उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी

बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून, मध्यम बांध्याची आहे. मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे.
Berari goat breed
Berari goat breed

बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून, मध्यम बांध्याची आहे. मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे.  सध्याचा अमरावती विभाग हा बेरार प्रांत म्हणून ओळखला जात असे. म्हणूनच या प्रांतात आढळणाऱ्या शेळ्यांना बेरारी असे संबोधले जाते. बेरारी शेळीचा विस्तार विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती व अकोला जिल्ह्यांत जास्त प्रमाणात या शेळ्यांची संख्या आहे. बेरारी शेळीला स्थानिक भागात लाखी किंवा गावरानी या नावाने सुद्धा ओळखले जाते.  महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमनेरी या शेळ्यांच्या जाती सोबतच विदर्भातील बेरारी या स्थानिक शेळीची राष्ट्रीय स्तरावर अधिकृत जात म्हणून नोंद करण्यात आली आहे. राज्यातील  स्थानिक शेळ्यांच्या जातींनी तेथील वातावरणात योग्य प्रकारे जुळून घेतले आहे. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तसेच उष्ण वातावरणात टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे, त्यामुळे उपलब्ध परिस्थितीत अधिक उत्पन्न मिळवून देतात. प्रजनन क्षमता 

  • शेळीचे प्रथम वयात येण्याचे वय २९२ दिवस, प्रथम गर्भधारणेचे वय ३१३ दिवस आणि प्रथम विण्याचे वय ४६० दिवस असते. 
  • शेळीच्या दोन वेतांतील अंतर २४० दिवस, तर व्यायल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ ९१ दिवस असतो.
  • शेळीचा गाभण काळ १४७ दिवस व माजाच्या चक्राचा कालावधी हा २१ दिवसांचा असतो. प्रजनन क्षमतेचा विचार केला असता बेरारी शेळी लवकर वयात येते. दोन वर्षांत तीन वेळा विते.
  • उत्पादन क्षमता 

  • शेळीची प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता ५३३ ग्रॅम, तर एका वेतातील दूध उत्पादन ७८ किलो असते. या जातीच्या शेळीचा दूध उत्पादनाचा काळ १३३ दिवस व भाकड काळ ११० दिवसाचा असतो. 
  • शेळीच्या दुधातील स्निग्धांचे प्रमाण ५.७२ टक्के, तर दुधातील स्निग्ध विरहित घन प्रमाण ११.१५ टक्के आहे.
  • शेळीची वैशिष्ट्ये

  • शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी (लाल) असून, मध्यम बांध्याची आहे. मांस उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे. 
  • त्वचेचा रंग करडा असून नाकपुड्या, खुरे इत्यादींचा रंग बहुतांशी काळा असतो. 
  • शेळीचे कपाळ बहिर्वक्र आहे. नर व मादी शेळीला शिंगे असतात व  त्यांची ठेवण वर व मागे झुकलेली असते. शिंगांची लांबी १० ते ११ सें.मी. असते.
  • शेळ्यांचे कान लोंबणारे, पानाच्या आकाराची व चपटे असतात. शेळीला दाढी व लोलक नसतात.
  • शेळ्यांची कास ही कटोऱ्याच्या आकाराची असून सड निमुळते व टोकदार असतात. शेपटी झुपकेदार व वळलेली असते. पोटाकडील भाग साधारणतः फिक्कट तपकिरी असतो. मांड्यांवर तपकिरी दाट केस पाहायला मिळतात. 
  • शेळी मध्यम आकाराची असून प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते. पूर्ण वाढ झालेल्या बेरारी बोकडाचे सरासरी वजन ३६ किलो तर शेळीचे वजन ३० किलोपर्यंत असते. जन्मतः नर करडाचे वजन २.४६ किलो तर मादी करडाचे वजन २.३६ किलो असते. करडांचे ३ महिने वाढीपर्यंतचे वजन अनुक्रमे ९.२२, ८.७० किलो व ६ महिन्यांपर्यंत १५.४१ व १४.६५ किलो असते. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे सरासरी वजन २३ किलो, तर मादीचे सरासरी वजन २० किलो असते.
  • या शेळीमध्ये एका वेतात करडू देण्याचा विचार केला असता एक करडू देण्याचे प्रमाण ४१.५६ टक्के, जुळे देण्याचे प्रमाण ५६.४५ टक्के, तिळे देण्याचे प्रमाण १.८७ टक्के, तर चार पिले देण्याचे प्रमाण ०.१२ टक्का असते.
  • बेरारी शेळीच्या चेहऱ्यावर शिंगांपासून नागपुड्यांपर्यंत दोन्ही बाजूंनी फिक्कट ते गडद रंगाची किनार पाहायला मिळते. नर व मादी दोघांतही मानेपासून शेपटीपर्यंत पाठीवरून जाणारा काळापट्टा असतो. फक्त नरामध्ये गळ्याभोवती काळ्या रंगाचा गोफ (वर्तुळ) असतो. 
  • - डॉ. शैलेंद्र कुरळकर, ९८२२९२३९९७ (पशुअनुवंशिक व प्रजनन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com