agricultural news in marathi banana advisory | Agrowon

थंडीमध्ये घ्या केळी बागांची काळजी

डॉ. सी.डी.बडगुजर, डॉ.जी.पी.देशमुख, प्रा. ए.आर.मेंढे
रविवार, 21 नोव्हेंबर 2021

हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जाते. याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जाते. याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

सद्यःस्थितीत कापणीत असलेली मागील वर्षीची कांदेबाग लागवड, मार्च -एप्रिल लागवड, शाखीय वाढ संपवून पुनरुत्पादन अवस्थेतील जूनमधील मृग बाग आणि नवीन लागवडीची कांदेबाग अशा वाढीच्या विविध अवस्थेतील बागा आहेत. केळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी किमान तापमान १६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्‍यक असते. केळीच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार कंद उगवण्यासाठी १६ ते ३० अंश सेल्सिअस, पाने व फळांच्या योग्य वाढीसाठी २६ ते ३० अंश सेल्सिअस, केळफूल योग्यरीत्या बाहेर पडण्यासाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस तसेच योग्य प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी १२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आवश्‍यकता असते. मात्र, हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जाते. याचा केळी पिकावर अनिष्ट परिणाम होतो.

थंडीचा होणारा परिणाम 
कंद उगवणीवर होणारा परिणाम 

 • थंडीच्या काळात केळी लागवड करण्यासाठी मर्यादा येतात. या काळात कंदाद्वारे केळी लागवड ही नोव्हेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच करणे गरजेचे असते.
 • हिवाळ्यात लागवड केल्यास कमी तापमानामुळे कंद उगवण व नवीन मुळ्या येण्यास उशीर होतो. पर्यायाने कंद उगवणीचा वेग मंदावतो. परिणामी पीक कालावधी लांबतो तसेच नांग्या पडण्याचे प्रमाणही वाढते.

नवीन मुळ्यांवर होणारा परिणाम 

 • पिकास अधिकाधिक अन्नद्रव्ये उपलब्ध होऊन जोमदार वाढ होण्यासाठी नवीन मुळ्या अधिक प्रमाणात येऊन त्यांची वेगाने वाढ होणे तसेच त्यांची अन्नद्रव्ये शोषण कार्यक्षमता वाढविणे आवश्‍यक असते.
 • कमी तापमानामुळे नवीन मुळ्या येणे आणि त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. मुळ्या आखूड राहतात. कमी तापमानामुळे मुळ्यांची अन्न आणि पाणी शोषण करण्याची क्षमता मंदावते. परिणामी पिकाची अपेक्षित वाढ होत नाही.
 • दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्यास मुळ्यांचे कंकण सडते व मुळांना इजा होते. त्यामुळे कार्यक्षम मुळ्यांच्या संख्येतही मोठी घट येते. पिकावर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रामुख्याने जस्ताच्या कमतरतेची लक्षणे (पानाच्या खालील बाजूस जांभळट छटा) दिसून येतात.

पानांच्या वाढीवर होणारा परिणाम 

 • केळी झाडास सर्वसाधारणपणे प्रति महिना सरासरी ४ नवीन पाने येतात. थंडीच्या काळात हा दर प्रति महिना २-३ नवीन पाने इतका कमी येतो. नवीन पानाची सुरळी उलगडण्यास वेळ लागतो. अनेक वेळा पानाच्या एका (उलगडणाऱ्या सुरळीच्या बाहेरील बाजू) कडेजवळ कमी तापमानामुळे काळसर चट्टा तयार होतो.
 • मुळ्यांद्वारे अन्नद्रव्य शोषणाची क्षमता कमी झाल्यामुळे पाने जवळ येऊन गुच्छ तयार होतो. पाने एकमेकांजवळ आल्याने पानांचा खूपच कमी भाग सुर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. परिणामी झाडाची वाढ मंदावते. पानांतील हरितद्रव्य नष्ट होऊन सुरवातीला पानांवर जांभळट रंगाची छटा तयार होते, नंतर पाने काळपट पडून करपतात. अन्नद्रव्ये शोषण व त्यांचे वहन योग्यरीत्या न झाल्याने पिवळसर होतात.

झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम 
वरील परिणामाप्रमाणेच झाडाच्या मंदावलेल्या वाढीमुळे केळफुल बाहेर पडण्यास वेळ लागतो. सर्व बागेत एकाच वेळी झाडांची निसवण होत नाही. केळी निसवण्याचा कालावधी लांबतो, त्यामुळे कापणीचा कालावधीदेखील लांबतो. परिणामी उत्पादन खर्चात वाढ होते. झाडे वांझ राहण्याचे प्रमाण वाढते.

केळफूल बाहेर पडण्यास अडचण 

 • कमी तापमानामुळे घड निसवण्यास वेळ लागतो. पानांच्या बेचक्यातील पोकळी प्रसरण पावण्यास निर्बंध येतात. पर्यायाने थंड वातावरणात घड निसवताना बाहेर येणारे केळफूल व संपूर्ण घडास नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास अटकाव होतो. मात्र, घडाची व दांड्याची अंतर्गत वाढ सुरूच असल्याने घडाच्या २ ते ५ फण्या या पोकळीतून बाहेर पडतात. उर्वरित घड आतमध्येच अडकतो.
 • काही वेळा घड बाहेर येण्यास योग्य पोकळी न मिळाल्याने घड दांडा वेडावाकडा होतो. हा संपूर्ण घड झाडाचे खोड फोडून वेडावाकडा बाहेर पडतो. या दोन्ही प्रकारचे घड व्यवस्थितरीत्या पोसले जात नाहीत. अनेक वेळा घड दांड्यासहीत निसटून पडतो.

फळ व घड वाढीवर होणारा परिणाम 
थंड वातावरणात नव्याने निसवलेल्या घडाच्या फण्या उमलण्यास वेळ लागतो. या काळात कर्ब साठवणुकीचा दर घटत असल्यामुळे फळ वाढीचा वेग मंदावतो. हिवाळी लागवडीच्या बागांतील घडांची निसवण व वाढ थंड वातावरणात होत असल्याने घड पक्व होण्यास मृगापेक्षा १० ते २० दिवस उशीर होतो.

केळी पिकण्यावर होणारा परिणाम 
थंडीमध्ये केळी एकसमान व अपेक्षित वेगाने पक्व होत नाहीत. फळांच्या सालीच्या आतील बाजूचा रंग मळकट पिवळसर दिसतो. तापमान अधिक कमी होऊन जास्त काळ राहिल्यास फळे काळपट होतात. अशा केळीस चांगला बाजारभाव मिळत नाही.

उपाययोजना 
कमी तापमानामुळे केळी पिकावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा.

 • केळीची लागवड १.५ बाय १.५ मी किंवा १.७५ बाय १.७५ मीटर या शिफारशीत अंतरावर करावी. जास्त अंतरावर लागवड करणे टाळावे.
 • थंड वातावरणात केळी लागवड करणे टाळावे. लागवड शक्यतो ऑक्टोबर महिन्यामध्येच पूर्ण करावी.
 • केळी लागवडीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने सुरु, नेपियर गवत, शेवरी इत्यादी वारा प्रतिरोधक वनस्पतींची दाट २-३ ओळींत लागवड करावी. यामुळे बागेतील झाडांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण होते.
 • रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात. हिवाळ्यात केळी पिकास पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
 • शक्य असल्यास बागेस रात्री किंवा पहाटेच्या वेळी ठिबक संचाने पाणी द्यावे.
 • जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्याकरिता पिकास शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. तसेच सेंद्रिय आच्छादन करावे. यामुळे ओलावा आणि जमिनीचे तापमान योग्य राखले जाते.
 • झाडाची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली रोग विरहित पाने कापू नयेत. पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. रोगग्रस्त पाने फक्त कापावीत.
 • वाढीच्या अवस्थेनुसार प्रति झाड अर्धा ते १ किलो निंबोळी खत मातीत मिसळून द्यावे. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. निंबोळी ढेपेमुळे मुळ्यांना इजा करणाऱ्या सुत्रकृमींपासूनही पिकाचे संरक्षण होते.
 • बागेमध्ये उसाचे पाचट, केळीची रोगविरहीत वाळलेली पाने, सोयाबीन भुगा अशा सेंद्रिय पदार्थांचा किंवा चंदेरी रंगाच्या पॉलिप्रॉपिलीन कागदाचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. तसेच जिवाणूंच्या संख्या वाढण्यास मदत होते.
 • घडाची योग्य वाढ व पक्वता होण्याकरिता शेवटची फणी उमलल्यानंतर त्वरित केळफूल कापून बागेबाहेर नष्ट करावे.
 • घडावर अतिरिक्त फण्या ठेवू नयेत. अपूर्ण व अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. तसेच केळफूल कापणीनंतर घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम व युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची १५ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारणी करावी. यामुळे घडांचे वजन वाढते व घड लवकर काढणीस येतात.
 • फळांच्या योग्य वाढीसाठी केळफूल कापणी, फण्यांची विरळणी आणि रसायनांची फवारणी झाल्यानंतर घड ७५ बाय १०० सेंमी आकारमानाच्या २ टक्के सच्छिद्र पॉलिप्रॉपीलीन (१०० गेज) पिशव्यांनी झाकावा. यामुळे घडाचे थंड हवा, धूळ, पाणी, दव यांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर घडाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होऊन घड लवकर पक्व होतो.
 • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बाग नियमितपणे स्वच्छ ठेवावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, (फवारणी ः प्रतिलिटर पाण्यातून) कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनाझोल (५० टक्के) अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन (२५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १.४ ग्रॅम किंवा
 • प्रॉपीकोनॅझोल १ मिलि अधिक मिनरल ऑइल १० मिलि स्टिकरसह मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने प्रॉपीकोनॅझोल १ मिलि अधिक मिनरल ऑइल १० मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे ४ ते ५ फवारण्या घ्याव्यात.
 • तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास, पहाटेच्या वेळी बागेच्या चोहोबाजूंनी ओला काडीकचरा व गवत जाळून धूर करावा.

(शिफारशी आहेत.)
(टीप: फवारणीसाठी पॉवर स्प्रे वापरणार असल्यास रसायने अडीच पट इतक्या प्रमाणात घ्यावीत.)

- डॉ. सी. डी. बडगुजर, ८८८८८५०८५८
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे)
केळी संशोधन केंद्र, जळगाव)


इतर कृषी सल्ला
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...