अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची उभारणी

चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ.
Construction of mushroom Spawn Laboratory
Construction of mushroom Spawn Laboratory

चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ. लोकांमध्ये अळिंबी लागवडीबद्दल बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. अळिंबी लागवडीतून स्वयंरोजगार आणि शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होत आहे. अळिंबी बियाणे किंवा स्पॉनची गुणवत्ता थेट अळिंबी उत्पादनावर परिणाम करते. प्रत्येक अळिंबी प्रजातीचे विशिष्ट बीज असते. भारतात केवळ ४ प्रजातींची (बटन अळिंबी, धिंगरी अळिंबी, भात पेंढ्यावरील अळिंबी आणि दुधी अळिंबी) व्यावसायिकरित्या मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यामुळे फक्त त्यांचे स्पॉन तयार होतात. सध्या महाराष्ट्रामध्ये वार्षिक २५ हजार मे. टनांपेक्षा जास्त अळिंबीचे उत्पादन होत असून त्यासाठी साधारणपणे १४०० मे. टन स्पॉनची आवश्‍यकता लागते. सध्या बरेचशे मोठे बटन अळिंबी उत्पादक परदेशातून स्पॉन आयात करतात. परंतु, देशांतर्गत देखील उत्कृष्ट प्रतीचे स्पॉन उत्पादित होऊ शकते. अळिंबी स्पॉन निर्मिती हा एक स्वतंत्र जोड धंदा किंवा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून करता येऊ शकतो. चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी सुसज्ज सर्व सोयी सुविधायुक्त प्रयोगशाळेची आवश्‍यकता असते. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री बाबत आज माहिती घेऊ. स्पॉन निर्मिती युनिटची जागा आणि आराखडा 

  • मध्यम आकाराच्या स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेचे (उत्पादन क्षमता किमान २५ टन प्रती वर्ष) एकूण बांधकाम क्षेत्र ९० ते १०० चौ.मी. असावे.
  • या क्षेत्राची विभागणी साठवणगृह, धान्य उकळणे, रसायने मिसळणे आणि पिशव्या भरण्यासाठी एक खोली, ॲटोक्लेव्हिंग खोली, इनॉकुलेशन खोली, उबवणी कक्ष, शीतगृह, कार्यालय व विक्री खोली अशी असावी.
  • हे युनिट कंपोस्टिंग यार्ड आणि अळिंबी वाढ गृहापासून वेगळे असावे.
  • स्पॉन निर्मितीसाठी आवश्‍यक बाबी  दरमहा २ टन स्पॉन तयार करण्यासाठी खालील बाबींची आवश्‍यकता लागते. साठवण खोली 

  • कच्चा मालाच्या साठवणुकीसाठी ही खोली आवश्‍यक आहे. उदा. गहू व इतर धान्य, रसायने, पॉलीप्रोपिलिन पिशव्या, पीव्हीसी पाइप्स, कापसाचे बंडल.
  • त्यामध्ये जास्तीत जास्त जागेच्या वापर करता यावा, यासाठी किमान ४ ते ५ मांडण्या असाव्यात. खोली ४ बाय ४ मीटर अळिंबी आकाराची असावी.
  • धान्य उकळणे आणि पिशव्या भरण्यासाठी खोली 

  • सदर खोली मोठ्या आकाराची (७ बाय ४ मीटर) असावी.
  • याठिकाणी पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची उत्तम सोय असावी.
  • ही खोली धान्य धुणे, उकळणे आणि पिशव्या भरण्यासाठी वापरली जाते.
  • या खोलीत १ किंवा २ सीलिंग पंखे आणि एक हवा बाहेर फेकणारा पंखा बसवावा. जेणेकरून धान्य लवकर सुकविले जाईल.
  • केटलच्या विरुद्ध बाजूस ग्रॅनाईट किंवा सिंमेटमध्ये बनवलेला एक ओटा (प्लॅटफॉर्म) असावा. त्याचा वापर धान्यामध्ये रसायने मिसळणे, पिशव्या भरणे आणि बेसिनमध्ये साहित्य धुण्यासाठी करता येतो.
  • ओटा १.१० मी.(उंच), ०.९ मी. (रुंद) आणि ४ मी. लांब असावा.
  • ॲटोक्लेव्हिंग खोली 

  • पिशव्या भरल्यानंतर त्या निर्जंतुकीकरणासाठी ॲटोक्लेव्हिंग रूममध्ये आणल्या जातात.
  • या खोलीचा आकार ४ बाय ३ मीटर किंवा ॲटोक्लेव्हच्या आकारमानानुसार ठरवावा.
  • ॲटोक्लेव्हिंग खोली आणि इनॉकुलेशन चेंबर दरम्यान १ लहान खिडकी असावी. त्यातून निर्जंतुकीकरण केलेल्या पिशव्या थेट इनॉकुलेशन खोलीत नेता येतील किंवा ॲटोक्लेव्हिंग आणिइनोकुलेशन रूममधील भिंतीमध्ये दोन दरवाज्यामध्ये ॲटोक्लेव्ह अशा पद्धतीने बसवावा की निर्जंतुकीकरण केलेल्या पिशव्या थेट इनॉकुलेशन खोलीत उघडणाऱ्या दरवाजातून काढून घेता येतील.
  • इनॉकुलेशन खोली 

  • इनॉकुलेशन खोलीचा आकार ४ बाय ३ मीटर असावा.
  •  खोलीत दरवाज्याच्या विरुद्ध बाजूस अतिनील प्रकाशाची ट्यूब (U.V. tube) बसवून घ्यावी. त्याचा लाल रंगाचा सूचक दिवा (बल्ब) दरवाज्याच्या बाहेर लावावा. - या खोलीत एका बाजूला लॅमिनार एअर फ्लो मशिन ठेवण्यासाठी ॲल्युमिनिअम फ्रेम आणि काचेची छताला भिडेल अशी एक विभाजक भिंत करावी. हवा जाऊ नये यासाठी घट्ट दरवाजा बसवावा.
  • उबवणी कक्ष 

  • ही साधारण ४ बाय ४ मीटरची खोली असते. यामध्ये उबवणीसाठी आवश्‍यक वातावरण नियंत्रित केले जाते.
  • या खोलीमध्ये जास्त पिशव्या ठेवता येण्यासाठी १.५ मीटर लांबीच्या ३५ ते ४० सेंमी रुंदीच्या पाच स्थरीय १२ ते १५ लोखंडी मांडण्या ठेवाव्यात. मांडणीच्या दोन थरांमध्ये ३० सेंमी अंतर असावे.
  • दीड मीटर लांबीच्या एका मांडणीवर अर्धा किलोच्या ३५० ते ३६० तर एक किलोच्या २९० ते ३०० पिशव्या बसतात.
  • उबवणी कक्ष पूर्णपणे पृथक्इ (इन्सुलेटेड) असला पाहिजे. तापमान (२५ अंश सेल्सिअस) नियंत्रित करण्यासाठी १ किंवा २ वातानुकूलित सयंत्रे (प्रत्येकी १.५ क्षमता) आवश्‍यक आहेत.
  • शीतगृह 

  • शीतगृहाचा आकार ४ बाय ३ मीटर असावा. यामध्ये तयार झालेल्या स्पॉन पिशव्या साठविल्या जातात.
  • शीतगृह पूर्णपणे पृथक् (इन्सुलेटेड) केले पाहिजे. त्यातील तापमान ४-५ अंश सेल्सिअस दरम्यान नियंत्रित करावे.
  • सर्व भिंती, छत तसेच दरवाजा यास जाड इन्सुलेशन (७.५-१० सेंमी जाड) करावे. खोलीच्या आतील तापमान नियंत्रित करण्यासाठी २ एअर कंडिशनर बसवावेत.
  • शीतगृहाला १ हवाबंद दरवाजा असावा. दरवाजाच्या वर हवा पडदा (Air curtain) बसविणे आवश्‍यक आहे.
  • कार्यालय आणि विक्री खोली कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व विक्री करण्यासाठी पुरेशी जागा असावी. तेथे टेबल, सेलिंग काउंटर, तिजोरी मांडणी अशी व्यवस्था असावी.  व्हरांडा (कॉरिडॉर)  स्पॉन युनिटच्या मुख्य प्रवेशामध्ये ४ बाय २ मीटरचा पूर्णपणे टाईल्स बसविलेला व्हरांडा असावा. मुख्य प्रवेशावरील दरवाजास देखील हवेचा पडदा बसविणे आवश्यक आहे. व्यावसायिक स्पॉन उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे  स्पॉन उत्पादनासाठी धान्य साठवण्याच्या कोठ्या ६ (५ क्विंटल क्षमता), धान्य भिजविणे आणि उकळण्यासाठी मोठी पातेली ४ (५० लिटर क्षमता) किंवा बॉईलिंग केटल १ (१०० किलो क्षमता), एक ॲटोक्लेव्ह (७५० मिमी खोली आणि ५५० मिमी व्यास), लॅमिनार एअर फ्लो (६ फूट लांब), बीओडी इनक्युबेटर (९० x ९० x ९० सेंमी), रेफ्रिजरेटर (२१० लिटर क्षमता), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पिशव्या ठेवण्यासाठी पाच स्थरीय १५ मांडण्या, वाहतुकीसाठी ट्रॉली, हवा बाहेर फेकणारे दोन पंखे, हवेचे पडदे ३, उच्च दाब गॅस शेगडी, पी.एच. मीटर. आवश्यक वस्तू  गहू धान्य, स्पिरीट, पॉलीप्रॉपिलिन पिशव्या (१४" x ७" किंवा १६" x १०"), पीपी नेक, ॲप्रॉन, स्लीपर, ग्लूकोजच्या बाटल्या, अ‍ॅल्युमिनियम फॉईल. इतर किरकोळ साहित्य  लोखंडी फ्रेमवर बसविलेल्या मोठ्या आकाराच्या (४’ x ४’) ४ ते ५ चाळण्या, २ स्पिरीट दिवे किंवा गॅस बर्नर, ४ इनॉकुलेशन निडल, आवश्यकतेनुसार शोषकरहित कापूस, रबरी हात मौजे (ग्लोव्हज), मलमल कापड. काचेचे साहित्य (ग्लासवेअर)  टेस्ट ट्यूब, पेट्री डिश, कोनिकल फ्लॉस्क, बिकर्स, मेजरिंग सिलिंडर, फनेल्स, पिपेट्स, माध्यम (मीडिया). - डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com