हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला फायद्याचा

शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये शेडनेट आणि पांढऱ्या रंगाचा थर अशा अन्य घटकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. नेदरलॅंड येथील हरितगृहातील शेतकरी त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धती वापरू लागले आहेत. या नव्या तंत्राविषयी जाणून घेऊ.
 benefits of white color spraying on greenhouse
benefits of white color spraying on greenhouse

शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये शेडनेट आणि पांढऱ्या रंगाचा थर अशा अन्य घटकांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. नेदरलॅंड येथील हरितगृहातील शेतकरी त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धती वापरू लागले आहेत. या नव्या तंत्राविषयी जाणून घेऊ.  शेवंती हे प्रकाश आवडणारे पीक आहे. मात्र उष्णतेसाठी तितकेच संवेदनशील आहे. म्हणजे एकाच वेळी या पिकाला सूर्यप्रकाश आवडतो, मात्र कडाक्याचे ऊन त्रासदायक ठरू शकते. वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये या पिकाला आवश्यक प्रकाशाचे प्रमाण बदलते. १० ते १२ तास प्रकाश पुरवण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये प्रकाश पुरवणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणाचा वापर केला जातो. दिवसातील सूर्यप्रकाशातील प्रकाश पिकापर्यंत पोहोचवतानाच त्यातील उष्णता वर रोखण्यासाठीही प्रयत्न केले जातात. या पिकातील शेडनेट वापराचे तंत्र आणि एकूणच बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना शेवंती पिकातील तज्ज्ञ पॉल डी वेल्ड यांनी सांगितले, की नेदरलॅंड येथील एक कंपनी शेवंतीच्या सॅण्टीनी व्हॅरियन्टच्या विविध जातींची लागवड करतात. यात एक जात अशी आहे, की तिच्या शाकीय वाढीच्या स्थितीमध्ये तिला अधिक प्रकाश किंवा रॅडिएशन आणि उष्णता दोन्हीही नको असतात. या दोन्ही बाबींमुळे फुलांच्या कळ्यांचा विकास होण्याची प्रक्रिया मंदावते. कळ्यांच्या शेजारून फुटणारे अनावश्यक फुटवे वाढत राहतात. हा परिणाम कळ्यांचा विकास होण्याच्या अवस्थेत तापमान अधिक होण्यामुळे दिसून येते. या अवस्थेत या पिकाला दिवस लहान असणे मानवते. त्यामुळे हरितगृहामध्ये वाढ करणारे शेतकरी या काळात काळ्या रंगाचे शेडनेट वापरून दिवसातील अर्ध्यापेक्षा अधिक काळ अंधार तयार करतात. उन्हाळ्याच्या काळामध्ये शेडनेटच्या वापराने प्रकाश कमी केला, तरी आतील तापमान अधिकच राहण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे आवरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर सूर्य तळपत असतानाही एकूण २४ तासांसाठी आतील तापमान कमी राखण्यास मदत होते. शेवंती हे पीक वातावरणातील विविध घटकांसाठी संवेदनशील आहे. त्यासाठी वसंतामध्ये आणखी एक धोरण राबवले जाते. त्यातही मागील वर्षातील अनुभवानुसार जातीनिहाय योग्य ते बदल करत पुढे जावे लागते. काही जातींमध्ये उष्णतेच्या काळात शाकीय वाढ वेगाने होण्याच्या समस्येसोबतच फुलांचा रंगही फिक्कट होतो. या समस्येवरही हे नवे आवरण कार्यक्षम ठरते. तापमान कमी करण्याच्या उद्देशाने दोन संभाव्य आवरणांचा वापर करता येतो. त्याचे दोन प्रकार रेड्यूहीट आणि रेड्यूफ्यूज आयआर असे आहेत. रेड्यूफ्यूज आयआर या आवरणातून किंचित सूर्यप्रकाश आत घेतला जातो. त्यातून उपलब्ध होणारा विखुरलेल्या स्वरूपातील प्रकाश (डीफ्यूज्ड लाइट) पिकांच्या वाढ आणि विकासासाठी अधिक फायदेशीर ठरतो. रेड्यूहीट या प्रकारच्या आवरणाचा वापर ज्या ठिकाणी उष्णतेमुळे फुलांचे रंग फिक्कट होण्याची समस्या दिसून येत असल्यास करावा.  आधुनिक पद्धतीचा वापर करत असलेल्या शेतकऱ्यांना काही वर्षांचा अनुभव गृहीत धरून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या मते रेड्यूफ्यूज आयआर हा प्रकार अधिक चांगला पर्याय ठरतो. अनावश्यक वाढ, अनावश्यक शाकीय वाढ पूर्णपणे टाळता येते. त्याच प्रमाणे फुलांचा दर्जाही चांगला मिळतो. शेवंती पिकांमध्ये प्रकाशाचे मोजमाप करण्याची आवश्यकता असली तरी अद्याप शेतकरी व कंपन्यांनी फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे लक्समीटर किंवा अन्य मोजमापामध्ये हाच अभ्यास शास्त्रीय पातळीवर करण्याची आवश्यकता आहे. पिकाची वाढ, फुलांचे उत्पादन या अनुषंगाने अधिक अभ्यास आवश्यकता आहे. जेव्हा आपण हरितगृहामध्ये शेडनेट किंवा आवरणांचा वापर करतो, त्या वेळी आवश्यकतेनुसार योग्य तितका सूर्यप्रकाश सरळ आत घेण्याची सोय आवश्यक असते. काही वेळा अशा सरळ सूर्यप्रकाशामुळे पिकाच्या रंगावर काही प्रमाणात परिणाम होतो. नवे आवरण नसताना शेतकऱ्याला काळ्या रंगाच्या शेडनेट ८५ ते ९० टक्के वेळेसाठी झाकून ठेवावे लागते. आवरणाचा वापर केला असता ६० टक्क्यांपर्यंत झाकण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. हरितगृहामध्ये चांगले वातावरण व हवा खेळती राहते. रेड्यूफ्यूज आयआर या आवरणांच्या वापरामुळे काळ्या शेडनेटने झाकल्यासारखे परिणाम मिळतात. उष्ण उन्हाळे व समस्या गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्यातील कडाक्याच्या उन्हाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, ग्राहकांकडून रेड्यूफ्यूज आयआर वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. हवामानाचे मिळणारे अंदाज पाहता वाढत्या उन्हाचे परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी ठिबकण्याची समस्याही हरितगृहामध्ये दिसते. अशा ठिकाणी काही रोपांमध्ये कूज रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. रेड्यूफ्यूज आवरणाखाली हे प्रमाण कमी होते. कारण कमी सूर्यप्रकाशामुळे पर्णछिद्रेही कमी प्रमाणात उघडली जातात. सामान्यतः शेतकरी हरितगृहाच्या प्लॅस्टिक किंवा काचघरांच्या काचांवर पांढऱ्या रंगाची फवारणी करतात. यातून फुलांचे रंग बदलणे, फिक्कट होणे किंवा फुलांच्या पाकळ्या जळणे अशा समस्या कमी होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com