लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच वर्षांपासून ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन’ (एसईबीसी) ही संस्था कार्यरत आहे.
Shivarpheri on the farm of experimental farmers
Shivarpheri on the farm of experimental farmers

ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच वर्षांपासून ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन’ (एसईबीसी) ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः पश्‍चिम घाट परिसरात दुर्मीळ होणाऱ्या उपयुक्त वनस्पती, औषधी वनस्पती, कंदमुळांच्या संवर्धनासाठी संस्थेने लोकांच्या सहभागातून विविध उपक्रमांना चालना दिली आहे.  पश्‍चिम घाट म्हणजेच सह्याद्री रांगांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींमुळे युनेस्कोने या भागातील ३९ नैसर्गिक भूप्रदेश जागतिक वारसा स्थळ  म्हणून निवडले आहे. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे बऱ्याच भागातील जंगल परिसंस्था धोक्यात आली आहे. या भागातील जंगलांचे संवर्धन व्हावे यासाठी ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन'' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. संस्थेने २०१५ पासून पश्‍चिम घाटातील विविध भागांत देशी वृक्षांच्या लागवडीच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम हाती घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रांत बेर्डे तसेच डॉ. राजेंद्र शेवडे, डॉ. राहुल मराठे, डॉ. दिग्विजय लवटे, डॉ. काशिनाथ चव्हाण, डॉ. चंदा बेर्डे, नचिकेत शेटे, दीपक रामाने या सदस्यांनी संस्थेच्या उपक्रमांना चालना दिली आहे.  जंगल परिसरात असलेल्या गावातील लोकांना संस्थेने रोपवाटिका तयार करणे, बिया गोळा करणे आणि  रोप लागवडीमध्ये सहभागी करून घेतले आहे. गेल्या पाच वर्षांत खासगी व सरकारी जागेमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने ४५ वृक्षांच्या प्रजातींच्या विविध रोपांची लागवड संस्थेच्या माध्यमातून झाली आहे. लागवडीसाठी हिरडा, बेहडा, आवळा, जांभूळ, कोकम, चिंच, असाणा, अंजनी, कुंभा, मुरुडशेंग, पाडळ, पांढरा कुडा, काळाकुडा, साग, सीता अशोक, करंज, शिवण, सोनचाफा, बिब्बा, काजू, आंबा, गुंज, अडुळसा, बेल, खैर, समुद्राशोक, चारोळी, पळस, फणस, करवंद, उंडी, वारस, सुरंगी, चेर, वावडिंग, इ. वनस्पतींची निवड करण्यात आली. वनस्पतींची निवड करताना त्यांचा औद्योगिक उपयोगी, औषधी उपयोग, जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्तता लक्षात घेतली आहे.  देवराई संवर्धन उपक्रम  पश्‍चिम घाट आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जंगल परिस्थिती चांगली आहे. या परिसरात ८४० देवराईंची नोंद झाली आहे. त्यामध्ये असलेल्या दुर्मीळ वृक्षांच्या प्रजाती, प्राणी आणि देवरायांबाबत जागरूकता करण्यासाठी  ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय, आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रचार केला जातो. पश्‍चिम घाट आणि त्यातील जैव विविधता याचे महत्त्व सांगण्यासाठी पथनाट्य, स्लाइड शो, प्रदर्शन, रॅलीचे आयोजन केले जाते. लांजा, दापोली परिसरांतील महाविद्यालयामध्ये औषधी वनस्पती व देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दाजिपूर परिसरातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अळिंबी लागवड, गांडूळ खतनिर्मिती, स्ट्रॉबेरी लागवड, मधमाश्‍या पालनाबाबत प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. देवरुखमधील सप्रे महाविद्यालय, दापोली येथील महाविद्यालय तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वलवण ग्रामपंचायत, माळेवाडी, पनोरीमधील विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शेतकऱ्यांची विविध उपक्रमांना मदत मिळाली आहे. रोजगारासाठी प्रशिक्षणाचे आयोजन 

  • संस्थेच्या औषधी वनस्पती रोपवाटिका आणि वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात ग्रामीण दुर्बल घटक तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
  • रोपवाटिका, औषधी वनस्पती, ग्रीन हाउस इत्यादी उपक्रमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यशाळा, व्याख्यान, चर्चासत्र, औषधी वनस्पती प्रदर्शनाचे आयोजन.  
  • ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांना एकत्र घेऊन वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यातून वृक्ष लागवडीला चालना. 
  • खासगी क्षेत्र, एकत्रित क्षेत्र, शासकीय जमीन (रस्ते, स्मशानभूमी, देवराई इ.) ठिकाणी सामूहिक पद्धतीने वृक्ष लागवड आणि देखभाल करण्याचे काम दुर्बल कुटुंब आणि महिलांना देण्यात आले. या उपक्रमाद्वारे गरजू कुटुंबांना रोपवाटिकेच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळाला. वृक्ष लागवड आणि जोपासना, रोपांना वेळेवर पाणी देण्याचे बारमाही काम मिळाले. त्याचा फायदा कुटुंबांचा दैनंदिन खर्च आणि मुलांना शैक्षणिक खर्चासाठी होतो आहे.
  • पुणे शहरातील उपक्रम 

  • एस.आर.पी.एफ. तसेच पाबे घाट, वेल्हा परिसरात २०१५ पासून बी.एम.सी.सी., एस. पी. कॉलेज, वाडिया कॉलेज यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा उपक्रम.
  • हुजूरपागा महिला महाविद्यालय, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून एकाच दिवसात तीस हजार सीड बॉल्स तयार करून पाबे घाटात रोपण. 
  • दरवर्षी २२ मे रोजी जागतिक जैवविविधता दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन, देशी वृक्षांची माहिती आणि स्थानिक पर्यावरणाच्या चित्रफिती आणि व्याख्यानांचे आयोजन. देशी फळे, कंदमुळांचे प्रदर्शन. संयुक्त राष्ट्र संघातर्फे या उपक्रमांची नोंद.
  • विद्यार्थांनी तयार केली रोपवाटिका 

  • संस्थेने २०१२-१३ पासून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा आणि न्यू एजुकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात देशी वृक्षांची पहिली रोपवाटिका तयार केली. यासाठी दुर्मीळ वृक्षांच्या जातींची निवड करून नजीकच्या जंगलातून तसेच देवराईमधून बियांचे संकलन करण्यात आले. त्यांचे शास्त्रीय प्रयोगाद्वारे विश्‍लेषण करून बियांची रुजवण क्षमता, त्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांचा परस्पर संबंध यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला. या उपक्रमामध्ये लोकांचा सहभाग वाढला आहे. 
  • वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी सुरुवातीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा महाविद्यालय, बंगलोरस्थित हिमालय ड्रग कंपनी आणि अमेरिकेतील ‘ट्रिस फॉर द फ्यूचर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची मोलाची मदत मिळाली.
  • उपयुक्त देशी वनस्पतींचे महत्व शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पटवून देणे तसेच लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी स्लाईड शो, सचित्र व्याख्यान, औषधी वनस्पती प्रदर्शन, फ्लेक्स इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती.
  • विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत तसेच  जगभरातील विविध जंगल परिसंस्था, त्यातील वनस्पती व प्राणी वैभव, तसेच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याबद्दल चित्रफीत, सचित्र व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती. 
  • संस्थेने आतापर्यंत २०० वर्ग सभा घेऊन पश्‍चिम घाटातील जैवविविधता, वनस्पती, प्राणी यांचे अनन्यसाधारण महत्त्व प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविण्यात येते.
  • अपारंपरिक ऊर्जास्रोत वाढीसाठी प्रयत्न 

  • ग्रामीण भागामध्ये सौर पथदीप, सौर कंदील, सौर चूल, एलईडी बल्ब वापराबाबत प्रबोधन.
  • वृक्ष तोडीला आळा घालण्यासाठी बायोगॅसचा प्रचार आणि प्रसार. महाविद्यालयातर्फे सायकल रॅली, वाहनमुक्त दिवस, शेअर टॅक्सी, प्लॅस्टिक फ्री झोनसारखे प्रकल्प. शाळा व महाविद्यालयात वीज बचतीसंदर्भात फलक.
  • पर्यावरण संतुलनासाठी प्लॅस्टिक पिशव्या बंद करून कापडी पिशव्यांचा वापर, घन कचऱ्यासाठी डस्टबिन वापराबाबत प्रबोधन. जैविक कचरा विघटनासाठी गांडूळ खत प्रकल्पाबाबत मार्गदर्शन. 
  • संपर्क - डॉ. श्रीनाथ कवडे,  ९७३०१५६८६५  (लेखक सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com