गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता वाढण्याची कारणे

गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. एकाच वर्गातील गोचीडनाशके सतत वापरू नयेत. तीव्रता कमी-जास्त होताना आलटून-पालटून वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचिडनाशकांचा वापर करावा.
Cattle and animal hygiene needs to be maintained for gochid control.
Cattle and animal hygiene needs to be maintained for gochid control.

गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता ठेवावी. एकाच वर्गातील गोचीडनाशके सतत वापरू नयेत. तीव्रता कमी-जास्त होताना आलटून-पालटून वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचिडनाशकांचा वापर करावा. जनावरांमध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव होत असतो. साधारणपणे ज्या गायीच्या शरीरावर १०० पेक्षा जास्त गोचिडे आहेत, तिच्यापासून २३ टक्के दुग्धोत्पादनामध्ये घट होते. म्हणजेच दहा लिटर दूध देणारी गाय ८ लिटर दूध देते. गोचिड नियंत्रणासाठी पशुपालक सातत्याने गोचीडनाशके जनावरांच्या शरीरावर फवारतात; परंतु त्यांचा जेव्हा अतिरेक होतो, एकच एक गोचीडनाशक सतत वापरले जाते, मात्रा कमी-जास्त प्रमाणापेक्षा वापरली जाते, गरज नसताना फवारणी केली जाते अशा वेळेस ठरलेल्या गोचीडनाशकाच्या मात्रेस ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गोचिडे दाद देत नाहीत, प्रतिकार करतात. हीच प्रतिकारशक्ती पुढील पिढ्यांमध्येदेखील प्रसारित केली जाते. यास गोचीडनाशकांना प्रतिकारक्षमता असे म्हणतात. यामुळे विनाकारण गोचिनाशकांसाठी केलेला खर्च वाया जातो आणि गोचिडांचा प्रादुर्भाव तसाच राहतो. ऑरगॅनोक्‍लोरीन व ऑरगॅनोफॉस्फेट दोन गटांतील रासायनिक गोचीडनाशकांप्रती प्रतिकारक्षमता वाढली आहे. म्हणून पायरेथ्रॉइड या गटातील गोचीडनाशकाचा वापर आज प्रभावीपणे होत आहे. तसेच इतरही गटातील गोचीडनाशके बाजारात आहेत; परंतु पुढील पिढीपर्यंत त्यांच्याबाबतही प्रतिकारक्षमता वाढू नये म्हणूनच आज काळजी घेणे आवश्‍यक आहे. प्रतिकार वाढण्याची कारणे 

  • एकाच गटातील एकच एक गोचीडनाशकाचा सातत्याने वापर.
  • पर्यायी गोचीडनाशकांचा वापर जसे, की वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचिडनाशकांचा वापर अधूनमधून न करणे.
  • रासायनिक गोचीडनाशकांची शिफारशीपेक्षा जास्त मात्रा वापरणे.
  • व्यवस्थापनाचा अभाव, एकात्मिक गोचीडनियंत्रण पद्धतीचा वापर न करणे.
  • पशुतज्ज्ञांचा मार्गदर्शनाचा अभाव.
  • लागू न होणारे, प्रभावी नसणारे गोचीडनाशक विशिष्ट प्रजातीच्या गोचिडासाठी वापरणे. आपल्याकडे प्रामुख्याने रिफिसिफॅलस मायक्रोप्लस या प्रजातीची गोचिडे जास्त आढळतात. त्यांच्यावर प्रभावी नसणाऱ्या गोचिडनाशकांचा वापर टाळावा.
  • बाजारामध्ये उपलब्ध आहे म्हणून एखादे गोचीडनाशक प्रभावी नसूनदेखील वापरणे.
  • गोचिडाची तीव्रता/ घनता शरीरावर किती आहे याची काळजी न करता केवळ गोचिडनाशकाची फवारणी करणे.
  • उपाययोजना 

  • रासायनिक गोचीडनाशकाची पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गरज असताना योग्य मात्रेमध्ये फवारणी करावी.
  • एकाच वर्गातील गोचीडनाशके सतत वापरू नयेत.
  • तीव्रता कमी-जास्त होताना आलटून-पालटून वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचिडनाशकांचा वापर करावा.
  • गोठ्यातील गोचिडांची अंडी कमी व्हावीत म्हणून स्वच्छता आणि त्यांची गोठ्यातील फटीमध्ये असलेली अंडी जाळणे हा उपक्रम राबवावा.
  • वनस्पतिजन्य, बुरशीजन्य गोचीडनाशके आणि गरजेवेळी रासायनिक गोचीडनाशक असे चक्र ठेवावे. हे करताना गोठा स्वच्छता आणि गोठ्यातील अंडी जाळणे ही उपाययोजना महत्त्वाची ठरते. अशा पद्धतीने ‘एकात्मिक गोचीड नियंत्रण’ यशस्वी ठरते. जेणेकरून रासायनिक गोचीडनाशकांचा अनियंत्रित वापर टाळता येतो. ‘प्रतिकार’ रोखता येईल.
  • रासायनिक गोचीडनाशके ही विषारी असतात. त्यांची विषबाधा संभवते. म्हणून सर्व काळजी घेऊन व योग्य मात्रेमध्ये गोचिडनाशकाची एकाच वेळेस जनावराच्या शरीरावर व गोठ्यामध्ये (भेगा, कपारी, गव्हाणीखालील भाग, अंधाऱ्या जागा) इत्यादी ठिकाणी फवारणी करावी. म्हणजे प्रभावी गोचीड नियंत्रण ठरते.
  • गोचीड, कीटकांमध्ये जनुकीय पातळीवर बदल करून प्रतिकार करण्याची शक्ती आहे. म्हणून गरज असेल तरच प्रभावी गोचीडनाशकाचा वापर करावा.
  • संपर्क : डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ डॉ. जगदीश गुडेवार, ९७३००६६८४७ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com