भारतातील प्राचीन गहू जातींचा शोध...

भारतीय उपखंडात शेतीचा विकास आणि प्रसार यांचा एक जटिल इतिहास आहे, जो नवपाषाण काळापर्यंत शोधला जाऊ शकतो.
Round grain wheat
Round grain wheat

भारतीय उपखंडात शेतीचा विकास आणि प्रसार यांचा एक जटिल इतिहास आहे, जो नवपाषाण काळापर्यंत शोधला जाऊ शकतो. इसवी सन पूर्व २६०० च्या आसपास दक्षिण आशियात उदयास आलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये लोकांनी खरीप आणि रब्बी या दोन हंगामांतील पीक लागवडीस सुरुवात केली. या कालावधीत, दक्षिण-पश्‍चिम आशिया, आफ्रिका, आग्नेय आशिया आणि जगातील इतर देशांतून आणलेल्या किंवा विकसित झालेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अनुकूलतेमुळे कृषी पद्धती बदलू लागली. भारतीय गव्हाचा इतिहास  नैर्ऋत्य आशियातून आलेल्या पिकांमध्ये गहू हे एक महत्त्वाचे पीक. त्याकाळी लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या एका जातीचे दाणे गोल होते, उंची कमी होती, लोंबी छोटी होती आणि खाण्यासाठी उत्तम होता.१९२१ मध्ये पर्सिव्हल या वनस्पती शास्त्रज्ञाने या गोल दाण्यांच्या गव्हाची वेगळी प्रजाती नमूद केले. या प्रजातीची उंची कमी असल्यामुळे त्याचे नाव ‘इंडियन ड्वार्फ व्हीट’ (कमी/छोटा उंचीचा भारतीय गहू) असे ठेवले. या गव्हाचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रिटिकम स्फिरोकोकम पर्सिव्हल’.

  • हा गहू प्राचीन दक्षिण आशियायी संस्कृतीत मुख्य हिवाळी पिकांपैकी महत्त्वाचा स्रोत होता. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत, मेहरगढ येथे सिंधू मैदानाच्या पश्‍चिम भागात या गव्हाचे पुरातत्त्व अवशेष मिळाले. मेहरगढ येथे सर्वप्रथम दक्षिण आशियातील शेती आणि पशुपालनाचा पुरावा मिळाला.
  • भारतात या गव्हाची लागवड उत्तर-पश्‍चिम हिमालय आणि हिंदुकुश पर्वत यांच्या दरम्यान असलेल्या भौगोलिक प्रदेशात पूर्व-ऐतिहासिक काळापासून होत होती. मोहेंजेदडो येथील उत्खननातून गोळा झालेले पुरातत्त्व पुरावे असे दर्शवितात, की हा गहू ख्रिस्तपूर्व ३००० च्या आसपास लागवडीखाली होता. सन १९४० च्या शास्त्रीय नोंदी असे सांगतात, की हिंदुस्थानामध्ये सिंध प्रांत, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर पसरली होती. ही गव्हाची जात दुष्काळी परिस्थितीतही टिकून होती. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्याची लागवड झपाट्याने कमी झाली, कारण या गव्हाला त्याच्या लहान आकारामुळे कोणतेही निर्यात मूल्य नव्हते. हा गहू केवळ स्थानिक वापरासाठी मर्यादित राहिला.
  • १९६० च्या दशकापासून सुरू झालेल्या हरित क्रांतीमुळे भारतामध्ये सुधारित कमी उंचीच्या गव्हाच्या जाती लागवडीखाली आल्या. भारतातील शेतकऱ्यांनी मेक्सिकोमधून आणलेल्या गहू जातींना प्राधान्य दिले. त्यामुळे भारतीय स्थानिक गव्हाच्या प्रजाती बहुतेक नष्ट झाल्या. याच कालावधीत गोल गहू नामशेष होण्याच्या मार्गावर आला.
  • २०१० मध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी आणि गुलगुंजनाळ गावात गोल गव्हाची लागवड झाल्याची नोंद आहे. पण २०११ नंतर या दोन गावांमधून या गव्हाचे अस्तित्व नाहीसे झाले.
  • सुदैवाने गोल दाण्याच्या गव्हाची जात अमेरिका, रशिया, जर्मनी आणि भारतातील जनुकीय बॅंकेमध्ये सुरक्षित आहे. भारतातील नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली या संस्थेमध्ये गव्हाच्या पारंपरिक जातींचे संवर्धन करण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश येथे काही शेतकरी या गव्हाची लागवड करत आहेत. या गव्हाचे उत्पन्न कमी असल्यामुळे याची लागवड फार कमी प्रमाणात आहे. कमी उत्पन्नामुळे दुर्लक्षित झालेल्या या गव्हाच्या जातीमध्ये काही चांगले गुणधर्म देखील आहेत. याचा उपयोग गव्हाच्या सुधारित जाती निर्माण करण्यात होऊ शकतो.
  • जातीची वैशिष्ट्ये 

  • कमी उंची, सरळ व छोटी पाने, फुटव्यांची क्षमता अधिक, लहान लोंबी असलेला गोल दाण्यांचा गहू. या गव्हाची निर्मिती काही हजार वर्षांपूर्वी ३डी या गुणसूत्रांमधील आनुवंशिक (म्युटेशन) बदलांमुळे झाली. या म्युटेशनमुळे स्फिरोकोकम एलील्स ‘एस १‘ जनुकाची निर्मिती झाली आणि या ‘एस १’ जनुकामुळे या गव्हाला कमी उंची, छोटी लोंबी, आणि गोल दाणे प्राप्त झाले. या गव्हाच्या दाण्यांचा आकार गोल असल्याने यामधून पांढरे पीठ अधिक मिळते.
  •  दैनंदिन वापरात असणाऱ्या गव्हापेक्षा स्फिरोकोकम गव्हामध्ये जास्त प्रथिने आहेत. एका परीक्षणानुसार यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.
  • पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना येथील अभ्यासातून हे समजले आहे, की या गव्हामध्ये ‘अमायलोज’चे प्रमाण सरबती गव्हापेक्षा जास्त आहे. त्यामुळे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असू शकतो. खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर वेगळी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते (हळूहळू येते की पटकन येते) यावर त्या अन्नपदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी चांगले असतात. स्फिरोकोकम गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे? आणि हा गहू खरंच मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे की नाही, यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
  • दाण्याचा लहान आकार आणि कमी उत्पादन क्षमता असून सुद्धा हा गहू भारतातील शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून जतन केला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा गहू प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीसाठी जतन करण्यात आला. परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन लेखात हे स्पष्ट झाले, की स्फिरोकोकम गव्हामध्ये भारतातील स्थानिक हवामान आणि मातीशी जुळवून घेण्याची चांगली क्षमता आहे. भारतातील कोरड्या हवामानामुळे अनेकदा पिकांवर दुष्काळाचा ताण येतो, ज्यामुळे फॉस्फेटसारख्या मातीमधील पोषक घटकांची उपलब्धता आणखी मर्यादित होते. स्फिरोकोकम गव्हामध्ये जास्त प्रमाणात असणारी प्रथिने धान्याच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाची होती. रोपांच्या लवकर वाढीसाठी हा एक महत्त्वाचा नायट्रोजन स्रोत देखील आहे.
  • या गव्हामधील एस १ जनुकाने दुष्काळ सहनशीलता वाढवली, फॉस्फेटचा वापर सुलभ केला. धान्यांमध्ये नायट्रोजनचे संचय सुधारले. याच कारणांमुळे भारतातील शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून हा गहू जतन केला आहे.
  • संपर्क :  डॉ. किरण गायकवाड, ९९५३२५८२३४ (आनुवंशिकी विभाग, भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com