नारळ गळीची कारणे अन् उपाययोजना

नारळाची गळ ही एक किंवा अनेक कारणांमुळे होते. आनुवंशिक गुणधर्म, परागीकरण करणाऱ्या कीटकांचे कमी प्रमाण, परागीकरणाचा अभाव, पाण्याचा अयोग्य निचरा, पाणी आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. फळगळीची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात.
Proper water management leads to good fruit set
Proper water management leads to good fruit set

नारळाची गळ ही एक किंवा अनेक कारणांमुळे होते. आनुवंशिक गुणधर्म, परागीकरण करणाऱ्या कीटकांचे कमी प्रमाण, परागीकरणाचा अभाव, पाण्याचा अयोग्य निचरा, पाणी आणि अन्नद्रव्यांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. फळगळीची लक्षणे तपासून उपाययोजना कराव्यात. नारळ झाडाला फुलाचा तुरा बाहेर पडल्यापासून पहिल्या दोन महिन्यांत गळीचे प्रमाण जास्त असते. परंतु फलधारणा झाल्यापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात गळीचे प्रमाण उच्चांक असते. कमी-जास्त प्रमाणात जवळ जवळ वर्षभर फळांची गळ होत असते. फळांची गळ ही एक किंवा अनेक कारणांमुळे होत असते. त्यामध्ये आनुवंशिक गुणधर्म, परागीकरण करणाऱ्या कीटकांचे कमी प्रमाण, परागीकरणाचा अभाव, पाण्याचा अयोग्य निचरा, पाणी आणि अन्नद्रव्यांची कमतरता, रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे  आहेत. नारळाचा फुलोरा 

  •  नारळामध्ये फुलोरा येण्याचा कालावधी त्याच्या जातीनुसार कमी-अधिक असतो. सर्वसाधारणपणे ठेंगू जातींमध्ये हा ३ ते ४ वर्षे असतो. उंच वाढणाऱ्या जातींमध्ये ६ ते ८ वर्षांचा असतो. फुलोरा येण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या ६ ते ७ फुलोऱ्यांना (पोयी) अनेक वेळा फळे लागत नाहीत, म्हणजेच सर्वच फळांची गळ होते. त्यानंतर मात्र ती कमी-अधिक होत असते. 
  •  योग्य निगा राखली असल्यास झाडाला प्रत्येक महिन्यात एक फुलाचा तुरा म्हणजेच पोय येते. पोयीत ते फुले धारण करणाऱ्या काड्या असतात. प्रत्येक काडीच्या तळावरील भागावर एक अगर अनेक मादी फुले असतात. प्रत्येक पोयीत ३० ते ४० मादी फुले असतात. मादी फुलांच्या वरील बाजूस काडीवर टोकापर्यंत २०० ते ३०० नर फुले असतात. प्रत्येक पोयीत ८,००० ते १०,००० नर फुले असतात.
  • सर्व नर फुले किंवा मादी फुले एकाचवेळी उमलत नाहीत. उंच झाडात पोय बाहेर पडते, त्या दिवसापासून नर फुले उमलतात. १९ ते २० दिवसांत सर्व नर फुले फुलून गळून पडतात. या काळात मादी फुलाची वाढ होत असते. पोय उमलल्यापासून किंवा २० किंवा २१ व्या दिवशी म्हणजेच नर फुले फुलून गळून पडल्यानंतर १ ते २  दिवसांनंतर पोयीतील अर्धी अधिक व एकविसाव्या किंवा बाविसाव्या दिवशी राहिलेली मादी फुले उमलून फळधारणेस तयार होतात. याच काळात मादी फुलांच्या उमललेल्या भागावर साखरेचा अंश असलेल्या स्रावाचे थेंब दिसतात. याच अवस्थेत मादी फुले परागकण धारण करतात आणि फळधारणा होते. नारळ हे परपरागीकरण होणारे झाड आहे. यामध्ये परागीकरण हे मधमाशी व इतर माश्‍यांमार्फत होते.
  •  फळगळीवर उपाययोजना आनुवंशिक गुणधर्म 

  • सर्वसाधारणपणे बागेतील सर्वच झाडे सारखे उत्पादन देत नाहीत. काही झाडे नियमितपणे भरपूर उत्पादन देतात, तर काही एक वर्षा आड भरपूर उत्पादन देतात. 
  • वेस्ट कोस्ट टॉल या जातीस महाराष्ट्रात बाणवली या नावाने संबोधतात. या जातीमध्ये ५० ते २५० नारळ प्रतिवर्षी देणारी झाडे आहेत. याचे कारण म्हणजे प्रत्येक झाड त्याच्यात असलेल्या गुणधर्मानुसार फळांचे उत्पादन देते. 
  • ज्या वेळी मादी फुले परागकण धारण करण्याच्या अवस्थेत येतात, त्या वेळी पोयीतील सर्व नर फुले गळून पडलेली असतात. याचाच अर्थ असा, की फळधारणेसाठी इतर झाडांवरील परागकण यावे लागतात. अशा स्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या झाडावरील फळांपासून तयार केलेले रोप त्याच मातृवृक्षाप्रमाणे जास्त उत्पादन देणारे असेलच असे सांगता येत नाही. कारण फळधारणा कोणत्या झाडावरील परागकणांमुळे झाली हे आपणाला कळू शकत नाही. परागकण जर निकृष्ट उत्पादन देणाऱ्या झाडावरून आला असेल, तर त्यापासून निर्माण होणाऱ्या झाडात देखील तेच गुणधर्म येऊ शकतात. म्हणून ज्या बागेत चांगले उत्पादन देणारी झाडे जास्त असतील अशा बागेतील झाडापासून जर रोपे तयार केली असतील तर ती झाडे चांगल्या प्रकारची निपजण्याची शक्‍यता असते. ज्या झाडावरील फळे आनुवंशिक गुणधर्मामुळे गळून पडतात, त्या झाडांपासून तयार केलेली रोपेदेखील तशीच निपजण्याची शक्‍यता असते. ही गळ कोणत्याही उपायांनी थांबविता येत नाही.
  • जमिनीची अवस्था 

  • नारळाच्या मुळांच्या वाढीसाठी तसेच जमिनीत अन्न शोषून घेण्याचे कार्य पार पाडण्यासाठी हवेची गरज असते. भारी जमिनीत किंवा पाणथळ जमिनीत ज्या जमिनीतून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही, अशा जमिनीत जास्त काळ पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांना प्राणवायू मिळू शकत नाही. प्राणवायूअभावी मुळांची वाढ खुंटते व ती योग्य प्रकारे अन्न शोषून घेण्याचे कार्य पार पाडू शकत नाहीत.
  • अन्नपुरवठा खंडित झाल्यामुळे कोवळी फळे गळून पडतात. नारळ बागेतील जमीन अनेक कारणांनी तुडविली जाते. त्यामुळे घट्टपणा येतो. अशा जमिनीत देखील मुळांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही, त्यामुळे फळांची गळ होते. 
  • जमिनीत पुरेशा प्रमाणात हवा खेळती राहण्यासाठी पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत चर खोदून पाणी शेताबाहेर काढून टाकावे. त्याचप्रमाणे जमीन वर्षातून २ ते ३ वेळा नांगरावी किंवा टिकावाने खोदून भुसभुशीत करावी. यामुळे मुळांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळेल. गळीचे प्रमाण कमी होईल.
  • जमिनीतील ओलावा 

  • जमिनीत सतत पाणी थांबून राहिल्यास मुळे पुरेसे अन्न शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे फळ गळ होते. जमिनीत गरजेइतका ओलावा नसला की मुळे अन्न शोषून घेऊ शकत नाहीत. अपुऱ्या अन्नपुरवठ्यामुळे फळांची गळ होते.
  • ज्या झाडांना पावसाळ्यानंतर पाणी दिले जात नाही किंवा ओलिताखालील ज्या नारळ झाडांना वेळेवर व गरजेइतके पाणी दिले जात नाही, अशा बागेत फळे मोठ्या प्रमाणावर गळतात. त्यासाठी बागेत एकाचवेळी खूप पाणी देण्यापेक्षा गरजेइतके पाणी अनेक वेळा देणे अधिक फायद्याचे ठरते. नियमित व गरजेइतके पाणी दिल्यास होणारी गळ थांबविता येईल.
  • नारळ झाडास ठिबक सिंचनाद्वारे हिवाळ्यात ३० ते ४० लिटर, तर उन्हाळ्यात ५० ते ६० लिटर पाणी द्यावे. आळे पद्धतीने १२० ते १६० लिटर हिवाळ्यात आणि २०० ते २४० लिटर पाणी उन्हाळ्यात द्यावे. 
  • पुरेसे पाणी देणे शक्‍य नसेल, तर झाडाच्या खोडाभोवती १.८ मीटरपर्यंतच्या भागावर पालापाचोळ्याने एक वीतभर उंचीचे आच्छादन करावे. म्हणजे जमिनीत जास्त काळ ओलावा टिकून राहील.
  • परागीकरणाचा अभाव  नारळात योग्य प्रकारे परागीकरण न झाल्यास फळांची गळ होते. यासाठी नारळ बागेत प्रति हेक्‍टर चार मधमाश्‍यांच्या पेट्या ठेवल्यास काही प्रमाणात फळ गळ थांबविता येईल. जमिनीतील अन्नघटक 

  •  नारळाला महिन्याला एक पान व एक पोय येते. त्यामुळे झाडाला जमिनीतून सतत अन्नपुरवठा होणे गरजेचे असते. जर हा अन्नपुरवठा पुरेसा झाला नाही, तर त्याचा निश्‍चितच परिणाम फळधारणेवर होतो.
  • जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यात जितकी फळे तयार करणे झाडाला शक्‍य असते, तितकीच ती शेवटपर्यंत राहतात. बाकीची फळे निरनिराळ्या अवस्थेत गळून पडतात. 
  • नारळ झाडास नत्र, स्फुरद आणि पालाश अशा तिन्ही अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. नारळ झाडास वयोमानानुसार शिफारशीत खते तीन हप्त्यांमध्ये विभागून देणे गरजेचे आहे. 
  • खत देण्याची पद्धत 

  • नत्र आणि पालाश खताच्या मात्रा समप्रमाणात विभागून जून, ऑक्‍टोबर आणि फेब्रुवारी अशा तीन वेळा द्याव्यात.
  • शेणखत व स्फुरद खते इतर खतांबरोबर जूनमध्ये एकाच वेळी द्यावीत. 
  • रोप लावल्यानंतर पहिल्या वर्षी रोपांची मुळे ३० सेंमी अंतरापर्यंत पसरलेली असतात. त्यामुळे खते खोडापासून ३० सेंमी अंतरापर्यंत सभोवती विखरून टिकावाच्या साह्याने मातीत मिसळावीत. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खते देताना ३० सेंमी अंतर वाढवत जावे. पाचव्या वर्षी त्यापुढे १.५ ते १.८० मीटरपर्यंतच्या अंतरात ते पसरून मातीत मिसळावीत. या खतासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीनुसार प्रत्येक वेळी द्यावीत.
  • - डॉ. वैभव शिंदे,  ९५१८९४३३६३ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com