agricultural news in marathi Chest disease in cows, buffaloes | Page 3 ||| Agrowon

गाई, म्हशींमधील छातीचे आजार

डॉ. चिरंजीवधर पाठक, डॉ. कमलाकर चौधरी
सोमवार, 24 मे 2021

जनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. आजाराची लक्षणे ओळखून सामान्य प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन पद्धती वापरल्यावर जनावरास होणार त्रास आणि आर्थिक नुकसान टाळता येते.
 

जनावरांमधील छातीच्या आजारामुळे दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. आजाराची लक्षणे ओळखून सामान्य प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन पद्धती वापरल्यावर जनावरास होणार त्रास आणि आर्थिक नुकसान टाळता येते.

मोठ्या जनावरांची किंमत त्यांच्या दुग्धोत्पादनाची क्षमता आणि कार्यक्षमतेवर ठरते. जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांची खाद्य आणि ऊर्जेची गरज सामान्य जनावरांपेक्षा जास्त असते. तसेच रोज लागणाऱ्या आहाराचे प्रमाण त्या जनावराची जाती आणि वजनावर अवलंबून असते. ही गरज पुरविण्यासाठी ते जास्त खाद्याचे सेवन करतात आणि कमी वेळेत जास्त आहार खाण्याचा प्रयत्न करतात. अशा सवयीमुळे बऱ्याचदा अखाद्य वस्तू त्यांच्या पोटात जातात; उदाहरणार्थ खिळे, तार, प्लॅस्टिक, कापड इत्यादी. धातूच्या टोकदार अखाद्य वस्तू पोटाला इजा पोहोचवू शकतात, पोटामधून छातीमध्ये जाऊ शकतात आणि अवयवांना इजा पोहोचवतात. अखाद्य वस्तूंमुळे जनावराचे पाचनतंत्र, श्‍वसनक्रिया आणि रक्ताभिसरणास अडचण येते. अशा कारणांमुळे दुग्धोत्पादन व कार्य करण्याची क्षमता कमी होते आणि जनावराच्या जिवाला धोका होऊ शकतो.

मोठ्या जनावरांतील छातीचे आजार 
हृदयाशयाचा दाह/ हृदयाच्या बाह्यवरणाचा दाह 

 • पोटात असलेल्या टोकदार वस्तू दबावामुळे किंवा हालचालींमुळे छातीच्या पडद्यामधून छातीमध्ये प्रवेश करून हृदयाला इजा पोहोचवतात.
 • इजेमुळे हृदयाच्या बाह्यआवरणात पाणी साचते. हृदयावर दबाव येतो, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते.
 • जास्त इजा झाल्यास हृदयावर येणारी सूज धोकादायक असते.

लक्षणे 

 • जनावर चारा कमी खाणे, अशक्तपणा येणे, दुग्धोत्पादन कमी होणे.
 • जनावराच्या ऊर व छातीच्या भागात पाणी साचून सूज येणे, कोपरे बाहेर करून चालतात, बसायला आणि उठायला त्रास होणे,
 • जनावर ठसकते, पाठ वाकून चालते.

निदान आणि उपचार 

 • निदान लक्षणे किंवा क्ष-किरण आणि सोनोग्राफीचा वापर करून होते. क्ष-किरणाची सुविधा जिल्हा पशू सर्वचिकित्सालय तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असतात.
 • औषधोपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे हा आजार बरा करता येतो.

छातीच्या पडद्याचा हॅर्निया 

 • धारदार अखाद्य वस्तू पोटामधून पुढे जाऊन छातीच्या पडद्याला इजा करून कमजोर करते. अशा वेळेस पडद्यामध्ये लहान छिद्र होते. काही काळानंतर छिद्र मोठे होऊन पोटातील अवयव त्या छिद्रामधून छातीमध्ये प्रवेश करतात.
 •  म्हशी या आजारास प्रवण असतात, कारण त्यांच्या छातीचा पडद्याचे स्नायू कमकुवत असतात.
 • गर्भार जनावरांमध्ये गर्भाशयाच्या वाढत्या वजनामुळे छातीच्या पडद्यावर जास्त दबाव असतो. ज्यामुळे हा आजार गर्भार जनावरांमध्ये जास्त आढळून येतो.

लक्षणे 
आजारामुळे चारा कमी खाणे, पोट फुगणे, श्‍वास घ्यायला त्रास, छातीच्या ऊर भागात पाणी साचून सूज येणे, संडास कमी करणे, उठायला आणि बसायला त्रास होतो.

निदान आणि उपचार 
लक्षणे दिसताच शस्त्रक्रिया करून पोटाचा भाग परत पोटात घेऊन छातीचा पडदा शिवावा लागतो.

छातीत पाणी भरणे 

 • आजारात छातीमध्ये पाणी साचते. जनावराला श्‍वास घेण्यात अडचण येते.
 •  यकृताचे आजार, क्षयरोग, हृदयाचे व रक्ताभिसरण संस्थेचे रोग, फुफ्फुसाचे आजार इत्यादी कारणे असू शकतात.

लक्षणे 
श्‍वास घेण्यास त्रास, नाकातून पाणी येणे, छातीच्या ऊर भागात सूज येणे, आहार कमी खाणे, दूध उत्पादनास कमी होते.

निदान आणि उपचार 

 • लक्षणे आणि क्ष-किरण व सोनोग्राफीचा वापर करून निदान करता येते.
 • उपचारासाठी छातीमध्ये साचलेले पाणी काढून औषधोपचार करणे अत्यावश्यक असते.

बरगड्यांचा अस्थिभंग 

 • छातीमधील अवयवासाठी बरगड्या कवचाची भूमिका निभवतात. बरगड्यांना जोरात मार लागल्यामुळे, जनावरांची एकमेकांसोबत भांडण, जनावर जोरात खाली पडणे या कारणांमुळे अस्थिभंग होतो.
 • अस्थिभंग झाल्यास जनावराला चांगल्यारीतीने श्‍वास घेण्यात अडचण येते. श्‍वास घेताना बरगड्यांच्या हालचालींमुळे अत्यंत वेदना जाणवते.

उपचार 

 • जनावराला पूर्णपणे आराम द्यावा.
 • आरामासोबत व्यवस्थित औषधोपचार करावा.

फुफ्फुसामधील टोकदार अखाद्य वस्तू 

 • जनावरांच्या जाळीपोटात अडकलेली टोकदार तार, खिळा इत्यादी वस्तू हालचालींमुळे पोटामधून पुढे जाऊन छातीमध्ये प्रवेश करतात. फुफ्फुसांना इजा पोचवतात.
 • इजा झाल्यामुळे जनावराने श्‍वास घेतलेल्या हवेचा फुफ्फुसामधून प्रसार होतो आणि छातीमध्ये हवा साचते. हवा साचल्यामुळे फुफ्फुसांवर खूप दबाव येऊन श्‍वासप्रक्रियेस जनावराला त्रास होतो. इजा झाल्यामुळे रक्ताचा स्राव होऊन रक्त छातीमध्ये साचू शकते. अशा वेळेस श्‍वास घेतल्यास नाकातून रक्त बाहेर पडते.

निदान आणि उपचार 

 • निदान लक्षणांवरून आणि क्ष-किरणांचा वापर करून होते. जिल्हा पशू सर्वचिकित्सालय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये निदानासाठी सुविधा उपलब्ध असतात.
 • उपचारासाठी शल्यचिकित्सा करून छातीतील टोकदार वस्तू आणि इजा झालेला फुफ्फुसाचा भाग काढावा लागतो.

प्रतिबंधात्मक उपाय 

 • जनावराला चारा देण्यापूर्वी तपासावा. आहारामध्ये कोणतीही अखाद्य वस्तू नसल्याची खात्री करावी.
 • पौष्टिक आणि उत्तम गुणवत्तेचा आहार द्यावा.
 • जनावराच्या चरण्याची जागेचे वेळोवेळी निरीक्षण करावे. जागा निवडताना निवासी भागातून दूर जागा निवडावी. ज्यामुळे घरात वापरण्यात येणाऱ्या दैनंदिन वस्तू जनावराच्या खाद्यात येण्याची संभावना कमी होते.
 • जनावरांच्या गव्हणीमध्ये मॅग्नेटिक सस्ट्रीपचा वापर करावा जेणेकरून धातूची अखाद्य वस्तू त्या मॅग्नेटिक स्ट्रीपला चिकटून बसेल. जनावराच्या पोटात जाणार नाही.
 • जनावरांच्या समोर चाटण वीट नेहमी बांधून ठेवावी जेणेकरून जनावरांना क्षार मिश्रणाची कमतरता पडणार नाही.
 • जनावरांनी चुंबकीय गोळी खाऊ घातल्यास ही गोळी जठरामध्ये जाऊन बसते. जनावराने एखादी लोखंडी वस्तू खाल्ल्यास त्या गोळीला चिकटून बसेल आणि पुढे होणारे आजार टाळता येतात.

संपर्क - डॉ. चिरंजीवधर पाठक, ७०२१९९१३९७
डॉ. कमलाकर चौधरी, ९९८७२३७३४२
(पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजनासंकरित गाईंना शिरेतून कॅल्शिअमयुक्त सलाइन दिले...
वासरांच्या आहारात काफ स्टार्टरचा वापरपशुपालकाला गोठ्यामध्ये जातिवंत वासरांची उत्तम...
शेळी व्यवस्थापनाच्या पद्धतीशेळी व्यवस्थापनामध्ये मुक्त व्यवस्थापन, बंदिस्त...
कांदळवन संवर्धनातून रोजगारनिर्मितीकांदळवन हे एक वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिनाऱ्याजवळील...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालनपृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून,...
मानवचलित सुधारित चारा कापणी यंत्रशेतीला पूरक असा घरगुती वापरासाठी २ ते ४ जनावरे...
कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे....
पशुपालन सल्लापावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे...
पशूपालनामध्ये ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान...जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा...
जंतनाशकाप्रती प्रतिकार तयार होण्याची...जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
ओळखा जनावरांतील जंताचा प्रादुर्भाव...जंताची प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची...
गोचीडनाशकांबाबत प्रतिकारक्षमता...गोचिड नियंत्रणासाठी जनावरे आणि गोठ्याची स्वच्छता...
फायदेशीर गर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानगर्भप्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी...
जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलनजंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया...
वासरांच्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसरमिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश...
गाई, म्हशींतील कासदाहवर उपाययोजनाकासदाहाची लक्षणीय कासदाह व सुप्त कासदाह असे दोन...
मत्स्य संवर्धनासाठी तळ्याचा आराखडामत्स्य संवर्धनासाठी लागणारे तळे हे शेततळ्यापेक्षा...
वराह फार्मचे व्यवस्थापन...वराहपालन सुरू करताना फार्मचा आकार आणि वराह...