हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
यशोगाथा
आधुनिक गुऱ्हाळघराद्वारे फायदेशीर गूळनिर्मिती
कासुर्डी (ता. दौड, जि. पुणे) येथील आखाडे बंधूंनी आपल्या पारंपरिक गुऱ्हाळघराला स्वयंचलित वा आधुनिक पद्धतीच्या गुऱ्हाळघर तंत्रज्ञानाची जोड देत व्यवसायवृद्धी केली आहे. त्यातून कमी वेळेत, कमी मजूरबळ संख्येत दर्जेदार गूळ तयार करणे शक्य झाले आहे.
कासुर्डी (ता. दौड, जि. पुणे) येथील आखाडे बंधूंनी आपल्या पारंपरिक गुऱ्हाळघराला स्वयंचलित वा आधुनिक पद्धतीच्या गुऱ्हाळघर तंत्रज्ञानाची जोड देत व्यवसायवृद्धी केली आहे. त्यातून कमी वेळेत, कमी मजूरबळ संख्येत दर्जेदार गूळ तयार करणे शक्य झाले आहे.
पुणे शहरापासून साधारणपणे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर पुणे- सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील कासुर्डी गाव आहे. गुळाचे आगार असेही त्यास म्हटले जाते. गावात आणि तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीची गुऱ्हाळे आहेत. अनेक शेतकरी या व्यवसायात उतरले असून पूरक म्हणूनच ते त्याकडे पाहतात.
आखाडे बंधूंचा व्यवसाय
कासुर्डीतील निवृत्ती शिवराम आखाडे हे गूळ व्यवसायात हातखंडा असलेले नाव आहे. सुमारे १५ वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. मुख्य किरण, तर सोबतीला शशिकांत आणि किशोर ही त्यांची मुले आपले व्यवसाय सांभाळून ही जबाबदारी सांभाळतात. त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती असून, त्यात ऊस हेच मुख्य पीक आहे. त्यांची पारंपरिक पद्धतीची दोन गुऱ्हाळे आहेत. मात्र एक वर्षापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित पद्धतीने गुऱ्हाळ त्यांनी सुरू केले.
व्यवसायातील वाटचाल
नवी पिढी कमी खर्चात, कमी मजुरांत चांगल्या पद्धतीने गूळ तयार करण्याकडे वळली आहे. आखाडे यांनी तेच केले. विविध गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांकडील तज्ज्ञ आदींकडून माहिती घेऊन पारंपरिक गूळनिर्मितीत बदल करण्याचे त्यांनी ठरवले. सुरुवातीला आर्थिक अडचणी आल्या. तरी हिमतीने त्यावर मात केली. प्रकल्प उभारल्यानंतर त्यातील येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन बदल केले.
यंत्र खरेदी
पारंपारिक पद्धतीने गुऱ्हाळाची प्रति दिन २० टनापर्यंत ऊस गाळपाची क्षमता असते. त्यात बदल करण्यासाठी मिल, बॉयलर, प्रोसेसिंग युनिट अशा विविध यंत्रांची खरेदी केली. त्यानंतर खासगी कंपनीतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थितरीत्या उभारला. प्रति दिन सुमारे ६० ते ६५, ७० टन ऊसगाळप होईल एवढी नव्या युनिटची क्षमता आहे.
प्रक्रिया
- संपूर्ण युनिट स्टेनलेस स्टीलमध्ये.
- मिलमध्ये गाळप करून रस दीड एचपी क्षमतेच्या मोटरद्वारे टॅंकमध्ये घेतला जातो.
- तीन कढया आहेत. पहिल्या कढईत चुना टाकून ७५ अंश सेल्सिअस तापमानाला रस उकळून त्यातील मळी बाहेर काढली जाते. रस तीन टप्प्यांमध्ये उकळला जातो.
- पुढील कढयांद्वारे अतिरिक्त पाणी काढून टाकले जाते. उकळण्याची क्रिया झाल्यानंतर रस छोट्या आकाराच्या टॅंकमध्ये घेऊन थंड केला जातो.
- त्यानंतर वेगवेगळ्या आकारांच्या साच्यांमध्ये भरून वजनानुसार गूळ तयार केला जातो.
- ऊस रासायनिक शेतीतील असला तरी गूळनिर्मितीत रसायनांचा वापर होत नाही.
विविध प्रकारांत गूळ
- पाच ग्रॅमपासून ते दहा किलोपर्यंत.
- पावडर तसेच क्यूब (वड्या)(पाच ग्रॅम) देखील.
- काकवीचेही अर्धा लिटर ते एक लिटर पॅंकिग.
आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे
- पारंपरिक पद्धतीत भट्टी बांधली जायची. जळण अधिक प्रमाणात लागत होते. उसाचा रस काढण्यासाठी वेळ लागायचा. लोखंडाच्या कढईत उकळून गूळ तयार केला जायचा. त्यासाठी वेळही अधिक लागायचा. प्रति १५ ते २० याप्रमाणे दोन गुऱ्हाळांसाठी ३० ते ४० मजुरांची गरज भासायची. दररोज दोन ते अडीच टन गूळ तयार केला जायचा. पूर्वी जळणासाठीचे चुयटे उन्हात सुकत घालावे लागायचे.
- स्वयंचलित पद्धतीत शेतातच जवळपास एक एकर क्षेत्रावर शेड उभारून कमी जागेत संपूर्ण प्रक्रिया करणे शक्य होते. सर्व युनिट एकाच ठिकाणी किंवा बंदिस्त स्वरूपात वापरात येते. त्यामुळे बाहेरील काडीकचरा आत येण्यापासून अटकाव करता येतो. त्यामुळे ‘हायजेनिक’ वातावरण ठेवता येते.
- बॉयलरची सोय असल्याने चुयटे सुकवत ठेवण्याची गरज भासत नाही.
- ऊस गाळपक्षमता तिपटीने अधिक झाली.
- कमी जागेत निम्म्यापर्यंत मजूरबळ संख्येत व वेळेत बचत करून गूळनिर्मिती साध्य झाली.
भांडवल
- एकूण गुऱ्हाळ प्रकल्प खर्च- १ कोटी ३५ लाख रु.
- पूर्वीपासूनचा गूळ व्यवसाय व शेती यातून जवळपास ३५ लाख रुपयांचा आर्थिक निधी उभारला.
- जवळपास एक कोटीचे कर्ज घेतले.
ऊस खरेदी
- स्वतःच्या शेतातील उसाचा वापर
- परिसरातील शेतकऱ्यांकडून बाजारभावानुसार प्रति टन २५०० रुपयांप्रमाणे ऊस खरेदी
- सुमारे २०० पर्यंत शेतकऱ्यांचे नेटवर्क
गूळ विक्री
- ग्राहकांना जागेवर विक्री.
- पुणे, मुंबई, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांना पुरवठा दर (रिटेलचे)
- अर्धा किलो- ३२ ते ३५ रु.
- एक किलो- ५० रु.
- पावडर- ८० रुपये प्रति किलो
- काकवी १ लिटर- ६० रु.
मजुरांना रोजगार
कोरोना संकटात अनेक कंपन्या बंद पडल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. मात्र आखाडे यांच्याकडील उद्योग त्या काळातही सुरू राहिला. मजुरसंख्येचा फटका मात्र काही प्रमाणात बसला. सध्या ५० मजूर कार्यरत आहेत. पैकी स्वयंचलित गुऱ्हाळ केंद्रात १० जणांना रोजगार मिळाला आहे. त्यांना दर महिन्याला बारा ते १८ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
उलाढाल
पूर्ण क्षमतेने व्यवसाय चालल्यास महिन्याला ७० ते ७५ लाख रुपयांची उलाढाल होते. उसावरील खर्च, प्रक्रिया, मजूर, वीजबिल व अन्य मिळून महिन्याला ६० ते ६५ लाख रुपयांपर्यंत खर्च असतो.
- शशिकांत आखाडे ७७६८९९३७३७
किरण आखाडे ९८२३७०८०८०
फोटो गॅलरी
- 1 of 98
- ››