ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबा

महागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित चव्हाण कुटुंबीय ऊसपट्ट्यात सुमारे पंचवीस वर्षांपासून केसर आंबा बागेची जोपासना करीत आहेत. अवीट गोडीचा, रसदार व गुणवत्तापूर्ण आंब्याची सातारा येथे दरवर्षी थेट विक्री करून ग्राहकांचे नेटवर्क त्यांनी तयार केले आहे.
saffron mangoe farm
saffron mangoe farm

महागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित चव्हाण कुटुंबीय ऊसपट्ट्यात सुमारे पंचवीस वर्षांपासून केसर आंबा बागेची उत्कृष्ट पद्धतीने जोपासना करीत आहेत. अवीट गोडीचा, रसदार व गुणवत्तापूर्ण आंब्याची सातारा येथे दरवर्षी थेट विक्री करून ग्राहकांचे नेटवर्क त्यांनी तयार केले आहे. यंदा सहा टन आंबा निर्यात करण्यातही त्यांना यश आले आहे.    कोरेगाव रस्त्यावरील महागाव (ता. जि. सातारा) येथील विठ्ठल रामराव चव्हाण तसेच बंधू चांगदेव, विठ्ठल व नामदेव असे चार भावाचे एकत्रित कुटुंब राहते. त्यांची २४ एकर शेती असून, यापैकी १४ एकर बागायत तर दहा एकर जिरायती आहे. विठ्ठल कामाच्या निमित्ताने मुंबई येथे राहायचे. उर्वरित तिघे भाऊ शेतीची जबाबदारी सांभाळत. त्या वेळी बागायत क्षेत्र कमी असल्याने ज्वारी, सोयाबीन, भात, गहू अशी पिके घेतली जायची.  आंब्याचा प्रयोग   कुटुंबाकडे गावच्या डोंगरालगत पाच ते सहा एकर चराऊ पडीक जमीन होती. पाणी नसल्यामुळे गावातील गुरे त्यावर चरायची. तत्कालीन कृषी सहायक श्री. जाधव यांची भेट झाली. या क्षेत्रात आंबा लागवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तो मनावर घेत १९९४ च्या दरम्यान कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा लागवडीचे नियोजन सुरू केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून केशर जातीची रोपे आणली. पाण्याची व्यवस्था नसल्याने चव्हाण बंधूनी बैलगाडीतून पाणी वाहून रोपे जगविली. सुमारे पाच एकर क्षेत्र असून झाडांची संख्या २५० पर्यंत आहे. लागवड ३० बाय ३० फूट अंतरावर आहे. पाच वर्षांनी बहर धरण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीत मोहोर येत असे. त्याची फळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येत असत. पाऊस व अन्य नैसर्गिक घटकांमुळे फळांचा दर्जा चांगला मिळण्यात अडचण येई. दरही कमी मिळत. सुमारे पाच एकर क्षेत्रात पाच ते सहा टन उत्पादन मिळायचे. अपेक्षित फायदा होत नसला तरी पडीक जागेचा वापर झाल्याने खर्च कमी करून बागेचे व्यवस्थापन सुरू ठेवले.  तंत्रज्ञानाचा वापर मध्यंतरीच्या काळात कृषी सहायक धनाजी फडतरे यांची भेट झाली. त्यांच्यासोबत बागेत येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. त्यातून बोरगाव कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके)  विषय तज्ज्ञ भूषण यादगीरवार यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी बागेस भेट देऊन समस्या समजून घेतल्या. केव्हीके व महात्मा फुले कृषी  विद्यापीठाच्या शिफारशीनुसार वाढ नियंत्रक ‘पॅक्‍लोब्युट्राझोल’चा वापर व अन्य तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला. डिसेंबरमध्ये मोहोर येऊन फळे मार्चअखेरीस तयार होऊ लागली. फळांचा दर्जा हा वजन, आकार व रंग व स्वाद यावर ठरविला जात असल्याने तशा फळांचे जास्तीत जास्त उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आच्छादनाचा वापर तसेच शिफारस असलेल्या कीडनाशकांच्या फवारण्या घेण्यास सुरुवात केली. फळमाशीपासून नुकसान कमी करण्यासाठी मिथिल युजेनॉल घटक असलेले गंध सापळे वापरले. दरवर्षी वेळेत तो़डणी केल्याने शिल्लक फळांची वाढ होण्यास मदत होते.    दर्जेदार आंबा उत्पादन   अलीकडील काळात फळे मार्च ते एप्रिलच्या दरम्यान तयार होत आहेत. अडीचशेपासून ते तीनशे ग्रॅमपर्यंत वजनाची फळे तयार होत आहेत. निर्यातीसाठी २०० ते ३०० ग्रॅम वजनापर्यंतचा व कीडनाशक अंश विरहित आंबा लागतो. यंदा कमाल वजन ४८० ग्रॅमपर्यंतही गेल्याचे कुटुंबातील नव्या पिढीचे अक्षय यांनी सांगितले. प्रति झाडाला सरासरी ३०० पासून ते ५०० पर्यंत फळे मिळत आहेत. एकरी सरासरी दोन ते अडीच टनांपर्यंत उत्पादन मिळू लागले आहे. यंदा पाच एकरांत १२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले.    मदत व मार्गदर्शन कुटुंबातील नवी पिढी अक्षय, तुषार, चेतन हे आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. बागेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. पुढील काळात पॅकिंग, ब्रँडिग करून विक्रीचा मानस असल्याचे चव्हाण कुटुंबीयांनी सांगितले. निर्यात व विक्री व्यवस्था  यंदाच्या वर्षासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ‘मॅगोनेट’ या प्रणालीत नोंदणी केली. निर्यातदार कंपनीसोबत बोलणी झाली. फळाची गुणवत्ता पसंतीस उतरल्याने सहा टन आंबा युरोपीय देशात निर्यात करण्यात चव्हाण कुटुंबीयांना यश आले. निर्यातीसाठी प्रति किलो १२० रुपये दर मिळाला. अन्य आंब्याची घरूनच विक्री होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात सातारा येथे स्टॉल उभारून चव्हाण कुटुंबीयांनी आंब्याची विक्री केली. खात्रीशीर व दर्जेदार आंबा असल्याने ग्राहकांकडून दरवर्षी मागणी असते. सर्व आंबा याच पद्धतीने विकून संपतो. डझनाला ४०० रुपये दराने त्यांना विक्री होत आहे.    - अक्षय चव्हाण  ८८८८९८४५९७  तुषार चव्हाण  ९३५९२३४१०९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com