उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचना

जनावराची आरोग्य तपासणी करण्यासाठी बनविलेले उपकरण.
जनावराची आरोग्य तपासणी करण्यासाठी बनविलेले उपकरण.

एसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतनमधील इलेक्र्टॉनिक इंजिनिअरींग डिप्लोमाच्या चौथ्या वर्षाला असणाऱ्या सलोनी राणे, वृषाली भाष्टे, निता जाधव आणि वृषाली हरड या विद्यार्थिनींनी पशुपालकांची गरज लक्षात घेऊन गाई, म्हशी आजारी पडण्याची पूर्वसूचना देणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण स्मार्ट फोनवर चालते. या संशोधनाबाबत विद्यार्थिनींना अहमदाबाद येथील सृष्टी आणि बायरॅक या संस्थांनी ‘बायोटेक इनॉव्हेशन इग्निशन स्कूल`मध्ये एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. ‘‘आम्ही चौघी शिक्षणासाठी मुंबईतील तंत्रनिकेतनमध्ये असलो तरी आमचे कुटुंब ग्रामीण भागातीलच आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात अहमदाबाद येथील सृष्टी संस्थेच्या ‘समर स्कूल`मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथे पशुपालकांची समस्या लक्षात घेऊन जनावर आजारी असल्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित करण्याचे ठरविले. याबाबत पशुपालकांशी चर्चा केली. यातून कळाले की, जनावर आजारी आहे, हे लगेच लक्षात येत नाही. जनावरांचे दुग्धोत्पादन कमी झाले किंवा त्यांच्या हालचाली मंदावल्यानंतरच कळते. त्यामुळे उपचाराचा खर्च वाढतो, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जनावर आजारी असल्याची पूर्वसूचना देणारे आणि पशुपालकास सहजपणे हाताळता येईल असे उपकरण विकसित करण्याचे ठरविले. यासाठी गुजरातमधील प्रयोगशील पशुपालक आणि पशुतज्ज्ञांशी चर्चा केली. या संशोधनासाठी सृष्टी संस्थेच्या समर स्कूल संकल्पनेचे आयोजक डॉ. अनिल गुप्ता यांचे मार्गदर्शन मिळाले. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही उपकरणाची यशस्वी चाचणीदेखील घेतली... गेल्या वर्षभरातील संशोधनाचे टप्पे सलोनी राणे सांगत होती.

असे होते संशोधनाचे टप्पे : जनावरांना आजाराच्या सुरवातीच्या काळातच योग्य उपचाराची गरज असते. उपचारास उशीर झाला तर प्रकृतीवर परिणाम होतो, खर्च वाढतो. यावर मात करण्यासाठी जनावर आजारी पडणार आहे किंवा पडत आहे याची पूर्वसूचना देणारे छोटे उपकरण विकसित करण्याचे विद्यार्थिनींनी ठरवले. याबाबत सलोनी राणे म्हणाली की, पशुतज्ज्ञांच्या चर्चेतून असे समजले की जनावर आजारी पडताना पहिल्यांदा शरीर तापमानामध्ये चढ उतार होतात. त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात. साधारणपणे जनावराचे शारीरिक तापमान १०१ ते १०३ अंश फॅरानाईट आणि हदयाचे ठोके ४५ ते ५५ बीपीएम असतात. यामध्ये सातत्याने कमी किंवा जास्त चढ उतार आला तर निश्चितपणे पुढील काळात जनावर आजारी पडणार हे समजते. पहिल्या टप्प्यात तयार केलेल्या उपकरणाद्वारे तापमान किंवा हृदयाचे ठोके मोजताना बझर वाजायचा, त्यामुळे जनावर बैचेन व्हायचे. ही अडचण लक्षात घेऊन बझरएेवजी लाल आणि हिरव्या रंगाचे एलईडी दिवे लावले. यासाठी लहान बॅटरी वापरली. या उपकरणात गाय, म्हैस आणि लहान वासरू यांचे हद्याचे ठोके आणि शारीरिक तापमान मोजण्यासाठी वेगवेगळे बटण ठेवले. त्यामुळे योग्य रीडिंग मिळायचे. उपकरणामध्ये सुधारणा करण्यासाठी आयआयटी मुंबईमधील तज्ज्ञ प्रा. बी. के. चक्रवर्ती आणि प्रा. आशिष ठुलकर यांचे मार्गदर्शन मिळाले. याच दरम्यान स्मार्ट फोनचलीत उपकरण निर्मितीबाबतही आम्ही  संशोधन केले. यामध्येही यश आले. तापमान आणि हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आम्ही एक ॲप स्मार्ट फोनवर डाऊनलोड केले. त्यानुसार जनावराचे तापमान आणि हृदयाच्या ठोक्यांची वारंवारता तपासणे सोपे जाऊ लागले. स्मार्टफोनमध्ये सर्व माहिती साठविता येते. या संशोधनासाठी आम्हाला गाईड म्हणून अरविंदकुमार मिश्रा, विभाग प्रमुख दिनेश गिरप आणि प्राचार्य डॉ. सचिन लढ्ढा यांचे मार्गदर्शन मिळाले. शिक्षण संपल्यानंतर आम्ही चौघी मिळून हे उपकरण तयार करणारे स्टार्ट अप सुरू करणार आहोत. या माध्यमातून देशभरातील पशुपालकांच्या पर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी होते तपासणी जनावराच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी उपकरणाला छोटीशी रिंग जोडलेली आहे. ही रिंग जनावराच्या शेपटी खाली ठेवली की लगेच स्मार्ट फोनवर तापमान दिसू लागते. जनावराचे हद्याचे ठोके मोजण्यासाठी इसीजीसाठी लागणाऱ्या तीन इल्केट्रोडचा वापर केला. हे तीन इल्केट्रोड जनावराच्या छातीशी लावले की त्याच्या हृदयाचे ठोके आणि त्यांची वारंवारता उपकरणाच्या माध्यमातून स्मार्ट फोनवर दिसते. जेव्हा सातत्याने तापमान किंवा हद्याचे ठोके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त असतील तर निश्चितपणे पुढील दिवसांत जनावर आजारी पडणार आहे हे लक्षात येते. उपकरणाची वैशिष्ट्ये

  • जनावराच्या शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके मोजते.
  • सामान्य पातळीपेक्षा तापमान आणि हृदयाच्या ठोक्यांची गती सातत्याने कमी किंवा जास्त झाली, तर निश्चितपणे जनावर पुढील काही दिवसांत आजारी पडण्याची पूर्व सूचना हे उपकरण देते.
  • उपकरणाला ऊर्जेची गरज नाही. स्मार्ट फोनला जोडून निरिक्षणाचा डेटा दिसतो.
  • स्मार्ट फोन नसल्यास बेसिक मोबाईल फोनमध्ये एसएमएसच्या माध्यमातून निरीक्षणाचे आकडे समजतात.
  • पशुपालक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना उपकरण हाताळण्यास सोपे.
  • परदेशातील उपकरणांच्यापेक्षा अत्यंत कमी किंमतीत निर्मिती.
  • उपकरण येणार बाजारपेठेत... विद्यार्थिंनी, तंत्रनिकेतन आणि सृष्टी संस्था मिळून या तंत्रज्ञानाचे पेटंट घेत आहोत. प्रधानमंत्री युवा विकास योजनेतंर्गत आंत्रप्रेनर सेल विकसित केला आहे. येत्या काळात हे उपकरण स्टार्ट अपच्या माध्यमातून पशुपालकांच्या पर्यंत नेण्याचे आम्ही ठरविले आहे. - दिनेश गिरप, प्रमुख, इलेक्र्टॉनिक्स विभाग, प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन, मुंबई

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com