कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्र

कोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती निसर्गतः किड्यांच्या अळ्या आणि कोषामध्ये वाढते. ही अळिंबी औषधी बुरशीचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. या अळिंबीस हिवाळ्यातील कीड, उन्हाळी गवत असेही म्हणतात. यामधील अनेक जैवसक्रिय घटकांमुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
Cordyceps mushroom production technique
Cordyceps mushroom production technique

कोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती निसर्गतः किड्यांच्या अळ्या आणि कोषामध्ये वाढते. ही अळिंबी औषधी बुरशीचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. या अळिंबीस हिवाळ्यातील कीड, उन्हाळी गवत असेही म्हणतात. यामधील अनेक जैवसक्रिय घटकांमुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.  कोर्डिसेप्स अळिंबी थंड प्रदेशीय जंगले आणि आर्द्र समशीतोष्ण भागामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. या अळिंबीच्या ४०० हून अधिक प्रजाती आहेत. मात्र, कॉर्डिसेप्स सायनेंसिस आणि कॉर्डिसेप्स मिलिटारिस या दोनच प्रजाती आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. आतापर्यंत कॉर्डिसेप्समधून अनेक जैवसक्रीय (बायोॲक्टिव्ह) घटक (नुक्लिओसाईड्स, कॉर्डीसेपिन, अडेनोसाइन, पॉलिसॅकराइड्स, एर्गोस्टेरॉल, मॅनिटॉल, प्रथिने, अमिनो आम्ले, पॉलीपेप्टाईड्स) काढण्यात आले आहेत. या सर्व घटकांमुळे कॉर्डिसेप्स शरीराला बहुअंगाने फायदेशीर ठरते. कोर्डिसेप्स अळिंबीचे बाजारातील मूल्य हे त्यातील कॉर्डीसेपिन या घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते.  या अळिंबीमध्ये सूज विरोधी, कर्करोग विरोधी, कावीळ संरक्षणात्मक, थकवा, अतिसार, डोकेदुखी, खोकला, संधीवात, यकृत रोग, मूत्रपिंडाचा आजार आणि नपुंसकता यासंबंधीच्या आजारांसाठी प्रभावी गुणधर्म आहेत. त्यामुळे या अळिंबीची लागवड करणे फायदेशीर आहे. लागवड तंत्रज्ञान

  • गेल्या दशकापर्यंत कोर्डिसेप्स ही फक्त नैसर्गिकरीत्या येणारी अळिंबी म्हणून ज्ञात होती. परंतु अलीकडे ती कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत रेशीम किडे, तांदूळ किंवा विशिष्ट द्रव माध्यमावर चांगल्या प्रकारे वाढवता येऊ शकते. यासाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक प्रयोगशाळेची आवश्यकता असते. 
  • मात्र कमीत कमी साधनसामुग्री सह कोर्डिसेप्स अळिंबीची लागवड करता येते. यासाठी साधारणपणे १०० ते १५० वर्गफूट आकाराच्या २ ते ३ खोल्यांची आवश्‍यकता असते. त्यामध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी ३ ते ४ लाख रुपये पुरेसे होतात.
  • हा खर्च बटन अळिंबीला येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. शिवाय कमी खर्चात जास्त आर्थिक फायदा होतो.
  • प्रयोगशाळेतील सुविधा  प्रयोगशाळेमध्ये १ व्हर्टीकल ॲटोक्लेव्ह, लॅमिनार एअर फ्लो, डोअर कर्टन, ह्युमिडीफायर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा (०.००१ ग्रॅम अचूकता), एसी युनिट्स २, स्टीलच्या मांडण्या, काचेचे साहित्य (कोनिकल फ्लास्क, अर्धा किलो क्षमतेच्या छोट्या बरण्या अशा यंत्रसामुग्रीची आवश्यकता असते.  शुद्ध कल्चर 

  • कोर्डिसेप्स अळिंबीची लागवडीसाठी त्याचे शुद्ध कल्चर असणे अत्यावश्यक आहे.  
  • ताज्या कोर्डिसेप्स अळिंबीतून  शुद्ध कल्चर वेगळे करावे. (आयसोलेशन) किंवा अळिंबी संशोधन संचालनालय, सोलन (हिमाचल प्रदेश) येथून शुद्ध कल्चर मागवावे.
  • या शुद्ध कल्चरचे संवर्धन पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर (पी.डी.ए.) स्लँट आणि वृद्धीकरण पेट्री प्लेट किंवा चपट्या बाटलीतील पी.डी.ए. माध्यमावर करावे.  
  • अळिंबी वाढीसाठी माध्यम तयार करणे

  • कोर्डिसेप्स अळिंबीच्या वाढीसाठी ब्राऊन राइस नुट्रीयंट माध्यम किंवा इतर अनेक प्रकारच्या माध्यमांचा वापर केला जातो. 
  • त्यासाठी सुरवातीला ब्राऊन राइस स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. नंतर तो स्वच्छ कपड्यावर ३० मिनिटे सुकवून घ्यावा. 
  • नुट्रीयंट माध्यम तयार करून ते प्रत्येक बरणीमध्ये ४० मि.लि. या प्रमाणात भरून घ्यावे. त्यामध्ये २० ते २५ ग्रॅम ब्राऊन राइस टाकावा. 
  • त्यानंतर भरणीला झाकण व्यवस्थित लावावे किंवा भरणीचे तोंड पॉलीप्रोपिलीन कागद व रबर बँडच्या साह्याने चांगले घट्ट बांधावे. 
  • या भरण्या १५ पी.एस.आय. दाबावर ४०-४५ मिनिटे ॲटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करून घ्याव्यात.
  • द्रवरूप स्पॉन तयार करणे 

  • पोटॅटो डेक्स्ट्रोज अर्क व इतर अल्प प्रमाणात लागणाऱ्या घटकांपासून (पोटशिअम, फॉस्फेट, मॅग्नेशिअम) द्रवरूप स्पॉन तयार करतात. 
  • साधारणतः ५०० मिलि द्रवरूप पोटॅटो डेक्स्ट्रोज अगर माध्यम १ लिटर क्षमतेच्या काचेच्या फ्लास्क (चंचूपात्र) मध्ये भरून घ्‍यावे. त्यास कापसाचा बोळा घट्ट बसवून ॲटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करून घ्यावे. 
  • माध्यम थंड झाल्यानंतर लॅमिनार एअर फ्लो मध्ये त्यात पी.डी.ए. स्लँट वर वाढवलेल्या कोर्डिसेप्सच्या शुद्ध कल्चरचा एक तुकडा टाकावा. 
  • या काचेच्या फ्लास्क शेकिंग मशिनवर ४ ते ५ दिवस सतत हलत्या ठेवाव्यात. अशाप्रकारे पाच दिवसानंतर चांगल्या प्रकारचे द्रवरूप स्पॉन तयार होईल.
  • इनॉकुलेशन

  • भरण्या निर्जंतुक केल्यानंतर त्या  लॅमिनार एअर फ्लो मध्ये ठेवून थंड कराव्यात. 
  • प्रत्येक बरणीत सिरींज (इंजेक्शन) च्या साह्याने ५ ते १० मिलि द्रवरूप स्पॉन टाकावे. आणि ते हळुवारपणे संपूर्ण माध्यमावर चांगले पसरून घ्यावे. 
  • उबवणी (इन्कुबेशन)

  • इनॉकुलेशन नंतर पुढील ८-१० दिवस बरण्या एका अंधाऱ्या खोलीत मांडणीवर ठेवाव्यात.
  • खोलीतील तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस व आर्द्रता ६५ ते ७० टक्के च्या दरम्यान ठेवावे. 
  • या काळात भरणीतील संपूर्ण माध्यमावर पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते. 
  • भरणीस सलग ७ दिवस प्रकाश दिल्यावर पांढरी बुरशी पिवळसर-नारंगी रंगाची होते. त्यानंतर भरणीस रोज १२ तास १००० लक्स प्रकाश मिळेल अशी व्यवस्था करावी. 
  • किमान १० ते १५ दिवसांत अंकुर दिसायला लागतात. आणि पुढील २०-२५ दिवसांत फळांची पूर्ण वाढ होण्यास मदत होते. 
  • या काळात वाढ गृहामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण वाढू नये, यासाठी रोज ठराविक वेळानंतर ताज्या हवेचा पुरवठा करावा.
  •  साधारणपणे ४० ते ५० दिवसांत फळांची लांबी ६ ते ७ सेंमी होते. 
  • काढणी व विक्री 

  • अळिंबीच्या टोकाकडील भाग फुगीर (दंडगोलाकार) झाल्यानंतर फळांची काढणी करावी. 
  • भरणीतील तयार झालेली अळिंबी हलक्या हाताने काढावी.
  • काढलेली अळिंबी वाळवून ती छोट्या पाकिटात (१० ते ५० ग्रॅम) भरून हवाबंद करावी.
  • - डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com