी पाने कापू नयेत. फक्त रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग कापून नष्ट करावा. 
  • घडातील पूर्ण फण्या निघाल्यावर केळफूल कापावे. घडात इच्छित फण्यांची संख्या ठेवून खालच्या कमी दर्जा असणाऱ्या फण्यांची विरळणी करावी. 
  • आंतरमशागत, वाफेबांधणी 

  • बाल्य अवस्थेतील केळी बागेची उभी, आडवी कुळवणी करावी.
  • मोठ्या बागेत टिचणी व बांधणी करून वाफ्यातील जमीन तडे विरहित व भुसभुशीत करावी. वाफ्याची व्यवस्थित दुरुस्ती करावी.
  • आच्छादन

  •  उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करावा. जमिनीचे तापमान योग्य राखणे तसेच तणांचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने बागेत आच्छादन करावे. 
  • आच्छादनासाठी उपलब्ध असलेला शेतातील काडी, कचरा, जुना गव्हाचा भुसा, सोयाबीन काड, बाजरी सरमट, केळीची रोगविरहित कोरडी पाने, बुंध्याच्या भोवती पसरावीत. सर्वसाधारणतः १० सेंमी जाडीचा थर असावा. नवीन गव्हाचा भुसा आच्छादनासाठी वापरू नये. सेंद्रिय आच्छादनाचे साहित्य उपलब्ध नसल्यास ३० मायक्रॉन जाडीचा चंदेरी, काळा मल्चिंग पेपर वाफ्यात अंथरावा.
  • बाष्परोधकाचा वापर  

  •  तापमान व सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास व पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पानातून  बाष्पीभवन होते. याचा वाढीवर व फळाच्या गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो.
  •  बाष्पीभवन रोखण्यासाठी ८ टक्के केओलीन  या बाष्परोधकाची फवारणी करावी. यामुळे पानांवर पांढरा थर तयार होऊन त्यावरून प्रकाश किरणे परावर्तित होतात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. 
  • खत व्यवस्थापन 

  • उन्हाळ्यात केळी पिकाच्या पोषणासाठी निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेतील मृग बागेस प्रतिहजार झाडांसाठी १२ आठवड्यांपर्यंत प्रति आठवडा युरिया ५.५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो अशी खतमात्रा द्यावी. 
  • मुख्य वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदे बागेस  प्रतिहजार झाडास प्रति आठवडा युरिया १३ किलो युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो ठिबक सिंचन संचातून द्यावे. 
  • व्यवस्थित पाणी आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पीक सशक्त राहते. त्याच्या प्रतिकार क्षमतेत वाढ होते. 
  • उन्हाळ्यात मृग बाग लागवडीची केळी घड निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेत असते. घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळफुल तोडल्यानंतर घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम अधिक सरफेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • घड व्यवस्थापन 

  • घड तयार झाला की, केळफूल व अतिरिक्त फण्या कापाव्यात. केळफूल व अतिरिक्त फण्या कापण्यासाठी विळा निर्जंतुक करावा.
  • घडावर फवारण्या केल्यानंतर दांड्यासहित झाकावेत. घड झाकणीसाठी ४ ते ६ टक्के सच्छिद्र  १०० गेज जाडीची पांढरी किंवा निळ्या रंगाची किंवा पारदर्शक प्लास्टिक बॅग वापरावी. पिशवी घडाच्या दांड्यावर वरच्या बाजूस सुतळीने बांधावी. खालची बाजू मोकळी ठेवावी. यामुळे घडाच्या आजूबाजूस सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन आर्द्रता वाढते. या पद्धतीमुळे  घडाचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. फळ लवकर पिकण्यास मदत होते.झाडांना आधार देणे  
  • झाडाच्या कक्षाबाहेर लोंबणाऱ्या  वजनदार घडामुळे अनेक वेळा झाड वाकते. थोड्याशा वादळाने घडासहित झाडे मध्यातून मोडतात किंवा उन्मळून पडतात, यामुळे घडाचे नुकसान होते. 
  • घडाच्या वाढीच्या अवस्थेत झाड मोडू किंवा पडू नये म्हणून झाडांना आधार देणे आवश्यक आहे.  यासाठी केळीची खोल लागवड करावी.  घड निसवण्यापूर्वी वाफ्याची बांधणी करून झाडांना मातीने आधार द्यावा. उपलब्ध झाडांच्या फांद्या वापरून घडास / झाडास बांबू तसेच लाकडाच्या साह्याने टेकू लावून आधार द्यावा. या प्रकारामध्ये दोन बांबूची कैची, शेवरी, निलगिरी किंवा इतर झाडांच्या फांद्या तोडून वाय  आकाराच्या काठ्यांच्या साह्याने झाडाच्या गळयालगत आधार देता येतो. मात्र अनेक वेळा घड या आधारावर रेलतो. या काठ्यांच्या घर्षणाने फळांची साल खराब होते. 
  • अलीकडे शेतकरी पॅकिंग पट्ट्यांचा वापर करून झाडे एकमेकांना बांधून आधार देतात. या प्रकारामध्ये पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अर्धा इंच जाडीच्या पॉलिप्रोपिलीन पट्ट्यांचा वापर केला जातो. ज्या झाडाला आधार द्यायचा आहे, त्या झाडाच्या गळ्याभोवती पट्टीचे एक टोक बांधले जाते. पट्टीचे दुसरे टोक त्या झाडाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या समोरील झाडाच्या बुंध्यालगत बांधण्यात येते. झाडांना आधार देण्याची ही प्रभावी व स्वस्त आणि सुलभ पध्दत आहे. पॉलिप्रोपिलीन पट्ट्याप्रमाणेच दोऱ्या वापरता येतात.
  • पाणी व्यवस्थापन 

  • जमिनीचा प्रकार, तापमान, पिकाची अवस्था, वाऱ्याचा वेग या सर्व घटकांचा विचार करून पाणीमात्रा व वेळ ठरवावी. 
  • वाफा पद्धतीच्या बागांना उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धतीत संचाची नियंत्रित देखभाल व दुरुस्ती महत्त्वाची ठरते. 
  • लागवडीपासून ३ महिन्यांपर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड ५ लिटर तर ४ ते ६ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड १५ ते २० लिटर आणि त्या पुढील वयाच्या बागांना २५ ते ३० लिटर पाणी प्रती दिन प्रती झाड द्यावे. 
  •  ठिबक सिंचन पद्धतीने कांदेबागेस एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यामध्ये प्रतिझाड प्रतिदिन १० ते १४ लिटर पाणी द्यावे.
  • हलक्या जमिनीत पाणी सरळ मुरते. अशा परिस्थितीत कमी पाण्यामुळे विकृती निर्माण होऊन वाईट परिणाम संभवतात. अशा वेळी जेथे पाणी पडते तेथे १ ते २ किलो शेणखत, गांडूळखत पसरावे. शिफारशीच्या मात्रेत पाणीपुरवठा केल्यास हवामानाच्या विपरीत घटकांच्या परिणामांची तीव्रता कमी होते.
  • - यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७ (जगदाळे हे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ आणि गणेश शिंदे हे कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com