बटाटा मूल्यसाखळीतील विविध टप्पे..

बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर असे निदर्शनास येईल, की बाजारपेठेतील व्यापारी हे महत्त्वाचे कार्य बटाटा मूल्यसाखळीत निभावतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना या मूल्यसाखळीत मोठा वाव आहे.
Different stages in the potato price chain.
Different stages in the potato price chain.

बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर असे निदर्शनास येईल, की बाजारपेठेतील व्यापारी हे महत्त्वाचे कार्य बटाटा मूल्यसाखळीत निभावतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना या मूल्यसाखळीत मोठा वाव आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या परीसरातील मुख्य पिकांची मूल्य साखळी ओळखून त्यावर आधारित व्यवसायाची निवड करणे आवश्यक आहे. यामध्ये शेतीमालाचा शेतातून ग्राहकापर्यंतचा प्रवास समजून घेऊन त्यातील कोणत्या भागावर काम करता येईल, यावर विचार होणे आवश्यक आहे. बटाटा उत्पादन व विक्री व्यवस्थापन या बाबींवर विचार केला, तर शेतीमाल लागवड, काढणी, विक्री व विक्रीपश्‍चात सेवा यापैकी कोणत्या भागापासून व्यवसायाचा शुभारंभ करावयाचा याचा अभ्यास व निर्णय संचालक मंडळाने घ्यावा. बटाटा बियाणे खरेदी,   पुरवठा आणि घाऊक खरेदी-विक्री

  • बटाटा लागवडीमध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे बटाट्याचे बियाणे. प्रमाणित व चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. 
  • राज्यातील बटाटे बियाण्याची परिस्थिती पाहिली तर राज्यात बटाटा बियाणे उगवणीबाबत फारसे कामकाज झालेले नाही.
  • कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, येथे टी.पी.एस. (ट्रू पोटॅटो सीड) बेण्याबाबत कामकाज झाले, तळेगावस्थित (एन.आय.पी.एच.टी.) राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एरोपॉनिक्स तंत्रज्ञानावर आधारित बटाटा बियाणे उत्पादनाचे प्रयोग करण्यात आले. यास काही प्रमाणात यश आले असले तरी संपूर्ण राज्याची बियाण्याची गरज भागविण्यासाठी हे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकरी, बटाटा बियाण्याची गरज दोन प्रकारे भागवितात.
  • बाजारातील उपलब्ध बटाटे आणून त्यातील चांगले बटाटे निवडून त्याच्या पृष्ठभागावरील डोळ्यांच्या जागा निवडून बटाट्याच्या फोडी कराव्यात. या फोडी निर्जंतुक करून या फोडींचा उपयोग बटाटा लागवडीसाठी केला जातो.
  • दुसरा प्रकार म्हणजे बाजार समितीमधून किंवा व्यापाऱ्यांकडून बटाटे बियाणे आणून त्याचा उपयोग बटाटा लागवडीसाठी केला जातो.
  • महाराष्ट्रात बटाटे बियाण्याकरिता मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुसेगाव (जि. सातारा) येथील बियाणे राज्यातील शेतकरी मुख्यत्वे करून वापरतात. आंबेगाव (जि. पुणे) आणि पुसेगाव, (जि. सातारा) या ठिकाणी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बटाट्याचे उत्पादन घेतले जाते.
  • कर्नाटक येथील हासन या भागात खरीप बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. देशातील बटाटा उत्पादन शक्यतो रब्बी हंगामात घेतले जाते. वरील तीन ठिकाणी खरीप हंगामात सुद्धा 
  • उत्पादन घेतले जाते. या तीनही भागांत बटाट्याचे बेणे पंजाब व हरियाना या राज्यांतून मागविण्यात येते.
  • बटाटे बेण्याचा प्रवास पाहिला तर यात पंजाब, हरियाना व गुजरात राज्यातील शेतकरी वर्गाने आघाडी घेतलेली आहे. हजारो एकरांवर विविध जातींची लागवड शेतकरी वर्गाकडून ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत केली जाते. फेब्रुवारीच्या पहिल्या ते शेवटच्या आठवड्यात या बेण्याची काढणी करून बेणे स्वच्छ केले जाते, त्याची प्रतवारी केली जाते. या प्रतवारी केलेल्या बेण्याची साठवणूक तेथील अवाढव्य शीतगृहामध्ये तेथील शेतकरी करतात. 
  • महाराष्ट्रातील व्यापारी पंजाब येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधून बटाट्याच्या बेण्याचे बुकिंग करताना संपूर्ण रक्कम व प्रति पोते शीतगृहभाडे रक्कम तेथील शेतकऱ्यांना एक रकमी जमा करतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये साठवलेले बेणे वाहतूक खर्च अदा करून महाराष्ट्रातील प्रामुख्याने मंचर येथील व्यापारी जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात विक्रीस आणायला सुरुवात करतात. प्रत्येक व्यापारी त्याच्या ऐपतीनुसार दोन ट्रकपासून पुढे बटाटा बेणे राज्यात घेऊन येतो. हे बेणे व्यापारी शेतकऱ्यांना बटाटा बियाण्याची पूर्ण रक्कम घेऊन किंवा दोघांमध्ये झालेल्या सौद्यानुसार रक्कम ठरवून विक्री करतात. शेतकरी या बेण्याची लागवड करण्यास जूनपासून सुरुवात करतात. याच शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे परिपक्व बटाट्याची खरेदी व्यापारी वर्गाकडून केली जाते किंवा शेतकरी परिपक्व बटाटा बाजार समितीत विकतात. जवळपासच्या परिसरात साठवणुकीच्या व्यवस्था असल्यास बटाटा शीतगृहात साठविला जातो. 
  • बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर असे निदर्शनास येईल, की बाजारपेठेतील व्यापारी हे महत्त्वाचे कार्य बटाटा मूल्यसाखळीत निभावतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना या मूल्यसाखळीत मोठा वाव आहे.
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना संधी बेण्याची घाऊक खरेदी आणि विक्री 

  • शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सभासदांच्या मागणीनुसार, परिसरात येणाऱ्या जातीनुसार बाजारपेठेतील मागणीनुसार अशा विविध हेतूच्या आधारे बेण्याची शेतकरी सभासदांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सभासद नोंदणीमार्फत ही माहिती उपलब्ध होऊ शकते. 
  • बटाटे बेणे बुकिंगकरिता खेळते भांडवलाची तरतूद वित्तीय संस्था किंवा भागभांडवलातून करावी. सभासदांना योग्य दरात बेणे विक्री किंवा वितरण करावे. या प्रकारातून शेतकरी उत्पादक कंपनीला उत्पन्न मिळू शकते.
  • बटाट्याची घाऊक खरेदी आणि विक्री

  • बटाटा परिपक्व झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीने बटाटा खरेदी किंवा संकलन सभासदांकडून करावे. हा उत्पादित माल शीतगृहाची व्यवस्था असल्यास तेथे ठेवावा किंवा इतर मार्गांनी त्याची विक्री करावी. बटाटा विक्री हॉटेल, प्रक्रिया उद्योग मॉल, किरकोळ विक्रेते अशा माध्यमातून करण्यास प्राधान्य द्यावे.
  • बटाट्याचे संकलन करण्यासाठी सुसज्ज पॅक हाउस व शीतगृह अशा प्रकारची व्यवस्था असावी.
  • शेतकरी कंपनीने सुरवातीच्या काळात अशा सुविधा उभारणीसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा किंवा अशा प्रकारची सुविधा भाड्याने 
  • काही काळापुरती उपलब्ध झाल्यास त्यास प्राधान्य द्यावे.
  • शेतकरी कंपन्यांनी बटाटा पिकासाठी करावयाचे कामकाज 

  • कृषी निविष्ठा पुरवठा व मार्गदर्शन केंद्र.
  • लागवड व काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी अवजारे बँक.
  • बियाणे खरेदी, पुरवठा आणि बटाट्याची घाऊक खरेदी व विक्री.
  • घाऊक खरेदी / संकलन  आणि विक्री.
  • दर्जेदार ब्रॅण्डकरिता  प्रक्रिया उद्योगात त्रयस्थ कंपनी म्हणून कामकाज.
  •  प्रक्रिया, ब्रॅण्ड निर्मिती आणि विक्री.
  • प्रक्रियायुक्त  पदार्थांची विक्री.
  • करार शेती.
  • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३० (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com