गीर संवर्धन करणारा भरवाड समुदाय

भरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे. जैवविविधतेचा एक भाग असणाऱ्या गीर गोवंशातील उपजातींचे संवर्धन हा समाज चांगल्या प्रकारे करत आहे.
Raising of Gir cows
Raising of Gir cows

भरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे. जैवविविधतेचा एक भाग असणाऱ्या गीर गोवंशातील उपजातींचे संवर्धन हा समाज चांगल्या प्रकारे करत आहे.  भरवाड समुदाय हा मुळचा गुजरातमधील. गीर गाईंचे संगोपन हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. १९७२ साली गुजरातमध्ये दुष्काळ पडला आणि गाई वाचवण्यासाठी या लोकांनी स्थलांतर केलं. गाईंचे कळप घेऊन ते चालत निघाले ते महाराष्ट्रात पोहोचले. मात्र, गायींच्या सोईने जंगलात त्यांनी आश्रय घेतला. सध्या महाराष्ट्रात सुमारे १० हजारांच्या आसपास या समुदायाची लोकसंख्या आहे. गेल्या ६० वर्षात या लोकांनी गाईंच्या चाऱ्यासाठी महाराष्ट्रात देखील एका भागातून दुसरीकडे असे स्थलांतर केले, बऱ्याच ठिकाणी स्थलांतर अजूनही कायम आहे.   भरवाड समुदायाला मालधारी म्हटले जाते. माल म्हणजे पशू आणि पाळलेल्या पशूंना सांभाळणाऱ्या समुदायाला स्थानिक भाषेत मालधारी म्हणतात. भरवाड समुदायासाठी त्यांच्या गीर गाई त्यांची संपत्ती आहेत. जैवविविधतेचा एक भाग असलेल्या या जनावरांच्या वेगवेगळ्या जाती-प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन हा समाज करतोय. गायींना होणाऱ्या आजारांवर ते घरीच उपचार करतात.भरवाड समुदाय हा जंगलात राहणारा आणि विविध भागात स्थलांतर करणारा असल्याने त्यांचे निसर्गाशी जवळचे नातं आहे. स्थलांतरित होणारा हा समुदाय  ७०च्या दशकात नागपूरचे गोरेवाडा जंगल, चंद्रपूरचे ताडोबा जंगल, तोतलाडोह, खैरीबाग जंगल परिसरात गाई घेऊन आला. चार ते सहा महिने जंगलात घालवून परत कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी परत यायचे. अनुभवातून आणि स्थानिकांकडून प्रदेशाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे कोणत्या ऋतूत कोणत्या भागात जनावरांसाठी चारा मिळू शकतो, याबद्दल ते अंदाज बांधायचे आणि ऋतूनुसार स्थलांतर करू लागले.  हा समुदाय उन्हाळ्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात स्थलांतर करतो. तेथे भात हे मुख्य पीक असल्याने जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात मिळतो. यासह नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, कुही भागात स्थलांतर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.    गीर गोवंशाचे संवर्धन  भरवाड समुदायाने गीरमधील धॉळ, जामुडी, बोडी, लिलेड, हरण, दिओळ, धमोळ, गोऱ्हेर, फडाक, गॉरी, बगली, रुपण या उपजातींचे चांगले संगोपन केले आहे.  गाईंना नावे कशी ठेवतात, याबाबत लिलूबेन भरवाड यांनी सांगितले की, गाईचे नाव आम्ही नव्याने ठेवत नाही. ही नावे पिढीजात आली आहेत. गाईच्या स्वभावानुसार त्यांचे नाव ठेवले जाते. उपजातीमध्ये लिलेड, धॉळ, जामुडी, बोडी या गायी चांगले दूध देतात. जेरामभाई भरवाड सांगतात की, गीर गाई संगोपन हे जिकरीचे काम आहे. या गायीचे दूध दाट असते. या गाईंना कायम हिरवा आणि चांगला चारा लागतो. चांगला चारा पोटभर न मिळाल्यास या गायी पाच-पाच वर्ष जनत नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहात बऱ्याच अडचणी येत आहेत. शेपरूट गवतासह दादर ज्वारी गाईसाठी चांगले चारा पीक आहे. मक्क्याच्या तुलनेत हे पौष्टिक असून गायी चांगले दूध देतात. या समुदायात जानडी नावाची एक प्रथा आहे. ती म्हणजे एखादी गाय आजारी असेल तर देवाला नैवेद्य बोलून जगली तर देवाच्या नावाने सोडतात. हे लोक जानडी गायीचे दूध कधीच विकत नाही, ते दूध घरात वापरले  जाते, वासरांना पाजले जाते. हा समुदाय समाजाबाहेरच्या लोकांना गाय विकत नाही. अनोळखी लोकांना गाई विकल्यास भविष्यात त्यांचे काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ते विश्वासार्ह लोकांशिवाय कुणालाच त्यांच्या गाई देत नाही. गाय कितीही म्हातारी झाली, आजारी पडली तरी तिने अंगणात जीव सोडावा, अशी त्यांची मान्यता आहे. भरवाड समुदायाकडे कळपाने गाई असतात, प्रजनन प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी एक कळपात एक वळू पाळला जातो. वळू निवडीबाबत  मालाभाईंनी सांगितले की, जी गाय जन्मापासून अंगकाठीने चांगली  आणि मजबूत आहे, सड चांगले आहेत, स्वभावाने जी गाय शांत असते, अशाच गायीच्या वासराचा वळू म्हणून विचार केला जातो. त्यानंतर वळूला त्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. याउलट इतर वासरू ज्याचा बैल म्हणून वापर केला जातो, त्यासाठी कोणतेही पात्रता निकष नसतात.   - सजल कुलकर्णी,  ९८८१४७९२३९ (लेखक पशू जैवविविधता अभ्यासक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com