हवामान बदलाचा शेती, उद्योगावर होतोय परिणाम

तापमानामधील वाढ विशेषतः पावसाळा संपल्यानंतर हिवाळी तसेच उन्हाळी हंगामामध्ये जाणवते. थंडीचे प्रमाण व कालावधी कमी होत आहे. एकूण पर्जन्यमान कमी, परंतु कमी दिवसांत पावसाची तीव्रता वाढत आहे.
Climate change is having an impact on hapus mango production
Climate change is having an impact on hapus mango production

तापमानामधील वाढ विशेषतः पावसाळा संपल्यानंतर हिवाळी तसेच उन्हाळी हंगामामध्ये जाणवते. थंडीचे प्रमाण व कालावधी कमी होत आहे. एकूण पर्जन्यमान कमी, परंतु कमी दिवसांत पावसाची तीव्रता वाढत आहे. त्यादृष्टीने पीक व्यवस्थापनात बदल आवश्यक आहे. वातावरण बदलाचा धोका भारतीय शेती, पर्यावरणाला वाढण्याची शक्यता आहे. भारतातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा फटका बसेल, असा निष्कर्ष ‘आयपीसीसी‘ या हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने काढला आहे. २००१ पासून भारतात अत्याधिक हवामान बदलाच्या घटना घडू लागल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

  • भारतीय हवामान विभागाची १८८६ ते १९८६ या १०० वर्षांची हवामानाची आकडेवारी बघता भारतामध्ये १९ कोरडे, तर १३ ओले दुष्काळ.
  • १९७२ मध्ये महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांतील ८४ तालुके, १९८६ मध्ये १४ जिल्हे दुष्काळी आणि ११४ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित. २००३ मध्ये १४ जिल्हे, ११८ तालुके आणि २०१२ मध्ये १८ जिल्हे आणि १२३ तालुके दुष्काळग्रस्त. २०१५ मध्ये २८ जिल्हे दुष्काळी आणि १३६ तालुके दुष्काळग्रस्त ठरले. एकूणच दुष्काळाची व्याप्ती विस्तारत आहे.
  • पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापूर, किंवा दुष्काळ, हिवाळ्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे त्या हंगामातील पिके आणि पीक पद्धतीला धोका.
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीच्या अंदाजाप्रमाणे तापमान वाढीमुळे दक्षिण भारताच्या तुलनेने उत्तर भारतातील उष्णतामानात जास्त वाढ होण्याची शक्‍यता.
  • भारतामधील गेल्या वर्षभरातील पावसाचा आलेख पाहिला, तर ठोस अनुमान काढता येत नसले, तरी पश्‍चिम किनारा, उत्तर आंध्र प्रदेश आणि उत्तर- पश्‍चिम भारतामध्ये एकूण पर्जन्यमानामध्ये वाढ जाणवते. तर पूर्व- मध्य प्रदेश, ओडिशा आणि उत्तर पूर्व भारतामध्ये एकूण पर्जन्यमानामध्ये घट जाणवते. तापमानामधील वाढ विशेषतः पावसाळा संपल्यानंतर हिवाळी तसेच उन्हाळी हंगामामध्ये जाणवते. थंडीचे प्रमाण व कालावधी कमी होत आहे. एकूण पर्जन्यमान कमी परंतु कमी दिवसांत पावसाची तीव्रता वाढत आहे. म्हणजेच ढगफुटीचा अनुभव जाणवत आहे.
  • हवामान बदलाचा भारतीय शेतीवर परिणाम  हवामान बदलाचा सर्वांत मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा अंदाजे ५७.८० टक्के, औद्योगिक क्षेत्राच्या वाटा २८.३० टक्के आहे. कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्के असला, तरी जवळपास ५८ टक्के लोकांना या क्षेत्रातून रोजगार मिळतो. हे अन्न सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

  • हवामान बदलाचा भारतीय कृषी क्षेत्रावर होणारा प्रतिकूल परिणाम हा शेतकरी, शेतीची आर्थिक स्थिती, शेतीमधील रोजगार, शेतीमालाच्या किमती आणि जागतिक कृषी व्यापाराचे स्वरूप यावर दिसणार.
  • कमी दिवसांत पावसाचे वाढणारे तीव्रतेचे परिणाम कोरडवाहू क्षेत्रामध्ये जास्त जाणवतील. पिकांना आवश्‍यक असणारा कार्बन डायऑक्‍साइड हवेत वाढल्यामुळे काही ठिकाणी काही प्रमाणात पिकांचे उत्पादन वाढले. परंतु तापमान वाढणे, किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढ, पावसाचे प्रमाण कमी किंवा अनियमित होणे, वाढणाऱ्या पर्जन्यामुळे जमिनीची धूप होणे इत्यादी कारणांमुळे उत्पादकता कमी होण्याचा संभव.
  • विषुववृत्तीय पिके विशेषतः गहू, सोयाबीन, बीट, टोमॅटो, तंबाखू, लिंबूवर्गीय आणि इतर फळपिकांच्या वाढीवर परिणाम. फळधारणा, फळांची वाढ तसेच काढणी हंगामामध्ये बदल.
  • थंड प्रदेशातील पिकांना फळधारणेसाठी ठरावीक कालावधीचे थंड हवामान लागते. तो कालावधी कमी झाल्यास एकूण उत्पादनावर परिणाम. सफरचंद, चेरी इ. फळे तडकण्याचा संभव.
  • वाढत्या कार्बन डायऑक्‍साइडमुळे नारळ, सुपारी व कोकोमध्ये बायोमास वाढेल असा निष्कर्ष काढण्यात आला तरी तापमान वाढीमुळे त्या बायोमास उत्पादनवाढीमध्ये घट होईल.
  • नारळाची उत्पादकता पूर्व किनाऱ्यावर कमी होईल, परंतु पश्‍चिम किनारी प्रदेशामध्ये वाढेल. विशेषतः केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये ही वाढ दिसेल. परंतु आंध्र प्रदेश, ओडिशामध्ये कमी होईल असे नारळ संशोधकांचे मत.
  • काजू पिकामध्ये अवकाळी पावसामुळे किडी व रोग वाढल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम. वेलदोडा तसेच काळी मिरीच्या उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. काळी मिरीखालील क्षेत्र तसेच उत्पादकता कमी होण्याची शक्यता.
  • बर्फवृष्टी किंवा अति थंड हवामानामुळे मसाला पिके उदा. जिरे, धने, ओवा इत्यादी पिकांची उत्पादकता कमी होत असल्याचा अनुमान.
  • तापमान वाढीमुळे संभाव्य महापूर आणि दुष्काळामुळे भारतामधील तृणधान्य उत्पादन १५ टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्यता. सन २१०० पर्यंत भाताची उत्पादकता १० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होण्याची शक्यता. दहा अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी गव्हाचे उत्पादन ४ ते ५ दशलक्ष टनांनी कमी होण्याचा धोका. विविध प्रकारच्या समस्या गव्हासारख्या हंगामी पिकामध्ये निर्माण होत आहेत.
  • भारतातील गंगा नदीच्या परिसरातील पठारी भागात सध्या अनुकूल, अधिक उत्पादनक्षम, ओलिताचे, कमी पर्जन्यमान असलेले वातावरण आहे. या भागातून जागतिक गहू उत्पादनाच्या १५ टक्के गहू उत्पादन होते. अशा संभाव्य धोक्‍यांचा विचार करून जर हवामान आधारित गव्हाची वेळेवर पेरणी केली, तर उत्पादनात फक्त १ ते २ दशलक्ष टन एवढीच संभाव्य तूट होऊ शकेल.
  • हवामान बदलाचे अनुकूल परिणाम  वातावरणामधील तापमान वाढीमुळे भारतीय कृषी क्षेत्रामध्ये होणाऱ्या विपरीत परिणामांबरोबर कोणकोणते अनुकूल परिणाम होण्याचा संभव आहे याचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे.

  • हवामान तज्ज्ञांच्या मते कमी होत जाणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बटाटा, वाटाणा आणि मोहरी पिकांना कमी धोका संभवतो. पश्‍चिम किनाऱ्यावरील नारळाचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता आहे. हरभरा, मोहरी, रब्बी मका, तसेच भरडधान्य पिकांमध्ये सुधारणा होण्याची शक्‍यता.
  • किनाऱ्याजवळील सखल प्रदेशांमध्ये पाणी साचण्याच्या संभाव्य स्थितीमुळे मत्स्योत्पादनाला चालना मिळू शकेल.
  • हवामान बदलाचा कोकणपट्टीवर होणारा परिणाम 

  • पावसाचा कालावधी आणि तीव्रता तसेच थंडीचा कालावधी यामध्ये बदल जाणवत आहे. अतिवृष्टी, पावसाच्या कालावधीमधील खंड, ढगाळ वातावरण, मंद सूर्यप्रकाशामुळे भातपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम.
  • हापूस ही जात हवामानातील बदलाला खूपच संवेदनशील, त्यामुळे बदलत्या हवामानाचा पहिला फटका हापूस आंब्याला बसत आहे. हापूस आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेमध्ये थंडीला महत्त्व आहे. परंतु सद्यःस्थितीमध्ये थंडी पडण्याचा योग्य आणि आवश्‍यक कालावधी आणि त्याची तीव्रता कमी होत आहे. थंडीचा काही कालावधी तसेच अवेळी पाऊस त्यामुळे आंबा मोहोरावर विपरीत परिणाम होताना दिसतो. याखेरीज हवामानातील कमी होत चाललेली आर्द्रता आणि वाढत जाणारे तापमान यामुळे फळांची गळ होणे, फळांवर चट्टे पडणे इत्यादी प्रकार वाढू लागले आहेत. फळ तोडणीच्या वेळी, अकाली पावसामुळे देठाजवळ फळे कुजण्याचा तसेच फळांचा इतर भाग काळपट पडून फळे कुजण्याचे प्रकार दिसतात. कदाचित तापमान वाढीमुळे फळ जून होण्याचा कालावधी काही अंशी कमी होत असला, तरी फळाचे वजन आणि आकार कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कमी-अधिक असाच प्रकार इतर फळपिकांमध्येसुद्धा जाणवणार आहे.
  • गेल्या वर्षी पावसाची तीव्रता जास्त होती. पावसाचा कालावधी ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत लांबला. त्यामुळे भातशेतीचे नुकसान तसेच आंबा, काजू पिकाचा हंगाम लांबला. २०२१ ची सुरुवात ढगाळ वातावरण तसेच तुरळक पावसाच्या आगमनाने झाली, अर्थात असेच हवामान बदल झाले, तर याचा फटका आंबा, काजू पिकांना बसू शकतो.
  • संपर्क - डॉ. प्रदीप हळदवणेकर, ९४२३०४८५९१ (सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, जि. सिंधुदुर्ग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com