नारळ लागवडीची पूर्वतयारी

नारळ लागवड करताना पूर्वनियोजन महत्त्वाचे आहे. नवीन लागवड करताना दोन झाडांत योग्य अंतर ठेवावे. ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य वाढ असलेली एक वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत.
योग्य वाढ झालेले रोप लागवडीसाठी निवडावे.
योग्य वाढ झालेले रोप लागवडीसाठी निवडावे.

नारळ लागवड करताना पूर्वनियोजन महत्त्वाचे आहे. नवीन लागवड करताना दोन झाडांत योग्य अंतर ठेवावे. ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य वाढ असलेली एक वर्ष वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. ओलिताची सोय असल्यास सर्व प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणे आवश्यक आहे, जसे रेताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी शेणखताचा वापर करावा.काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळू तसेच सेंद्रिय खतांचा वापर करावा.भाताच्या खाचरात लागवड करावयाची झाल्यास पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी चर खणून पाणी बाहेर काढणे महत्त्वाचे असते. शेताच्या बांधावर लागवड करता येते. डोंगर उतारावरील वरकस जमिनीत ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे देखील लागवड शक्य आहे.  सुधारणा केलेल्या खार जमिनीतही लागवड करता येते. नदीकाठच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हणजेच ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये लागवड करावी. कातळावर नारळ झाडांची लागवड करावयाची झाल्यास कातळात खड्डा किती खोल असावा हे महत्त्वाचे नसून किती उंची आणि रुंदीची मातीची भर घालणे शक्य आहे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कमीत कमी १ मीटर उंच आणि माडाच्या खोडाभोवती दीड मीटर अंतरापर्यंत मातीची भर गरजेची आहे.  झाडातील अंतर

  • नवीन लागवड करताना दोन झाडात योग्य अंतर असणे गरजेचे आहे. ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी नारळ झाडाच्या झावळीच्या रचनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झावळीची लांबी १५ फूट असते. वजनामुळे झावळीला धनुष्यासारखा आकार येतो. त्यामुळे  झावळीचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर १२.५ फूट असते. दोन झाडात २५ फूट (७.५ मीटर) अंतर असेल तर  झावळ्या एकमेकात शिरणार नाहीत.
  • झाडाची सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात २५ फूट (७.५ मी.) अंतर ठेवावे. पाट, शेतीच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास २० फुटाचे अंतर ठेवावे. ठेंगू जातीसाठी देखील २० फूट अंतर ठेवावे.
  • खड्याचे आकारमान

  • वरकस किंवा मुरूम युक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे, अशा जमिनीत १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. समुद्र किंवा नदी किनाऱ्यावरील पुळणीची जमीन, गाळ मिश्रित, रेताड, मध्यम काळ्या आणि भारी काळ्या जमिनीत थोडा लहान आकाराचा खड्डा खोदला तरी चालू शकेल. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. 
  • रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी १ ते २ टोपल्या चांगल्या प्रतीची माती टाकावी. तसेच खड्डा भरताना आणखी १ ते २ टोपल्या चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते. पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणाऱ्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला १ ते २ टोपल्या रेती (वाळू) घालावी, तसेच खड्डा भरताना १ ते २ टोपल्या रेती मातीत मिसळावी. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी सोडणाचा थर द्यावा. त्याव्दारे जमिनीत ओल टिकून राहाते.
  • खड्डा भरताना ४ ते ५ घमेली शेणखत, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम कीडनाशक पावडर खड्ड्यातील मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत,  त्याचप्रमाणे ज्या जमिनीत पाणी साचते अशा ठिकाणचे खड्डे पूर्ण  भरून वर थोडी भर द्यावी. जमीन उताराची असल्यास आणि पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचणार नाही अशी खात्री असल्यास खड्डे अर्ध्यापर्यंत भरावेत. उरलेली माती खड्ड्याच्या वरील बाजूवर वरंबा करण्यासाठी वापरावी म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे पाणी खड्ड्यात येणार नाही. पुढे  रोप वाढत जाईल तशा पद्धतीने खड्ड्यात मातीची भर घालावी.
  • रोपांची निवड, लागवड

  • एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. 
  • रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. 
  • रोपांना ५ ते ६ पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. 
  • रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. निवडलेले रोप खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. रोप लावताना नारळाच्या आकाराचा खड्डा काढावा. रोपाचा नारळ पृष्ठभागापर्यंत जमिनीत गाडावा. नारळाचा कोंब मातीत गाडला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. रोपांच्या बाजूची माती पायाने घट्ट दाबून रोप लावावे.
  • जाती  बाणवली, प्रताप आणि संकरित टी बाय डी आणि डी बाय टी या जाती आहेत.नारळामध्ये मुख्यत्वे उंच आणि ठेंगू या दोन जाती आढळतात. नारळामध्ये परपरागीकरण होत असल्याने विविधता आढळून येते. यामध्ये फळांचा आकार, तेलाचे प्रमाण वगैरे गुणधर्मानुसार अनेक पोटजाती आहेत.  उंच जाती 

  • झाडांची उंची १५ ते १८ मीटर असते. आयुष्यमान ७० ते ९० वर्षे किंवा त्याहूनही अधिक असते. 
  • लागवडीनंतर ५ ते ७ वर्षानंतर फळधारणेला सुरवात होते. नारळ मध्यम ते मोठ्या आकाराचे असून चांगल्या प्रतीचे व अधिक खोबरे मिळते. 
  • तेलाचे प्रमाण अधिक (६८.७५ टक्के) असते. 
  • बाणवली

  • जातीचे आयुष्य ७० ते ८० वर्षे असून, ६ ते ७ वर्षात फुलो-यास येते.
  • प्रत्येक झाडापासून प्रति वर्षी ५० ते १०० नारळ मिळतात. 
  • फळात सरासरी १७६ ग्रॅम खोबरे आणि तेलाचे प्रमाण ६७ ते ७० टक्के असते. 
  • या जातीमध्ये रंग, आकार, आकारमान, खोबरे, तेलाचे प्रमाण यामध्ये विविधता आहे.
  •  लक्षव्दिप ऑर्डिनरी प्रति वर्षी ८० ते १७८ फळे मिळतात.नारळामध्ये सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते. - खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण ७२ टक्के इतके असते.  लक्षव्दिप मायक्रो  प्रति वर्षी  १०० ते ३२० नारळ मिळतात. ही जात गोटा नारळ तयार करण्यास उत्तम आहे. एका नारळात खोबरे ८० ते १०० ग्रॅम असते. तेलाचे प्रमाण ७५ टक्के असते.  ईस्ट कोस्ट टॉल 

  • फळधारणेस येण्यासाठी ६ ते ८ वर्षे लागतात. प्रति वर्षी ४० ते १२० नारळ मिळतात.
  • एका नारळात १०० ते १४० ग्रॅम खोबरे मिळते. तेलाचे प्रमाण ६४ टक्के असते. 
  • प्रताप

  • नारळ आकाराने मध्यम असून गोल असतात. 
  • ही जात फलधारणेस येण्यास ६ ते ७ वर्षे लागतात. प्रति वर्षी १३९ ते १६०  नारळ मिळतात.
  • खोबरे १२० ते १६० ग्रॅम मिळते. तेलाचे प्रमाण ६८ टक्के असते.  
  • फिलिपिन्स ऑर्डिनरी

  • नारळ आकाराने फारच मोठे असतात. दरवर्षी ९० ते २०० नारळाचे उत्पादन मिळते.
  • फळात २१५ ग्रॅम खोबरे मिळते. तेलाचे प्रमाण ६९ टक्के आहे.
  • केरा बस्तर  प्रति वर्षी ११० नारळाचे उत्पादन मिळते. अंदमान ऑर्डिनरी 

  • नारळ आकाराने मोठे असतात. प्रति वर्षी ९४ नारळाचे उत्पादन मिळते. 
  • सरासरी १६९ ग्रॅम खोबरे मिळते. तेलाचे प्रमाण ६७ टक्के असते.
  • ठेंगू जाती 

  • या प्रकारामध्ये हिरवा, नारिंगी, पिवळा अशा रंगांची फळे आढळून येतात. 
  • जातींना ३ ते ४ वर्षात फलधारणेस सुरवात होते. आयुष्यमान ४० ते ५० वर्षे असते. 
  • तेलाचे प्रमाण कमी (६६.६८ टक्के) असते. 
  • चौघाट ग्रीन डॉर्फ 

  • ३ ते ४ वर्षात फलधारणेस सुरवात होते.  प्रतिवर्षी ३० ते १०७ नारळ मिळतात. 
  • प्रति नारळात ३८ ते १०० ग्रॅम खोबरे असते. 
  • चौघाट ऑरेंज डॉर्फ

  • प्रतिवर्षी ५० ते १२० फळांचे उत्पादन मिळते.  फळात खोबरे ११२ ते १८८ ग्रॅम असते.
  • शहाळ्याचे पाणी तुलनेने इतर जातीपेक्षा गोड असते. 
  • मलायन ग्रीन डॉर्फ, मलायन यलो डॉर्फ ३ ते ४ वर्षात फुलोरा येण्यास सुरवात होते. मलायन ग्रीन डॉर्फ या जातीचे प्रती वर्षी ३९ ते १२० नारळ उत्पादन मिळते. फळात १३८ ते १६८ ग्रॅम खोबरे असते. तेलाचे प्रमाण ६६ ते ६७ टक्के असते.  गंगा बोंडम

  • ४ ते ५ वर्षात फलधारणा सुरू होते. प्रति वर्षी ५० ते ९० नारळाचे उत्पादन मिळते.
  • सरासरी १६० ग्रॅम खोबरे आणि ६८ टक्के तेलाचे प्रमाण असते. 
  • संकरित जाती  टी बाय डी ( केरासंकरा) 

  • ४ ते ५ वर्षात फळधारणा सुरू होते. प्रति झाड  १०० ते १६० फळांचे उत्पादन मिळते.  
  • नारळात १७४ ते १९६ ग्रॅम खोबरे असते. तेलाचे प्रमाण ६८ टक्के आहे. 
  • डी बाय टी (चंद्रसंकरा) 
  • ४ ते ५ वर्षात फळधारणा सुरू होते.  प्रती वर्षी १४० फळांचे उत्पादन मिळते. 
  • फळात खोबऱ्याचे प्रमाण २१५ ग्रॅम असते. तेलाचे प्रमाण ६८ टक्के असते. 
  • कोकण भाट्ये कोकोनट हायब्रीड १ 

  • ही जात गंगाबोंडम ग्रीन डॉर्फ (ठेंगू) आणि ईस्ट कोस्ट टॉल (उंच) यांच्या संकरातून तयार झाली आहे.
  • पाचव्या वर्षापासून उत्पादनाला सुरवात होते. प्रति वर्षी १० वर्षांपासून १२२ नारळ मिळतात. -खोबऱ्याचे वजन १६९ ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६७.१० टक्के असते. 
  •  गोदावरी गंगा 

  • लागवडीनंतर ४ ते ५ वर्षात फुलोऱ्यात येते.  प्रती वर्षी १४० फळांचे उत्पादन. 
  • फळामध्ये १५० ग्रॅम खोबरे मिळते. तेलाचे प्रमाण ६८ टक्के आहे. 
  • - ०२३५२ - २५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com