agricultural news in marathi created a sustainable market for mushroom products | Page 2 ||| Agrowon

अळिंबी उत्पादनाला तयार केली शाश्‍वत बाजारपेठ

विनोद इंगोले
मंगळवार, 29 जून 2021

शेतीतील पीक अवशेषावरच अळिंबी उत्पादन घेत मोझर (ता. नेर, यवतमाळ) येथील सतीश व वैशाली मोहरकर या दांपत्याने चांगला प्रयोग केला आहे. अळिंबी विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच हळूहळू बाजारपेठ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. 
 

केवळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहिल्यास एखाद्या वर्षी पावसाची साथ न मिळाल्यास कुटुंबांचा उदरनिर्वाहही धोक्यात येतो. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतीतील पीक अवशेषावरच अळिंबी उत्पादन घेत मोझर (ता. नेर, यवतमाळ) येथील सतीश व वैशाली मोहरकर या दांपत्याने चांगला प्रयोग केला आहे. अळिंबी विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच हळूहळू बाजारपेठ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील मोझर (ता. नेर) येथील सतीश मोहरकर यांच्या नावे पाच एकर तर पत्नी वैशालीच्या नावे तीन एकर शेती आहे. अशा आठ एकर शेतीमध्ये खरिपात सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जाते. कोरडवाहू असलेल्या या शिवारात त्यांनी या वर्षीच विहीर खोदली. २४ फूट खोलीवर या विहिरीला चांगले पाणी लागले असून, पुढील काळात सिंचनाची शाश्‍वत सोय साधली जाणार आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी सहा क्विंटल प्रति एकर मिळते, तर तुरीचेही देखील एकरी सरासरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे मोहरकर सांगतात. आता पाण्याची सोय झाल्याने उत्पादनात वाढ होण्याची आशा आहे.

अळिंबी व्यवसायाला सुरुवात
एका खासगी कंपनीने अळिंबी उत्पादनाविषयी घेतलेल्या प्रशिक्षणाने सतीश मोहरकर यांच्या विचारांना बळ मिळाले. पण आधी १६ म्हशींसह सुरू केलेल्या दूध व्यवसायात अपेक्षित यश आलेले नसल्याने त्यांचे धाडस होत नव्हते. दरम्यान, शिरजगाव येथील त्यांच्या मित्राने अळिंबी उत्पादन सुरू केले होते. त्याच्या प्रकल्पाला भेट देत माहिती घेतली. व्यवसायाशी संबंधित बारकावे जाणून घेतल्यानंतर २०१६ मध्ये बंद केलेल्या गोठ्याचा वापर करत अळिंबी उत्पादनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी २०० बेड भरले. मात्र त्यानंतर प्रत्येक वर्षी १०० ते २०० बेड या प्रमाणे वाढ करत आता त्यांच्याकडे एक हजार बेड भरले जातात. 

अळिंबी उत्पादनाची प्रक्रिया 
एका अंधाऱ्या खोलीमध्ये आर्द्रतायुक्त वातावरण तयार केले जाते. तिथे दोरीचे शिंकाळे (रॅक) बसवले आहेत. या रॅकवर पाच किलोच्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये अडीच किलो सोयाबीन कुटार किंचित ओलसर करून भरले जाते. त्यात प्रत्येक थरानंतर अळिंबीचे स्पॉन यांचे टाकले जातात. या प्लॅस्टिक पिशवीचे तोंड बांधून रॅकमध्ये लटकवत ठेवले जाते. प्लॅस्टिक पिशवीला लहान छिद्रे पाडली जातात. साधारणपणे २०-२२ दिवस कालावधीत केवळ आर्द्रतायुक्त वातावरण ठेवले जाते. उत्पादनाच्या खोलीमध्ये सापेक्ष आर्द्रता ८० टक्क्यांवर आणि तापमान २० ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. याकरिता तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी या खोलीच्या पत्र्यावर तुराट्या टाकतात. तसेच खिडक्यांना बारदाने (पोती) लावली जातात. या पोत्यांवर सातत्याने पाणी शिंपडून ओली ठेवली जातात. त्यामुळे खोलीमध्ये सापेक्ष आर्द्रता व तापमान या पातळीपर्यंत ठेवणे शक्य होते. त्यानंतर प्लॅस्टिक पिशवीला असलेल्या छिद्रातून कोंब बाहेर येण्यास सुरुवात होते. पिशवीचा रंगही पांढरा होतो. काढणीयोग्य किंवा परिपक्व झालेल्या पांढऱ्याशुभ्र अळिंबी फूल प्लॅस्टिक पिशवीबाहेर काढले जाते. त्यानंतर पुन्हा कुटारावर पाणी मारले जाते. त्यातून पुन्हा अळिंबीची वाढ होते. अशा प्रकारे दोन महिने एकाच स्पॉनपासून उत्पादन घेता येते. एका स्पॉनपासून एक ते तीन काढण्या मिळतात. प्रत्येकवेळी २०० ते २५० ग्रॅम अळिंबीचे उत्पादन होते. अशा प्रकारे एका बेडपासून सरासरी एक ते दीड किलोपर्यंत उत्पादन मिळून जाते, असे मोहरकर दांपत्याने सांगितले.

थेट विक्रीचा पर्याय
एक हजार बेडसाठी एक क्विंटल स्पॉनची गरज भासते. त्या माध्यमातून एक हजार किलो ताजी अळिंबी मिळते. ओल्या अळिंबीला ग्राहकांची मागणी कमी असते. कारण याचा टिकवण कालावधी केवळ दोन ते तीन दिवसांचा आहे. तरीही दररोज सरासरी सहा किलो ओल्या अळिंबीची विक्री होते. अशा प्रकारे तीन क्विंटल ओली अळिंबी विकली जाते. तर उर्वरित ७ क्विंटल अळिंबी वाळवली जाते. वाळविल्यानंतर ७ क्विंटल ओल्या अळिंबीचे वजन अवघे ७० किलोपर्यंत होते. मात्र वाळवलेल्या अळिंबी ही वर्षभर चांगल्या प्रकारे राहू शकते. यामुळे त्याला अधिक दर मिळतो. 

ग्राहकांची वाढली मागणी
अळिंबी उत्पादन सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी त्यांची धडपड सुरू झाली. मोझरपासून नेर हे तालुक्याचे ठिकाण सात किलोमीटरवर आहे. येथील किराणा व्यावसायिकांशी संपर्क साधला. मात्र ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळेल, याविषयी शाश्‍वती नसल्याने त्यांनी घाबरतच अल्प प्रमाणात विक्रीस ठेवला. अळिंबी व त्यातील पोषक घटकांची माहिती ग्राहकांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहिल्यानंतर मागणी वाढत आहे. आता नेरसारख्या ठिकाणीही रोज पाच किलो ताजी अळिंबी विकली जात आहे. या व्यावसायिकांकडून मालाची मागणी फोनवरून नोंदविली जाते. मोहरकर यांनी मोझर ग्रामस्थांमध्येही विक्रीसाठी प्रयत्न केले. आता त्यांच्याकडूनही अळिंबीची मागणी होऊ लागली आहे. 

प्रयत्नांती परमेश्‍वर
सतीश व वैशाली मोहरकर या दांपत्याने अळिंबी उत्पादनाला २०० बेडपासून सुरुवात केली. त्यातून २ क्विंटल अळिंबी उत्पादन होत होते. दहा ते पंधरा किलो वाळलेली अळिंबी शिल्लक राहत होते. त्यामुळे निराशा वाढत होती. मात्र खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवले. नेरमधील विक्रेत्यांशी, व्यावसायिकांशी संवाद वाढविला. पहिल्यांदा त्यांना अळिंबी सेवनाचे फायदे पटवून दिले. त्यांच्याकडून वाळलेल्या अळिंबीला मागणी वाढत गेली. मोहरकर यांनी २०० बेडवरून आता एक हजार बेडपर्यंत व्यवसाय वाढवावा लागला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अळिंबी उत्पादनाची सारी जबाबदारी वैशाली मोहरकर या पार पाडतात. त्याची विक्री आणि शेतीचे व्यवस्थापन ही कामे सतीश मोहरकर सांभाळतात. सध्या त्यांच्याकडील अळिंबीची कायमस्वरूपी विक्री करणारी दालने ः किराणा व्यावसायिक -९, हॉटेल -४, पान टपरी -४, फळ विक्रेते २.

असे आहे अर्थशास्त्र

  • कुटार ः घरच्या शेतीतील असल्याने त्यावर फारसा खर्च होत नाही. अळिंबी उत्पादनानंतर त्याचा खत म्हणूनही वापर शक्य.
  • केव्हीके सांगवी रेल्वे (यवतमाळ) मार्फत स्पॉनची खरेदी नगर जिल्ह्यातून केली जाते. वाहतूक खर्चासह ते १०० रुपये प्रति किलोला मिळते. एका बेडसाठी १०० ग्रॅम स्पॉन पुरेसे असतात. एक किलो स्पॉनपासून १० बेड तयार होतात. त्यातून दहा किलो अळिंबी उत्पादन मिळते.
  • एक बेड भरण्यासाठी स्पॉन १० रुपये, प्लॅस्टिक पिशवी दीड रुपये, भराई मजुरी असा सर्व खर्च धरल्यास साधारणपणे २० रुपये खर्च होतो. 
  • बेड भरल्यानंतर पहिले उत्पादन २५ दिवसानंतर, त्याच बेडपासून चार ते पाच दिवसांत दुसरे उत्पादन आणि पुढे चार पाच दिवसांत तिसरे उत्पादन मिळते. अशा प्रकारे ३५ दिवसांत तीन उत्पादने मिळतात. ४० दिवसांत एक असे वर्षामध्ये ७ ते ८ वेळा उत्पादन मिळते. 
  • एका भराईमध्ये ७०० किलो ताजी अळिंबी उत्पादन मिळते. त्यातील सध्या ३० टक्के ताज्या स्वरूपात विकले जाते. ७० टक्के वाळवले जाते. 
  • ताज्या अळिंबीचा दर २५० रुपये किलो असतो. वाळवलेल्या अळिंबीला साधारणपणे एक हजार रुपये किलो किरकोळ विक्रीसाठी, तर ७०० रुपये किलो घाऊक विक्रीसाठी (पाच किलोच्या वर खरेदी करणाऱ्यांसाठी) दर असतो. 
  • अळिंबी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कौटुंबिक खर्चाचा ५० टक्क्यांपेक्षाही अधिक भार उचलला जात असल्याचे मोहरकर सांगतात.

- सतीश मोहरकर    ९१३०९५५३१२


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...
वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्रपुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी...
बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादनकचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष...
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...