शेतीसह पर्यावरणाचे संवर्धन

मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू गभाले आपल्या चार एकर शेतीत फळबागा, औषधी व मसाला पिके, रानभाज्या आदींची विविधता तयार केली आहे. पारंपरिक पिकांतून अर्थार्जन होत असले तरी तेवढ्यावर समाधान न मानता शेती- पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण हेच जीवनाचे उद्दिष्ट ठेवत त्यानुसार आदर्श व अनुकरणीय वाटचाल केली आहे.
केळी पिकात तुकाराम व कलावती हे गभाले कुटुंब.
केळी पिकात तुकाराम व कलावती हे गभाले कुटुंब.

मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू गभाले आपल्या चार एकर शेतीत फळबागा, औषधी व मसाला पिके, रानभाज्या आदींची विविधता तयार केली आहे. पारंपरिक पिकांतून अर्थार्जन होत असले तरी तेवढ्यावर समाधान न मानता शेती- पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण हेच जीवनाचे उद्दिष्ट ठेवत त्यानुसार आदर्श व अनुकरणीय वाटचाल केली आहे.  शेती व पर्यावरण संवर्धन हेच उद्दिष्ट ठेवून काहींनी आपले जीवन व्यतीत केलेले असते. नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील मान्हेरे गावचे तुकाराम भोरु गभाले हे त्यापैकीच एक आहेत. अकोले हा तालुकाच निसर्गरम्य व डोंगरदऱ्यांच्या कुशीत लपलेला आहे. शेती- पर्यावरणाचा सुंदर मेळ येथे पाहण्यास मिळतो. गभाले यांनी निसर्गाने दिलेले हे लेणे जपण्याचा प्रयत्न केला आहे. ७१ वर्षांच्या या तरुण शेतकऱ्याने खडकाळ माळरानावर बैलजोडीने सपाटीकरण करून शेतीत सोने पिकविले आहे. परिसरातील गावांमध्ये हिरवाई निर्माण व्हावी, पारंपारिक जंगलांचे जतन व वृद्धी व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.  शेतीत जपली विविधता गभाले शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु निसर्गाची शाळा त्यांनी कधी बंद होऊ दिली नाही. मान्हेरे कोदणी, रंधा, लाडगाव, टिटवी, डोंगरवाडी, पिंपरकणे आंबेवंगण अशा विविध गावांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झाले आहे. यात साग, बांबू, काशीद, चंदन शिवन, आंबा, काजू, जांभूळ, सुबाभूळ आदींचा समावेश होतो. गभाले यांची सुमारे चार एकर शेती आहे. यात त्यांनी फळबागा, रानभाज्या आदींची विविधता जपली आहे. आंब्याची सुमारे ७५ झाडे असून त्यात हापूस, लंगडा, दशहरी आदी वाण आहेत. केळीची सुमारे ५५ झाडे असून, वेलची किंवा देशी प्रकारची झाडे आहेत. पपई व चिकूची प्रत्येकी १० झाडे, जांभळाची ५ झाडे आहेत. सागाची तब्बल एक हजार झाडांची लागवड त्यांनी १९९४ पासून केली आहे. याशिवाय पेरू, लिंबू, सीताफळ, रामफळ, ब्राझीलियन चेरी, हिरडा, बेहडा, बांबू, ऐन, चंदन, सादडा, खैर, अर्जुन, काटेसावर, बहावा, शिंधी, बेल अशा कितीतरी प्रकारच्या वनस्पतींचे आपल्या शेतात संवर्धन केले आहे. औषधी, मसाला वनस्पती, रानभाज्या  देशी शतावरीचे तीन वेल ९ ते १० वर्षांपासून, अडुळसा, निर्गुडी, देशी हळद १९९४ पासून, देशी केळी,  नागफणी अशा वनस्पतीही गभाले यांच्याकडे पाहण्यास मिळतात. दालचिनीची सात झाडे, मिरीचे दोन वेल यांच्यासह अळूचे चार प्रकार त्यांच्याकडे आहेत. छोटी पाने, लवकर शिजणारे असे प्रकार त्यात आहेत. चिचोर्डीसारखी वांग्यासारखी रानभाजी त्यांनी लावली आहे. पित्तावर ती गुणकारी आहे. चाईचा मोहोर ही देखील रानभाजी आहे. त्याच्या देठांची तसेच मोहोरांची भाजीही केली जाते असे ते सांगतात.  हंगामी पिके या व्यतिरिक्त खरिपात भात, भाजीपाला, रब्बीत हरभरा, गहू आदी पिके ते घेतात. भाजीपाल्याची थेट विक्री करण्यावर त्यांचा भर आहे. गभाले गुरुजी मोठ्या आनंदाने वृक्ष लागवडीबद्दल विद्यार्थी, शिक्षक गावातील तरुणवर्ग, बचत गटातील महिला, विविध संस्था यांना मोठ्या उत्साहात मार्गदर्शन करीत असतात. शेतावर लावलेली झाडे म्हणजे आपले निवृत्ती वेतन आहे असे ते आनंदाने सांगतात.आपली ही संवर्धनाची चळवळ तरूणांनी पुढे नेली पाहिजे हीच त्यांची अपेक्षा असेल.  ओढ्याची दुरुस्ती व बंधारा  शेतीला शाश्‍वत पाणी मिळण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचे अर्थसाह्य घेऊन बंधारा बांधला. त्यामुळे बाराही महिने शेतीला पाणी मिळण्याची संधी तयार झाली. परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनाही त्यामुळे पाणी उपलब्ध होणार आहे. जनावरांच्या शेणापासून गोबर गॅस प्लॅंट सुरू केला असून, त्याद्वारे घरातील स्वयंपाक बनविण्यात येतो. विविध प्रकारची फुलझाडे लावून त्यापासून उत्पन्नस्रोत तयार करण्याचा प्रयत्न आहे. कंपोस्ट खत तयार करून त्याची विक्री होते. ‘बायफ’ संस्थेच्या मदतीने त्यांनी बियाणे बँक तसेच शेतकऱ्यांचा बचत गट स्थापन केला आहे. पद्‌मश्री राहीबाई पोपेरे, ममताबाई भांगरे यांनाही ते शेतीबाबत सहकार्य करतात. अखंड कार्यरत पत्नी कलावती यांची त्यांना साथ आहे. दोन मुले नोकरीला असूनही ते सवड मिळेल त्यानुसार शेतीत मदत करतात दररोज पहाटे उठून शक्य ते किलोमीटर अंतर पायी चालण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. फिरून आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करतात. जनावरे घेऊन चरण्यासाठी बाजूच्या जंगलात जातात. त्यानंतर सकाळी भाजीपाला विकण्यासाठी जवळच गावात जातात. दोनशे ते पाचशे रुपयांची थेट विक्री करतात. पुन्हा शेती काम व वृक्ष लागवडीच्या कामात ते व्यग्र होतात. सतत हसतमुख व भेटीसाठी आलेल्यांना प्रेमाचा अनुभव देणारे गभाले बाबा आदिवासी भागात परिचित आहेत. उतरत्या वयातही शेतीत काहीतरी प्रयोग करण्याचा त्यांचा उत्साह असतो. काश्मीरचा लाल तांदूळ, परदेशी जांभळा तांदूळ, इंद्रायणी आदी वाणांचे प्रयोग त्यांनी केले. सर्व विक्रीतून वर्षाला किमान तीन लाख रुपये उत्पन्न ते मिळवतात. फळबागांपैकी काही झाडे उत्पादनक्षम होत आहेत. त्यांच्यापासून उत्पन्न पुढे सुरू होईल.     - तुकाराम गभाले, ९४२३७४९८४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com