जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे किंवा साचलेल्या पाण्यातून जनावरांना विविध रोगांची बाधा होते. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
The udder should be inspected from time to time during milking to prevent Mastitis.
The udder should be inspected from time to time during milking to prevent Mastitis.

पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे किंवा साचलेल्या पाण्यातून जनावरांना विविध रोगांची बाधा होते. तसेच जनावरे अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.  पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. काही वेळा गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक काळजी घेणे हितकारक ठरते. पावसाळ्यातील काही आजार हे संसर्गजन्य असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.  पोटफुगी  कारणे 

  • पावसाळ्यामधे सर्वत्र हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो. हा चारा खाल्ल्याने जनावराच्या पोटाच्या डाव्या बाजूकडील कोटी पोट फुगते. त्यामुळे पोटाकडील डावी बाजू फुग्यासारखी दिसते. 
  • पोटामध्ये किंवा छातीच्या पडद्याला सुई, खिळा, तारेचा तुकडा किंवा इतर टोकदार वस्तूंमुळे इजा झाल्यास रवंथ थांबते, पोटाची हालचाल मंदावते. परिणामी पोटफुगी वारंवार उद्‌भवते. 
  • यासोबतच धनुर्वात, दुग्धज्वर, पचनेंद्रिय अवयवांच्या हर्नियामध्ये तसेच आतड्याला पीळ पडल्यास जनावराचे पोट फुगू शकते. 
  • पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटातच साठून राहतो. अशावेळी जनावर खाली बसून राहते. उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन ह्रदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.
  • लक्षणे 

  • पोटफुगीमध्ये रोमंथिकेस अचानक फुगवटा पकडते. जनावराचे रवंथ करणे बंद होते. 
  • बाधित जनावर अस्वस्थ होऊन सतत ऊठ-बस करते. जनावर पोटावर लाथा मारतात व जमिनीवर लोळतात.
  • डाव्या बाजूच्या खुब्याचे, माकड हाडाचे टोक व शेवटची बरगडी यामधील भाग फुगतो. त्याजागी बोटाने मारून बघितल्यास ‘बदबद’ असा आवाज येतो. 
  • तीव्र स्वरूपाची पोटफुगी असेल तर श्‍वासोच्छ्वासास त्रास होतो.
  • उपाय 

  • पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर २ ते ३ किलो सुका चारा खायला द्यावा. त्यामुळे जनावरांची पचनसंस्था व्यवस्थित कार्यरत होते. पोटफुगीची समस्या टाळता येते. 
  •  जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते. 
  • पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवरील औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरांवर वेळीच उपचार करता येतील.
  • खुरातील जखम 

  • पावसाळ्यामध्ये पाण्यात तसेच चिखलात जनावरांचे पाय सतत राहिल्यामुळे खुरामध्ये जखमा होतात. 
  • खुरामध्ये सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माश्‍या बसतात. आणि जखमेत किडे होतात. 
  • जखमा झाल्यामुळे जनावरांच्या पायाला तीव्र वेदना होतात. जनावर लंगडते. परिणामी, जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
  • उपाय   विशेषकरून पावसाळ्यात जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.   खुरांना झालेली जखम पोटॅशिअम परमॅग्नेटने  स्वच्छ करून मलमपट्टी करावी. कासदाह  कासदाह किंवा काससुजी हा विशेषतः दुधाळ जनावरांमध्ये होणारा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग जनावरांच्या स्तनाग्रातून कासेमध्ये सूक्ष्म जंतूंचा शिरकाव झाल्याने होतो. जनावराच्या कासेला जखम झाली तरी त्यातून या रोगकारक जंतूचा शिरकाव होतो. तेथे जंतूंची वाढ झपाट्याने होते. लक्षणे 

  • जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते. 
  • कास गरम होते व सुजते. सडातून रक्तमिश्रित दूध येते. 
  • उत्पादित दुधामध्ये गुठळ्या तयार होतात. 
  • योग्यवेळी उपचार न केल्यास कास दगडासारखी कठीण होऊन निकामी होते. 
  • बाधित जनावराचे दूध काढण्याचा प्रयत्न केल्यास ते कासेला हात लावू देत नाहीत.
  • उपाययोजना 

  • कासेतील दूध पूर्ण काढावे. 
  • सडाची छिद्रे जर बंद झाली असतील तर निर्जंतुक केलेली ‘दूध नळी’ सडामध्ये अलगद सरकवून कासेतील पूर्ण दूध काढून कास मोकळी करावी.
  • कास व सड पोटॅशिअम परमॅग्नेटच्या पाण्याने धुऊन काढावेत.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य ते मलम सडामध्ये सोडावेत. 
  • बाधित जनावरावर औषधोपचार केल्यानंतर त्याच्या दुधाचा किमान ४८ तास वापर करू नये. तसेच पिलांना देखील पाजू नये.
  • स्तनदाह झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे. 
  • दूध काढणाऱ्या व्यक्तीची नखे वाढलेली नसावीत. 
  • दूध काढताना अंगठा दुमडलेला नसावा. दुमडलेल्या अंगठ्यामुळे सडांना इजा होण्याची शक्यता असते.
  • संसर्गजन्य आजार  पावसाळ्यातील दमट वातावरणाचा जनावराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासोबतच जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यांसारखे संसर्गजन्य आजार होतात. दमट वातावरणामुळे घटसर्पासारखे श्‍वसनाचे आजार अधिक प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागामध्ये या रोगास गळसुजी, परपड या नावाने ओळखले जाते. 

  • संसर्गजन्य आजारांमध्ये जनावरांच्या छातीत पाणी होते. जबड्याच्या खालील बाजूस सूज येते.
  • जनावराला श्‍वास घेण्यास त्रास होतो. 
  • जनावरास १०४ ते १०५ अंश फॅरेनाईट इतका ताप येतो. संसर्गजन्य आजारांमध्ये ९० टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात. 
  • उपाय 

  • पावसाळ्याच्या सुरुवातीला पशुवैद्यकाकडून जनावरांना प्रतिबंधात्मक लस टोचावी. 
  • फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारांवर लसीकरण करून घ्यावे.
  • गोमाश्‍या व गोचीड 

  • पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांच्या अंगावर गोमाशा आणि गोचिडांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. 
  • गोचिडांची लागण जास्त झाल्यास जनावरांच्या लघवीमध्ये रक्त येते. त्यामुळे मूत्राचा रंग कॉफीसारखा दिसतो. 
  • गोचीड जनावराच्या त्वचेला चिटकून बसतात. त्यामुळे त्वचेला खाज सुटते. परिणामी, जनावर भिंतीला अंग घासते किंवा पायाने खाजवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जनावराच्या अंगावर जखमा होण्याची शक्यता असते. जखमांवर वेळीच उपचार न केल्यास, त्यावर माश्‍या बसतात आणि किडे पडण्याची शक्यता असते. अशा जखमा पूर्णपणे ठीक होण्यास बराच वेळ लागतो. 
  • गोचिडांमुळे जनावरांना विषमज्वर आजार होतो. या आजारात जनावर स्वतःभोवती गोल फिरते. डोके आपटते. 
  • हा आजार संकरित जनावरांत जास्त दिसून येतो. बाधित जनावराच्या रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते. श्‍वास घेण्यास त्रास होतो. 
  • उपाय 

  • जनावरांच्या अंगावर व गोठ्यामध्ये गोचीड, गोमाश्‍या प्रतिबंधक औषधांची शिफारशीनुसार फवारणी करावी. 
  • गोठ्यातील शेण, मलमूत्राची वेळोवेळी साफसफाई करावी. गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावा.
  • वासरांचे संगोपन 

  •  पावसाळ्यात नवजात वासरे मोठ्या प्रमाणात आजाराला बळी पडू शकतात. नवजात वासराला लवकरात लवकर मातेचा चीक पाजावा. कारण चिकामुळे वासराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वासराची नाळ कापून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. जखम लवकर सुकेल याची काळजी घ्यावी. 
  •  वासरांना हगवणीसारखे आजार होऊ नये याकरिता गोठ्यात स्वच्छता राखावी. वासरांना सकस आहार पुरवावा. 
  •  रोगांची लागण टाळण्याकरिता वेळेवर रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर भर द्यावा. 
  • - डॉ. धनंजय सातपुते,९७६३९९६६५७ उमेश,चादर, ९४०३४६६३५३ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com