वनशेतीमध्ये मेलिया डुबियाची लागवड

देशात गेल्या दशकापासून मेलिया डुबियाची वनशेतीमध्ये लागवड वाढू लागली आहे. ही एक देशी प्रजाती आहे. याव्यतिरिक्त पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याबरोबर कर्बाचे स्थिरीकरण, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि एकत्रितरीत्या उत्पादकता वाढविण्याची क्षमता या झाडामध्ये आहे.
Intercropping of asparagus in Melia dubia
Intercropping of asparagus in Melia dubia

देशात गेल्या दशकापासून मेलिया डुबियाची वनशेतीमध्ये लागवड वाढू लागली आहे. ही एक देशी प्रजाती आहे. याव्यतिरिक्त  पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याबरोबर कर्बाचे स्थिरीकरण, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि एकत्रितरीत्या उत्पादकता वाढविण्याची क्षमता या झाडामध्ये आहे. मेलिया डुबिया ही  वेगाने वाढणारी, स्थानिक आणि नीम-सदाहरित प्रकारातील प्रजाती आहे. पूर्णपणे वाढलेल्या वृक्षाची उंची सामान्यपणे २० ते २५ मीटर व खोडाचा घेर १२० ते १५० सेंमी असतो. भारतामध्ये मेलिया डुबिया हे मलबार नीम, घोरा नीम, महानीम, लिंबारो, मलाई वेंबू या नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्रामध्ये वनशेती अभियान आणि रोजगार हमी योजने अंतर्गत मेलिया डुबियाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.  हवामान आणि जमीन 

  • हे झाड नैसर्गिकरित्या उष्णकटिबंधीय नीम-सदाहरित, दमट व पानगळीच्या वनांमध्ये आढळते. 
  • भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतातील पश्चिम घाटात व कमी-अधिक प्रमाणात सिक्कीम, हिमालय, उत्तर बंगाल, आसाम, ओरिसाच्या खासी टेकड्या, दख्खन आणि पश्चिम घाटामध्ये समुद्रसपाटीपासून ६०० ते १८०० मीटर उंचीवर आढळते. 
  • योग्य वाढीसाठी वार्षिक पर्जन्यमान १००० मि.मी.पेक्षा अधिक लागते. परंतु बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास ६०० मि.मी. पावसाच्या क्षेत्रात वाढू शकते. या प्रजातीसाठी सर्वोत्कृष्ट तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आवश्यक असते. या प्रजातीस जास्त सूर्यप्रकाशाची गरज असते, परंतु सागवान, सुरू आणि नारळ बागांच्या मध्यम सावलीत देखील वाढते.
  • विविध प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करण्यास योग्य प्रजाती आहे. थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा निचरा होणारी लाल, चिकणमाती,काळ्या जमिनीतही लागवड शक्य आहे. लागवड योग्य जमिनीचा सामू  ५.५ ते ७.५ एवढा असावा. मातीची खोली १.५-२ मिटर असावी. काळ्या व पाणी साचून राहणाऱ्या जमिनीमध्ये याची वाढ व्यवस्थित होत नाही.
  • रोपवाटिका निर्मिती  

  • रोपे बिया व शाखीय पद्धतीद्वारे तयार केली जातात. प्रामुख्याने बियांद्वारे रोपनिर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. निवडलेल्या बिजवृक्षापासून किंवा वनविभाग, संशोधन संस्था यांच्यामार्फत सुधारित गुणवत्तेची फळे जानेवारी ते मार्च महिन्यांत एकत्र करून लावण्यापूर्वी शेणाच्या गारीमध्ये २४ ते ३६ तास भिजवल्याने उगवण क्षमता २० टक्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते. 
  • उत्तम रोपांसाठी काळ्या रंगाच्या पॉलिथिन पिशव्या (२०x१० सेंमी) ३:१:१ (माती:वाळू:शेणखत) मिश्रणाने भरून उपचारित केलेले बियाणे २ सेंमी पुरावे. 
  • नियमितपणे सिंचन केल्याने ३० दिवसानंतर उगवण सुरू होते आणि ७० दिवसांपर्यंत चालू राहते. सहा महिन्यांमध्ये ४५ सेंमी उंच व १ सेंमी जाड असलेली रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
  • या पद्धतीव्यतरिक्त, मिनी नोडल कटिंगद्वारे सुद्धा दर्जेदार रोपे तयार केली जातात. यामध्ये मातृबाग तयार करण्यासाठी शेडनेटमध्ये सिमेंटच्या कुंडीत १५ x १० सेंमी. वरती सुधारित बियांपासून किंवा कलमाद्वारे  रोपे तयार केली जातात. याला ठिबक सिंचनाची सोय करावी. या रोपांपासून प्रत्येक ३० दिवसाला कोवळे शेंडे २% बुरशीनाशकामध्ये १० मिनिटे ठेवले जाते. त्यानंतर या कटिंगचा खालचा भाग आयबीए ( २००० पीपीएम) पावडर मध्ये बुडवून कोको पीट भरलेल्या रूट ट्रेनर मध्ये लावला जातो. हे कटिंग हवामान नियंत्रित हरितगृहामध्ये ठेवले जाते. हरितगृहामध्ये ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान व  ८५ ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता नियंत्रित करून दर २० ते ३० मिनिटांनी फॉगर्सच्या माध्यमातून पाणी द्यावे.  
  • साधारणपणे १५ दिवसांनी कटींगला मुळे येतात. ३० दिवसांमध्ये रोप हार्डनिंग करण्यासाठी सावलीत ठेवावीत. या कालावधीत, नियमितपणे दिवसातून दोनदा पाणी आणि ५ ग्रॅम प्रती रोप १९:१९:१९ चे द्रावण द्यावे.
  • लागवड तंत्र 

  • मे महिन्याच्या सुरवातीला जमिनीची खोल नांगरणी करून रोटाव्हेटरने मशागत करावी. 
  • साधारणपणे ४५×४५×४५ सेंमी किंवा ६०×६०×६० सेंमीचे खड्डे सुनिश्चित केलेल्या अंतरावर काढून ते  ५ किलो शेणखत, १०० ग्रॅम निंबोळी खत, ५० ग्रॅम डीएपी या मिश्रणाने भरावेत. 
  • लागवडीचे अंतर हे जमीन धारणा, बाजारातील गरज, आंतरपिकांचे प्रकार व पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. 
  • पाणी आणि खत व्यवस्थापन 

  • चांगल्या वाढीसाठी झाडे ही पावसाळ्यामध्ये लावावीत. पावसाळ्यानंतर प्रत्येकी १० ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन असेल तर आठवड्यातून ८ तास पाणी द्यावे. वनशेतीमध्ये आंतरपिकाला पाणी दिल्याने वृक्षांना  विशेष पाण्याची गरज लागत नाही. 
  • दरवर्षी प्रति झाड  २५ ते ५० ग्रॅम नत्र, स्फुरद पालाश याचे मिश्रण वापरल्यास योग्य वाढ वाढण्यास मदत होते. तिसऱ्या वर्षापासून खतांची मात्रा १०० ग्रॅम प्रति झाड द्यावी.
  • उत्पादन आणि काढणी चक्र  

  • झाडांच्या छाटणीचे वय त्याच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते. २ वर्षांपासून ते १० वर्षांपर्यंत बदलते.
  • मेलियाचे लाकूड काडेपेटी, लगदा, पेट्या बांधणी, इमारती लाकूड आणि प्लायवूड उद्योगात  वापरले जाते. वय आणि व्यासाच्या वाढीवर झाडांची विक्री होते. 
  • साधारणपणे ३ ते ५ वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे १५० ते २५० टन प्रती हेक्टर एवढ्या वजनाचे लाकूड निर्मिती करते. 
  • - संग्राम चव्हाण,   ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, ता. बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com