Veterinarians while using embryo transplantation technology in animals.
Veterinarians while using embryo transplantation technology in animals.

फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञान

गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी कालावधीत जनुकीय सुधारणा घडवून आणता येते. उत्कृष्ट व जातिवंत नर व मादी दोघांचे गुणधर्म अपत्यात आणता येतात. गाई, म्हशींत प्रजनन सुधारणा करता येते.

गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी कालावधीत जनुकीय सुधारणा घडवून आणता येते. उत्कृष्ट व जातिवंत नर व मादी दोघांचे गुणधर्म अपत्यात आणता येतात. गाई, म्हशींत प्रजनन सुधारणा करता येते. गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञान (ईटीटी) या तंत्राने जातिवंत गाई, म्हशींमधून (गर्भ दाता) गर्भ गोळा करून वर्गीकृत केले जातात. त्यानंतर कमी जातिवंत किंवा कमी उत्पादक गाय, म्हशीच्या (सरोगेट मदर) गर्भाशयात प्रत्यारोपण करतात. निसर्गतः बहुतेक वेळेस गोवंशातील जनावरांमध्ये एका वेळी एकच स्त्री बीजांड तयार होते. परंतु ईटीटी तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट गर्भ दाता गाईकडून एकापेक्षा अधिक स्त्री बीजांड संप्रेरक उपचारांद्वारे उत्पादित केले जातात. अशा गाईमध्ये त्यानंतर माजाच्या वेळी उच्च प्रतीचे सिमेन वापरून कृत्रिम रेतन केले जाते. ज्यामधून एकपेक्षा अधिक स्त्री बीजांडे फलोत्पादित होतात. अशी गाय मर्यादित काळासाठी गर्भवती होते. फलोत्पादन  झाल्याच्या सात दिवसांनंतर सर्व गर्भ वैज्ञानिक पद्धतीने त्या (दाता) गाईच्या गर्भाशयातून बाहेर काढले जातात. त्यानंतर गर्भाच्या गुणवत्तेची तपासणी, वर्गीकरण केले जाते. यानंतर असे गर्भपालक गाईच्या (प्राप्तकर्ता गाय /म्हैस) गर्भाशयामध्ये रोपीत केले जातात. तेथे त्यांची वाढ केली जाऊन त्यांची प्रसूती होते.  गर्भप्रत्यारोपण  तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये 

  • उत्कृष्ट व जातिवंत जनावरांपासून गर्भ गोळा करणे.
  • जनावरांमध्ये उत्कृष्ट प्रजनन दरासोबतच चांगली वंशावळ निर्माण करणे.
  • लुप्तप्राय होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करणे.
  • भविष्यातील भ्रूण बँकेचा विकास करणे.
  • नर आणि मादी दोघांमधील गुण संततीत उतरविणे किंवा पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित करणे. 
  • गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या क्रिया दात्याची निवड

  • उत्तम गाय, म्हशीपासून गर्भ मिळविले जातात. अशा गाई, म्हशींकडे इतर समकालीन गाई, म्हशींपेक्षा श्रेष्ठ शारीरिक व जनुकीय शुद्धता असली पाहिजे. डेअरी उद्योगासाठी दाता निवडताना त्यांची दूध उत्पादन क्षमता आधारभूत मानून निवड केली जाते.
  • शरीराची स्थिती (बॉडी स्कोअर इंडेक्स) स्केल १.५ ते ३.५ दरम्यान असावी. 
  • साधारणतः एकदा व्यायलेली गाय/ म्हैस किंवा सुदृढ प्रजनन संस्था असलेली पण अप्रसूत गाय, म्हशीची दाता म्हणून निवड केली जाते.
  • संप्रेरक उपचाराला चांगला प्रतिसाद देणारी दाता गाय, म्हैस निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी अल्ट्रासोनोग्राफीचा वापर करणे लाभदायक पर्याय आहे. काही दातांपासून प्राप्त गर्भ समसमान गुणधर्म असून देखील गर्भ स्थापित होण्याच्या क्षमतेमध्ये विविधता दाखवितात.  म्हणून संप्रेरक उपचाराला चांगली प्रतिक्रिया देणारी आणि उत्कृष्ट गर्भ स्थापन  दर असलेली दाता गाय, म्हशीची निवडक (जैव-मार्कर) करणे आवश्यक आहे.
  • प्राप्तकर्त्याची निवड

  • कमी शारीरिक व जनुकीय वर्ण असलेली  प्राप्तकर्ता गाय, म्हशीच्या (सरोगेटेड) गर्भाशयामध्ये दात्यापासून मिळवलेले गर्भरोपण करायचे आहे. प्राप्तकर्ता गाय, म्हशीच्या शरीराची स्थिती (बॉडी स्कोअर इंडेक्स) स्केल ३ ते ३.५ दरम्यान असावी. 
  • कुठल्याही असफल प्रसूती किंवा गर्भपाताच्या इतिहासाशिवाय, नियमितपणे माजावर येणारी तसेच गर्भाशय व प्रजनसंस्थांमध्ये कुठलेही विकृती व आजार संबंधित समस्या नसलेली गाय, म्हैस निवडावी. 
  • दाता आणि प्राप्तकर्ता गाई, म्हशी या टीबी, जॉन्स डीसिज, ब्रुसेलोसिस, आयबीआर, आयपीव्ही आजारांपासून मुक्त असाव्यात.
  • दाता आणि प्राप्तकर्तामध्ये माजाचे संयोजन (सिंक्रोनायझेशन)

  • चांगला गर्भप्रत्यारोपण दर साध्य करण्यासाठी दाता आणि प्राप्तकर्ता जनावरांमध्ये माजाचे संयोजन अनिवार्य आहे. या दोघांचा माज सुरू होण्याच्या कालावधीत १२ तासांपेक्षा अधिक अंतर असेल, तर गर्भप्रत्यारोपण दरामध्ये कमालीची घसरण होऊ शकते. 
  • एका दात्यापासून मिळणाऱ्या गर्भांना प्रत्यारोपण करण्यासाठी किमान १५ प्राप्तकर्त्या जनावरांमध्ये माजाचे एकसमान संयोजन केले जाते. माज संयोजन पद्धती यशस्वी होण्याचा दर ६० टक्के गृहीत धरल्यास १५ पैकी ९ प्राप्तकर्ता जनावर माजावर येतात आणि अंतिमतः त्या नऊमधील सहा जनावरे गर्भ प्रत्यारोपणासाठी निश्‍चित केली जातात.
  • दाता सुपरस्टिम्यूलेशन नैसर्गिकरीत्या एक गाय, म्हैस आपल्या अंडाशायातून माजाच्या वेळेस एक परिपक्व स्त्री बीजांड बाहेर सोडते. परंतु या तंत्रज्ञानामध्ये अंडाशयास उत्तेजित करून एकावेळी एकाहून अधिक परिपक्व स्त्री बीजांड प्राप्त करणे म्हणजेच सुपरस्टिम्युलेशन. त्यातून कितीतरी अधिक स्त्री बीजांड मिळणे म्हणजे सुपरओव्यूलेशन. या प्रक्रियेसाठी दाता जनावरांमध्ये  बारा ते चौदाव्या दिवशी सुरू करून पुढील ४ ते ५ दिवस फॉलिकॅल स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) दिले जाते, ज्यामुळे अंडाशयाचे सुपरस्टिम्युलेशन होते. त्यानंतर PGF२ नावाचे हार्मोन वापरून सुपरओव्यूलेशन केले जाते. दात्यामध्ये कृत्रिम रेतन सुपरओव्यूलेशन केलेल्या दात्यामध्ये माजाची लक्षणे सुरू झाल्यानंतर १२ व्या, १८ व्या  आणि २४ व्या तासास उत्कृष्ट नरापासून मिळविलेले सिमेन वापरून कृत्रिम रेतन केले जाते. दात्यांपासून गर्भ मिळविणे कृत्रिम रेतन केल्यापासून गायींमध्ये सातव्या दिवशी व म्हशींमध्ये पाचव्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने बिगर शस्त्रक्रिया गर्भ पुनर्प्राप्त केले जातात. यासाठी फॉली कॅथेटरचा वापर केला जातो. या उपकरणाद्वारे डीबीपीएस मीडिया व अन्य औषधांच्या द्रावणाचा सामू ७. -७.२ आणि द्रावणाची चंचलता २७०-३०० ms/mol     एवढी नियंत्रित केली जाते. यांच्याद्वारे गर्भ दात्याच्या गर्भाशयातून अलगद फ्लश करून एम्कोन फिल्टरमध्ये एकत्र    केले जातात.  गर्भाची गुणवत्ता तपासणी आणि वर्गीकरण

  • एम्कोन फिल्टरमध्ये साठलेली सामग्री पेट्री-डिशमध्ये घेऊन मायक्रोस्कोपद्वारे त्यात गर्भ शोधला जातो. सापडलेल्या गर्भात त्यानंतर झोना पेलुसिडा आणि ब्लास्टोमिअर आवारणाच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण केले जाते. 
  • झोना पेलुसिडाचा आकार, नियमित झोना; गर्भाचा आकार, गर्भाचा व्यास; आकारात एकसारखेपणा इत्यादी व ब्लास्टोमिअरची रचना ही गर्भाच्या वर्गीकरणाचा प्रमुख निकष आहे.
  • हस्तांतर योग्य गर्भ एक तर माज  संयोजित केलेल्या प्राप्तकर्त्या गाय/म्हशीमध्ये (सिंक्रोनाइझ प्राप्तकर्ता) प्रत्यारोपण केले जातात (नवीन प्रत्यारोपण) किंवा भविष्यात वापरण्यासाठी क्रिओ- संरक्षित (लिक्विड नायट्रोजनमध्ये उणे १९८ सेल्सिअस तापमानाला गोठविले जातात) गर्भाचे  क्रिओ-संरक्षण विट्रीफिकेशन प्रक्रियेद्वारे केले जाते.
  • गर्भाचे प्रत्यारोपण  बिगर शस्त्रक्रिया दात्यामधून पुनर्प्राप्त व वर्गीकृत केलेले गर्भप्राप्तकर्त्या गाय, म्हशीमध्ये  माजानंतर ७ व्या दिवशी प्रत्यारोपण केले जाते. प्रत्यारोपण दरम्यान, हस्तांतरीय गर्भाला ईटी इन्स्ट्रुमेंटद्वारे गर्भाशयाच्या अलीकडील टोकाकडे ठेवले जाते. ज्या ठिकाणी अंडाशयाच्या काठावर उद्‍भवणाऱ्या कॉर्पस ल्यूटियम कोशिका असतात. क्रायो- संरक्षित गर्भापेक्षा ताज्या गर्भ प्रत्यारोपणामध्ये १० ते २० टक्के जास्त गर्भधारणा होते. गरोदरपणाचे मूल्यमापन

  • गर्भ प्रत्यारोपणानंतर प्राप्तकर्त्या जनावरांचे नियमितपणे मूल्यमापन केले जाते.  प्राप्तकर्ता जनावर माजात परत येत नाही ना याची पुष्टी केली जाते. प्रत्यारोपणानंतर सुमारे ४० दिवसांनंतर अल्ट्रासोनोग्राफीद्वारे गर्भधारणेची पुष्टी केली जाते. 
  • गर्भ प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे आदर्श परिस्थितीत, गर्भधारणा, प्रसूती व सुदृढ वासरू होण्याचा दर  ३५-४५ टक्के एवढा असू शकतो.  
  • गर्भदात्यामार्फत दिलेल्या गर्भाचे अपत्यात रूपांतर होण्यास दाता -प्राप्तकर्ता संबंध, माजाचे संयोजन, गर्भाची गुणवत्ता, प्रत्यारोपणाचा हंगाम, प्रत्यारोपण कौशल्य अशा काही घटकांवर अवलंबून आहे.
  • ईटीटी तंत्रज्ञानाचे फायदे

  • अत्यंत कमी कालावधीत जनुकीय सुधारणा घडवून आणणे. 
  • उत्कृष्ट व जातिवंत नर व मादी दोघांचे गुणधर्म अपत्यात आणणे. 
  • कमी उत्पादन करणाऱ्या, अनेक जातींचे संकर असलेल्या पशुधनात प्रजनन सुधारित करणे. 
  • कृत्रिम रेतनात सेक्स सोर्टेड सिमेनचा वापर करून फक्त कालवडी जन्माला घालणे. 
  • नैसर्गिकरीत्या गाभ न जाणाऱ्या जनावरांमध्ये गर्भरोपण करून त्यांचा सरोगेट म्हणून वापर करणे.
  • - डॉ. धीरज पाटील, ९५५२१४४३४९ (गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com