agricultural news in marathi cattle health advisory | Agrowon

नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..

डॉ. पराग घोगळे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन करावे. हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्त्व-अ व जीवनसत्त्व-इ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
 

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन करावे. हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्त्व-अ व जीवनसत्त्व-इ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.

प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. याच काळात सरकी पेंड, चुणी, पशुखाद्याचे दर वाढलेले असतात. या काळात उपलब्ध चारा व खाद्य काटेकोरपणे वापरावे. नासाडी टाळावी, दुभती व गाभण जनावरे, वासरे, बैलांना वजनाप्रमाणे खुराक द्यावा. सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावरांच्या वजनाप्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते. लहान पशुपालक व दूध उत्पादक एकत्र येऊन अशी खरेदी करू शकतात. मागील १० ते १२ वर्षांच्या खाद्य घटक व चारा किमती यांचा अभ्यास केला, तर कुठला कच्चा माल कधी कमी किमतीत उपलब्ध असतो हे सहज लक्षात येईल. भविष्यात अशा कच्च्या मालाच्या किमती कशा राहतील याचा तज्ज्ञांकडून आढावा घ्यावा.

जनावरांची चाऱ्याची गरज 

 • ज्या पशुपालकाकडे १० गाई किंवा म्हशी आहेत, त्यांना एका जनावराला दिवसाला सरासरी ६ किलो पशुखाद्य याप्रमाणे ६० किलो पशुखाद्य लागेल. म्हणजे १८०० किलो प्रतिमहिना. म्हणजे हेच प्रमाण १० उत्पादकांचे गृहीत धरल्यास १८ टन प्रति महिना इतके पशुखाद्य लागेल. हेच प्रमाण चाऱ्याचे गृहीत धरल्यास ७०० टन हिरवा चारा व सुमारे २०० टन कोरडा चारा लागेल.
 •  खाद्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल, कडबा कुट्टी, कोरडा चारा कमी किमतीला उपलब्ध असताना खरेदी करून ठेवावा.
 •  हिरवा चारा मुरघास स्वरूपात सुमारे एक वर्ष साठवता येतो. यासाठी बंकर सायलेज पीट सायलेज, बेलड सायलेजचा वापर करावा. काही ठिकाणी कोरड्या चाऱ्याला पर्याय म्हणून हाय फायबर पेलेट्सचा वापरही केला जातो.
 • हिरवा चारा म्हणजे केवळ हिरवी मका या मानसिकतेतून बाहेर यावे. जे शेतकरी वर्षभर हिरवा चारा लागवड करू शकतात. ते जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड वर्षभर करून चांगला व्यवसाय करू शकतात किंवा चाऱ्याचे मुरघास बनवून पुढील १२ महिने पर्यंत हिरवा चारा संपल्यावर त्याचा वापर करू शकतात.
 • जास्त प्रथिनयुक्त चारा जसे की लसूण घास गवत, डीएचएन-६ मुळे पशुखाद्याचा खर्च खूप कमी करता येऊ शकतो. चाऱ्यातील प्रथिने शरीराला लवकर उपलब्ध होतात.
 • हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्त्व-अ व जीवनसत्त्व- इ. मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. जे प्रजनन, दूध उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड करावी.

टीप

 • पशुखाद्य, कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आर्द्रतेसह गृहीत धरले आहे.
 • वरील प्रमाण हे २४ तासांचे असून, दोन वेळेस विभागून जनावरांना देण्यात यावे.
 • हिरवा चारा उपलब्ध नसल्यास कोरडा चारा वाढवून द्यावा.
 • याव्यतिरिक्त दुभत्या गाई-म्हशींना बायपास फॅट व प्रिमिक्स द्यावे.
 • दूध उत्पादन वाढल्यास एकूण शुष्क पदार्थाचे (ड्राय मॅटर) प्रमाण वाढवावे.

जनावराचे वजन काढण्याचे सूत्र 

 • सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावरांच्या वजना प्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते.
 • प्रथम जनावराचे वजन करावे. त्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा.
 • {जनावराच्या छातीचा घेर (इंच)}२ × लांबी (इंच) = जनावराचे वजन (कि.ग्रॅ.) ६००
 • उ.दा. {६६ × ६६ } × ७० / ६०० = ५०८ किलो वजन
 • जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायांमागून मोजलेला छातीचा घेर इंचामध्ये त्याचा वर्ग, गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटापर्यंतचे अंतर इंचामध्ये भागिले ६०० बरोबर जनावराचे अंदाजे वजन किलोमध्ये आपल्याला मिळते.
 • भारतामध्ये जनावरांना हिरव्या चाऱ्यातून मिळणारा कोरडा पदार्थ हा केवळ २३ टक्के इतका असून, प्रगत देशामध्ये हेच प्रमाण ६० टक्के इतके जास्त आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्त्वे चाऱ्यातून दिली पाहिजेत. तरच उत्पादन खर्च कमी करता येऊ शकतो.
 •  पशू आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन जास्त प्रथिनयुक्त व योग्य चारा पिकाविषयी माहिती घ्यावी. पशुखाद्य, कच्चा माल योग्य किमतीत पुढील हंगामापर्यंत पुरेल अशा प्रमाणात साठा करून ठेवण्यास प्राधान्य द्यावे.
 • दूध उत्पादकांनी एकत्र येऊन आपल्या गावात एका मोठ्या गोदामाची उभारणी केल्यास सहकारी तत्त्वावर नाममात्र भाडे घेऊन त्या ठिकाणी कच्च्या मालाचा साठा खरेदी करून पुढील काळासाठी करता येऊ शकतो.

गायी म्हशींचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन 

 • दुभत्या गायींसाठी जास्तीत जास्त सुमारे २५ ते २७ अंश सेल्सिअस तापमान इतके गृहीत धरले जाते, यापुढे तापमान वाढत गेल्यास त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादन व दुधातील घटकांवर होतो.
 • उन्हाळ्यात जनावरांची भूक मंदावते, जनावर धापा टाकते, दूध व दुधातील फॅट आणि एसएनएफ कमी होते. तसेच पोटातील आम्लता वाढण्याची शक्यता असते. उष्णतेमुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ते माजावर येऊन गाभण रहाण्याची शक्यताही कमी होते.
 • जनावरांना पिण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावे, जेणेकरून दूध उत्पादन व शरीराची गरज भागवली जाऊ शकेल, स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येते.
 • गाई,म्हशींना अतिरिक्त ऊर्जा असलेला आहार द्यावा, जेणेकरून भूक मंदावली असली तरी जरुरी कॅलरीज त्यांना मिळून उत्पादनावर परिणाम होणार नाही यासाठी मका किंवा गहू ऐवजी बायपास फॅटचा वापर करावा.
 • गोठ्यातील हवा खेळती ठेवावी. गोठ्यामध्ये छतावर पंखे न लावता एका बाजूने पंखा व एका बाजूने एक्झॉस्ट पंखा लावल्यास हवेचा झोत तयार होऊन गोठ्यातील गायींना थंडावा मिळू शकतो. पत्र्याखाली किंवा छताखाली पंखे लावल्यास वरील गरम हवा जनावरांना लागून त्यांना अजून त्रास होऊ शकतो.
 • तीव्र सूर्य किरणांपासून जनावरांचे संरक्षण करावे, मुक्त गोठयामध्ये कडूलिंब किंवा बदामासारखी दाट सावली देणारी झाडे असल्यास उन्हाचा ताण काही प्रमाणात कमी करता येतो.
 • वासरांच्या वाढीकडे उन्हाळ्यात विशेष लक्ष द्यावे, त्यांनाही भरपूर पाणी उपलब्ध करावे. वासरांचे खाद्य देऊन त्यांची वजन वाढ कायम ठेवावी.
 • जनावरांना जीवनसत्व मिश्रण व खनिज मिश्रण द्यावे. जीवनसत्व अ , ई व डी ३ या घटकांमुळे उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते.
 • दहा लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम गूळ, २५ ग्रॅम मीठ व एक लिंबू पिळून घ्यावे. हे द्रावण तयार करून दिवसातून एक किंवा दोन वेळेस जनावरांना पाजावे किंवा जीवनसत्व क युक्त पूरक द्यावे. म्हणजे उन्हाचा ताण कमी होण्यास मदत होते.

संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक पशू आहारतज्ज्ञ आहेत.)


इतर कृषिपूरक
आहारात असावा आरोग्यदायी क्विनोआआंध्र प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात क्विनोआची...
दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या...दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य...
वासरांची वाढ खुंटण्याची कारणे अन्...वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक इ....
संगोपन जानी म्हशीचे...चांगल्या दर्जाचे जनावर टिकून राहावे म्हणून जानी...
दूध उत्पादन वाढीसाठी दर्जेदार पशुआहारचारा कुट्टी करत असताना त्याचा योग्य आकार...
दूधनिर्मिती अन् प्रत टिकविण्यासाठी...दुधाचा दर हा गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्यामुळे...
देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्रशेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय...
शिफारशीनुसार जनावरांना लसीकरण आवश्यक...जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात...
उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन जनावरांसाठी पुरेसे पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी...
जनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...
नियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...
शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...
फलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...
पैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...
मृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ...
शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...
सातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...
जनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...