शेतकरी कंपनीसाठी सुविधा केंद्राची रचना

शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रातर्गत गावस्तरावर मूलभूत सुविधा जसे, की चाळणी यंत्र, प्रतवारी यंत्र, उत्पादित मालाचे पॅकिंग इ. बाबींचा अवलंब करून उत्पादित शेतीमालास योग्य भाव मिळून, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शेतीमालाची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून कामकाज सुरू करावे.
Design of facility center for farmer company
Design of facility center for farmer company

शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रातर्गत गावस्तरावर मूलभूत सुविधा जसे, की चाळणी यंत्र, प्रतवारी यंत्र, उत्पादित मालाचे पॅकिंग इ. बाबींचा अवलंब करून उत्पादित शेतीमालास योग्य भाव मिळून, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शेतीमालाची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून कामकाज सुरू करावे. शेतकरी कंपनीसाठी उत्पादित शेतीमाल व बाजारपेठ निर्मिती

  • शेतकरी कंपनी संचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतीमाल आणि व शेतजमिनीची यादी करावी. ही यादी कृषी सहाय्यक यांचेकडे उपलब्ध असते. त्याचा आधार घ्यावा. 
  • प्रती शेतकरी त्यांच्याकडील उत्पादित क्षेत्र व क्षेत्रातील हंगाम निहाय उत्पादित शेतीमाल या शेतीमालाचा शेतीपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास, उपलब्ध बाजारपेठा (जवळच्या व दूरच्या) यांची माहिती शेतकरी कंपनी संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संकलित करावी. 
  • शेतीमाल लागवड क्षेत्र व उत्पादन यावरुन शेतकरी कंपनीच्या कार्यक्षेत्रात किती शेतीमाल विक्रीस उपलब्ध असतो याचा अंदाज येऊ शकतो. या अंदाजावर शेतकरी कंपनीस कोणता व्यवसाय सुरु करावयाचा याचा निर्णय संचालक मंडळ घेऊ शकते. वरील माहितीवरून शेतकरी कंपनीमार्फत कोणत्या सेवा शेतकऱ्यांना देता येऊ शकतील याची यादी संचालक मंडळाने तयार करून सभासद संख्या वाढीसाठी मोहीम सुरु करावी. बाजारपेठेच्या निर्मितीच्या अनुषंगाने शेतकरी सामूहिक सुविधा केंद्र निर्मिती करावी. 
  • शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र 

  • एका विशिष्ट उद्देशापोटी उत्पादन घेणारे ३ ते ५ कि. मी. परिसरातील ३०० ते ३५० शेतकऱ्यांनी मिळून एका विशिष्ट उद्देशाने व ध्येयाने स्थापन केलेली उत्पादक कंपनीने निर्माण केलेले सुविधा केंद्र म्हणजे “शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र” (Farmers Common Service Center-FCSC) होय. 
  • शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रासाठी स्वत:ची किमान ४० ते १०० गुंठे जागा शक्यतो विकत/ दानपत्र/ बक्षीसपत्र असे कंपनीच्या नावावर असावे. त्याची ७/१२ व ८ अ वर नोंद असावी.  
  • शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रातर्गत गावस्तरावर मूलभूत सुविधा जसे, की चाळणी यंत्र, प्रतवारी यंत्र, उत्पादित मालाचे पॅकिंग इ. बाबींचा अवलंब करून उत्पादित शेतीमालास योग्य भाव मिळून, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शेतीमालाची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून कामकाज सुरू करावे.
  • जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातील (एमएसीपी) मार्गदर्शक सूचनांनुसार सामूहिक सुविधा केंद्राचे दोन प्रकार आहेत. १) शेतकरी सामूहिक सुविधा केंद्र (धान्ये व तेलबिया ) २)  शेतकरी सामूहिक सुविधा केंद्र (फळे व भाजीपाला) 
  • सुविधा केंद्राची रचना शेतकरी सामूहिक सुविधा केंद्र (धान्ये व तेलबिया ) 

  • शेतकरी कंपनीने सामूहिक सुविधा केंद्रासाठी किमान १०,०००  चौरस फूट जागा विकत / दत्तक / बक्षिस / दानपत्र / भाड्याने घ्यावी. आवश्यकतेनुसार ७/१२  व ८ अ वर नोंद घ्यावी. या जागेवर कोणताही बोजा नसावा. 
  • प्रति शेतकरी सामुदायिक सेवा केंद्र किमान १ टन प्रति तास क्षमता असलेले स्वच्छता, वर्गीकरण  व पॅकिंग मशिनरी सह शेडचे बांधकाम. 
  • साठवणूक व वाळवणुकीद्वारे शेतीमाल गुणवत्तेत सुधारणा करणे, पॅकिंग साहित्य (उदा. पोती, सुतळी इ.)
  • इतर आवश्यकतेनुसार लागणारी शेती उपकरणे. 
  • सामूहिक सुविधा केंद्राची जोडणी वखार महामंडळाच्या गोदामांशी करून त्यांना शेतीमाल साठवणुकीवर कर्ज व ई-ट्रेडिंग सुविधांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे. 
  • शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारणी करणे. 
  • शेतीमालासह बाजार जोडणी व बँकेस आर्थिक सहकार्यासाठी जोडणी. 
  • शेतकरी सामूहिक सुविधा केंद्र  (फळे व भाजीपाला)

  • शेतकरी सामुदायिक सेवा केंद्रामध्ये स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग सुविधा निर्माण करणे. 
  • लहान ३०० चौ. फूट आकाराची चांगली जमीन, पुरेशी हवा, प्रकाश सुविधा व शौचालयाच्या सुविधेसह बांधलेली सिमेंट, पत्रा आच्छादित बंदिस्त खोली. 
  • गरजेनुसार क्रेट, वजनकाटा, पॅकिंग यंत्र 
  • फळे व भाजीपाला वर्गीकरण व पॅकिंग करण्यासाठी टेबल (गरजेनुसार) 
  • इतर आवश्यकतेनुसार लागणारी शेती उपकरणे. 
  • पीकनिहाय व्यवसाय 

  • शेतकरी कंपनीने पीकनिहाय व्यवसाय उभारणी करणे आवश्यक आहे. सुरवातीला आपल्या परिसरातील मुख्य पिकावर कामकाज सुरू करावे. मुख्य पिकाचा प्रवास किंवा त्याची मूल्यसाखळी तपासून पाहणे आवश्यक आहे.यामध्ये शेतीमालाचा शेतातून ग्राहकाच्या आहारापर्यंत प्रवास समजून घेऊन त्यातील कोणत्या कोणत्या पायरीवर काम करता येईल यावर विचार होणे आवश्यक आहे. 
  • मुख्य पिकाची लागवड आणि निर्णय, लागवड निर्णयावर अवलंबून विविध कारणे, निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, त्यांचे पिकाबाबत ज्ञान, विक्री व्यवस्था, उपलब्ध पायाभूत सुविधा इत्यादी बाबींवर शेतकरी कंपनीने अहवाल तयार करून व्यवसायाच्या निर्णयाप्रत येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, केळी उत्पादन व विक्री या विषयावर काम सुरू केले तर केळी रोपवाटिका, उतिसंवर्धन प्रयोगशाळा, केळी लागवडीकरिता आवश्यक यंत्रणा किंवा मनुष्यबळ, पाणी देण्याच्या पद्धतींचा वापर उदा.ठिबक, तुषार सिंचन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, विक्री व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, शासकीय योजना व सहकार्य, प्रक्रिया उद्योग, केळी लागवड करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान सहकार्य इत्यादी. यापैकी कोणत्या भागापासून अथवा कोणत्या घटकापासून शेतकरी कंपनीच्या व्यवसायाचा शुभारंभ करावयाचा ते संचालक मंडळाने ठरवावे.     
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० ( कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com