कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
कृषिपूरक
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...
कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच परजीवी इत्यादी विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये जैवसुरक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रक्षेत्रावर दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये जैवसुरक्षा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच परजीवी इत्यादी विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये जैवसुरक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रक्षेत्रावर दैनंदिन कार्यपद्धतीमध्ये जैवसुरक्षा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
जैवसुरक्षा ही रोग नियंत्रण पद्धतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे.जैवसुरक्षेचे प्रामुख्याने महत्त्वाचे तीन उद्देश आहेत. यामधील पहिले उद्दिष्ट म्हणजे प्रक्षेत्रामधील सर्व प्रकारच्या रोगकारकांच्या प्रवेशास प्रतिबंध करणे. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झालाच तर प्रसार नियंत्रित करणे आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे कोंबड्यांना सदैव निरोगी ठेवणे. कुक्कुटपालनामध्ये जैवसुरक्षा प्रामुख्याने तीन भागात विभागली जाते.
वैचारिक जैवसुरक्षा
- पोल्ट्री शेड गावापासून दूर असावे. ब्रीडर कोंबड्यांच्या फार्म जवळच्या इतर कोंबड्यांचे शेड कमीत कमी ३ किलोमीटर दूर असावे. व्यावसायिक मांसल किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा फार्म कमीत कमी १.६ किलो मीटर दूर असावा. ब्रीडर कोंबड्यांचा फार्म नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यापासून दूर असावा. बाजूच्या रस्त्यावरून व्यावसायिक मांसल किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्यांची ने आण होणार नाही याची काळजी घ्यावी.
- प्रक्षेत्रावर ब्रीडर कोंबड्या, उबवणी केंद्र तसेच खाद्य सामग्री यंत्रणा यामध्ये विशिष्ट अंतर असावे.
स्ट्रक्चरल जैवसुरक्षा
- पोल्ट्री शेड शास्त्रीय पद्धतीने बांधलेली असावी. कोंबड्यांना पुरेशी जागा असावी. शेड हवेशीर असावे.
- नको असलेल्या अभ्यागतांची पोल्ट्री फार्मवर ये-जा टाळण्यासाठी प्रक्षेत्राच्या सभोवताली कुंपण करावे.
- कोंबड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची नियमित दोन ते तीन महिन्यांतून एकदा तरी खनिजे, जिवाणू, इतर रोगकारके तसेच रासायनिक पदार्थांच्या संसर्ग होणार नाही यादृष्टीने चाचणी करून घ्यावी.
- खाद्य व औषध साठवणुकीसाठी प्रक्षेत्रावर जागा ठेवावी.
- प्रक्षेत्रावर असणारे रस्ते स्वच्छ व निर्जंतुकीकरण करता येईल असे असावे.
- खाद्य, लिटर, यंत्रसामग्री इत्यादींचे साठवणुकीचे विभाग वेगवेगळे असावेत.
- प्रक्षेत्राच्या आजूबाजूच्या ३ किलोमीटर जागेमध्ये कोणत्याही वनस्पतीची लागवड करू नये. जेणेकरून उंदीर तसेच इतर जंगली पक्षी व जनावरांचा सहवास टाळता येईल.
- प्रक्षेत्रावर मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याकरिता सुरक्षित अंतरावर जागा असावी. प्रक्षेत्रावर वापरण्यात येणारी उपकरणे तसेच शेडचे योग्य निर्जंतुकीकरण करावे.
प्रक्षेत्रावरील जैवसुरक्षा
- फार्मवर फीड मिल, उबवणी केंद्र, ब्रीडिंग युनिट इत्यादी कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करावी.
- वापरात येणारी यंत्रसामग्री तसेच शेडमधील एक बॅच संपली की नवीन बॅच चालू करण्याअगोदर निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
- ब्रीडर फार्मवर अभ्यागतांना तसेच मजुरांना फार्मवर येण्याअगोदर त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. फार्मवर आल्यावर फार्मवरील कामकाजाच्या दृष्टीने वेगळे कपडे घालण्याची सोय असावी. जेणेकरून फार्मवर रोगाचा प्रसार टाळता येईल.
- फार्मवर येणाऱ्या अभ्यागतांची भेट वहीत त्यांचे नाव व भेट देण्याचे कारण याची नोंद घ्यावी.
- व्यावसायिक ब्रॉयलर कोंबडीपालन फार्मवर दुसरी बॅच सुरू करताना पहिली बॅच संपल्यावर दोन आठवड्यांनी दुसरी बॅच सुरू करावी.
- ब्रीडर फार्मवर ब्रीडिंग फार्म चालू केल्यापासून तर ती बॅच संपेपर्यंत बाहेरील कोणत्याही वाहनांना तसेच यंत्रसामग्रीला प्रवेश देऊ नये.
- फार्मवर नियमित पेस्ट कंट्रोल करून घ्यावे.
- कोंबड्यांना वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे.
- फार्मवर ऑल इन ऑल आउट ही पद्धत अमलात आणावी.
- फार्मवर नियमित रोग निदान चाचण्या, जसे की मेलेल्या कोंबडीचे शवविच्छेदन, विविध रोगांकरिता प्रतिजैवकाची चाचणी करून घ्यावी.
- फार्मवरील रोगट, अनुत्पादित तसेच आजारी कोंबड्यांची पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य विल्हेवाट लावावी.
जैवसुरक्षेकरिता घ्यावयाच्या काळजी
अलगीकरण
- कोंबड्यांना नियंत्रित वातावरणात ठेवणे आवश्यक आहे. आजारी कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांपासून वेगळे करणे हा अलगीकरणाचा महत्त्वाचा भाग आहे.
- विविध वयोगटांतील कोंबड्या एकाच शेडमध्ये ठेवू नयेत. कुक्कुटपालनामधे ऑल इन ऑल आउट ही पद्धत वापरावी. ही पद्धत अवलंबल्यास शेड स्वच्छता करण्यास वेळ मिळतो.
रहदारी नियंत्रण
अभ्यागत किंवा वाहने थेट कोंबड्यांच्या घरापर्यंत जाणार नाहीत या पद्धतीचा आकृतिबंध आपल्या फार्मवर अवलंबावा. अभ्यागतांना किंवा अनोळखी माणसांना थेट शेडच्या आजूबाजूला किंवा शेडमध्ये प्रवेश देऊ नये.
स्वच्छता
शेड, कोंबड्यांसाठी वापरात येणारी विविध यंत्रसामग्री तसेच प्रक्षेत्रावर येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागतांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या अंत्यत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
-डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४
(विभाग प्रमुख, पशुविकृती शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
- 1 of 36
- ››