उन्हाळ्यातील अंबिया बहारातील फळगळ व्यवस्थापन

आळ्याने पाणी देण्याची पद्धत वापरात असलेल्या बागांमध्ये लहान फळांची फळगळ अधिक दिसून येते. कारण आळ्यातून पाणी देताना दोन पाळ्यामधील अंतर अधिक झाल्यास झाडास ताण बसतो. एकदम आळे भरून पाणी दिल्यास ताण सुटतो. यामुळे झाडांमध्ये ईथीलीन वायू तयार होतो, परिणामी फळगळ दिसून येते.
use organic matter with a 10 cm thick layer for mulching.
use organic matter with a 10 cm thick layer for mulching.

आळ्याने पाणी देण्याची पद्धत वापरात असलेल्या बागांमध्ये लहान फळांची फळगळ अधिक दिसून येते. कारण आळ्यातून पाणी देताना दोन पाळ्यामधील अंतर अधिक झाल्यास झाडास ताण बसतो. एकदम आळे भरून पाणी दिल्यास ताण सुटतो. यामुळे झाडांमध्ये ईथीलीन वायू तयार होतो, परिणामी फळगळ दिसून येते. विदर्भातील विशेषतः अमरावती व नागपूर भागातील संत्रा बागांमध्ये अंबिया बहाराच्या लहान फळांची गळ, फांदी मर, पानगळ अशा समस्या जाणवत आहेत. त्याच प्रमाणे डिंक्या रोगाची लक्षणे दिसत आहेत. या समस्या सोडवण्याकरिता पुढील उपाययोजना कराव्यात. अंबिया बहाराच्या लहान फळांची गळ उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासते. अनेकवेळा दोन ओलितामध्ये अधिक ताण पडला तरी फळांना पाणी उपलब्ध होत नाही. उलट लहान फळांमधून पानांकडे पाणी वाहून जाते. परिणामी लहान फळे कोमेजतात किंवा शुष्क होऊन पिवळी पडून गळतात. या गळीमध्ये संत्र्याचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो. पुढे तो खालीपर्यंत पसरून गळ होते. पाण्याच्या कमतरतेप्रमाणेच फांदीवर पानांची अपेक्षित संख्या नसल्यास प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. आवश्यक अन्नद्रव्ये तयार होत नाहीत अन्नाअभावी फळे गळून पडतात. उपाययोजना  आच्छादन

  • उत्तम उपाय म्हणजे बागेत थंडावा ठेवणे. पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये व पाणी बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थ उदा. गवत / पालापाचोळा / कुटार / गव्हांडा / तणस यांचा १० सेंटीमीटर जाडीचा थर देऊन आच्छादन करावे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरचे (१०० मायक्रॉन) आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. आच्छादनामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणाची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. यामुळे जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केले असल्यास कालांतराने ते कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. जमिनीची धूप कमी होते. आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यांतील अंतर वाढविता येते. आच्छादनाचा वापर करताना सोबतच प्रति झाड २-३ किलो गांडूळखत द्यावे. सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त केल्यास जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेतही वाढ होते.
  • आळ्याने पाणी देण्याच्या पद्धत वापरात असलेल्या बागांमध्ये अशी फळगळ अधिक दिसून येते. कारण आळ्यातून पाणी देताना दोन पाळ्यामधील अंतर अधिक झाल्यास झाडास ताण बसतो. एकदम आळे भरून पाणी दिल्यास ताण सुटतो. यामुळे झाडांमध्ये ईथीलिन वायू तयार होतो, परिणामी फळगळ दिसून येते. झाडाचे आळे ओलिताच्या पाण्याने तुडुंब भरले की जमिनीतील हवा कमी होते. परिणामी मुळांना प्राणवायू न मिळाल्यानेही फळगळ होते. याकरिता बागेमध्ये शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा वापर योग्य राहतो. ठिबक नसल्यास दांडाने पाणी द्यावे.
  • फळगळ नियंत्रणाकरिता फवारणी

  • एनएए १ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक अॅसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक युरिया (१ किलो) अधिक १०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची फवारणी करावी.
  • या मिश्रणातील संजीवक बदलून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. ( संजीवके - २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम.)
  • संत्रा, मोसंबी, लिंबू फळवाढीकरिता फवारणी

  • जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो अधिक १०० लिटर पाणी
  • किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) ८०० ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) ५०० ग्रॅम अधिक १०० लिटर पाणी.
  • चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (ज्यामधे बोरॉन, जस्त, मग्नेशिअम यांचा समावेश असावा) २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • ठिबक सिंचनाने पाणी देताना दररोज होत असलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या ८० टक्के इतके पाणी द्यावे. यामुळे ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते.
  • ६) पाणी उपलब्ध असल्यास आंबिया बहराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलित सुरु ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून फळे झाडावर टिकतील. ठिबक सिंचनाची सोय असल्यास संत्रा व मोसंबीच्या १० वर्षावरील झाडांना १६० ते १९८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे.
  • बरेचदा फळे लहान अवस्थेत असताना कोळी कीड किंवा फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे जखमा निर्माण होतात. यामुळे फळांवर दुय्यम रोगांचे संक्रमण होऊन फळे काळी पडून गळतात. याकरिता फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर वेळेवर आंतरप्रवाही कीटकनाशक फवारणी करावी.
  • कोळी किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायफेन्थ्युरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम (लेबल क्लेम आहे.) प्रोपरगाईट (५७ ईसी) * १ मि.लि. किंवा
  • इथिऑन (५० ईसी)* १ मि.लि.
  • फूलकिडे नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमिथोएट (३० ईसी)* १ मि.लि.
  • फांदी मर किंवा शेंडे मर फांदी मर होण्यास अति उष्ण वारा, रोगकारक बुरशी आणि अन्नद्रव्ये यांची कमतरता कारणीभूत असते. उष्ण वाऱ्यामुळे नवीन पालवी फुटलेल्या फांद्या कोमेजून जातात. यामध्ये पाने फांदीस तशीच लटकून राहतात. रोगकारक बुरशीच्या प्रादुर्भावामुळे फांद्याची साल मरते, साल लाल काळसर होते व पाने देठासहित गळून पडतात. छोट्या छोट्या फांद्या पानेविरहीत होतात. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा शेंड्याकडील पाने लहान राहून अकाली गळतात.

  • याकरिता बागेच्या सभोवती सुरवातीलाच वारा रोधक वनस्पतीची कुंपणाकरिता लागवड करावी. अशा सजीव कुंपणामुळे वारा तसेच वादळांचा त्रास होत नाही. गरम उष्ण हवेपासून बागेचे संरक्षण होते.
  • वाळलेल्या फांद्या काढल्यानंतर त्या फांद्या बागेत न ठेवता जाळून टाकाव्यात. कारण यावर रोगकारक घटक सुप्ताअवस्थेत असतात. ते नष्ट होणे गरजेचे आहे.
  • फांद्या छाटणी प्रक्रियेत आणि व्यापक संपर्कात असलेल्या अवजारांचे निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. संक्रमित झाडाच्या फांद्या कापल्यानंतर अवजारे २% सोडियम हायपोक्लोराइड द्रावणाने निर्जंतुक कराव्यात.
  • बोर्डो मिश्रण ०.६ ते १.० टक्के तीव्रतेचे द्रावण फवारणीकरिता उपयोगात आणावे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे २५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास झाडांच्या खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी झाडाचे बुरशीजन्य व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरवातीस खोडाला बोर्डो मिश्रण लावावे. बोर्डो मिश्रण एक ते दीड मीटर उंची पर्यंत लावावे.
  • (* शिफारसीत बुरशीनाशके/संजीवकांना लेबल क्लेम नाहीत. मात्र संशोधनाच्या आधारावर ॲग्रेस्को शिफारस आहे.) - डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७ डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com