agricultural news in marathi Cultivation of fodder crops in forestry is beneficial ... | Page 3 ||| Agrowon

वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...

संग्राम चव्हाण, विजयसिंह काकडे
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान वनीयकूरण आणि बांधवरती चारा पिकांची लागवड फायदेशीर ठरते. चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये सुबाभूळ, अंजन, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारूख, तुती, शेवगा, बाभूळ लागवड करावी.
 

वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान वनीयकूरण आणि बांधवरती चारा पिकांची लागवड फायदेशीर ठरते. चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये सुबाभूळ, अंजन, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारूख, तुती, शेवगा, बाभूळ लागवड करावी.

ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये पशुपालनाचे योगदान सुमारे १५ टक्के असून ग्रामीण भागातील दोन तृतीयांश लोकांचे जीवन निर्वाह यावर अवलंबून आहे. सध्या जनावरांसाठी मुख्य खाद्य स्रोत म्हणजे गवत, गायरान, सामुदायिक कुरणे, पिकाचे अवशेष, शेती-उत्पादने, शेतामध्ये लावलेला चारा, शेतातील तण, वृक्षांची पाने व शेती-औद्योगिक उपउत्पादने इत्यादी उपलब्ध आहेत.

भारत हा जैविविधतेच्या बाबतीत जगामध्ये प्रमुख देशांमध्ये येतो. देशात गवत कुळ वर्गाच्या १,२५६ प्रजातीपैकी एक तृतीयांश प्रजाती या चारा म्हणून उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे ४०० पेक्षा जास्त लेगुमिनोसी या कुळातील प्रजाती चारा म्हणून उपयुक्त आहेत.परंतु, देशाच्या एकूण भू-भागांपैकी फक्त ५ टक्के क्षेत्र चारापिके लागवडीखाली आहे. दर्जेदार खाद्य आणि चारा यांची उपलब्धता ही भारतातील पशुधन क्षेत्राची वाढ आणि उत्पादन क्षमतेची मोठी अडचण आहे. सध्या देशात २१ टक्के हिरवा चारा, २६ टक्के सुका चारा आणि ३४ टक्के खाद्याची निव्वळ तूट आहे.
राज्यात मका, बाजरी, ज्वारी, मेथी गवत, नेपियर चारा गवत ही मुख्य चारा पिके असून यांची लागवड ७० टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रात होते. याचबरोबर गिनी गवत, ऱ्होडस गवत, पॅरा ग्रास, नेपियर, दीनानाथ, अंजन, डोंगरी, पवना, स्टायलो, रानमूग व गोकर्णी सारख्या चारा पिकांचा समावेश होतो. चारा वृक्षांमध्ये सुबाभूळ, अंजन, निंबारा, कडुलिंब, हादगा, शेवरी, महारूख, तुती, शेवगा, बोर, बांबू व बाभूळ इत्यादींचा समावेश होतो.

चारा उत्पादनासाठी वनशेतीच्या पद्धती 
जनावरांच्यासाठी चाऱ्याची गरजा भागविण्यासाठी चारा क्षेत्र वाढविण्याबरोबरच त्याची गुणवत्ता वाढवली पाहिजे. जनावरांच्या चाऱ्याची पूर्तता करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रति एकक जमीन क्षेत्रावरती हिरव्या चाऱ्या उपलब्धता टिकवून उत्पादकता वाढविण्यासाठी नवनवीन पद्धतींचा उपयोग करणे. यामध्ये वनीयकुरण, कृषिवनीयकुरण, उद्यान वनीयकूरण आणि बांधवरती चारा पिके या पद्धतींचा वापर फायदेशीर ठरतो. या पद्धतींमुळे पडीक, बरड किंवा मुरमाड जमिनींचा पर्यायी वापर करून उत्पादकता, संसाधनाचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धनाबरोबर चारा, जळावू लाकूड, फळ आणि इमारती लाकूड मिळते. वनशेतीच्या विविध प्रणाली पर्यावरणीयदृष्ट्या व्यवहार्य आहेत. उदा. योग्य वनीयकुरण पद्धतीचा वापर केल्याने पडीक जमिनीची उत्पादकता ०.५ टन प्रति हेक्टर पासून १५ टन प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे शक्य होते. शेतकऱ्यांचा कल उद्यानिकीकुरण ही पद्धती अवलंबण्यास वाढत असून याद्वारे निकृष्ट दर्जाच्या जमिनीपासून फळ उत्पादनाबरोबर अतिरिक्त चारा उपलब्ध होतो.

चाऱ्याची आवश्यकता 
मोठ्या जनावरांना (म्हशी आणि गाई) सुमारे २० ते ३० किलो हिरवा चारा, ६ ते ८ किलो सुका चारा आणि २ किलो (+प्रती लिटर ४०० ग्रॅम) पशू खाद्य प्रती दिवस लागते. छोट्या जनावरांना (मेंढी आणि शेळी) ४ ते ५ किलो हिरवा चारा, १ किलो सुका चारा आणि २५० ग्रॅम पशू खाद्य प्रती दिवस आवश्यक असते. झाडांची पाने चारा म्हणून वापरल्याने उच्च पौष्टिक मूल्य आणि दुधाचे उत्पादन ३० टक्के आणि मांस उत्पादनात २५ टक्के वाढविण्याची क्षमता ठेवतात.

चारा देणाऱ्या वृक्षांची वैशिष्ट्ये 

 • वेगवान वाढ होऊन जमीन आच्छादन करून तणांची घनता कमी होते.
 • वारंवार रोपांची छाटणी आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता.
 • मृद व जल संवर्धन करून जमिनीची सुपीकता वाढते.
 • उच्च पुनरुत्पादन क्षमता, वारंवार लागवड आणि मशागतीचा कमी खर्च.
 •  विस्तृत अनुकूलनक्षमता, ताणतणावाच्या परिस्थितीत वाढू शकते.
 • कमी अन्नद्रव्ये आणि पाण्याची आवश्यकता.
 •  ठराविक अंतराने कापणी शक्य.
 • जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा (प्रथिने १० ते २५ टक्के) मिळतो. उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता. लागवडीचा खर्च कमी.
 • शेताच्या बांधावर किंवा कंटूर ओळीच्या बाजूने मातीची धूप कमी होण्यासाठी व सजीव कुंपण लागवड करता येते.
 • चारा देणारे वृक्ष वाढवणे सोपे. कमी मजूर किंवा कमी भांडवल लागते. त्याचबरोबर विविध उप-उत्पादने मिळतात.
 • झाडांच्या पानांपासून ब्रिकेट तयार करता येतात. या चाऱ्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते.
 • वृक्षांचा उपयोग चारा म्हणून केल्यास पशुधनापासून होणारे मिथेन उत्सर्जन कमी होते. तसेच व्यावसायिकदृष्ट्या पशूखाद्य तयार करण्यासाठी होणारे कार्बन उत्सर्जन देखील कमी करण्यात मदत होते.

चाऱ्यासाठी झाडांची लागवड 

शेवगा 

 • शेंगा व फुले प्रामुख्याने भाजी म्हणून प्रचलित आहेत. शेंगांचा औद्योगिक, औषधी, कृषी व्यवसायामध्ये आणि पशू खाद्य म्हणून वापर. हे पौष्टिक, वेगाने वाढणारे, दुष्काळ सहन करणारे झाड आहे. याच्या पाल्यात १५-३० टक्के प्रथिने आहेत.
 • जाती: भाग्या, पीकेएम १ व पीकेएम २, ओडीसी, देशी
 • लागवड :  जून-ऑगस्टमध्ये लागवड करावी. तथापि, मध्यम हवामानात आणि सिंचन उपलब्धतेसह वर्षाच्या कधीही लागवड करता येते. 
 • प्रति हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते. सरासरी १ किलो बियांपासून सुमारे २५०० रोपे तयार होतात.
 • मथुरा येथील सीआरजीजी या संस्थेने चारा उत्पादनाच्यादृष्टीने सघन लागवडीसाठी ३० सेंमी बाय ३० सें.मी. अंतराची शिफारस केली आहे. परंतु पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि जमिनीची प्रतवारीनुसार लागवडीचे अंतर ठरवावे.
 • कमी पाण्याच्या भागात ३ मी x १ मी किंवा २ मी x १ मी या अंतरावर लागवड करावी.
 • खत व्यवस्थापन : मशागतीवेळी प्रति हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. साधारणपणे प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, स्फुरद आणि पालाश देण्याची शिफारस आहे. वर्षभरात तीन टप्यामध्ये खताची मात्रा द्यावी.
 • पाणी: कोरडवाहू हंगामासह वर्षभर पालवी येण्यासाठी साधारणपणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन आवश्यक आहे. पाणी बचतीसाठी तसेच जास्त उत्पादन मिळण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते.
 • छाटणी वेळ: पहिली छाटणी १२० ते १५० दिवसांनी ३० ते ४५ सेंमी उंचीवर करावी.त्यानंतर दर ४५ ते ६० दिवसांनी छाटणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांना पाला आणि शेंगा घ्यायच्या असतील त्यांनी ८ ते १० महिन्यांनी सुमारे १.५ मी उंचीवर छाटणी करावी. एकदा लागवड केल्यास हिरव्या चारा सुमारे ८ ते १० वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते.
 • उत्पादन: बागायती क्षेत्रामध्ये वर्षाकाठी ६ ते ८ छाटण्या दरम्यान प्रति हेक्टरी ८० ते १०० टन हिरवा चारा मिळतो. कमी पाण्याच्या भागात प्रति हेक्टरी १५ ते २० टन चारा निर्मिती केली जाऊ शकते.

(टीप: लागवडीसाठी शेवगा बियाणे स्वतः तयार केलेले वापरावे.)

हादगा 

 • या झाडाची वाढ वर्षभर सुरू असते. पडीक किंवा मुरमाड जमिनीत तसेच कमी पाण्यामध्ये या झाडापासून पाल्याचे चांगले उत्पादन मिळते.
 • या झाडाचा पाला सर्व जनावरांसाठी योग्य आहे. विशेषतः शेळी, मेंढीसाठी अतिशय पौष्टिक आहे. हे अतिशय वेगाने वाढणारे झाड आहे. याच्या पाल्यामध्ये २५ टक्के प्रथिनांची मात्रा आहे.
 • पूर्ण खाद्याच्या फक्त ८ ते १० टक्के याच्या पाल्याचा समवेश करावा.
 • देशी प्रजातींचा लागवडीसाठी उपयोग करावा.

लागवड 

 • लागवड पावसाळी हंगामात करावी. जिथे पाण्याच्या स्रोत असेल तिथे वर्षभर लागवड करता येते.
 • सरळ वाढणाऱ्या झाडाच्या शेंगा मार्च ते एप्रिल मध्ये एकत्रित करून सावली मध्ये सुकवून ठेवाव्यात.
 • पडीक जमिनीत १ मिटर बाय १ मीटर अंतरावर लागवड करावी. बांधावर किंवा सजीव कुंपण म्हणून लागवड करताना १ मिटर अंतर ठेवावे. नागमोडी पद्धतीने लागवड करावी.

खत व्यवस्थापन
या पिकाला खतमात्रेची गरज कमी असते. मात्र योग्य मात्रा दिली तर उत्पादन वाढविण्यास मदत होते. लागवडीच्यावेळी माती परिक्षणाच्या शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी.

पाणी
लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. पावसाळ्यामध्ये लागवड केल्यास पाण्याची विशेष गरज लागत नाही.

छाटणी वेळ
पहिली छाटणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्याने करता येते. त्यानंतरच्या छाटणी ५० ते ६० दिवसाच्या अंतराने करू शकतो.

उत्पादन: ५०-६० टन प्रती वर्षी

सुबाभूळ

 • हा एक जलद गतीने वाढणारा चारा वृक्ष आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात बिया तयार होतात.
 • दुष्काळग्रस्त भागामध्ये या झाडाला पहिले दोन वर्ष वाढून द्यावे आणि नंतर मग छाटणी करावी.
 • जनावरांना नवीन पाला देण्याचे टाळावे, कारण पानांमध्ये मायमोसिन हा विषारी घटक असतो. हा घटक जनावरांसाठी घातक ठरू शकतो.

जाती
के ३४१, के ८, सुबाभूळ सीओ-१, एफडी- १४२३, निर्बिजा

लागवड 

 • लागवड पावसाळी हंगामात केली जाते. जून-जुलैमध्ये लागवड केल्याने उगवण व्यवस्थित होऊन झाडांची वाढ व्यवस्थित होते. जिथे पाण्याची उपलब्धता असेल तिथे वर्षभर लागवड करता येते.
 • लागवड १मीटर बाय १ मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी बियाणे गरम पाण्यात एक रात्रभर भिजवावे. लागवडीच्यावेळी रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बियाणाची उगवणक्षमता वाढते.
 • लागवड करताना माती परिक्षणाच्या शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी. सुबाभूळ जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करते.

पाणी
लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सहसा या पिकाला पाण्याची आवश्यकता कमी लागते. परंतु १५ ते २० दिवसातून आवश्यकतेनुसार पाणी दिल्याने उत्पादनात वाढ होते.

छाटणीची वेळ
पहिली छाटणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्याने जमिनीपासून ९० ते १०० सेंमी उंचीवर करू शकतो. त्यानंतरची छाटणी ५० ते ६० दिवसाच्या अंतराने करू शकतो. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सुमारे ९० ते १०० दिवसांच्या अंतराने वर्षातून तीन छाटण्या करू शकतो.

उत्पादन
सुरवातीच्या काही वर्षामध्ये प्रति हेक्टरी १२ ते १५ टन प्रती वर्षी चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.

संपर्क - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती,जि.पुणे )


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची संधीसोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी...
उसाला पर्याय ठरण्याची उन्हाळी नाचणीत...कोल्हापूर : उन्हाळी नाचणी उसाचे कमी उत्पादन...
सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबत...सांगली ः टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन...
सौर प्रकल्पासाठी ८६ ग्रामपंचायतींचे...नागपूर : महा कृषी ऊर्जा धोरणांतर्गत शेतीला...
‘श्रद्धा’चा दूध व्यवसाय युवा पिढीला...नगर ः श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा...
कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला...नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
डाळिंबातील कीड- रोग नियंत्रणबहर व्यवस्थापन छाटणी मे महिन्यामध्ये केली असल्यास...
शेतकरी नियोजन पीक : शेवंतीमाझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक...
देवराई संवर्धनातून आदिवासींसाठी...मेघालयामध्ये देवराई संरक्षण आणि संवर्धनाला...
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...