पेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी गेल्या सात वर्षांच्या प्रयोगातून शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. शेणखताच्या ब्रिकेट्स बियाण्यासोबत कशा पेरता येतील याबाबत स्वतःच्या शेतीत प्रयोग केले.त्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे.
पेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...
पेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...

मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी गेल्या सात वर्षांच्या प्रयोगातून शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. शेणखताच्या ब्रिकेट्स बियाण्यासोबत कशा पेरता येतील याबाबत स्वतःच्या शेतीत प्रयोग केले. त्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांत जमिनीची सुपीकता कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला पुरेसे शेणखतही मिळत नाही. पावसाळ्याच्या अगोदर शेतात शेणखताचे ढीग लावून मजुरांतर्फे खत विस्कटले जाते. उष्ण तापमानामुळे शेणखतातील ओलावा उडून जातो. जोरदार वळीव पाऊस झाल्यास काही शेणखत वाहून जाते. यावर बरेच तज्ज्ञ आणि शेतकरी उपाय शोधत आहेत. यापैकीच एक आहेत मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक. कमी झालेली शेणखताची उपलब्धता आणि वाढता दर, मजुरी लक्षात घेता त्यांनी शेणखताच्या ब्रिकेट्स तयार करण्याचे यंत्र तयार केले आहे. या यंत्राची त्यांनी पेटंटसाठी नोंदणी केली आहे.

असे आहे यंत्र :

  • ब्रिकेट तयार करण्याचे मिश्रण भरण्यासाठी नऊ इंच व्यास आणि नऊ इंच उंचीचा गोलाकार ड्रम. त्याच्या तळाला छिद्रे असलेली प्लेट. ड्रमच्या दोन्ही बाजूला दोन स्टॅन्ड आहेत. ड्रमवर दोन चॅनेलमध्ये चार स्प्रिंग.
  • ड्रममध्ये शेण आणि घटकांचे सहा किलो ओलसर मिश्रण भरल्यानंतर त्यावर प्लेट बसविली जाते. ड्रममधील मिश्रणावर दाब देण्यासाठी जॅक आहे. जॅक वर चढताना प्लेटवर दाब पडतो आणि ड्रममधील मिश्रण छिद्राच्या प्लेटमधून ब्रिकेटच्या स्वरूपात खाली पडते. जॅकला लॉक बसविलेले असते. लॉक खोलले की जॅकमधील दाब निघून तो मूळ स्थितीत येतो. त्यानंतर पुन्हा ड्रममध्ये मिश्रण भरता येते.
  • एका तासामध्ये ५० किलो ब्रिकेट. या ब्रिकेट दोन दिवस उन्हात वाळल्यावर २० ते २५ किलो होतात.
  • ब्रिकेट तयार करण्यासाठी वैभव मोडक वाळलेले शेण पावडर ६० किलो, १० किलो लेंडी खत, १० किलो कोंबडी खत, ५ किलो निंबोळी पेंड, ५ किलो वाया जाणारे धान्य (मोड आणून पेस्ट करावी), १० किलो गोठ्यातील शेणमूत्र मिश्रित माती हे मिश्रण वापरतात. पाच दिवस दररोज पाणी मिसळून हे मिश्रण चांगले मळले जाते. ब्रिकेट तयार करण्यापुर्वी हे मिश्रण चांगले मळून थोडे ओलसर असताना ड्रममध्ये भरतात.
  • बियाण्यासोबत ब्रिकेट पेरणीसाठी मोडक यांनी मोठे छिद्रे असलेले चाढे तयार केले. हे चाढे कोणत्याही तिफणीला बसविता येते. ब्रिकेट तिफणीच्या मागील बाजूने पडाव्या लागतात. कारण फणाची छिद्रे मोठी करता येत नाहीत. यासाठी तिफणीच्या मागील बाजूने प्रत्येक फणामागे ‘U` आकाराची लोखंडी क्लिप वेल्डिंग करावी. त्यामुळे ब्रिकेट पेरणीच्या चाढ्याचा मोठा पाइप त्यात बसतो आणि ब्रिकेट बियाण्यासोबत जमिनीत गाडली जाते.
  • ब्रिकेट वापरण्याचे अनुभव शेणखत ब्रिकेट वापरण्याच्या अनुभवाबाबत मोडक म्हणाले की, एकरी सरासरी दोन टन शेणखत मिसळले जाते. परंतू १८ इंची तिफणीने पेरणी करताना एकरी १३९ ओळी बसतात. त्या ओळीमध्ये बियाण्यासोबत २०० किलो शेणखत ब्रिकेट पुरेशा ठरतात. १८ इंची तिफणीने पेरणी करताना चार इंच रुंदीचा रूट झोन तयार होतो. ब्रिकेट या रूट झोनमध्ये पडल्याने रोपवाढीस फायदा होतो. शेतकरी एकरी सरासरी पाच हजाराचे शेणखत वापरतो. परंतू शेणखताच्या ब्रिकेट्स तिफणीने पेरल्याने मला शेणखताचा ५०० रुपये खर्च येतो. पेरणीपूर्वी वाळलेल्या ब्रिकेटवर माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जिवाणू संवर्धकाच्या द्रावणाची फवारणी केल्यामुळे हे घटक थेट मुळांना उपलब्ध होण्यास मदत होते.   गेली सात वर्षे मी ब्रिकेट्सचा वापर करत आहे. दरवर्षी ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा पिकासाठी ब्रिकेट्स वापरतो. ब्रिकेट्समुळे शेणखत खरेदीचा खर्च कमी झाला. पिकाला योग्य अन्नद्रव्ये मिळतात. किमान पाच ते दहा टक्यांपर्यंत उत्पादनात वाढ मिळाली. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. ब्रिकेटमुळे ओलावा टिकून रहातो. पावसाच्या ताणाच्या काळात मुळांना ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळतात. मी आता रासायनिक खतांचा वापर करत नाही. यंत्र बनविण्यासाठी पाच हजाराचा खर्च आला. यंत्रामध्ये अजून सुधारणा करणार आहे. हे यंत्र आयआयटी,मुंबई आणि गुजरातमधील सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी संस्थेच्या तज्ज्ञांना दाखविले आहे.

    संपर्क : वैभव मोडक : ९४२०९१६८५८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com